मनाली, हिमाचल प्रदेश या ठिकाणी असलेले श्रीरामाचे कुलगुरु श्री वसिष्ठ ऋषी यांचे तपोस्थान !

मनाली येथील श्री वसिष्ठ ऋषींचे तपोस्थान (वसिष्ठ कुंड)

मनाली येथील मंदिराच्या गाभार्‍यातील श्री वसिष्ठ ऋषींची मूर्ती

 

सनातनला सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणारे वसिष्ठऋषी !

अखिल मानवजातीविषयी शिव-पार्वती यांच्यात झालेला संवाद सप्तर्षींनी ऐकला. त्यांनी तो मानवजातीच्या कल्याणासाठी आणि आध्यात्मिक जिवांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी लिहून ठेवला. हेच ते नाडीभविष्य ! नाडीभविष्य ताडपत्रीच्या काही पट्ट्यांवर लिहिलेले असते. सप्तर्षि जीवनाडीच्या माध्यमातूनच महर्षींनी परात्पर गुरु डॉ. आठवले कलियुगातील श्रीविष्णूचा अवतार आहेत !, असे सांगून त्यांचे अवतारत्व प्रकट केले आहे. आताही वेळोवेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारत्वाचे विविध पैलू महर्षींच्या माध्यमातूनच उलगडत आहेत. सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून केलेल्या मार्गदर्शनानुसारच सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत.

हिंदु राष्ट्राची शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्र, धर्म, तसेच साधक यांचे रक्षण व्हावे आणि देवतांचा आशीर्वाद मिळावा, यासाठी सप्तर्षि जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून मार्गदर्शन करणारे महर्षि हे वसिष्ठ ऋषीच आहेत. वैश्‍विक कार्याच्या आवश्यकतेप्रमाणे वर्तमानकाळात कार्य करणारा सप्तर्षींचा गट वेगवेगळा असतो; मात्र सर्वत्र बहुतांशी आदिगुरु म्हणून वसिष्ठच मार्गदर्शन करतात आणि जनसामान्यांचे प्रतिनिधी म्हणून महर्षि विश्‍वामित्र वसिष्ठांना प्रश्‍न विचारत असतात. २-३ मासांनी सप्तर्षींतील महर्षी पालटतातही. कधी यांत वसिष्ठ, विश्‍वामित्र यांच्याबरोबर नंदिकेश्‍वर आणि नारदही येतात, तर कधी अंगीरस, जमदग्नी, दुर्वास, पुलस्त्य असेही महर्षी संवादात असतात, असे दिसून येते. आताच्या नाडीपट्टीत प.पू. डॉक्टरांविषयी, तसेच सनातनच्या कार्याविषयी बोलणार्‍या गटात वसिष्ठ, विश्‍वामित्र, गौतम, पराशर, पुलस्त्य, अंगीरस आणि दुर्वास हा सप्तर्षींचा गट आहे. कधीतरी मध्येच येऊन नंदिकेश्‍वर किंवा नारदही तेवढ्या काळापुरता प्रश्‍न विचारून जातात. – सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

 

वसिष्ठ कुंडाची कथा आणि या स्थानाचे महत्त्व

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ

मनाली, हिमाचल प्रदेश येथे जवळजवळ १०,००० फूट उंचीवर महर्षि वसिष्ठांचे तपोस्थान आहे. येथे एक ऊन पाण्याचे कुंडही आहे. यालाच वसिष्ठ कुंड, असे म्हणतात. विशेष म्हणजे आजूबाजूला बर्फ असतांनाही या पाण्याचे बर्फ होत नाही आणि एवढ्या न्यून तापमानालाही हे पाणी ऊनच असते. या कुंडात स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्तता मिळते. याची कथा पुढीलप्रमाणे आहे.

पूर्वी याच विपाशा नदीच्या काठी महर्षी वसिष्ठांनी तप करून ते आत्मग्लानी येण्यापासून मुक्त झाले होते. रावणाला मारल्यानंतर श्रीरामचंद्रांना ब्रह्महत्येचे पाप लागले. या पापापासून मुक्त होण्यासाठी श्रीरामांनी अश्‍वमेध करण्याचे योजले. इतर ऋषीमुनींसोबत चर्चा करतांना वसिष्ठ ऋषींना शोधून काढण्याचे कार्य लक्ष्मणावर सोपवण्यात आले. लक्ष्मणाने याच प्रदेशात, म्हणजेच कुल्लू घाटीमध्ये वसिष्ठ ऋषींना शोधून काढले. तो थंडीचा कालावधी होता. आपल्या गुरूंच्या स्नानासाठी म्हणून आपला अग्नीबाण सोडून लक्ष्मणाने येथील भूमीतून ऊन पाणी काढले. वसिष्ठ ऋषी तर तपस्वी होते. त्यांना ऊन पाण्याची आवश्यकता नव्हती. लक्ष्मणाला थकलेला पाहून वसिष्ठांनी त्याला पहिल्यांदा या ऊन कुंडात स्नान करण्याची आज्ञा दिली आणि असे वरदानही दिले की, जो भाविक येथे स्नान करेल, त्याची पापे नष्ट होतील, चर्मरोग बरे होतील, तसेच त्याचा थकवाही दूर होईल.

 

श्रीराम मंदिराच्या स्थापनेचा इतिहास

वसिष्ठ कुंडाजवळच श्रीरामाचे मंदिर आहे. जवळजवळ ४००० वर्षांपूर्वी हे मंदिर राजा जनमेजय याने बनवले. पिता राजा परिक्षिताच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून राजा जनमेजय याने अनेक ठिकाणी श्रीरामाची मंदिरे बनवली. त्यांतीलच हे एक मंदिर आहे. कालांतराने या मंदिरातील मूर्तींची चोरी झाली. वर्ष १६०० मध्ये राजा जगतसिंहने कुल्लूमध्ये वैष्णव धर्माचा प्रसार चालू केला. अयोध्येमध्ये श्रीरामाने अश्‍वमेध यज्ञासाठी बनवलेल्या मूर्तींना घेऊन येण्यासाठी राजाने तेथे आपले दूत पाठवले; परंतु श्रीराममूर्तींना ते ओळखू शकले नसल्याने वेगळ्याच दोन मूर्ती दोन वेळा आणल्या गेल्या. या मूर्तींची स्थापना राजाने वसिष्ठ, तसेच मणिकर्ण या स्थानांतील श्रीराममंदिरांत केली आणि मंदिरांच्या नावावर मालकीहक्काची मोहोरही लावली. त्यानुसार येथे मंदिराची व्यवस्था पाहिली जाते.

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, मनाली, हिमाचल प्रदेश

 

श्रीगुरूंचे महात्म्य सांगणार्‍या वसिष्ठ ऋषींच्या चरणी कृतज्ञता !

प.पू. डॉ. आठवले हे स्वयं विष्णूचा अवतार आहेत, हे महर्षींनी १०.५.२०१५ या दिवशी घोषित केले आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी, साधकांच्या साधनेतील, तसेच धर्मप्रसारातील अडथळे दूर होण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करणारे, तसेच श्रीगुरूंची साधकांना खर्‍या अर्थाने ओळख करून देणारे महर्षि साधकांना त्यामुळेच परमवंदनीय आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारत्व उलगडून सर्वत्र त्यांची कीर्ती करण्याचे दायित्व आता महर्षींनी त्यांच्याकडे घेतले आहे. त्यासाठी सनातनच्या साधकांनी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी कमीच आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले हे साधकांचे सर्वस्व आहेत. त्यांची कृपा संपादन करण्यासाठी साधकांनी काय करायला हवे, याविषयी वेळोवेळी मार्गदर्शन करून सप्तर्षींनी साधकांवर अनमोल कृपाच केली आहे. वसिष्ठ ऋषींसह सर्वच सप्तर्षींच्या चरणी सनातन परिवार अनंतकोटी कृतज्ञ आहे !

– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ

 

ऋषी-मुनींची शिकवण आणि नावे चिरंतन असण्याचे कारण

वसिष्ठ ऋषी, विश्‍वामित्र ऋषी, भृगु ऋषी, अत्रि ऋषी, अगस्ति ऋषी, नारद मुनी इत्यादींची शिकवण आणि नावे युगानुयुगे चिरंतन आहेत. याउलट बुद्धीवान आणि धर्मद्रोही अन् बुद्धीप्रामाण्यवादी यांची नावे १ – २ पिढ्यांतच विसरली जातात. याचे कारण हे की, ऋषी-मुनी सत्य सांगतात; म्हणून काळ त्यांच्या नावाला आणि शिकवणीला स्पर्श करू शकत नाही. याउलट बुद्धीवान आणि धर्मद्रोही अन् बुद्धीप्रामाण्यवादी सांगतात ते सत्य नसल्याने काळाच्या ओघात त्यांची नावे आणि शिकवण विसरली जाते.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

4 thoughts on “मनाली, हिमाचल प्रदेश या ठिकाणी असलेले श्रीरामाचे कुलगुरु श्री वसिष्ठ ऋषी यांचे तपोस्थान !”

  1. सुंदर माहिती, अशीच माहिती रामायणात येणाऱ्या व्यक्तींचीही मिळाल्यास बरे होईल. आपल्या साधुसंतांचीही माहिती मिळाली तर आवडेल. धन्यवाद

    Reply

Leave a Comment