अ.परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी
साधकांच्या शीघ्र आध्यात्मिक उन्नतीसाठी ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाची निर्मिती करणे
कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग इत्यादी कोणत्याही मार्गाने साधना केली, तरी ईश्वरप्राप्ती होण्यासाठी गुरुकृपेविना गत्यंतर नाही. यासाठीच म्हटले आहे, ‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।’ म्हणजे ‘शिष्याचे परममंगल (मोक्षाप्राप्ती) हे केवळ गुरुकृपेनेच होऊ शकते.’ शीघ्र गुरुप्राप्ती होण्यासाठी आणि गुरुकृपा सातत्याने होत रहाण्यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘गुरुकृपायोग’ हा सोपा साधनामार्ग सांगितला आहे.
अ १. गुरुकृपायोगाचा सिद्धांत – ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग !’
सांप्रदायिक आणि विविध पंथांतील साधना सर्वांसाठी एकच असते; परंतु गुरुकृपायोगानुसार ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’ आहेत. प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकृतीचा आणि पात्रतेचा असल्याने ईश्वरप्राप्तीचे साधनामार्गही अनेक आहेत. आपली प्रकृती आणि पात्रता यांना अनुरूप अशी साधना केल्यास ईश्वरप्राप्ती लवकर होण्यास साहाय्य होते. सनातन संस्थेचे सहस्रावधी साधक गुरुकृपायोगाच्या एकाच छत्राखाली आपापली निरनिराळी साधना करत आहेत.
अ २. गुरुकृपायोगाची मुख तत्त्वे
बहुतेकांना साधनेची तत्त्वे ठाऊक नसल्याने ते चुकीची साधना करण्यात आयुष्य वाया घालवतात. तसे होऊ नये; म्हणून परात्पर गुरु डॉक्टरांनी गुरुकृपायोगाची पुढील तत्त्वे सांगितली आहेत –
१. आवड आणि क्षमता यांनुसार (प्रकृतीनुसार) साधना, २. अनेकातून एकात जाणे, ३. स्थुलाकडून सूक्ष्माकडे जाणे, ४. पातळीनुसार साधना, ५. वर्णानुसार साधना, ६. आश्रमानुसार साधना, ७. काळानुसार साधना, ८. सगुणापेक्षा निर्गुण श्रेष्ठ; पण साधनेसाठी निर्गुण उपासनेपेक्षा सगुण उपासना श्रेष्ठ, ९. तत्त्वानुसार साधना आणि १०. व्यक्तीनिष्ठा नको, तर तत्त्वनिष्ठा हवी!
अ ३. गुरुकृपायोगाची वैशिष्ट्ये
अ ३ अ. सर्वसमावेशक साधनामार्ग
गुरुकृपायोग हा कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग आदी धनामार्गांना सामावून घेणारा, असा ईश्वरप्राप्तीचा सहजसोपा मार्ग आहे. ‘गुरुकृपायोगातील’ विविध योगमार्गांचे प्रमाण पुढीलमाणे आहे.
योगमार्ग प्रमाण | (टक्के) |
---|---|
१. भक्तीयोग | ४० |
२.ज्ञानयोग | ३० |
३.कर्मयोग | २० |
४.इतर | १० |
एकूण | १०० |
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.३.२०१७)
अ ३ आ. गुरुमंत्र देण्याची पद्धत नसलेला साधनामार्ग म्हणजे गुरुकृपायोग !
‘गुरुकृपायोगानुसार साधना करणा-या साधकांपैकी कोणालाही मी गुरुमंत्र दिलेला नाही, तरीही ते आध्यात्मिक उन्नती करत आहेत आणि काही साधक तर आध्यात्मिक उन्नती करून सदगुरुपदापर्यंत पोहोचले आहेत. याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. गुरुमंत्र मिळणे, म्हणजे गुरूंनी दीक्षा देणे होय. गुरुदीक्षा म्हणजे गुरूंनी सांगितलेली साधना. गुरुकृपायोगात सांगितलेली गुरुतत्त्वाला काळानुसार अपेक्षित अशी व्यष्टी साधना (वैयक्तिक साधना) आणि समष्टी साधना (समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी करण्याची साधना), ही एक प्रकारे गुरूंनी सांगितलेली साधनाच असून ती केल्याने गुरुकृपा होते, हे अनेक साधकांनी शब्दशः अनुभवले आहे.
२. गुरुमंत्रात ‘मंत्र’ हा शब्द असला, तरी बहुधा शिष्याने कोणता नामजप करावा, हे गुरूंनी सांगितलेले असते. गुरुकृपायोगानुसार साधनेमध्ये ‘व्यक्ती तितक्या कृती, तितके साधनामार्ग ‘ हा सिद्धांत असून या साधनेचा ‘वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती’ हा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे साधक त्यांच्या साधनेला पूरक म्हणजेच स्वतःची कृती, स्वतःला होणारा वाईट शक्तींचा त्रास, ते करत असलेल्या समष्टी साधनेसाठी आवश्यक आध्यात्मिक बळ इत्यादी कारणांसाठी आवश्यक असे निरनिराळे जप करतात. हे सर्व आध्यात्मिक उन्नतीसाठी पोषक असल्याने वेगळ्या गुरुमंत्राची आवश्यकता नसते.
३. ‘केवळ गुरुमंत्र घेतलेला शिष्य बनण्यापेक्षा ‘जाणूनी श्री गुरूंचे मनोगत’, अशी गुरुसेवा करणारा शिष्य बनणे अधिक योग्य असते, हे गुरुकृपायोगानुसार साधनेत शिकवलेले असल्याने साधक गुरुमंत्रात अडकून रहात नाहीत.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१८.३.२०१७)
अ ३ इ. गुरुकृपायोगाची आठ अंगे
१. स्वभावदोष-निर्मूलन, २ अहं-निर्मूलन, ३. नामजप, ४. सत्संग, ५. सत्सेवा, ६. सत्साठी त्याग, ७. प्रीती (निरपेक्ष प्रेम) आणि ८. भक्तीभाव जागृत करण्यासाठी प्रयत्न
(अधिक विवेचनासाठी वाचा- ग्रंथमालिका ‘गुरुकृपायोग’)
अ ३ ई. ‘कोणत्याही योगमार्गाची साधना योग्य प्रकारे होऊन शीघ्र आध्यात्मिक गती होण्यासाठी साहाय्यक ठरते गुरुकृपायोगातील ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन’ पद्धत.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (६.४.२०१७)
आ. साधकांच्या साधनेकडे व्यक्तीगत लक्ष
देण्यासाठी व्यष्टी साधना आणि समष्टी साधना यांचा आढावा देण्याची पद्धत निर्माण करणे
साधना करतांना स्वभावदोष आणि अहं यांमुळे साधकांकडून चुका होतात. या चुकांमुळे साधकांच्या साधनेची आणि सेवेचीही फलनिष्पत्ती घटते, तसेच गुरुकार्याचीही हानी होऊ शकते. असे होऊ नये, यासाठी प्रत्येक साधकाने त्याच्या व्यष्टी आणि समष्टी साधनेचा आढावा साधारणपणे प्रत्येक ७ दिवसांनी देण्याची पद्धत परात्पर गुरु डॉक्टरांनी घालून दिली आहे.
आढावा देण्याच्या निमित्ताने साधकांचे स्वतःच्या साधनेविषयी चिंतन होते. आढावा घेणा-याकडून साधकांना योग्य दृष्टीकोन मिळून साधनेची पुढची दिशाही कळते. यामुळे साधकांची साधना चांगली होण्यास साहाय्य होते. अशा प्रकारे साधनेचा एवढ्या काटेकोरपणे नियमित आढावा देण्याची पद्धत अन्य कोणत्याही संप्रदायात किंवा आध्यात्मिक संस्थेत पहायला मिळत नाही !
इ. साधनेच्या दृष्टीतून १४ विद्या आणि ६४ कला यांच्या शिक्षणाचे बीजारोपण करणे
‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, या सिद्धांताला अनुसरून परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांची विद्या ग्रहण करण्याची क्षमता आणि कलेची आवड यांनुसार त्यांना साधना शिकवली. वेदांचे अध्ययन करण्याची क्षमता असलेल्या साधकांसाठी ‘सनातन साधक-पुरोहित पाठशाळा ‘स्थापन केली. आज परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ‘ईश्वराप्राप्तीसाठी कला’, हे ध्येय ठेवून काही साधक चित्रकला, मूर्तीकला, संगीत, नृत्यकला, नाट्यशास्त्र, वास्तूविद्या आदी कलांच्या माध्यमांतून साधना करत आहेत.
परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करत असणा-या ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या’ माध्यमातून साधनेच्या दृष्टीतून १४ विद्या आणि ६४ कला यांचे शिक्षण देण्यात येणार आहे.
ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे
मार्गदर्शन आणि कृपा यांमुळे साधकांची होत असलेली शीघ्र आध्यात्मिक उन्नती !
बरेच संत आणि गुरु यांच्याकडे त्यांची परंपरा पुढे चालवण्यासाठी एकही शिष्य नसतो. याउलट परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे मार्गदर्शन आणि कृपा यांमुळे मार्च २०१७ पर्यंत सनातनचे ७० साधक संत झाले आहेत आणि १,०१४ साधकांनी ६० टक्क्यांहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठली असून तेही संत बनण्याच्या मार्गावर आहेत.