परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला गुरु, संत आणि ऋषी यांनी दिलेले आशीर्वाद !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून इतके कार्य होण्याचे कारण म्हणजे त्यांची तळमळ, भक्ती आणि त्यांना मिळालेले गुरु, संत आणि महर्षी यांचे आशीर्वाद होय.

 

अ. श्री गुरूंचे आशीर्वाद

‘प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर ऑगस्ट १९८७ मध्ये त्यांचा शिष्य म्हणून स्वीकार करण्यापासून ते आजपर्यंत स्थुलातून आणि सूक्ष्मातून कृपादृष्टी राहिली आहे. परात्पर गुरु डॉ.आठवले यांना विविध प्रसंगांतून दिलेली शिकवण आणि त्यांची अध्यात्मात करवून घेतलेली प्रगती, हा प.पू. बाबांच्या कृपाशीर्वादाचाच परिणाम आहे. याविषयीची सविस्तर माहिती सनातन-निर्मित ‘आदर्श शिष्य’,’ गुरु’ आणि ‘संत भक्तराज महाराज यांची शिकवण’ या ग्रंथमालिकांमध्ये दिली आहे.

प.पू. भक्तराज महाराज हेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याचे प्रेरणास्थान आहेत. प.पू. बाबांची संकल्पशक्ती आणि कृपाशीर्वाद यांमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य दिवसेंदिवस वाढत आहे. याविषयी शब्दांत काही व्यक्त करणे अशक्य आहे. तरीही प.पू. बाबांचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर असलेले प्रेम, तसेच त्यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याला दिलेले आशीर्वाद लौकिकार्थाने कळावेत, यासाठी हे प्रकरण संकलित केलेले आहे.’

– श्री. चेतन राजहंस, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

अ १. प.पू. भक्तराज महाराज यांनी
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अध्यात्मप्रसाराच्या कार्याला दिलेले आशीर्वाद !

  ‘अध्यात्म-प्रसाराच्या संदर्भात प.पू. बाबांनी मला पुढे दिलेल्या वर्षी उत्तरोत्तर पुढचे पुढचे आशीर्वाद दिले.

वर्ष १९९२ : अध्यात्माचा महाराष्ट्रभर प्रसार करा.

वर्ष १९९३ : अध्यात्माचा भारतभर प्रसार करा.

वर्ष १९९५ : अध्यात्माचा जगभर प्रसार करा.

९ फेब्रुवारी १९९५ या दिवशी प.पू. बाबांचा अमृतमहोत्सव आम्ही साजरा केला. तेव्हा त्यांनी मला आशीर्वाद म्हणून धर्मप्रसाराचा संदेश देणारा श्रीकृष्णार्जुन असलेला चांदीचा रथ दिला’. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अ २. प.पू. भक्तराज महाराज यांनी
परात्पर गुरु डॉ.आठवले यांचे कार्य स्वतः चालवणार असण्याविषयी दिलेली ग्वाही !

फेब्रुवारी १९९५ मध्ये प.पू. बाबांचा अमृतमहोत्सव झाला. तेव्हा ते एकदा ताडकन उठून बसून विशिष्ट आवाजात श्री. शरद मेहेर यांना म्हणाले, “सनातन मी चालवीन !”

 

आ. संतांचे आशीर्वाद (वर्ष १९९६ पासून)

वर्ष १९९६ पासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अनेक साधू-संतांच्या भेटी घेतल्या आणि त्यांच्याशी जवळीक साधली. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद संस्थेच्या कार्याला सातत्याने मिळाले आणि मिळत आहेत. वर्ष २००७ पासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे कुठे जाता आले नाही, तरीही अनेक संत कार्याशी जोडले जात असून आशीर्वाद देत आहेत.

 

इ. महर्षींचे आशीर्वाद (एप्रिल २०१४ पासून)

वर्ष २०१४ पासून सप्तर्षि जीवनाडीपट्टी आणि भृगु संहिता यांचे वाचक अनुक्रमे पू. डॉ. ॐ उलगनाथन् आणि डॉ. विशाल शर्मा यांच्या माध्यमातून ऋषी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्याच्या प्रत्येक गोष्टीच्या संदर्भात आशीर्वादस्वरूप मार्गदर्शन करत आहेत.

(अधिक माहितीसाठी वाचा – ग्रंथ ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्यात विविध संतांचा सहभाग’)

Leave a Comment