परात्पर गुरु डॉ. आठवले यांंनी धारण केलेले श्रीकृष्ण आणि श्रीराम यांचे वस्त्रालंकार पाहून तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी केलेल्या टीकांचे खंडण !

‘१८ आणि १९ मे २०१७ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. ‘न भूतो न भविष्यती’ असा हा दिव्य सोहळा होता. केवळ आश्रमातील साधकांनीच नव्हे, तर भारत आणि विदेश येथील सहस्रो साधकांनी संगणकीय प्रणालीद्वारे या अलौकिक सोहळ्याचा आनंद लुटला. साधकांनी पहिल्या दिवशी श्रीकृष्णमय झालेल्या परात्पर गुरुंसमवेत द्वापरयुग आणि दुसर्‍या दिवशी श्रीराममय झालेल्या परात्पर गुरुंसह त्रेतायुग यांचे दैवी वातावरण अनुभवले. या घोर कलियुगात द्वापरयुग आणि त्रेतायुग यांची अनुभूती अनेक घंटे अनुभवण्याची अमूल्य संधी असंख्य साधकांना मिळाली, यासाठी आम्ही सर्व साधक भगवंताच्या चरणी कृतज्ञ आहोत; परंतु जसे त्रेतायुगात केवळ प्रभु श्रीराम नव्हता, तर रावणासारखे राक्षसही होते आणि द्वापरयुगात केवळ भगवान श्रीकृष्ण नव्हता, तर कंस अन् दुर्योधन यांसारखे दुर्जनही होते, तसेच या कलियुगात केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या दिव्य विभूती नसून हीन पातळीला जाऊन टीका करणारेही पृथ्वीवर आहेत, याची प्रचीती साधकांना आली. जगात सर्वच माणसे चांगली नसतात आणि कलियुगात तर दुष्ट लोक बहुसंख्यांक आहेत. अशा मंडळींनी साधकांनी अनुभवलेल्या आनंदावर विरजण घालण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर टीका करून त्यांची टिंगल केली. या लेखातून बुद्धीहीन लोकांनी केलेल्या टीकेचे खंडण करून सर्वांपुढे सत्य मांडण्याचा प्रयत्न करत आहे.

 

१. टीका : काहींनी परात्पर गुरु डॉ.
आठवले यांचा उल्लेख ‘पप्पू’ असा करून त्यांची टिंगल करणे

खंडण : श्रीरामाला रावणाने ‘वनवासी’ म्हणून हिणवले होते. श्रीकृष्णाला जरासंध, शिशुपाल, दुर्योधन आदी दुर्जन ‘गवळ्याचा पोर’ म्हणून अपमानित करत होते. तसेच आता कलियुगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा काही नतद्रष्ट ‘पप्पू’ असा उल्लेख करून त्यांची टिंगल करत आहेत. ‘अवतारांचा अवमान करणार्‍यांना कर्मफल न्यायाप्रमाणे पाप लागते’, हा भारताचा आजपर्यंतचा इतिहास आहे. हे टीकाकारांना ठाऊक नाही का ? जर त्यांना ठाऊक असेल, तर त्यांनी हे लक्षात ठेवावे की, अवतारांचा अवमान करणार्‍यांना ईश्‍वरेच्छेने पापांचे फळ भोगावे लागेल. इतिहासाची पुनरावृत्ती करू पहाणार्‍यांनी स्वत:च्या दृष्कृत्यांच्या भीषण परिणामांना सामोरे जाण्याचे धाडसही दाखवावे.

२. टीका : (म्हणे) चार लोकांना तरी डॉ. आठवले कोण आहेत, हे माहिती आहे का ?

खंडण : केवळ चार लोकांनाच नव्हे, तर भारतातील आणि जगभरातील असंख्य लोकांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे महान गुुरु आहेत’, हे ठाऊक आहेत. टीका करणार्‍या केवळ चार टाळक्यांना सोडून सहस्रो जणांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे कोण आहेत ?’, हे ठाऊकच आहे.

३. टीका : कसले भंपक अंक टाकताय ?

खंडण : ज्यांना सत्य आणि असत्य यांतील भेदच कळत नाही, अशा तथाकथित बुद्धीवंतांच्या बुद्धीची कीव येते. ‘सनातन प्रभातमधून केवळ आणि केवळ सत्यच छापले जाते’, असे गौरवोद्गार अनेक मान्यवरांनी सनातन प्रभातविषयी काढले आहेत. ‘सत्य म्हणजे सनातन आणि सनातन म्हणजे सत्य’, असे समीकरण आहे.

४. अवतारांविषयी केलेल्या विविध टीका

४ अ. टीका : कोण जी आठवले नावाची व्यक्ती आहे, ती रामाचा-कृष्णाचा अवतार आहे का ?

खंडण : परात्पर गुरु डॉ. आठवले हेे राम आणि कृष्ण यांचे अवतार आहेत, म्हणूनच ते धर्मसंस्थापना करण्यासाठी क्रियाशील आहेत. सत्ययुगापासून कलियुगापर्यंतच्या इतिहासात धर्मसंस्थापना करण्याचे कार्य केवळ श्रीविष्णूच्याच अवतारांनी केले आहे. हे शिवधनुष्य उचलणे कोणा येर्‍या गबाळ्याचे काम नाही. केवळ अवतारच हे शिवधनुष्य पेलू शकतात. परात्पर गुरु डॉ. आठवले श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे अवतार आहेत, त्यामुळेच त्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेचा, म्हणजे धर्मसंस्थापना करण्याचा संकल्प केलेला आहे. ते दिसतांना सामान्य मनुष्य वाटत असले, तरी त्यांचे विचार दिव्य आहेत आणि त्यांचे कार्य अवतारी आहे, हे आपण ओळखले पाहिजे.

४ आ. टीका : हा माणूस श्रीकृष्णाचा अवतार कसा
असेल आणि या आठवलेला तुम्ही रामाचा अवतार कसा केला ?

खंडण :

‘परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।

धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥४.८॥

– श्रीमद्भगवद्गीता

अर्थ : ‘साधू-साधकांचे रक्षण करण्यासाठी, दुर्जनांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची संस्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात पुन:पुन्हा अवतार घेतो’, हे भगवान श्रीकृष्णाने भक्तांना दिलेले वचन आहे.

‘कुणाला अवतार केले जात नसून, अवतार स्वयंभू असतो’, हे सत्यही टीकाकारांना माहित नाही का ? परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारीपणाविषयी शंका उपस्थित करून तथाकथित बुद्धीवादी माणसे भगवान श्रीकृष्णाच्या वचनावरच संशय व्यक्त करत आहेत.

५. टीका : कोण महर्षि ?

खंडण : त्रेतायुगात रावणाने त्याचे पिता विशर्वा ऋषी आणि आजोबा पुलस्त्य ऋषी यांचा वारंवार अपमान केला. कंसाला समजावण्यासाठी गेलेल्या नारदमुनींचे म्हणणे कंसाने धुडकावून लावले होते आणि त्याने गर्गमुनींचाही अपमान केला होता. राजमहालात महर्षि व्यासांचे आगमन झाल्यावर उद्धट दुर्योधनाला साधे उभे राहून हात जोडून नमस्कार करण्याचा शिष्टाचारही ठाऊक नव्हता. मतिभ्रष्ट लोकांना महर्षींचे महत्त्व कसे कळणार ?

६. टीका : हा धार्मिक भावना दुखावल्याचा प्रकार आहे.

खंडण : धार्मिकता आणि सात्त्विकता जोपासल्यामुळे प्रथम मनुष्याचे मन आणि नंतर त्याची बुद्धी सात्त्विक होते. मन सात्त्विक झाल्यामुळे मनात धार्मिक भावनांचा उदय होतो आणि बुद्धी सात्त्विक झाल्यामुळे धर्म-अधर्म यांतील भेद मनुष्याला कळू लागतो. ज्यांना ‘अध्यात्माचा गंध नाही आणि धार्मिकता म्हणजे काय ?’, हे ठाऊक नाही, त्यांनी धार्मिक भावना दुखावल्याचा कांगावा करू नये.

सनातन संस्था ही यांत्रिक मानवाप्रमाणे कार्यकर्ते घडवणारी संस्था नसून ईश्‍वराविषयी श्रद्धा आणि भाव जोपासणारे संत घडवणारी संस्था आहे. त्यामुळेच तर सनातनचे कार्य रात्रंदिवस चालू आहे आणि दिवसेंदिवस या कार्याची वृद्धी होत आहे. सनातनच्या साधकांच्या हृदयात प्रेम आणि भाव यांचा झरा वाहतो. त्यामुळे त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दिव्य स्वरूप ओळखले आणि त्यांना श्रीकृष्ण अन् श्रीराम यांच्या रूपात पाहून अत्यानंद अनुभवता आला. ‘गाढवाला गुळाची चव काय कळणार ?’, तशी तुम्हा टीकाकारांची स्थिती झाली आहे. तुम्ही इतके अभागी आहात की, तुम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दिव्यत्व जाणवतही नाही आणि कळतही नाही. बुद्धीने अवतारांचे महत्त्व जाणून घ्यायचे म्हटले, तर तुमची बुद्धी इतकी खुजी आहे की, तिला सत्य असणारे प्रमाण कळतही नाही आणि पटतही नाही. तुम्ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारत्व अनुभवू शकत नाही, हा दोष अवतारी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा नसून तुमचा आहे, हे लक्षात घ्या.

टीकाराकारांनो, परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर निरर्थक टीका करण्यात वेळ घालवण्यापेक्षा त्यांचे स्वरूप जाणून घेण्याची जिज्ञासा स्वत:च्या मनात जागृत करा आणि लवकरात लवकर साधनेला आरंभ करा. तुमच्या प्रश्‍नांची उत्तरे तुम्हाला आतूनच मिळतील आणि ज्याप्रमाणे सहस्रो साधक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दिव्य स्वरूप अनुभवत आहेत, त्याप्रमाणे तुम्हालाही अनुभवायला मिळेल.

‘हे भगवंता ! या नतद्रष्ट लोकांना जरा सुबुद्धी दे’, हीच तुझ्या चरणी प्रार्थना.’

– परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घडवलेली एक सामान्य साधिका, कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.५.२०१७)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment