तमिळनाडू येथील सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे भक्त वेदमूर्ती गुरुमूर्ती शिवाचार्य आणि त्यांचे सुपुत्र वेदमूर्ती अरुण गुरुमूर्ती यांचे सनातनच्या रामनाथी येथील आश्रमात आगमन

उजवीकडे वेदमूर्ती गुरुमूर्ती शिवाचार्यजी आणि त्यांच्या बाजूला वेदमूर्ती अरुण गुरुमूर्ती यांचे औक्षण करतांना पू. (डॉ.) मुकुल गाडगीळ, वेदमूर्तींच्या मागे उभे असलेले श्री. आदर्श बालाजी, शेजारी सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि वेदमूर्ती केतन शहाणेगुरुजी

रामनाथी (गोवा) : तमिळनाडू येथील सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे भक्त आणि महर्षींचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले वेदमूर्ती गुरुमूर्ती शिवाचार्य, त्यांचे सुपुत्र वेदमूर्ती अरुण गुरुमूर्ती आणि नातू श्री. आदर्श बालाजी (वेदमूर्ती गुरुमूर्ती शिवाचार्य यांची मुलगी सौ. अभिरामी यांचा मुलगा) यांचे १४ मे या दिवशी सायंकाळी ७.३० वाजता सनातनच्या आश्रमात आगमन झाले. या वेळी सनातनचे संत पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले. सनातनच्या साधक-पुरोहित पाठशाळेतील अध्यापक वेदमूर्ती केतन शहाणेगुरुजी आणि वेदमूर्ती सिद्धेश करंदीकर यांनी औक्षणाच्या वेळी वेदमंत्रांचे पठण केले. सनातनच्या सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ या वेळी उपस्थित होत्या.

क्षणचित्र

आश्रमात आल्यावर वेदमूर्ती गुरुमूर्ती शिवाचार्य म्हणाले, ‘‘गेल्या ३० वर्षांमध्ये पू. डॉ. ॐ उलगनाथन् नाडीवाचनात ज्या गुरूंविषयी सांगत असत, त्यांच्या आश्रमात आलो आहे, यावर अजून विश्वास बसत नाही. ज्या गुरूंविषयी मी इतकी वर्षे ऐकले होते, त्यांचे यावर्षी मला प्रत्यक्ष दर्शन होणार, हे माझे परमभाग्य आहे. आश्रमात आलो, त्या रात्री मला चांगली झोप लागली. कुठलेही विचार आले नाहीत. कितीतरी वर्षांनंतर मला छान झोप लागली.’’

वेदमूर्ती गुरुमूर्ती शिवाचार्यजी आणि वेदमूर्ती अरुण गुरुमूर्ती यांची वैशिष्ट्ये !

सनातनच्या साधकांचे रक्षण व्हावे, हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी आणि परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे यांसाठी महर्षींनी गेल्या २ वर्षांत तमिळनाडू येथे अनेक यज्ञयाग करवून घेतले. हे सर्व याग सप्तर्षींच्या आज्ञेप्रमाणे वेदमूर्ती गुरुमूर्ती शिवाचार्यजी आणि वेदमूर्ती अरुण गुरुमूर्ती यांनी भावपूर्ण आणि परिपूर्णरित्या केले. रामनाथी येथील सनातनच्या आश्रमावर स्थापित करण्यात आलेले तीन कळस विकत घेऊन नंतर अनुष्ठान करून घेण्याची सर्व प्रक्रिया वेदमूर्ती गुरुमूर्ती शिवाचार्यजी आणि वेदमूर्ती अरुण गुरुमूर्ती यांनी केली. या कळसांमध्ये शक्ती संक्रमण करण्याचे कार्य सप्तर्षींनी वेदमूर्ती गुरुमूर्ती शिवाचार्य आणि वेदमूर्ती अरुण गुरुमूर्ती यांच्या माध्यमातून पूर्ण केले. वेदमूर्ती अरुण गुरुमूर्ती यांचा जन्म सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे झाल्यामुळे सप्तर्षि त्यांचा ‘महर्षींचा पुत्र’ असा उल्लेख नाडीवाचनात सतत करत असतात. ते ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकरजी यांच्या वेदपाठशाळेतील पहिले विद्यार्थी ! बेंगळुरू येथील श्री श्री वेदपाठशाळेत त्यांनी वेदाध्ययन केले आहे. गेल्या ४ वर्षांपासून वेदमूर्ती अरुण गुरुमूर्ती हे श्री श्री रविशंकरजी देशविदेशात विश्वशांतीसाठी करत असलेल्या यागांमध्ये मुख्य पुरोहित म्हणून सहभागी होतात.

सप्तर्षींची कृपा लाभलेले आणि त्यांचे आज्ञापालन करत धर्मसंस्थापनेच्या समष्टी कार्यात सहभागी झालेले वेदमूर्ती गुरुमूर्ती शिवाचार्य आणि वेदमूर्ती अरुण गुरुमूर्ती यांच्या चरणी आम्ही सनातनचे सर्व साधक कृतज्ञ आहोत !

– सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

यज्ञापूर्वी वेदमूर्ती गुरुमूर्ती शिवाचार्य आणि वेदमूर्ती अरुण यांच्याकडून आशीर्वाद घेतांना सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ अन् सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ

 

Leave a Comment