सुखसागर सेवाकेंद्राच्या बांधकामाची सेवा करतांना संत अन् साधकांनी अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सर्वज्ञता आणि प्रीती !

अनुक्रमणिका

श्री. भूषण मिठबांवकर

 

वर्ष १९९९ ते २००० या काळात देवाच्या कृपेने मला फोंडा, गोवा येथील सुखसागर सेवाकेंद्रात रहाण्याची आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना जवळून अनुभवण्याची संधी मिळाली.

१. सुखसागर सेवाकेंद्राच्या बांधकामाची सेवा मिळणे

गोव्यातील सीमेपाईण, म्हार्दोळ येथून फोंड्याच्या सुखसागर येथील सेवाकेंद्रात साहित्याचे स्थलांतर करण्याची सेवा चालू होती. मी ट्रकमधून साहित्य उतरवण्याच्या सेवेसाठी आलो होतो. त्या नवीन जागेत आवश्यक त्या सर्व सुविधा नव्हत्या. त्या करण्यासाठी काही साधकांचा एक गट करून त्यांना एका जागेत दुरुस्तीची सेवा करण्यास सांगण्यात आले.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना साधकांनी बांधकामातील
कौशल्ये आत्मसात करून सक्षम होणे आणि त्यातून साधकांची
साधना होऊन त्यांची आध्यात्मिक उन्नती होणे अपेक्षित असणे

आम्ही सकाळी ७ वाजल्यापासून रात्री १० – ११ वाजेपर्यंत दुरुस्तीची सेवा करायचो. आम्ही सर्व साधक सेवाकेंद्राबाहेर झोपायला जात होतो. आम्ही सकाळी सेवेला येण्यापूर्वीच परात्पर गुरु डॉ. आठवले तेथे उपस्थित असायचे. श्री. पांडुरंग परब आमच्या सेवेचे नियोजन पहायचे. त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले कोणत्या सेवा करायच्या आहेत ?, हे सांगायचे. त्या वेळी दैनिक सनातन प्रभातमध्ये सेवाकेंद्राच्या बांधकामाची सेवा करतांना सुतारकाम, विद्युतजोडणी, नळजोडणी, गवंडीकाम, फॅब्रिकेशन इत्यादी सेवा शिकण्याची सुवर्णसंधी !, अशी चौकट दिली होती. पुढे राष्ट्र-धर्म यांच्या कार्यासाठी देश-विदेश यांत शेकडो आश्रम बांधायचे असल्याने परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना साधकांनी सुखसागर सेवाकेंद्राचे बांधकाम करतांना त्यातील कौशल्ये शिकून घेऊन सक्षम व्हावे, असे अपेक्षित होते. त्यांना साधकांच्या सेवेपेक्षा त्यांनी आध्यात्मिक प्रगती करून घ्यावी, असे वाटत असेे.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रत्येक
साधक प्रत्येक गोष्टीत सक्षम व्हायला हवा, ही तळमळ

एखाद्या साधकानेे त्याला येत असलेल्या कौशल्याव्यतिरिक्त अन्य काही शिकण्याचा प्रयत्न केल्यास परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पुष्कळ आनंद होत असे. माझे फॅब्रिकेशन या विषयातील शिक्षण झाल्याने मला ती सेवा जमत असे. मी सुतारकाम किंवा अन्य सेवा शिकण्याचा प्रयत्न केल्यावर परात्पर गुरु डॉक्टर मला प्रोत्साहन द्यायचे. त्यांना प्रत्येक साधक प्रत्येक गोष्टीत सक्षम व्हायला हवा, अशी तळमळ होती.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी
बांधकामाशी संबंधित शारीरिक कष्टाच्या सेवाही करणे

परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांच्या प्रत्येक कृतीतून साधकांसमोर आदर्श ठेवतात. ते सकाळी लवकर उठून चिरे तासणे, वाळू चाळणे, ट्रक चालवणे, बांधकाम साहित्याची घमेली उचलणे आदी सेवा करायचे. कृष्णाने राजसूय यज्ञाच्या वेळी उष्ट्या पत्रावळी उचलल्या होत्या, त्याची या वेळी मला आठवण झाली.

५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सेवा अल्प वेळेत
आणि सर्वांना सोयीस्कर अशी होण्यासाठी सांगितलेली सूत्रे

५ अ. प्रत्येक गोष्टीला आवश्यक तेवढाच वेळ देणे अपेक्षित असणे

एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले सुखसागरच्या आगाशीत बसून लिहीत होते. त्या वेळी त्यांना आधारासाठी शेजारी असलेले पाण्याचे रिकामे पिंप हवे होते. त्यावर धूळ असल्याने मी पुसण्यासाठी ओले कापड शोधत होतो. त्या वेळी त्यांनी सांगितले, कुठल्या गोष्टीला किती वेळ द्यायचा, हे समजले पाहिजे. साध्या कपड्याने धूळ झटकली की, झाले.

५ आ. सेवेचा आवाका मोठा असतांना सर्वांना सोयीचे होईल अशी टप्याटप्याने सेवा कशी करायची ?, ते सांगणे

सुखसागरच्या मार्गाकडील असलेल्या सज्ज्याला (बाल्कनीला) १० ते १२ लोखंडी जाळ्या (ग्रील्स) बसवायच्या होत्या. मी त्यासाठी लागणारे सर्व साहित्य एकदम कापले आणि एकाच वेळी रंगवून जोडण्यास घेतले. आम्ही एकाच दिवशी सर्व जाळ्या (ग्रील्स) बसवण्यास घेतल्या. आम्ही सर्व जण साधनेत नवीन असल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्या वेळी आम्हाला काही सांगितले नाही. सर्व जाळ्या बसवून झाल्यावर त्यांनी आम्हाला आमच्या चुकीची जाणीव करून दिली. त्यांनी सांगितले, तुम्ही आरंभी २ – ३ जाळ्यांसाठी (ग्रील्ससाठी) लागणारे साहित्य बनवून त्या बसवल्या असत्या, तर काम लवकर झाले असते आणि साधकही तेथे सेवा करू शकले असते.

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची साधकांवरील प्रीती

६ अ. साधकांना त्रास होणार नाही, अशा वेळेत सेवा करण्यास सांगणे

एकदा आम्ही रात्री उशिरापर्यंत पाण्याची टाकी बांधण्याची सेवा करत होतो. आम्ही ही सेेवा कुणालाही अडचण न येता करणे अपेक्षित होते. आमच्या बोलण्याने शेजारच्या खोलीत झोपलेल्या साधकांची झोपमोड झाली. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दुसर्‍या दिवशी साप्ताहिक सत्संगात हे सूत्र आम्हाला सांगितले.

६ आ. साधकांच्या आवश्यकतेनुसार वस्तू उपलब्ध करून देणे

कोणत्या साधकाला कुठल्या लाकडी वस्तूंची (फर्निचरची) अधिक आवश्यकता आहे, याचा अभ्यास करून सेवाकेंद्रात अर्पण आलेल्या वस्तू (फर्निचर) दिल्या जायच्या. अन्य ठिकाणच्या सेवाकेंद्रांत लाकडी वस्तू (फर्निचर) हव्या असल्यास त्या वस्तू वाहनातून तिकडे पाठवण्याचे नियोजनही व्हायचे.

६ इ. साधकांना ते करत असलेल्या सेवेत विरंगुळा म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांना चारचाकीने गोवा दर्शनाला पाठवायचे.

६ ई. साधकाच्या मनमंदिरातील अविस्मरणीय आठवणी

६ ई १. साधकाची घरातील व्यक्तींसमवेत राहून सेवा करायची इच्छा जाणून देवद आश्रमात सेवेसाठी जाण्यास सांगणे : त्या वेळी माझे कुटुंब ठाणे जिल्ह्यातील विरार येथे रहायला होते. मला साधनेसाठी घरातून विरोध होता. काही दिवसांनी मिरज आणि देवद (पनवेल) येथे दोन नवीन आश्रमांचे बांधकाम चालू होणार होेते. तेव्हा माझ्या मनात विचार आला, मला देवद आश्रमाच्या बांधकामाची सेवा मिळायला हवी म्हणजे कुटुंबियांच्या संपर्कात रहाता येईल; परंतु ईश्‍वरेच्छेनुसार करायचे; म्हणून मी याविषयी कुणाला काही सांगितले नाही. एका रात्री अकस्मात् मला निरोप मिळाला, उद्या सकाळी धर्मरथासमवेत देवद येथे पुढील सेेवेसाठी जायचे आहे. मला घरातील व्यक्तींसमवेत राहून सेवा करायला मिळेल आणि त्यांचा विरोधही अल्प होईल, याचा मला आनंद झाला. मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना काहीही न सांगताही त्यांनी माझी इच्छा ओळखली.

६ ई २. सेवाकेंद्रातून निघतांना साधकाला उंच जागी ठेवलेली भेटवस्तू स्वतः काढून देणे आणि त्याला व्यापक होऊन सेवेतून साधना व्हायला हवी, असे सांगणे : मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा निरोप घेण्यासाठी त्यांना भेटायला गेलो. तेव्हा ते स्वतः ५ फुटी मोठ्या स्टूलवर चढले आणि त्यांनी मांडणीतून एक भेटवस्तू काढून मला दिली. ते मला म्हणाले, पनवेलला जात आहेेस, तर तिथेच अडकून रहायचे नाही. पुढे आपल्याला अनेक आश्रम उभे करायचे आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी सेवेला जाता आले पाहिजे. त्यातून आपली साधना व्हायला हवी. मी हा प्रसंग आयुष्यभर विसरणार नाही. त्यांनी सर्व साधकांना प्रेम दिले आणि प्रत्येकाकडून साधना करवून घेतली.

७. कृतज्ञता आणि प्रार्थना

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या समवेत अनुभवलेला प्रत्येक दिवस आणि क्षण आठवल्यावर मला आजही प्रोत्साहन मिळून माझी भावजागृती होते. माझा हा उत्साह आणि त्यांच्या प्रतीचा भाव असाच टिकून राहून तो वृद्धींगत होऊ दे, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना !

– श्री. भूषण मिठबांवकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.२.२०१७)

 

शिष्याने गुरूंची सेवा करायची असते. सनातनमध्ये मात्र परात्पर गुरु डॉक्टर स्वतःच साधकांना सर्वतोपरी साहाय्य करतात. केवळ गुरु म्हणून नव्हे, तर माता, पिता, बंधू, सखा अशा अनेक नात्यांनी परात्पर गुरु डॉक्टर साधकांना आधार देतात. त्यांच्या कक्षात केर काढणाऱ्या साधिकेला साहाय्य म्हणून खुर्च्या उचलण्यापासून ते प्रसंगी साधकांचा वेळ जाऊ नये; म्हणून रुग्णसेवेसारख्या कृतीही साधकांच्या बरोबरीने पूर्वी करत असत. साधकांना साधना करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण व्हावे, यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत असतात. केवळ साधकांचीच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबियांचीही काळजी ते तितक्याच प्रेमाने घेतात. ते साधकांची केवळ स्थुलातूनच नव्हे, तर सूक्ष्मातूनही काळजी घेतात. साधकांना साधनेनंतर पुढची गती मिळतच असते; मात्र त्यांच्या कुटुंबियांनी त्या साधकाला साधनेसाठी अनुकूल वातावरण निर्माण करून एकप्रकारे त्यागच केलेले असतो. त्यामुळे कुटुंबियांचाही मृत्यूनंतरचा प्रवास सुकर होण्यासाठीही प्रयत्न करणारे परात्पर गुरु डॉक्टर, हे मोक्षगुरु आहेत ! सनातनच्या प्रत्येक साधकाने कोणत्या ना कोणत्या रूपात गुरूंची ही प्रीती अनुभवली आहे. त्यातील काही हृदयस्पर्शी प्रसंगांना येथे उजाळा देत आहोत.

 

८. साधकांच्या पायाला टाचणी लागू नये; म्हणून ती स्वतः उचलणे !

कु. गीता चौधरी

‘२८.२.२००३ या दिवशी आश्रमात सत्संग होता. साधक चुका सांगायला उभे रहातात, तेथेच एक टाचणी पडली होती. एका-दोघांनी पाहूनही ती उचलली नाही. सत्संग चालू झाल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी ती बघताक्षणीच स्वतः जाऊन उचलली. त्यांना ‘साधकांच्या पायाला लागू नये’, ही काळजी होती. ’

 

९. विदेशी साधकाला रहाण्यासाठी दिलेल्या खोलीची व्यवस्था परात्पर गुरु
डॉ. आठवले यांनी स्वतः पहाणे, हे समजल्यावर साधकातील कृतज्ञताभावात वाढ होणे !

‘एस्.एस्.आर्.एफ्.चे संपादक श्री. शॉन क्लार्क (सध्याची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के) पूर्वी ऑस्ट्रेलियाला असतांना काही कालावधीकरता रामनाथी आश्रमात यायचे, तेव्हा आम्ही चांगल्यात चांगल्या प्रकारे त्यांची खोली आवरत असू, तरीही शॉनदादांना दिलेली खोली बघण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टर पुनःपुन्हा येत होते. त्यात राहिलेल्या चुकाही ते आम्हाला लक्षात आणून देत होते. ‘शॉनदादांना लिखाणासाठी पटल कोणते ठेवायचे ? बेडशीट आणि चादरी यांचा रंग फिकट हवा अन् दोन्ही एकाच रंगाचे हवे. खोलीत आल्यावर त्यांना प्रसन्न वाटले पाहिजे. विदेशात त्यांना चांगल्या खोल्यांमध्ये रहाण्याची सवय असते’, हे ते सांगत होते. प्रत्यक्षात खोली पूर्ण आवरून झाली, तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘ही खोली चैतन्यानेच भरून गेली. दादांसाठी विदेशात यापेक्षा चांगल्या खोल्या असतीलही; पण प्रत्यक्ष परात्पर गुरु डॉक्टर येऊन गेलेल्या खोलीत चैतन्य भरून गेले होते. ते कुठल्याच देशात मिळणार नाही.’

शॉनदादा आश्रमात येतांना विचारत होते, ‘‘मी एवढे सामान आश्रमात आणले, तर चालेल ना ? मला एखादा कप्पा मिळेल ना ? माझ्या सामानामुळे इतर साधकांची गैरसोय होणार नाही ना ?’’ प्रत्यक्षात त्यांना दिलेली खोली पाहिल्यावर त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. ‘त्या खोलीत चैतन्य जाणवते’, असे ते स्वतःहून म्हणाले. ‘ही खोली प्रत्यक्ष परात्पर गुरु डॉक्टरांनी आमच्याकडून आवरून घेतली’, हे समजल्यावर त्यांच्या तोंडवळ्यावरील कृतज्ञतेचे भाव अधिकच वाढले. परात्पर गुरु डॉक्टरांची साधकांवरील ही प्रीती पाहून मलाही कृतज्ञता वाटली.

 

१०. साधकांना खोलीत बोलवून खाऊ देणे आणि आग्रहाने वाढणे !

सुखसागर येथे दसऱ्याच्या दिवशी काही साधकांना खोलीत बोलावून परात्पर गुरु डॉक्टरांनी पुष्कळ खाऊ खायला दिला. आम्ही लाजत होतो. ते वेगवेगळ्या गंमती सांगून आम्हाला हसवून आमचा बुजरेपणा न्यून करत होते. ‘आमच्यासमवेत त्यांनीही खावे’, असे आम्हाला वाटत होते. त्यावर ते म्हणाले, ‘‘प्रतिदिन तुम्ही मला वाढता. आज मला तुम्हाला वाढायची संधी मिळाली आहे. आधी तुम्हाला तृप्त करतो. मग मी घेतो.’’ आमच्या ताटल्याही ते गोळा करण्यासाठी मागत होते; पण आम्ही दिल्या नाहीत. शेवटी ते म्हणाले, ‘‘मला भंडाऱ्यात सेवा केल्याचा आनंद मिळाला. पूर्वी प.पू. भक्तराज महाराज यांच्या भंडाऱ्यात मीही आतासारखे इतरांना आग्रह करून वाढायचो. आता प्रकृतीमुळे मला भंडाऱ्याला जाता येत नाही; पण देवाने तोही आनंद दिला.’’ असे त्यांनी म्हटल्यावर मला अजूनच लाज वाटली. ‘प्रत्यक्ष देव असूनही ते आमची सेवा करण्यात आनंद मानत होते आणि मला माझी सेवाही परिपूर्ण करता येत नाही’, याचे मला वाईट वाटत होते. कृतज्ञतेनेच भरलेल्या अंतःकरणाने आणि प्रीतीने न्हाऊन निघालेल्या तनाने ‘हा प्रसंग हृदयात कसा कोरता येईल ?’, याच विचारात आम्ही खोलीतून बाहेर पडलो. आम्ही बाहेर पडतांनाही ‘आज मला फार आनंद मिळाला हो !’, असेच ते म्हणत होते !’

– कु. गीता चौधरी, सनातन आश्रम, रामनाथी. (३१.५.२०१६)

 

११. ‘छान झाले’, या शब्दांनी साधकांना आपलेसे करणारे परात्पर गुरु डॉक्टर !

‘वर्ष १९९३-९४ च्या दरम्यान श्री. दत्ता बेंद्रे मला शीव येथील परात्पर गुरु डॉक्टरांच्या घरी सेवेला घेऊन आले. त्या ठिकाणी मला सुतारकामाची सेवा होती. प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवाची सिद्धता चालू होती. त्यासाठी डफलीच्या आकाराचे महाद्वार बनवण्याची सेवा होती. प्रतिदिन कामावरून सुटल्यावर मी शीव येथे जात असे. मी आणि अन्य साधक आम्ही ती सेवा करत होतो. प्रत्येक वेळी परात्पर गुरु डॉक्टर ‘छान झाले !’, असे म्हणायचे. आरंभी ‘छान’ हा शब्द ऐकण्यासाठी मी नेहमी जात असे.

 

१२. अहंशून्यता आणि सेवाभाव यांचा समुच्चय असणारे परात्पर गुरु डॉक्टर !

एके दिवशी सहसाधकाने मला चहा आणून दिला. चहा प्यायल्यावर मी रिकामा कप खोलीच्या एका कोपऱ्यात तसाच ठेवून दिला होता. त्या वेळी विचार केला की, एवढ काम आटपले की, नंतर तो कप धुऊन ठेवू. थोड्या वेळाने पाहिले, तर कोपऱ्यात चहाचा रिकामा कप नव्हता. नंतर माझ्या लक्षात आले की, परात्पर गुरु डॉक्टरांनीच तो कप उचलून नेला होता. नंतर पुष्कळ खंत वाटली की, एवढ्या मोठ्या व्यक्तीने चहाचा उष्टा रिकामा कप उचलून नेला.’

– श्री. सदानंद पांचाल, मिरा रोड, मुंबई. (२४.१२.२०२०)

 

१३. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातनचे संत

अ. प.पू. दास महाराज यांच्या पायाचे शस्त्रकर्म झाल्यानंतर
दैनंदिन कृती करण्यास साहाय्य करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

वर्ष २००७ मध्ये एका अपघातात पायाला मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्यावर माझ्या पायाचे शस्त्रकर्म करावे लागले. त्यानंतर रुग्णालयातून घरी जाण्याची अनुमती मिळाल्यानंतर मी रामनाथी आश्रमात गेलो. परात्पर गुरुदेव स्वतः मला खोलीत नेण्यासाठी आले होते. परात्पर गुरुदेवांच्या खोलीच्या शेजारीच माझी रहाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मी पुष्कळ वेळा आगाशीत येऊन बसत असे. तेव्हा परात्पर गुरुदेव तेथे येऊन माझ्या पायाचे निरीक्षण करत असत. पायाला मोठी छिद्रे होती. ते त्यांना हात लावून प्रतिदिन पायाचे निरीक्षण करायचे. ते कधीकधी स्वतःच मला आगाशीत घेऊन जायचे. त्या वेळी ते स्वतः मला बसण्यासाठी आसंदी, पटल आणि पायथळ (पाय ठेवायचा लाकडी खोका) आगाशीत घेऊन येत.

देवच भक्तांची सेवा करतो, याची प्रचीतीच मला गुरुदेवांनी दिली. देव आणि गुरु यांचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही.

– प.पू. दास महाराज, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२३.८.२०१८)

आ. प.पू. (श्रीमती) विमल फडकेआजी यांचा हात अर्धांगवायूमुळे हलत
नसल्याने त्यांना नमस्कार करायला साहाय्य करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘११ जुलै २००३ या दिवसापासून पू. फडकेआजींना अर्धांगवायूचा झटका असल्यामुळे झोपूनच होत्या. त्या वेळी आजींचा एक हात हलत नव्हता. १४ जुलै या दिवशी गुरुपौर्णिमा होती. सकाळपासून आजींना वाटत होते, ‘आज प.पू. डॉक्टर आपल्या खोलीत येतील; पण आपल्याला साधा हात जोडून नमस्कारही करता येत नाही.’ त्यामुळे त्यांना पुष्कळ वाईट वाटत होते. पू. आजी सकाळपासून अधूनमधून नमस्काराच्या मुद्रेत हात जोडण्याचा प्रयत्न करत होत्या. संध्याकाळी अचानक प.पू. डॉक्टर खोलीतील दरवाज्याजवळ आले. तेव्हा आजींचे लक्ष नव्हते. त्या हात जोडण्याच्या प्रयत्नात इतक्या मग्न होत्या की, प.पू. डॉक्टर आल्याचे त्यांना कळलेही नाही. त्या वेळी प.पू. डॉक्टरांनी मला खुणेनेच विचारले, ‘हे काय चालू आहे ?’ मी सांगितले, ‘आई तुम्हाला नमस्कार करण्याचा प्रयत्न करत आहे.’ त्याक्षणी प.पू. डॉक्टरांनी पू. आजींचा एक हात दुसऱ्या हाताला जुळवला आणि म्हणाले, ‘आजी, तुमचा नमस्कार पोचला.’ त्या वेळी पू. आजींना पुष्कळ आनंद झाला. केवढे ते गुरु-शिष्याचे प्रेम ! अजूनही ते दृश्य आठवले, तरी कृतज्ञतेने मन भरून येते.

इ. आजारी व्यक्तीची पूर्णपणे काळजी घेणे !

एक दिवस पू. आजींना एका जागेवर पुष्कळ वेळ झोपल्यामुळे त्रास होत होता. त्या वेळी मी त्यांना थोडे उचलण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळी प.पू. डॉक्टर खोलीत आले आणि त्यांनी मला पू. आजींना उचलण्यासाठी साहाय्य केले. केवळ उचलून ते थांबले नाहीत, तर त्यांनी पू. आजींना विचारले, ‘तुम्हाला अजून थोडे वर उचलायला हवे का ? आता आरामदायी वाटते का ?’ त्यावर आजी ‘हो’ म्हणाल्या.

दुसऱ्या दिवशी आजींना श्वास घेण्यासाठी थोडा त्रास होत होता. आजींना त्रास होत असल्याचा निरोप मी प.पू. डॉक्टरांना दिला. ते लगेचच खोलीत आले. त्यांनी पू. आजींना स्टेथोस्कोप लावून तपासले. ते दृश्य पाहून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. त्रास पुष्कळच वाढल्याने काही वेळाने पू. आजींना रुग्णालयात भरती करावे लागले. रुग्णालयातही प.पू. डॉक्टर पू. आजींना भेटण्यासाठी २ वेळा येऊन गेले. पू. आजी रुग्णालयातून आश्रमात आल्यानंतरही ते नेहमी त्यांची काळजी घेत.’

– श्रीमती मनीषा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन संकुल, देवद, पनवेल.

ई. पू. माईणकरआजींना उठायला साहाय्य करण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांचा हात धरणे !

‘एक दिवस परात्पर गुरु डॉक्टर पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजींना भेटायला आले होते. ते जायला निघाल्यावर पू. आजी उठायचा प्रयत्न करू लागल्या. तेव्हा तिथे कुणीच नव्हते; म्हणून त्या बाहेर उभ्या असलेल्या साधिकेला बोलवायला लागल्या. तेव्हा परात्पर गुरु डॉक्टर त्यांना म्हणाले, ‘‘कुणाला बोलवता ? मी आहे ना इथे ?’’ आणि त्यांनीच पू. आजींना आधार देण्यासाठी पू. आजींचा हात धरला.’

– सौ. अनुराधा पुरोहित ( पू. (श्रीमती) शालिनी माईणकर यांची मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

Leave a Comment