‘१८ आणि १९ मे २०१७ या दिवशी महर्षींच्या आज्ञेने संपन्न झालेल्या अमृत महोत्सव सोहळ्यात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी श्रीकृष्ण आणि श्रीराम यांचे वस्त्रालंकार धारण केले होते.या सोहळ्यावर काही कथित बुद्धीप्रामाण्यवादी आणि काही सनातनद्वेष्टे सामाजिक प्रसारमाध्यमांतून अज्ञानमूलक अन् हीन पातळीवर जाऊन टीका करत आहेत. वास्तविक अध्यात्म हे जिज्ञासू आणि श्रद्धावंत यांच्यासाठी आहे. देवतेचे तत्त्व शब्दांत नव्हे, तर अनुभूतींतून अनुभवायचे असते. ज्यांच्याकडे अध्यात्म जाणून घेण्याची जिज्ञासा आणि श्रद्धा नाही, त्यांचे प्रबोधन करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी पालथ्या घड्यावर पाणीच असते. नास्तिकतावादी आणि सातत्याने विरोधासाठी विरोध करणारे सनातनद्वेष्टे अशा विद्वेषींकडून होणार्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आम्ही हिंदु राष्ट्र स्थापनेच्या विश्वकल्याणकारी कार्यातील वेळ घालवणार नाही. जे अध्यात्मातील जिज्ञासू आहेत, ज्यांना स्वतःचे शंकानिरसन करून घ्यायचे आहे, त्यांच्यासाठी ही प्रश्नोत्तरे प्रसिद्ध करत आहोत.
१. नाडीभविष्य म्हणजे काय ?
अखिल मानवजातीविषयी शिव-पार्वती यांच्यात झालेला संवाद सप्तर्षींनी ऐकला. त्यांनी तो मानवजातीच्या कल्याणासाठी आणि आध्यात्मिक जिवांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी लिहून ठेवला. हेच ते नाडीभविष्य ! नाडीभविष्य हे एक प्रगल्भ ज्योतिषशास्त्र आहे. ते ताडपत्राच्या पट्ट्यांवर लिहिलेले असते. महर्षींनी लाखो वर्षांपूर्वी लिहून ठेवलेल्या नाडीभविष्याचे वाचन करण्याचे कौशल्य आज अत्यल्प जणांकडेच उपलब्ध आहे. सध्याच्या नाडीपट्ट्यांवर तमिळ भाषेत माहिती लिहिली आहे. तमिळमध्ये ‘नाडी’ या शब्दाचा अर्थ ‘शोध घेणे’ थोडक्यात ‘स्व’चा शोध घेणे, असा होतो. नाडीवाचकांकडे प्रत्येक व्यक्तीची नाडीपट्टी असते.
१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या
अवतारत्वाचा केवळ एकाच नव्हे, तर विविध नाडीपट्ट्यांमध्ये उल्लेख
वर्ष २०१५ मध्ये झालेल्या सप्तर्षि जीवनाडीवाचनातच महर्षींनी ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे स्वयं श्रीविष्णूचे अवतार आहेत’, असे घोषित केले आहे. केवळ सप्तर्षि जीवनाडीपट्टीच नाही, तर वसिष्ठ नाडी, सूर्यकला नाडी, शिववाक्य नाडी, भृगु संहिता यांतही ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे ईश्वराचा अवतार आहेत’, असा उल्लेख आहे. सुप्रसिद्ध हस्तरेषातज्ञ के.टी. बालामणी यांनीही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हस्तरेषांवरून त्यांचे कार्य अवतारी असल्याचे सांगितले आहे.
प्रत्यक्षातही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्याची व्याप्ती पहाता ‘हे कार्य केवळ अवतारी संतांच्या रूपातील ईश्वरच करू शकतो’, हे लक्षात येते. परात्पर गुरु डॉ. आठवले हे केवळ संत नसून ते ‘अवतार’ आहेत; कारण सध्याच्या काळात केवळ त्यांनीच हिंदु राष्ट्र स्थापनेची संकल्पना मांडली आहे. भगवान श्रीकृष्ण, प्रभु श्रीराम यांनी ज्याप्रमाणे धर्मसंस्थापनेचे कार्य केले, त्याप्रमाणे हिंदु राष्ट्राच्या रूपाने परात्पर गुरु डॉ. आठवले आताही धर्मसंस्थापनेचे कार्य करत आहेत. व्यष्टी स्तरावर मार्गदर्शन करणारे अनेक संत असतात; मात्र ज्यांच्यात अंशात्मक श्रीविष्णुतत्त्वही आहे आणि धर्मसंस्थापनेचे, म्हणजेच हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य जे करत आहेत, असे सध्याच्या काळातील एकमेव परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अवतारत्वाकडे
पहाण्याचा दृष्टीकोन कसा आहे ? ते स्वतःला ‘अवतार’ म्हणवून घेतात का ?
प.पू. डॉक्टरांना महर्षींनी अवतार म्हणण्यामागचे शास्त्र
‘एखाद्या संतांना एखाद्या ‘देवतेचा अवतार’, उदा. ‘दत्तावतार’ म्हटले जाते, तेव्हा संबंधित देवतेचे तत्त्व त्या व्यक्तीमध्ये अधिक प्रमाणात असते. माझ्या व्यष्टी साधनेत श्रीकृष्णाची आणि समष्टी साधनेत (रामराज्याची म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना करायची असल्यामुळे) श्रीरामाची उपासना असल्यामुळे माझ्यात विष्णुतत्त्व अधिक प्रमाणात आहे. (मला गुरुमंत्रही ‘श्री राम जय राम जय जय राम’ हा मिळाला आहे.) त्यामुळे मला नाडीभविष्याच्या भाषेत ‘विष्णूचा अवतार’ म्हटले आहे.
‘श्रीविष्णूचे दशावतार’ आणि महर्षींनी मला ‘अवतार’ म्हणणे यांतील मुख्य भेद म्हणजे विष्णूच्या दशावतारांत विष्णुतत्त्व खूप अधिक प्रमाणात आहे, तर माझ्यामध्ये ते अंशाअंशात्मक आहे. काही वेळा माझा उल्लेख ‘कृष्णावतार’ असाही करण्यात येतो. त्याचे मुख्य कारण म्हणजे माझ्या साधनेत गीतेतील ज्ञान, भक्ती आणि कर्म या योगांत सांगितलेली साधना आहे आणि तीही समष्टी कृष्णतत्त्व रूपात आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
प्रत्यक्षातही अनेक संत, महर्षि यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘अवतार’ असे घोषित करूनही परात्पर गुरु डॉ. आठवले स्वतः सतत शिष्यभावात रहातात. आश्रमातही ‘गुरु’ म्हणून कोणताही मोठेपणा न ठेवता शिष्यभावानेच रहातात. या वयातही आणि अत्यंत कठीण शारीरिक स्थितीतही ते अखिल मानवजातीला पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शक असलेले ग्रंथलिखाणाचे कार्य करत आहेत. खरेतर त्यांचे आदर्श जीवन आणि अत्यल्प कालावधीत वाढत असणार्या त्यांच्या कार्याची व्याप्ती हीच त्यांच्या अवतारत्वाची पावती आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले केवळ एखाद्या विषयात नाही, तर प्रत्येक विषयातील सखोल आध्यात्मिक ज्ञानाने परिपूर्ण आहेत.
३. अनेक संत होऊन गेले; मात्र त्यांनी स्वतःला कधी ‘अवतार’ म्हटले नव्हते ?
यापूर्वीही अनेक शिवावतारी, तसेच दत्तावतारी संत होऊन गेले आहेत. दत्तावतारी संत प.प. टेंब्येस्वामी महाराज, अक्कलकोट (जिल्हा सोलापूर) येथील श्री स्वामी समर्थ, स्वामी दत्तावधूत यांना ‘दत्तावतार’ म्हणून, तसेच ‘शिवावतार’ म्हणून कोल्हापूर येथील प.पू. शामराव महाराज यांना समाजाने आदराचे स्थान दिले. त्यांच्या अवतारत्वाविषयी त्या काळी त्यांचे भक्त, तसेच समाजातील अनेक जणांना अनुभूती आल्या आणि आताही येत आहेत. त्या अवतारांप्रमाणेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांनाही ‘श्रीविष्णूचे अवतार’ म्हणून संबोधले जात आहे. त्यांच्या अवतारत्वाविषयी अनेक साधक आणि धर्माभिमानी यांना अनुभूतीही येत आहेत. अवतार कधीच स्वतःचे अवतारत्व मान्य करत नसतात, तर भक्तांना येणार्या अनुभूतींतूनच त्यांचे अवतारत्व प्रगटत असते.
४. देवतांचे वस्त्रालंकार परिधान करणे, हे विडंबन आहे का ?
४ अ. विडंबन म्हणजे काय ?
केवळ श्रीकृष्ण आणि श्रीराम यांचे वस्त्रालंकार धारण केल्याने त्यांचे विडंबन होत नाही, तर अपात्र व्यक्तीने केवळ देखावा म्हणून तशी वेशभूषा करणे, हे देवाचे विडंबन आहे. अनेकदा देवतेची वेशभूषा करून ती वस्त्रे अडगळीत टाकली जातात. काही वेळा ती पायदळी तुडवली जातात, हेही देवतेचे विडंबन आहे. एका तीर्थक्षेत्री चित्रपट अभिनेत्यांच्या रूपातील श्रीराम आणि सीतामाता यांच्या चित्रांची विक्री केली जात आहे. तो चित्रपट अभिनेता सिगारेट पीत असे. तसेच सीतेच्या रूपात दाखवलेल्या त्या अभिनेत्रीचेही वर्तन चांगले नव्हते. चित्रपट अथवा मालिकांतून काम करणार्यांचे वर्तन अशुद्ध असते, तसेच ते नंतर गैरकारभारातही गुंतलेले आढळतात. अशा वेळी त्यांनी देवतांची वस्त्रे परिधान करणे, हे विडंबनच आहे. देवतेचे वस्त्र परिधान करतांना वेश आणि वृत्ती एकमेकांशी जुळली पाहिजे.
४ आ. महर्षींच्या आज्ञेने अध्यात्मातील अधिकारी संतांनी श्रीकृष्ण
आणि श्रीराम यांचे वस्त्रालंकार परिधान करणे, हे विडंबन नाही !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारख्या अध्यात्मातील अधिकारी व्यक्तीने महर्षींच्या आज्ञेचे पालन करणे, हा एक दैवी योग आहे. त्यांचे वर्तनही अतिशय शुद्ध आहे. केवळ अमृत महोत्सवाच्या दिवशी त्यांनी महर्षींच्या आज्ञेने श्रीकृष्ण आणि श्रीराम यांच्याप्रमाणे वस्त्रालंकार धारण केले होते. ती वस्त्रेही आम्ही सन्मानाने संग्रहित केली आहेत. त्यांचा महर्षींच्या आज्ञापालनाचा हेतूही शुद्ध होता, तसेच अमृत महोत्सव सोहळा हा सार्वजनिक कार्यक्रम नव्हता, तर तो केवळ साधकांसाठी मर्यादित होता. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा साधकांचा भक्तीभाव वाढावा; म्हणून आम्ही सनातन प्रभातमध्ये त्या सोहळ्याचे वृत्त आणि छायाचित्रे प्रसिद्ध केली.
४ इ. दूरचित्रवाणीवरून सात्त्विकरित्या सादर झालेल्या
‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिकांमुळे भाविकांची श्रद्धा वाढली !
दूरचित्रवाणीवर देवतांविषयीच्या अनेक मालिका प्रसारित होतात. पूर्वीच्या काळी प्रसारित होणार्या रामायण आणि महाभारत या मालिका सर्वत्र अत्यंत श्रद्धेने पाहिल्या जात असत. छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज यांच्याविषयी अनेक चित्रपट निघाले आहेत. चांगल्या प्रकारे देवता किंवा थोर पुरुष यांचे चरित्र सादर केलेल्या या मालिकांना विडंबन म्हणता येत नाही, तर त्यामुळे सामान्य भक्ताला ‘प्रभु श्रीराम कसा होता’, ‘भगवान श्रीकृष्ण कसा होता’, ते अनुभवता आले आणि श्रद्धा बळकट झाली. त्या मालिका चालतात; मात्र त्याच प्रकारे साधकांची प्रभु श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यावरील श्रद्धा बळकट होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांच्याप्रमाणे वस्त्रालंकार धारण केले, तर इतरांना पोटशूळ का उठतो ?
वास्तविक पहाता परात्पर गुरु डॉ. आठवले यांची रहाणी साधी आहे. पांढर्या रंगाचा सुती सदरा आणि पायजमा असाच त्यांचा नियमित पोशाख असतो.
५. सनातनद्वेष्ट्यांची अवतारी संतांवर टीका करण्याची पात्रता तरी आहे का ?
येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की, ज्या मूठभर मंडळींनी सामाजिक प्रसारमाध्यमांतून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर टीका करण्याचे सत्र गेली २ वर्षे चालवले आहे, त्यांचे कार्य काय आहे ? त्यांची संतांवर टीका करण्याची पात्रता तरी आहे का ?
५ अ. सार्वजनिक उत्सवांत प्रत्यक्ष होणार्या
विडंबनाविषयी सामाजिक प्रसारमाध्यमांतील कंपू गप्प का ?
परात्पर गुरु डॉ. आठवले यांना श्रीकृष्ण आणि श्रीराम यांच्या रूपात पाहिल्यानंतर ज्यांना देवतेच्या विडंबनाची आठवण आली, त्यांनी क्रिकेट खेळतांना श्री गणेश, ‘सैराट’ या मराठी चित्रपटातील अभिनेत्री आर्चीप्रमाणे ‘विहिरीत उडी मारतांना श्री गणेश’, अशा विकृत रूपांतील श्रीमूर्ती महाराष्ट्रभर पोचल्या, तेव्हा कधी ‘फेसबूक’वर प्रबोधन मोहीम उघडल्याचे दिसून आले नाही कि आयोजकांना देखावा पालटण्यास भाग पाडले नाही. केवळ सनातनवर टीका करतांना पाजळणारे यांचे शब्द हा निवळ सनातनद्वेष आहे.
आज परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधना केल्यामुळे देश-विदेशांतील सहस्रो जीव आनंदी जीवन जगत आहेत, तसेच ईश्वरप्राप्तीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. टीका करणार्यांना किती जनाधार आहे ?
– श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्वस्त, सनातन संस्था