१. शनिदेवता या ग्रहाचे ज्योतिषशास्त्रदृष्ट्या महत्त्व
हिंदु धर्मात ग्रहांना देवता मानले जाते. शनिदेव हा पापग्रह असून सर्व ग्रहांमध्ये या ग्रहाला लौकिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. मकर आणि कुंभ या शनिदेवता ग्रहाच्या राशी आहेत. शनिदेवता तुळ राशीत उच्चीचा होतो. ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या उच्च आणि नीच राशी ठरवून दिलेल्या आहेत. ‘ग्रह जेव्हा उच्च राशीत असतो, तेव्हा तो ज्या गोष्टींचा कारक आहे आणि कुंडलीतील ज्या स्थानांचा स्वामी आहे, त्यांसंबंधी शुभ फलदायी ठरतो’, असा नियम आहे. शनिदेव हा ग्रह वायुतत्त्वाचा असून मनुष्याला आसक्तीकडून विरक्तीकडे नेतो. तो मानवाला जीवनातील मान, अपमान आणि अवहेलना यांतून परमार्थाकडे वळवतो. हा पूर्वसुकृत दर्शवणारा आणि मोक्षाची वाट दाखवणारा ग्रह आहे.
एका नक्षत्रातून शनीचे भ्रमण सरासरी १ वर्ष दहा मास असते. शनि ग्रहाला ‘मंद ग्रह’ म्हणतात; कारण शनि एका राशीत अडीच वर्षे असतो. यामुळे शनि ग्रह पालटानंतर लगेचच त्याची चांगली अथवा वाईट फळे मिळत नाहीत, तर शेवटच्या सहा मासांत त्याचे अनुभव प्रकर्षाने जाणवतात.
२. मानवाच्या गुण-दोषांसंदर्भात शनिदेवतेचे महत्त्व
ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाच्या शुभ (गुण) आणि अशुभ (दोष) अशा दोन बाजू असतात. कोणताही ग्रह केवळ अशुभच अथवा केवळ शुभच असतो असे नसते. या नियमाप्रमाणे शनि ग्रहाच्याही दोन बाजू आहेत; पण शनिदेवतेची फक्त ‘अशुभ’ ही एकच बाजू विचारात घेतली जाते; म्हणूनच लोकांच्या मनात शनिदेवतेविषयी भीती निर्माण होते. शनि हा ग्रह गर्व, अहंकार आणि पूर्वग्रह यांना दूर करून माणसाला माणुसकी शिकवतो. तो मानवाच्या अंतरंगातील उच्च गुणांची ओळख करून देतो. शनिदेव हा अनुभवातून शिक्षण देणारा शिक्षक आहे. जे शिस्तबद्ध, विनयशील आणि नम्र आहेत, त्यांना तो उच्च पदाला घेऊन जातो, तर जे अहंकारी, गर्विष्ठ आणि स्वार्थी आहेत त्यांना त्रास देतो. अशा वाईट काळातच माणसाची योग्य पारख होते. या काळात व्यक्तीला आपल्या-परक्याची जाणीव होते, स्वत:चे गुण-दोष लक्षात येतात, गर्वाचे हरण होते आणि अहंकार गळून पडतो, माणुसकीची जाणीव होते, तसेच ‘एक माणूस म्हणून कसे जगावे’, याचे ज्ञान होते. अविचारांनी केलेल्या कामांची फळे साडेसातीत मिळतांना दिसतात.
शनि हा ग्रह कर्माचा अधिपती असून तो अहंकार नाहीसा करतो. शनि हा संवेदनेचा कारक ग्रह आहे. शनि हा चिंतनशील ग्रह असल्याने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्नरत असणार्या साधकांना साधनेच्या प्रयत्नांत यश देतो. शनि ग्रहामुळे चिंतन योग्य प्रकारे होण्यास साहाय्य होते.
– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.५.२०१९)
३. शनिदेवाची वैशिष्ट्ये
३ अ. परिवार
१ अ १. आई आणि वडील : सूर्यदेव आणि छायादेवी.
१ अ २. कुटुंबीय : तापी आणि यमुना या दोन बहिणी अन् यमदेव हा मोठा भाऊ.
३ आ. स्थान
१ आ १. जन्मस्थान : भारतातील सौराष्ट्रात वैशाख अमावास्येला मध्यान्ही शनैश्चराचा जन्म झाला; म्हणून या दिवशी शनैश्चर जयंती साजरी करतात.
१ आ २. कार्यस्थान / कार्यक्षेत्र : महाराष्ट्रातील शनिशिंगणापूर येथे शनिदेवतेची काळी मोठी शिळा असून तेथे शनिदेवाची शक्ती कार्यरत आहे. त्यामुळे शनिशिंगणापूर हे शनिदेवतेचे कार्यक्षेत्र आहे. शनैश्चर जयंतीला शनिशिंगणापूर येथे जत्रा भरते आणि शनिदेवाचा उत्सव साजरा होतो.
३ इ. शनिदेवाची अन्य नावे
सूर्यसूत, बभ्रुरूप, कृष्ण, रौद्रदेह, अंतक (हे यमाचे नाव आहे), यमसंज्ञ, सौर्य, मंदसंज्ञ, शनैश्चर, बिभीषण, छायासूत, निभ:श्रुती, संवर्तक, ग्रहराज, रविनंदन, मंदगती, नीलस्य, कोटराक्ष, सूर्यपुत्र, आदित्यनंदन, नक्षत्रगणनायक, नीलांजन, कृतान्तो, धनप्रदाता, क्रूरकर्मविधाता, सर्वकर्मावरोधक, कामरूप, महाकाय, महाबल, कालात्मा, छायामार्तंड इत्यादी शनिदेवतेची नावे प्रचलित आहेत.
३ ई. शनिलोक
ग्रहमालिकेत शनिग्रह सूर्यापासून पुष्कळ अंतर दूर आहे. त्याप्रमाणे सूक्ष्मातील शनिलोकही सूर्यलोकापासून पुष्कळ दूर आहे. शनिलोकात सूर्यकिरणांचा अभाव असल्यामुळे तेथे पुष्कळ अंधार असतो. शनिदेवतेचा अपमान करणार्या पापी लोकांना शनिलोकात नेऊन तेथे शनिदेव दंडित करतो.
३ उ. संबंधित लिंग
शनिदेवता नपुंसक आहे.
३ ऊ. संबंधित रंग – काळा किंवा गडद निळा
तमप्रधान कर्माचा लय करण्यासाठी जिवांना कठोरपणे दंडित करण्यासाठी शनिदेवाने उग्र रूप घेतले. त्याचे द्योतक काळा किंवा गडद निळा हा रंग आहे.
३ ए. संबंधित वस्त्राचा रंग – काळा
काळ्या रंगातून शनितत्त्व कार्यरत होते. नवग्रहमंडलातील संबंधित देवतांसाठी वापरलेले तांदूळ आणि वस्त्र यांचा रंग त्या त्या देवतांच्या रंगाशी (वर्णाशी) संबंधित आहे; म्हणून धार्मिक विधीच्या ठिकाणी नवग्रहमंडलाची स्थापना करतांना त्या त्या रंगाची वस्त्रे, अक्षता, पुष्प इत्यादी वापरली जातात.
३ ऐ. चातुर्वर्णातील वर्ण
शनिदेवाचा वर्ण अंत्यज, म्हणजे लयकारी आहे. त्याच्याकडून पुष्कळ प्रमाणात मारक शक्तीचे प्रक्षेपण होते. त्यामुळे त्याचे स्वरूप उग्र जाणवते.
३ ओ. संबंधित तत्त्व
शनिदेवतेचा संबंध वायूतत्त्वाशी आहे.
३ औ. संबंधित गुण
शनिदेवतेचा जन्म सूर्याच्या लयकारी शक्तीपासून झाल्यामुळे त्याच्यामध्ये तमोगुण प्रबळ आहे.
३ अं. संबंधित रस
शनिदेवतेला तुरट चव किंवा रस प्रिय आहे.
३ क. प्रिय पुष्प
शनिदेवतेला शनितत्त्व आकृष्ट करणारे जांभळ्या किंवा गडद निळ्या रंगाची पुष्पे प्रिय आहेत.
३ ख. संबंधित धातु
शनिदेवतेचा संबंध लोह या धातूशी आहे. शनिदेवतेला प्रसन्न करण्यासाठी काही ठिकाणी शनिदेवतेच्या लोहप्रतिमांची स्थापना केली जाते आणि शनिदेवतेला लोह अर्पण केले जाते.
३ ग. संबंधित कालबल
शनिदेवतेची शक्ती रात्रीच्या वेळी अधिक प्रमाणात कार्यरत असते.
३ घ. संबंधित कालांश
शनिदेवतेचा कार्यकाळ वर्षाशी संबंधित आहे.
३ च. संबंधित तिथी आणि वार
शनिदेवाला त्रयोदशी तिथी प्रिय आहे. सप्ताहातील शनिवार शनिदेवतेशी संबंधित आहे.
३ छ. संबंधित दिशा
शनिदेवतेचा संबंध पश्चिम दिशेशी आहे.
३ ज. संबंधित देवता
३ ज १. अधिपति : ब्रह्मदेव शनिदेवतेचा अधिपति आहे.
३ ज २. अधिदेवता (डाव्या बाजूची देवता) यम : यम कर्मप्रधान देवता म्हणून कार्यरत असतांना पापी लोकांना दंडित करण्यासाठी तो शनिदेवतेला प्रेरणा देतो.
३ ज ३. प्रत्यधिदेवता (उजव्या बाजूची देवता) प्रजापति : शनिदेवतेची उग्रता न्यून करून त्याला शांत करण्यासाठी प्रजापतीची तारक शक्ती कार्यरत असते.
३ झ. संबंधित शस्त्रे
धनुष्य, बाण आणि शूल (सूळ) ही शस्त्रे शनिदेवतेशी संबंधित आहेत. वक्रमार्गाने चालणार्यांवर लक्ष ठेवून शनिदेवतेने शरसंधान केल्याचे द्योतक धनुष्याकृती आहे. पूजनाच्या ठिकाणी चौरंगावर नवग्रहमंडलदेवतांची स्थापना करतांना काळ्या रंगाच्या अक्षतांनी शनिमंडलाचे प्रतीक असणारी धनुष्याकृती चौरंगाच्या पश्चिम दिशेला सिद्ध केली जाते.
३ ट. मनुष्याचा देहाशी संबंधित
शनिदेवतेचा संबंध मनुष्याच्या देहातील स्नायूंशी आहे.
३ ठ. शुभाशुभ फळ
शनिदेवतेचा कोप झाला, तर मनुष्याला अशुभ फळाची प्राप्ती होते; परंतु शनिदेवतेची मनुष्यावर कृपा झाली, तर त्याला पुत्रवान, धनवान आणि श्रीमान होण्याचे भाग्य लाभते.
३ ड. रत्न
शनिदेवतेशी संबंधित रत्न नील आहे.
३ ढ. अक्षरे, देवता आणि फल
अक्षरांचे अ, क, च, ट, त, प, य आणि श या आठ वर्गांत विभाजन केले आहे. प्रत्येक वर्गाची विशिष्ट देवता आहे. विशिष्ट वर्गाच्या पद्यरचनेची विशिष्ट फलप्राप्ती होते. शनैश्चराचा संबंध प या वर्गाशी असून त्याची फलप्राप्ती मंदत्व आहे. याचा अर्थ दुष्कर्म करण्याची गती मंदावते.
३ ण. हविष्य द्रव्य
नवग्रह यज्ञामध्ये शनिदेवतेला दूर्वा किंवा शमी यांची आहुती दिली जाते. दूर्वा किंवा शमी यांमध्ये कार्यरत असणार्या गणेशतत्त्वाची शक्ती शनिदेवतेला सृजनशील कार्य करण्यासाठी प्रेरक असते. शनिदेवाला दूर्वा किंवा शमी यांची आहुती दिल्यामुळे उपासकाचे पापक्षालन होऊन त्याला उत्तम आरोग्याची प्राप्ती होते.
३ त. जपसंख्या
शनिदेवतेची जपसंख्या तेवीस सहस्र आहे.
३ थ. शनिदेवतेशी संबंधित स्तोत्रे
१. शनिस्तोत्र
२. शनैश्चरकवचस्तोत्र
३. शनिमहात्म्य
– कु. मधुरा भोसले (संदर्भ : सनातनचा ग्रंथ परमेश्वर, ईश्वर, अवतार आणि देव आणि ज्ञानातून मिळालेली माहिती.)
४. नवग्रहांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
४ अ. ५ ऑगस्ट २०१६ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात
बेंगळुरू येथून आलेल्या एका संतांनी नवग्रहांसाठी हवन केल्यावर आलेल्या अनुभूती
४ अ १. शनि, राहु आणि केतु
शनि, राहु आणि केतु या ग्रहदेवांना उद्देशून हवन केल्यावर माझ्या देहातील स्नायूंमध्ये जाणवणार्या वेदना उणावून माझ्या देहाचे जडत्व उणावले.
शास्त्र : साधिकेला आलेल्या अनुभूतीवरून शनिदेवतेचा संबंध देहातील स्नायूंशी आहे, हे सिद्ध झाले.
४ अ २. मंगळ
मंगळ ग्रहाला उद्देशून हवन चालू असतांना माझ्या पाठीच्या मणक्याला धक्का बसल्याप्रमाणे जाणवले आणि माझा मणका अन् अस्थी येथील वेदना पुष्कळ प्रमाणात उणावल्या.
शास्त्र : साधिकेला आलेल्या अनुभूतीवरून मंगळ ग्रहाचा संबंध देहातील मणक्यांशी आहे, हे सिद्ध झाले.
४ अ ३. बुध आणि गुरु
बुध आणि गुरु या ग्रहदेवतांना उद्देशून हवन चालू असतांना मला आनंद जाणवला.
४ अ ४. सोम आणि रवि
सोमाला आहुती देत असतांना मला शीतलता आणि रवीला उद्देशून मंत्रोच्चार चालू असतांना चांगल्या शक्तीच्या निर्मितीमुळे मला आल्हाददायक ऊब जाणवली.
४ आ. महर्षि व्यासांनी रचलेले नवग्रहस्तोत्र ऐकत असतांना शारीरिक आणि
मानसिक स्तरांवर चांगले परिणाम होणे अन् एका ऋषीने या अनुभूतींचे विश्लेषण सूक्ष्मातून करणे
४ आ १. नवग्रहदेवतांशी संबंधित स्तोत्र ऐकतांना देहाभोवती गुंडाळलेला पाश सैल होणे
मार्च २०१६ मध्ये माझ्या मनात नवग्रहदेवतांशी संबंधित स्तोत्र ऐकण्याची इच्छा जागृत झाली. त्याप्रमाणे मी नवग्रहांना नमन करून महर्षी व्यासांनी नवग्रहांवर रचलेले नवग्रहस्तोत्र ऐकले. हे स्तोत्र ऐकत असतांना माझ्या देहाभोवती सूक्ष्मातून गुंडाळलेला पाश सैल झाल्याचे मला जाणवले. माझ्या जिभेवर २ – ३ प्रकारच्या धातूंची चव (मेटॅलिक टेस्ट) आली.
शास्त्र : नवग्रहांचा संबंध विविध धातूंशी असल्यामुळे त्यांचे स्तोत्र ऐकत असतांना साधिकेच्या जीभेवर विविध धातूंची चव आली.
४ आ २. शनिदेवतेचा श्लोक ऐकत असतांना खांद्यांजवळच्या भागातून दोन ते अडीच इंच लांबीचे मोठे खिळे देहातून बाहेर खेचले जाणे
शनिदेवतेचा श्लोक ऐकतांना माझ्या हृदयाच्या वरती दोन्ही बाजूंना खांद्यांच्या जवळच्या भागातून दोन ते अडीच इंच लांबीचे मोठे लोखंडी खिळे देहातून बाहेर खेचले गेले, असे दृश्य मला दिसले आणि माझे खांदे, छाती अन् हात यांमध्ये जाणवणार्या वेदना उणावल्या.
शास्त्र : शनिदेवतेचा संबंध लोह, म्हणजे लोखंड या धातुशी आहे. पाताळातील मोठ्या वाईट शक्तींनी साधिकेला त्रास देण्यासाठी तिच्यावर सूक्ष्मातून करणीचा प्रयोग करून तिची सूक्ष्म प्रतिकृती बनवून तिच्यामध्ये लोखंडी खिळे खुपसले होते. शनिदेवाच्या उपासनेमुळे तो साधिकेवर प्रसन्न झाला आणि त्याने तिच्या प्रतिकृतीमध्ये रोवलेले लोखंडी खिळे खेचून नष्ट केलेे.
४ आ ३. गुरुकृपेमुळे नवग्रह अनुकूल होऊन नात्यांमधील परस्परांशी स्नेहबंध सुधारले जातात, असे विश्लेषण एका ऋषींनी करणे
नवग्रहस्तोत्र ऐकत असतांना त्याचा परिणाम माझ्या मनोदेहावर होऊन माझे मन प्रसन्न झाले आणि माझ्या संपर्कात येणार्या व्यक्तींशी माझे मानसिक नाते सुधारत आहे, असे मला जाणवले. ग्रहांचा परिणाम नात्यांशी असून ग्रहपीडेमुळे नात्यांमध्ये तेढ निर्माण होते आणि गुरुकृपेमुळे नवग्रह अनुकूल होऊन व्यक्तींचे परस्परांशी स्नेहबंध सुधारले जातात, असे विश्लेषण एका ऋषींनी सूक्ष्मातून केल्याचे मला जाणवले. – कु. मधुरा भोसले, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.५.२०१७)
१. शनिदेवाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
१ अ. शनैश्चरकवचस्तोत्र ऐकत असतांना चांगल्या आणि त्रासदायक
अनुभूती येणे अन् शनिदेवतेचीपीडा देहातून बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत आहे, असे जाणवणे
मार्च २०१६ मध्ये मी शनैश्चरकवचस्तोत्रातील सुरुवातीचे श्लोक ऐकत असतांना माझ्या देहात जाणवणार्या वेदना आणि घशावर जाणवणारा दाब अल्प झाल्याचे जाणवले. स्तोत्रातील पुढचे श्लोक ऐकत असतांना माझ्या उजव्या पायाच्या स्नायुंमध्ये वेदना जाणवल्या आणि माझ्या उजव्या पायाच्या पावलात सूक्ष्मातून हालचाल होत आहे आणि मला वेदना होत आहेत, असे मला जाणवले. माझ्या उजव्या पायाच्या पावलात जाणवणार्या वेदना उजव्या पायाच्या अंगठ्यामधून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहेत, असे मला जाणवले. तेव्हा माझ्या उजव्या पायाच्या अंगठ्याच्या नखाखाली पुष्कळ दाब जाणवत होता. काही वेळा माझ्या डाव्या पायातूनही वेदनांचा प्रवाह वाहत आहे, असे मला जाणवले. शनिकवचस्तोत्र ऐकल्यामुळे माझ्या प्रारब्धातील शनिदेवतेची पीडा पायातील वेदनांच्या स्वरूपात प्रगट होऊन पावलातून बाहेर पडण्यासाठी अंगठ्यातून मार्ग शोधत आहे, असे मला वाटले.
शास्त्र : शनिदेवतेची पीडा मनुष्याच्या पायातून प्रवेश करते आणि त्याच मार्गाने ती दूर होते.
१ आ. देहातील अवयवांभोवती सूर्याच्या
तेजाचे संरक्षककवच निर्माण होणे आणि शीतलता जाणवणे
शनैश्चरकवचस्तोत्र ऐकत असतांना माझ्या देहातील विविध अवयवांच्या भोवती सूर्याच्या तेजाचे संरक्षककवच निर्माण झाले आहे, असे मला जाणवले; परंतु आश्चर्य म्हणजे मला उष्णता न जाणवता एक वेगळ्याच प्रकारची शीतलता जाणवली.
शास्त्र : शनिदेवता सूर्यपुत्र असल्याने साधिकेला सूर्याच्या तेजाच्या संदर्भात अनुभूती आली.
१ इ. शनीदेवाच्या सूक्ष्म रूपाचे दर्शन होणे
मी शनैश्चरकवचस्तोत्राचे श्रवण करत असतांना मला गडद निळ्या आकृतीतून तेजस्वी चंदेरी प्रकाश बाहेर पडतांना दिसला आणि त्या आकृतीभोवती काळ्या रंगाची गडद सावली असल्याचे जाणवले.
शास्त्र : हे शनिदेवाचे सूक्ष्म रूप आहे, असे मला जाणवले.
२. शनिशिंगणापूर येथील शनैश्चरदेवतेच्या
संदर्भात आलेली अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे
२ अ. सुस्थितीत असणारी बस शनिशिंगणापूर जवळ
अचानक बंद पडणे, बस बंद पडण्याचे कारण कुणालाही लक्षात न येणे आणि
शनिशिंगणापूर येथील शनैश्चरदेवतेला मानस प्रार्थना केल्यानंतर बंद पडलेली बस पुन्हा चालू होणे
मार्च २०११ मध्ये मी एका साधिकेसह एका खाजगी बसने अमरावती ते पुणे हा प्रवास करत होतेे. आमची बस नगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूरपासून अर्धा कि.मी. अंतर दूर असतांना अचानक बंद पडली. बसचे इंजिन उघडून त्यात नेमका काय बिघाड झाला, हे तपासण्यासाठी सर्वांचे प्रयत्न चालू झाले, तेव्हा बसच्या इंजिनमधून अचानक पुष्कळ धूर येऊ लागला. इंजिन तापल्यामुळे धूर येत असावा, असा निष्कर्ष सर्वांनी काढला; परंतु इंजिनमध्ये पाणी घातल्यानंतर आणि बराच वेळ इंजिन बंद करून त्याचे झाकण उघडे ठेवूनसुद्धा इंजिनचे तापमान घटत नव्हते. वाहनाची दुरुस्ती करणार्या जवळपासच्या तज्ञ मंडळींना बस दुरुस्त करण्यासाठी बोलवण्यात आले; परंतु त्यांनाही बस बंद पडण्याचे कारण उमगले नाही. या प्रयत्नांमध्ये एक घंटा व्यय झाला. तेव्हा माझ्या मनात विचार आला की, आपण शनिशिंगणापूरच्या जवळ आहोत. तेव्हा शनैश्चर देवतेचे मानस दर्शन घेऊन त्याला साधनेतील अडथळे दूर होण्यासाठी आणि त्याची कृपादृष्टी आपल्याला लाभण्यासाठी प्रार्थना करूया. त्याप्रमाणे मी आणि माझ्या सोबत असणारी साधिका कु. रागेश्री देशपांडे यांनी शनिदेवाला प्रार्थना केली. प्रार्थना करून अवघी पाच मिनिटे झाली असतील, तर बसचे तापलेले इंजिन थंड झाल्याचे एका व्यक्तीने सांगितले. बस सुरू होते का ?, हे पहाण्यासाठी इंजिन चालू करून पाहिले, तर इंजिन चालू झाले. बस पुन्हा चालू झाल्याबद्दल सर्वांना हायसे वाटले आणि कोणतीही अडचण न येता आम्ही सुरळीतपणे पुण्याला पोहोचू शकलो.
२ आ. अनुभूतीतून शिकायला मिळेले सूत्र – मनुष्याच्या बुद्धीला मर्यादा
असून समस्येचे निवारण करण्याचे खरे सामर्थ्य देवतांमध्येच असते, याची ग्वाही मिळणे
मनुष्याच्या बुद्धीला मर्यादा असल्यामुळे कोणत्याही घटनेमागे नेमके कारण काय आहे ?, हे शोधण्यात मनुष्याला मर्यादा येतात. स्थूलातील घटनांमागे मनुष्याला अनाकलनीय असणारी कारणे शोधण्यास सर्वज्ञ असणार्या देवता सक्षम असतात. त्याचबरोबर समस्यांचेे निवारण करण्यासही देवता समर्थ असतात, याची ग्वाही आम्हाला वरील अनुभूतीतून मिळाली, यासाठी आम्ही शनैश्चर देवतेच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहोत.
भगवंताप्रती कृतज्ञता आणि शनैश्चरदेवतेला प्रार्थना !
विविध ग्रहदेवतांचे महत्त्व आणि त्यांच्याशी संबंधित उपासना करत असतांना, त्यांचा कोप दूर होऊन त्यांची कृपादृष्टी कशी लाभते ?, याची देवाने मला ऋषी आणि संत यांनी रचलेल्या विविध स्तोत्रांच्या माध्यमातून अनुभूती दिली. यासाठी मी भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करते. शनैश्चर देवाने आम्हा साधकांवर अखंड कृपादृष्टी ठेवावी, अशी त्याच्या चरणी प्रार्थना आहे.
– कु. मधुरा भोसले