प्राचीन इजिप्तमध्ये पपायरस नावाच्या झाडापासून कागद बनवत, हे शाळेत आवर्जून शिकवतात; पण कागदनिर्मितीचा खरा इतिहास वेगळाच आहे. मावळा म्हणजे प्राचीन भारतातील ‘मालव’ प्रांत. त्याची राजधानी म्हणजे धार किंवा धारानगरी. वर्ष १०१० मध्ये तेथे भोजराजा होता. तो अत्यंत विद्वान असून त्याने एकूण ८४ ग्रंथ लिहिले. त्यातील काही आज उपलब्ध आहेत. भोजराजाने कमलनाल म्हणजे कमळाच्या देठापासून कागद बनवण्याचे कारखाने काढले होते. हे मात्र आमच्यापासून आवर्जून लपवले जाते. धार ते मांडू या रस्त्यावर ‘नालचा’ नावाचे गाव आहे. त्याचे मूळचे नाव आहे ‘नालकक्षफर’. भोजराजाने येथे प्रचंड सरोवर बांधून त्यात कमळाची शेती केली.
नालचाजवळ कागजीपूर नावाचे आणखी एक गाव आहे. नालकक्षफरमधील सरोवरातील कमळांचे देठ तेथे आणून त्याचा लगदा केला जाई. त्यासाठी तेथे मोठ्या टाक्या बांधल्या होत्या. आज मूळच्या १५२ टाक्यांपैकी ३ टाक्या तेथे जीव धरून आहेत. त्यानंतर कमळाच्या देठाच्या लगद्यापासून उत्तम प्रतीचा कागद बनत असे.
भोजराजाच्या या कागदाच्या कारखान्यात सिद्ध झालेल्या उत्तम टणक कागदावर लिहिलेले मिस्त-उल फजल आणि नियामतनामा हे दोन फारसी ग्रंथ आजही पहायला मिळतात; पण कुठे ?, तर जिथे भोजशाळेतील त्या वेळची सुंदर सरस्वतीची मूर्ती ज्या लंडनच्या संग्रहालयात आहे तेथे ! अशा पर्यावरणप्रेमी राजा भोज, ज्याने झाडे न तोडता कागद बनवला, त्याचे आपण स्मरण करूया !
श्री. विद्याधर नारगोलकर, स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे