हिंदु राष्ट्राचे घटक
हिंदु हा शब्द मूलत: देशवाचक, राष्ट्रवाचक आहे. याचे मुख्य अधिष्ठान ‘आसिंधु सिंधू’ अशी ही भारतभूमिका आहे. ‘आसिंधु सिंधू’ अशा त्या भारतभूमिकेत अत्यंत प्राचीन काळापासून ज्यांचे पूर्वज परंपरेने निवसत आले, ज्या राष्ट्रात प्रचलित असलेली सांघिक संस्कृती, घडलेला इतिहास, बोललेल्या भाषा, अनुसरलेले धर्म, ज्यांचे संस्कृती, इतिहास, भाषा, धर्म आहेत ते सारे हिंदु होत. त्या हिंदु राष्ट्राचे घटक होत.
हिंदुस्थानात हिंदु ही ‘जात’ होऊ शकत नाही
हिंदुस्थानात आम्हांस एक जाती म्हणणे मूर्खपणाचे आहे. जर्मनीत ‘जर्मन’ हे राष्ट्र आहे आणि ज्यू ही जात आहे. तुर्कस्थानात तुर्क हे राष्ट्र असून अरब वा आर्मेनियन अल्पसंख्य जाती आहेत. त्याचप्रमाणे हिंदुस्थानात हिंदु एक राष्ट्र आहे आणि अल्पसंख्य मुसलमान एक जाती आहेत.
हिंदुस्थानावाचून हिंदूंना अन्य गती नाही !
हिंदुस्थानात हिंदूंचे पूर्वज राहिले नि वाढले. त्यांची सर्व पवित्र स्थाने याच पुण्यभूमीत आहेत. त्यांना जिवंत रहायला नि मरायलाही या देशाबाहेर दुसरी जागा नाही. त्यांना पृथ्वीतलावरच नव्हे, तर स्वर्गात दुसरी गती नाही. त्यांचे देवही क्षीणपुण्य झाले की, त्यांना हिंदुस्थानच्या कर्मभूमीवर येऊन पुण्य करून स्वर्गपद प्राप्त करून घ्यावे लागते. म्हणून हिंदुस्थान हे हिंदुत्वनिष्ठांचे राष्ट्र आहे. हिंदुस्थानातील हिंद्वेतरांशी आमचे भांडण नाही; परंतु त्यांना हिंदूंविषयी अभेद्यपणा वाटत नसेल, तर हिंदूंनी काय करावे ?
हिंदु राष्ट्र एक सत्य
… वैदिक काळापासून निदान पाच सहस्र वर्षे तरी आपले पूर्वज आपल्या लोकांचा धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक नि राजकीय दृष्ट्या एकात्म असा गट घडवून आणत होते. त्या क्रियेला स्वाभाविकपणे विकास पावता जे फळ आले, ते म्हणजेच वैदिक काळातील त्या सिंधूचेच आज संपूर्ण हिंदुस्थानभर पसरलेले आणि हिंदुस्थानालाच आपली एकमेव पितृभू नि पुण्यभू मानत असलेले असे हिंदु राष्ट्र होय. कदाचित चिनी राष्ट्र वर्ज्य केल्यास जगातील दुसर्या कोणत्याही राष्ट्राला आपल्या हिंदु राष्ट्रासारख्या जीवनाच्या नि विकासाच्या अखंड सातत्यावर अधिकार सांगता येणार नाही. हिंदु राष्ट्र हे काही पावसाळ्यातील कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेले नाही किंवा ते एखाद्या तहातून उत्पन्न झालेले नाही ते निव्वळ कागदी खेळणे नाही किंवा ते एखाद्या मागणीप्रमाणे घडवलेले नाही. अथवा ती एखादी चालचलाऊ सोय नाही. ते याच भूमीतून वर आलेले आहे नि या भूमीतच त्याची मुळे खोल नि दूरवर पसरलेली आहेत. मुसलमानांचा किंवा जगातील अन्य कोणाचा द्वेष करण्यासाठी म्हणून काही तरी लावलेला शोध नाही, तर आपली उत्तर सीमा सांभाळणार्या हिमालयाप्रमाणे हिंदु राष्ट्र हे एक भक्कम आणि प्रचंड सत्य आहे.
नकारात्मक दृष्टीनेही हिंदु राष्ट्र !
प्रामाणिक आणि भोळसट अशा हिंदूंच्या हे स्पष्ट लक्षात आले पाहिजे की, सर्वसामान्य राष्ट्रीय जीवनाशी मुसलमानांनी समरस होण्याचे नाकारले म्हणजे नकारात्मक दृष्टीनेही हिंदूंचे एक राष्ट्र्रच उरते.
राष्ट्रीय जीवनाचा धागा पुन्हा उचलून धरा !
आपल्या पितामहांनी मराठा आणि शीख हिंदु साम्राज्याच्या पतनाच्या वेळी जो तेथेच सोडून दिला, तो आपल्या राष्ट्रीय जीवनाचा धागा आपण हिंदूंनी पुन्हा उचलून हाती धरावा. आत्मविस्मृतीमुळे क्षय झालेल्या आपल्या हिंदु राष्ट्र्राच्या जीवनाचे आणि विकासाचे आपण पुनरुज्जीवन केले पाहिजे, त्याला समाधीतून पुन्हा उठवले पाहिजे.
हिंदु राष्ट्राचे ध्येय
राष्ट्राचा मोठेपणा त्याच्या ध्येयातून व्यक्त होतो. राष्ट्राचे स्वरूप त्याने आपल्यापुढे ठेवलेल्या ध्येयावर अवलंबून असते. संकुचित ध्येयाच्या राष्ट्रांनी भूतकाळात चिरंतन मोठेपणा प्राप्त केलेला नाही. राष्ट्राला महानता आणि वैभव प्राप्त करुन देण्याकरिता उदात्त ध्येय असणे आवश्यक आहे.
हिंदु राष्ट्र हिंदुध्वजाखालीच स्थापन झाले पाहिजे !
हिंदु राष्ट्र्र हे एकच राष्ट्र असे आहे की, त्याने पूर्ण नि:श्रेयसाच्या आधारावरील निर्दोष अभ्युदय हे आपले ध्येय स्वीकारले आहे. या जगात आपणाला जर हिंदुत्वाचे मानाचे राष्ट्र म्हणून जगावयाचे असेल, तर तसा आपला अधिकार आहे आणि ते राष्ट्र हिंदुध्वजाखालीच स्थापन झाले पाहिजे.
हिंदु राष्ट्र स्थापना – सावरकरांनी दिलेला वारसा !
‘या जगात जर आपणास ‘हिंदु’ म्हणून स्वाभिमानाने जीवन जगायचे असेल, तर आपल्याला तसा पूर्ण अधिकार आहे. हे राष्ट्र हिंदु ध्वजाखालीच स्थापन होईल. माझी ही भविष्यवाणी खोटी ठरली, तर लोक मला ‘वेडा’ म्हणतील; मात्र खरी ठरली, तर मी ‘प्रेषित’ ठरेन. माझा हा वारसा मी तुम्हाला देत आहे.’ स्वातंत्र्यवीर सावरकर
(संदर्भ : ‘स्वातंत्र्यवीर’, दिवाळी अंक २००७)