श्री. उदयकुमार हे मंगळुरु येथे रहाणारे असून ते देवीचे भक्त आहेत. गेल्या २५ वर्षांपासून ते ध्यान-साधना करत आहेत. रेकी आणि योगनिद्रा यांमध्ये त्यांचे विशेष प्राविण्य आहे. गत जन्मांविषयी सांगणे, हेसुद्धा त्यांचे वैशिष्ट्य आहे. ते पहाटे ४.३० वाजता उठून गायत्रीमंत्राचा ५ सहस्र जप करतात आणि देवपूजेनंतर न्यूनतम् १० ते १२ घंटे ध्यान साधना करतात. आतापर्यंत जगन्मातेने (देवीने) त्यांना विविध विषयांवरील ज्ञान दिले आहे आणि आताही देत आहे. एकदा ते ध्यानात असतांना देवलोकात गेले. तेव्हा देवतांनी त्यांच्यावर ३.३० घंटे पुष्पवृष्टी केली. ज्योतिष शास्त्राविषयीही ते मार्गदर्शन करतात. त्यांचे विशेष म्हणजे याविषयी त्यांनी काही शिक्षण घेतलेले नसतांना केवळ देवीच्या कृपेने ते भविष्य सांगतात. श्री. उदयकुमार म्हणाले, आपण जे करतो, ते सगळे देवाला समर्पित करायचे. आपल्यात कोणताही अहंकार नसावा. सनातनची साधिका कु. तेजल पात्रीकर यांनी श्री. उदयकुमार यांच्याशी साधलेला वार्तालाप येथे देत आहोत.
१. सृष्टीमध्ये परिवर्तन होऊन सर्व जीव सत्यनिष्ठ, सात्त्विक आणि देवाची भक्ती करणारे असतील !
कु. तेजल : सध्याच्या स्थितीत परिवर्तनाविषयी ब्रह्मांडात प्रक्रिया काय होत आहे ?
श्री. उदयकुमार : आधी सृष्टीची निर्मिती झाली होती. तेव्हा देवतांना आपल्यामुळे सृष्टीची निर्मिती झाली, असा अहंकार वाटला. हाच अहंकार मानवातही येऊन पूर्ण ब्रह्मांड आपल्या हातात आहे आणि देवतांनाही आपणच निर्माण केले आहे, असे त्याला वाटत होते. या सर्वांमध्ये परिवर्तन होऊन पुढे येणार्या सृष्टीत सत्य माहिती असणारे, सात्त्विक आणि आपल्याकडे असलेले इतरांना वाटून खाणार्या व्यक्ती येतील. सगळे जीव देव-देव म्हणून ध्यान करतील, असा काळ लवकरच येईल.
आता ब्रह्मांडात परिवर्तन होत आहे. हेे परिवर्तन वर्ष २०२७ मध्ये पूर्ण होईल. २७.५.२०२७ नंतर भारत आध्यात्मिक विचारांचे राष्ट्र होऊन पूर्ण विश्वाला जागृत करील आणि पूर्ण विश्व अध्यात्म चिंतन विश्व होईल. ही विश्वव्यापी शक्ती आपल्याला न समजल्यामुळे आपण राष्ट्र-भेद आणि धर्म-भेद करत आहोत. आता जी राष्टे्र वेगवेगळी आहेत, ती एकच राष्ट्र असल्यासारखी होतील. तेव्हा भेद रहाणार नाही. प्रत्येकाने चांगल्या मनाने आणि चांगल्या भावनेने त्याला ठाऊक असलेल्या विचारांचे चिंतन इतरांना सांगितलेे, तर हे राष्ट्र निश्चितच उन्नत राष्ट्र होईल.
२. काळाला अनुसरून आणि वेगाने परिवर्तन होत असणे
कु. तेजल : आताच हे परिवर्तन का झाले ? या आधी का नाही झाले ?
श्री. उदयकुमार : देवाने काळाला अनुसरून परिवर्तन केले. आता वर्ष २०२७ यायला दहाच वर्षे शेष राहिल्याने परिवर्तन वेगाने होत आहे.
३. परात्पर गुरु डॉ. आठवलेे पृथ्वीमध्ये सुधारणा
करत असल्याने त्यांच्या देहाला (शरिराला) त्रास होत असणे
कु. तेजल : परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्राणशक्ती पुष्कळ अल्प आहे, तरीही सर्व कार्य होत आहे.
श्री. उदयकुमार : प्रत्येक मनुष्यात आंतरिक शक्ती (Inner Energy) आणि बाह्य शक्ती (Outer Engergy) असते. बाह्य शक्ती त्वचेच्या माध्यमातून स्वीकारली जाते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना बाह्य प्राणशक्ती पुष्कळ प्रमाणात मिळते. त्यांची आंतरिक प्राणशक्ती (Inner Energy) कुकर्मांना नष्ट करण्यासाठी वापरली जाते. त्यामुळेे त्यांची प्राणशक्ती अल्प आहे. ते ठीक होतील. ते पृथ्वीमध्ये सुधारणा करत आहेत; म्हणून त्यांच्या शरिराला त्रास होत आहे.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले हे अवकाशातून
प्राणशक्ती केंद्रित करून ती सर्वांना देणार असणे
कु. तेजल : परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्राणशक्ती वाढण्यासाठी काही उपाय करायला हवेत का ?
श्री. उदयकुमार : आधी प्राणशक्ती पुष्कळ दूर होती; पण आता ती पुष्कळ जवळ आली आहे; म्हणून प्राणशक्ती शोधण्याची आवश्यकता नाही. तीच त्यांना शोधत येईल. पूर्वीच्या काळात सर्वजण साधक होते. त्यांच्या भौतिक शरिरातून निघणार्या प्राणशक्तीमुळे (चैतन्यामुळे) आकाशाच्या पुढेही चांगलीच शक्ती होती. ही चांगली शक्ती परात्पर गुरु डॉ. आठवले केंद्रित करत आहेत आणि त्यांच्याकडून ती परत सर्वांना मिळणार आहे. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करतांनाही अशा केंद्रित केलेल्या सर्व शक्तींच्या माध्यमातून विविध ठिकाणी सृष्टी निर्माण केली. तसेच गुरुदेव करत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्याकडील सर्व सात्त्विक शक्ती वाटणार आहेत. जिवाने भूतलावर किती वर्षे रहायचे, हे ईश्वराने आधीच निर्धारित केलेले असते. प्रत्येक व्यक्तीचे कार्य हे निर्धारित असते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य सर्व विश्वाला सात्त्विक शक्ती देणे, हे आहे.
५. सनातन संस्था परमात्म्याला जाणून
घेऊन प्रत्येकाला परमात्म्याचा बोध करून देत असणे
कु. तेजल : सनातन संस्थेचे हिंदु राष्ट्र स्थापनेमध्ये कार्य कसे असेल ?
श्री. उदयकुमार : सनातन संस्था सनातन धर्माचा एक भाग म्हणून हे कार्य करत आहे. सनातन संस्थेच्या माध्यमातूनच लोकांमध्ये चांगले गुण निर्माण करण्याचे कार्य चालू आहे. संस्थेच्या माध्यमातून हे कार्य विश्वात पोहोचल्यावर संपूर्ण विश्वात सनातन धर्म पसरेल. सर्व विश्वात बंधुत्व निर्माण होईल आणि आपण एकाच आईची मुले असल्यासारखे राहू. यासाठी आपण आपल्यातील अहंकार दूर करण्याचे नियमित प्रयत्न करायला हवेत. अहंकार दूर झाल्याविना बंधुत्वासाठी केलेले प्रयत्न टिकणार नाहीत. अशा विशेष ज्ञान देणार्या व्यक्तीच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) माध्यमातून आपल्यात बंधुत्व निर्माण होईल. ते ज्ञानच आपल्याला अज्ञानाकडून सज्ञानाकडे घेऊन जाईल. पुढे येणारी सर्व पिढी ही सात्त्विकच असेल. या परिवर्तनाची प्रक्रिया चालू होऊन ५० वर्षे झाली आहेत. (या वेळी संस्थेची स्थापना वर्ष १९९० मध्ये झाल्याचे आम्ही त्यांना सांगितले. – तेजल)
५० वर्षांपासून चालू झालेल्या या प्रक्रियेचे ज्ञान काही जणांना आधीच होते. आता ते पूर्ण विश्वात पोहोचेल. मी या प्रकारचे ज्ञान २५ वर्षे सांगत आहे. जो परमात्म्याला जाणून घेतो, तो हिंदु आहे. जे परमात्म्याला समजून घेत नाहीत, ते हिंदू नाहीत. भारत आपले हिंदु राष्ट्रच आहे. सनातन संस्था परमात्म्याला समजून घेऊन प्रत्येकाला परमात्म्याचा बोध करून देत आहे.
६. हिंदु राष्ट्र लवकर येण्यासाठी संघटित होऊन संकुचित भावना दूर करणे आवश्यक !
कु. तेजल : हिंदु राष्ट्र लवकर येण्यासाठी आम्ही काय प्रयत्न करायला हवेत ?
श्री. उदयकुमार : हिंदु राष्ट्राविषयी अनेक मते आहेत. ही मते आमच्या मध्येच निर्माण झाली आहेत. येथे पक्ष-भेदही आहेत. संकुचित भावना दूर करायला पाहिजे. आताच्या प्रयत्नांमुळे १० वर्षांत हे पालट होऊ शकतात. या आधी ते होऊ शकत नव्हते; कारण पालट केव्हा करायचे, हे देवाने निर्धारित केलेलेे आहे. कुठलेही कार्य होण्याच्या आधी ते निर्धारित झालेले असते, ते नंतर मानवाला कळते.
७. प्रत्येकाची साधना आणि भगवंताची प्रेरणा यामुळे प्रकृतीचे परिवर्तन
होऊन मनुष्याच्या विकृतीचा नाश होईल अन् विश्वात हिंदुत्वाचे बळ वाढेल !
कु. तेजल : हिंदु राष्ट्र कसे असेल ?
श्री. उदयकुमार : आपले मन कलुशित झाले की, आपल्याला सगळे वेगळे वाटायला लागतेे. आपले मन शुद्ध झाल्यावर आपण सगळे एकाच धर्माचे आहोत, असे वाटायला लागते. सध्या प्रकृती अशुद्ध होऊन तिच्यातील अशुद्ध भाग मानवामध्ये आला आहे. आता प्रत्येकाची साधना आणि भगवंताची प्रेरणा यांमुळे प्रकृतीचे परिवर्तन होऊन मनुष्याच्या विकृतीचा नाश होईल आणि विश्वात हिंदुत्वाचे बळ वाढेल.
८. भविष्यात विश्वात सनातन धर्म असेेल,
त्यामुळे सर्वांना आपण सनातन धर्मीय आहोत, असे वाटेल !
कु. तेजल : येणार्या हिंदु राष्ट्रात अनिष्ट प्रकृतीही असतील का ?
श्री. उदयकुमार : येणार्या काळात प्रकृतीत परिवर्तन होऊन मनुष्यातील सर्व अशुभ नष्ट होईल. वातावरणातील रज-तमामुळे प्रकृती कलुषित झाली आहे. येणार्या चांगल्या काळात सात्त्विक जीव सात्त्विक प्रकृतीशी आपोआप मिळून जाणार आहेत आणि संपूर्ण विश्वात सनातन धर्म असेेल. त्यामुळे सर्वांना आपण सनातन धर्मीय आहोत, असे वाटेल.
९. श्री. उदयकुमार यांना सूक्ष्मातून रावणाचा वध होतांनाचे दृष्य दिसणे
एके दिवशी श्री. उदयकुमार यांना कुकर्म करणारे निष्प्रभ झाल्याचे दृष्य दिसले. वर्ष २०१७ पासून ब्रह्मांडात विशेष परिवर्तन होईल. वर्ष २०१७ मधील सर्व अंकांची बेरीज केल्यावर १० हा अंक येतो. रावणाला १० तोंडे होती. १० तोंडेे म्हणजे ९ ग्रह आणि त्याचे स्वतःचे १ तोंड, असे मिळून ती १० होती. त्या दहा डोक्यांनी देवतांना कसे मारायचे ?, हाच विचार तो करत होता. एकदा श्री. उदयकुमार यांना सूक्ष्मातून रावणाचा वध होतांनाचे दृष्य दिसले. कुकर्म करणारे आता निष्प्रभ झाले आहेत, असा या दृष्याचा अर्थ आहे. (जसे त्या काळी रावण ही दुष्प्रवृत्ती होती, तशी आताच्या काळात स्वार्थी आणि अपेक्षा ठेवणारे लोक चांगले कार्य करणार्यांना विरोध करतात, ते दुष्ट आता निष्प्रभ होत आहेत.)
१०. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची स्थापना होणारच !
कु. तेजल : महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या स्थापनेविषयी काही सांगा.
श्री. उदयकुमार : परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाची स्थापना करण्याचे कार्य करावे, अशी प्रकृतीची प्रेरणा झाली आहे आणि ते करणारच आहेत. भगवंताची प्रेरणा आणि प.पू. गुरुदेवांकडून लोकांना मिळणारे प्रोत्साहन यांमुळे परिपूर्ण असे हे परिवर्तन होणारच आहे, हे निश्चित आहे.
११. भगवंतच भक्तांचे त्रास दूर करणार असणे
कु. तेजल : साधकांचे त्रास दूर होण्यासाठी काय करावे ?
श्री. उदयकुमार : जो साधना करतो, त्याला जोडून वेदना येतेच. हे आपण टाळू शकत नाही. असेच आपल्याला विविध त्रास होत असले, तरी परमात्म्याच्या चिंतनाने ही सर्व बाधा दूर होईल. भौतिक शरिराला थोडा त्रास होईल. मीसुद्धा असे त्रास अनुभवले आहेत; पण भगवंताने तुमच्या गुरूंकडून हे कार्य करून घेण्याचे निश्चित केले आहे. यात कुणीही, काहीही करू शकत नाही.
रावण असल्यामुळे रामाचे महत्त्व कळले. कंस असल्यामुळे कृष्णाचे महत्त्व कळले. करणी, जादुटोणा इत्यादी जे प्रकार आहेत ते मानवनिर्मित विषाणू (virus) आहेत. हे भगवंताने निर्माण केलेले नाहीत. भगवंत Anti-virus असल्याने तो या विषाणूंना सहज नष्ट करणार आहे. काळजी करू नका !
श्री. उदयकुमार यांच्याशी संभाषण करून आम्ही बाहेर आलो, त्यावेळी अचानक वीजा चमकून धो धो पाऊस सुरू झाला. विशेष म्हणजे दिवसभर आणि आम्ही त्यांच्याकडे पोचेपर्यंत आकाश निरभ्र होते, आणि नंतर अचानक पाऊस आला. त्यावेळी वरूणदेवानेच दिलेली ही साक्ष आहे, असे जाणवले.
– कु. तेजल पात्रीकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये आकाशतत्त्व आणि भूमीतत्त्व दोन्हीही असणे
(कलियुगातील) आईच्या उदरात प्रत्यक्ष ईश्वर येऊन जन्म घेऊ शकत नाही. (सध्याच्या) आईची (तितकी सात्त्विकता नसल्याने) ईश्वराची शक्ती सहन करण्याची क्षमता तिच्यामध्ये नसते. त्यामुळे आईच्या उदरातून त्याचा मनुष्य रूपात जन्म होेऊन साधना करत गेल्याने त्याचे दैवीकरण होते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा आत्मा पवित्र आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या डोक्यावर लक्ष्मीचा एक कलश आणि छातीवर एक कलश दिसत आहे. वरचा कलश आकाश आणि छातीवरचा कलश भूमीशी निगडित आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये आकाशतत्त्व आणि भूमीतत्त्व ही दोन्ही तत्त्वे आहेत. – श्री. उदयकुमार
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या गतजन्मांविषयी मिळालेले ज्ञान
१. परात्पर गुरु डॉ. आठवले हे जन्म-जन्मांपासून गोपूजक आणि एक महान साधक असणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मागील जन्मांविषयी श्री. उदयकुमार यांना ज्ञान मिळाले. ते म्हणाले, परात्पर गुरु डॉ. आठवले हे अनेक जन्मांपासून एक महान साधक आहेत. एका जन्मात त्यांनी धारवाड जिल्ह्यात एक स्त्री म्हणून जन्म घेतला होता. तिचे गाय आणि वासरावर पुष्कळ प्रेम होते. गाय आणि वासरू यांना पूजनीय भावात पहाता पहाता तिने गाईमध्येे देवाला पहाण्यास आरंभ केला.
२. त्यानंतर दुसर्या जन्मात त्यांनी विशेष साधक म्हणून जन्म घेतला असणे (या वेळी श्री. उदयकुमार यांना दीड पायावर उभे (म्हणजे एक पाय उभा करून दुसर्या पायाचा तळपाय उभ्या पायाच्या गुडघ्याला लावणे, याला कन्नडमध्ये दीड पाय, असे म्हणतात.) राहून पाण्यात साधना केल्याचे दृश्य देवाने दाखवले.)
३. त्यानंतर त्यांनी अनेक जन्म हिमालयात तपश्चर्या केली आहे. प्रत्येक जन्म बघत गेलो, तर त्यांचे पुष्कळ जन्म आहेत.
४. त्यांच्या हातून निरपेक्षपणे संपूर्ण विश्वाला संघटित करण्याचे कार्य घडणार असणे
सांप्रत जन्मात संपूर्ण विश्वाला संघटित करण्याचे कार्य त्यांच्या हातून व्हायचे आहे. येथे (भूतलावर) अनेक वर्षांपासून साधना करण्यास पुष्कळ साधक आले आहेत. साधना म्हणजे आपल्या भौतिक शरीर, मन आणि बुद्धी यांद्वारे साधना केलेले पुष्कळ जण आहेत. परमात्म्याच्या प्रेरणेने अनेक जण आहेत. (उच्च लोकातून अनेक जीव पृथ्वीवर धर्मराज्य स्थापन करण्यासाठी आले आहेत, असे परात्पर गुरु डॉ. आठवले नेहमी सांगतात. – कु. तेजल पात्रीकर) काही जण कुठलीही अपेक्षा न ठेवता साधना करतात. त्यापैकी एक म्हणजे तुमचे गुरुदेव !
५. निरपेक्षपणे विश्वकल्याणासाठी झटणे
अपेक्षा न करता केलेली साधना म्हणजे परमात्म्याची प्रेरणा. भूतलावर अनेक जणांमध्ये परमात्म्याची प्रेरणा होत आहे. विश्वकल्याण व्हायला पाहिजे. सध्या मानव पशुवत् झाला आहेे; म्हणून भगवंताने काहींची निवड करून मानवाला उपदेश देऊन त्याच्यात परिवर्तन करण्याचे सामर्थ्य दिले आहेे. फळाची अपेक्षा न करता कार्य करणारे पुष्कळ जण आहेत. दुसरे म्हणजे भगवंताचे प्रोत्साहन नसेल, तर ती प्रेरणा फलदायी होत नाही.