१. परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले
यांना ओळखणे हे साधकांच्या बुद्धीपलीकडे आहे !
‘गेल्या काही सप्तर्षि जीवनाडीपट्टी वाचनांमध्ये महर्षि बर्याच वेळा साधकांना आवर्जून सांगत आहेत, ‘साधकांनो, परम गुरुजींवरील (परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्यावरील) श्रद्धा वाढवा !’
प्रत्यक्ष श्रीविष्णूने मानवी देहात गुरूंच्या रूपात अवतार घेतला आहे. ‘राम-कृष्णाच्या वेळी हे अवतार आहेत’, याची सर्वांना जाण नव्हती; पण आज महर्षींच्या अगाध कृपेमुळे परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचे अवतारी कार्य आपल्या डोळ्यांनी आपण पाहू शकत आहोत आणि त्याची अनुभूती घेऊ शकत आहोत. अशा महान गुरूंना ओळखणेे, म्हणजे ‘ते कोण आहेत ? त्यांचे मूळ स्वरूप काय ?’, हे साधकांच्या बुद्धीपलीकडील आहे. महर्षि म्हणतात, ‘आम्हाला जरी ‘ते कोण आहेत ? त्यांची अवतारी कृपा कशी चालू आहे ?’, हे सर्व ज्ञात असले, तरी आम्ही स्वतः शिष्यभावाने त्यांच्या चरणी नमस्कार करतो.’
२. कष्टमय शारीरिक त्रास सहन करून आणि साधकांवरील वातावरणातील
अनिष्ट शक्तींची आक्रमणे स्वतःवर घेऊनही साधकांसाठी अखंड कार्यरत असणारी गुरुमाऊली !
महर्षि एक अप्रत्यक्ष खंत व्यक्त करतात, ‘साधक अजूनही गुरूंना समजू शकले नाहीत.’ गुरूंनी किती कष्ट घेऊन साधकांना आज साधनेत आणले आहे. साधक जेवढे त्रास साधक सहन करत आहेत, त्याच्या अनेक पटींनी ते गुरूंनी स्वतःवर घेतले आहेत. सर्व साधकांचे कष्ट, त्रास, अनिष्ट शक्तींची आक्रमणे गुरूंनी स्वतःवर झेलली आहेत. प्रत्येक साधकासाठी त्यांनी अपार कष्ट केले आहेत. ते त्यांच्या स्वतःच्या मुखाने कधीच एका शब्दानेही बोलणार नाहीत की, मी अमुक एक साधकासाठी असे केले आहे. एवढे आपले गुरु महान आहेत. एवढ्या कष्टमय शारीरिक वेदना अंतर्बाह्य सहन करत असतांनाही गुरु साधकांसाठी अखंड कार्यरत आहेत.
३. तळमळीने आणि श्रद्धेने सेवा केलेल्या एका
खारीचीही दखल देव घेतो, तर आपली का नाही घेणार ?
ते जेव्हा झोपण्यासाठी डोळे बंद करतात त्या क्षणी आणि सकाळी उठल्यावर डोळ्यांच्या पापण्या उघडताक्षणी त्यांना प्रथम साधक समोर दिसतात. त्यांना एकच ध्यास असतो, ‘माझ्या साधकांची शीघ्रतेने आध्यात्मिक उन्नती कशी होईल ? त्यांचे आपत्काळात कसे रक्षण होईल ? मी अजून माझ्या साधकांसाठी काय करू शकतो ?’ अशा अवतारी गुरूंना समजणे कठीण आहे; पण त्यांची कृपा संपादन करून ईश्वरप्राप्ती करण्यासाठी साधकांनी गुरूंवरील श्रद्धा वाढवणे महत्त्वाचे आहे. श्रद्धेवरच हे जग टिकून आहे. साधकांनी गुरूंना आपल्या साधनेने एवढे प्रसन्न करावे की, त्यांची कृपा झाल्याविना रहाणार नाही. जेथे तळमळीने आणि संपूर्ण श्रद्धेेने सेवा केलेल्या एका छोट्याशा खारीचीही देव दखल घेतो, तो आपली दखल का घेणार नाही ?
४. केवळ महर्षींमुळेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारी कार्य
साधकांसमोर येत आहे आणि कुणालाही लाभले नाही, असे मार्गदर्शन साधकांना मिळत आहे !
हे द्रष्ट्या आणि अवतारांचे साक्षी असलेल्या महर्षींनो, केवळ आपल्यामुळेच परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचे हे अवतारी कार्य आज आम्हा साधकांसमोर येत आहे. पृथ्वीवर कलियुगात कुणाला लाभले नाही, असे मार्गदर्शन गुरुकृपेने आम्हाला मिळत आहे. आमच्याकडून आजपर्यंत कळत-नकळत ज्या काही चुका झाल्या आहेत, त्यासाठी आम्ही गुरुमाऊलींची क्षमा मागतो.
५. गुरूंना आनंद देता येईल, अशी दृढ
श्रद्धा निर्माण होण्यासाठी सप्तर्षींच्या चरणी केलेली प्रार्थना !
‘हे सप्तर्षींनो, आपल्या कोमल चरणी आम्ही साधक कळकळीची प्रार्थना करतो, ‘आपल्या कृपेने आम्हा साधकांमधील श्रद्धा वाढू दे. आमच्या मनातील नकारात्मक आणि अयोग्य विचारांचे परिवर्तन सकारात्मक अन् साधनेला पूरक अशा विचारांमध्ये होऊ दे. आम्हाला आमच्या साधनेतील अडथळ्यांवर मात करता येऊ दे. गुरूंना आनंद देता येईल, अशी श्रद्धा आमच्यात दृढ होऊ दे.’
– श्री. दिवाकर आगावणे, तिरूवण्णामलई, तमिळनाडू. (१९.४.२०१७)