१. पद्मपुराणात श्रीक्षेत्र नीरा-नृसिंहपूर स्थानाचा उल्लेख असणे
पुणे जिल्ह्याच्या आग्नेय दिशेला नीरा आणि भीमा या नद्यांच्या संगमतटावर श्रीक्षेत्र नीरा-नृसिंहपूर वसलेले आहे. ज्यांचे कुलदैवत नृसिंह आहे, त्यांनी या तीर्थक्षेत्री जाऊन श्री नृसिंहाचे दर्शन घ्यावे. पद्मपुराणात म्हटले आहे, हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू हिचे इंद्रदेवाने हरण केले. त्या वेळी कयाधू गर्भवती होती. या नृसिंहपूर क्षेत्राजवळ नीरा नदीच्या काठावर त्या काळी नारदमुनींचा आश्रम होता. नारदांनी त्या ठिकाणी इंद्राला थांबवून त्याला कयाधूच्या पोटी भगवद्भक्त जन्माला येणार आहे, असे सांगितले. तेव्हा इंद्राने कयाधूला नारदांच्या आश्रमात ठेवले. पुढे याच आश्रमात कयाधूच्या पोटी भक्त प्रल्हादाचा जन्म झाला. नारदमुनींच्या सहवासात प्रल्हादाची भक्ती दृढ झाली.
२. प्रल्हादाने श्रीक्षेत्र नीरा-नृसिंहपूर येथे श्री नृसिंहमूर्ती सिद्ध करून तिचे
पूजन करणे आणि श्री नृसिंहाने प्रल्हादाच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला दर्शन देणे
पुढे नीरा-भीमा संगमावरील वाळू घेऊन प्रल्हादाने श्री नृसिंहमूर्ती सिद्ध केली. या मूर्तीपूजेमुळे संतुष्ट होऊन श्री नृसिंहाने भक्त प्रल्हादास दर्शन दिले. त्या वेळी श्री नृसिंहाने त्याला वर दिला, तुझ्याप्रमाणे या वालुकामूर्तीची जो पूजा-अर्चा करील, त्याच्या मनोकामनाही पूर्ण होतील.
सध्या मंदिरात पश्मिमाभिमुख विराजमान असलेली हीच ती मूर्ती आहे, असे सांगितले जाते. सध्या जे मंदिर उभे आहे, त्याच्या बांधकामास वर्ष १६७८ मध्ये प्रारंभ झाला, असा उल्लेख येथील शिलालेखावर आढळतो.
३. श्री नृसिंहमूर्तीचे वैशिष्ट्य
येथील श्री नृसिंहमूर्ती पश्चिमाभिमुख असून ती वालुकाशिलेची आहे. भक्त प्रल्हादाच्या प्रत्यक्ष उपासनेतील ही मूर्ती वीरासनस्थ, जानुद्वयाहितकर म्हणजेच दोन्ही मांड्यांवर हात ठेवलेल्या स्थितीत समोरील मंदिरातील भक्त प्रल्हादाच्या मूर्तीकडे आणि भक्तांकडे अत्यंत कृपाळू दृष्टीनेच पहात असल्याचे जाणवते. या मूर्तीच्या डाव्या बाजूला गाभार्यातच साक्षात् ब्रह्मदेवाच्या उपासनेतील अतीप्राचीन श्री नृसिंह शामराजाची उत्तराभिमुख मूर्ती आहे. हे देवस्थान अत्यंत जागृत आहे.
४. क्षेत्रमाहात्म्य
या क्षेत्री नृसिंहाचा सदासर्वदा निवास असतो. नुसत्या मंदिराच्या दर्शनानेही चारही पुरुषार्थाची प्राप्ती होते आणि भक्ताला अंती वैकुंठप्राप्ती होते. हे स्थान पृथ्वीचे नाभीस्थान आहे. पद्मपुराणातील पुढील श्लोकात नीरा-नृसिंहपूर क्षेत्राचे वैशिष्ट्य वर्णिले आहे –
सुदर्शनमित्यभिहितं क्षेत्रं यत् वेदविद्वरैः ।
तन्नाभिरेव भूगर्भे क्षेत्रराजो विराजते ॥
अर्थ : वेद जाणणारे ज्याचे नयनरम्य आणि सुदर्शनीय, असे वर्णन करतात, ते हे (नीरा-नृसिंहपूर क्षेत्र) क्षेत्रराज असून पृथ्वीच्या नाभीस्थानी शोभत आहे.