अनुक्रमणिका
- १. ‘पी.टी.आय्.’ या वृत्तसंस्थेविषयीची चौकशी करायला पाठवणे
- २. लिखाण वाचतांना कायम पेन समवेत ठेवणा-या प.पू. डॉक्टरांकडून लिखाण नेहमीच सतर्कतेने वाचण्याची शिकवण मिळणे
- ३. संपादकीय लिखाण करण्यास पूर्ण मुभा देणे
- ४. लिखाणातील अयोग्य शब्दप्रयोग लक्षात आणून देणे
- ५. दैनिक कार्यालयातील साधकांचे शुद्धलेखन सुधारावे, यासाठी सतत प्रयत्नशील रहाणारे प.पू. डॉक्टर !
- ६. सनातनच्या पत्रकारितेविषयी ग्रंथ सिद्ध करणे
- सनातन संस्थेसारख्या आध्यात्मिक संस्थेचे वर्तमानपत्र चालवण्याचा धाडसी निर्णय घेणारे प.पू. डॉक्टर आणि त्यातून सिद्ध झालेले त्यांचे द्रष्टेपण
- ७. कारगील युद्धाविषयीचे सनातन प्रभातमधील लिखाण वाचून वाचकांना सनातनचा विशेष ‘युद्ध वार्ताहर’ असल्याचे वाटणे
- ८. ‘दैनिक वितरणातील समस्यांकडे लक्ष देणे’, हेही आपलेच दायित्व आहे, हे प.पू. डॉक्टरांनी शिकवणे
- ९. दैनिक कार्यालयातील वाहनचालकांच्या समस्यांकडे लक्ष देणारे प.पू. डॉक्टर !
- १०. दैनिकातील चुकांविषयी साधकांना विचारायला शिकवणे
- ११. कार्य नवीन साधकांच्या हाती देऊन आणि ते करणा-या जुन्या साधकांना पुढची सेवा देऊन सगळ्यांच्या क्षमतांचा विकास करणारे प.पू. डॉक्टर
- १२. अन्य साधकांच्या चुका हाताळतांना मी कुठे न्यून पडलो, हे दाखवणे
- १३. साधकांकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटवून समस्येकडे नव्या दृष्टीनेे पहायला शिकवणारे प.पू. डॉक्टर
- १४. कार्यालयाच्या पूर्ण स्वच्छतेचेे महत्त्व मनावर बिंबवणे
- १५. परिपूर्ण स्वच्छता कशी करायची, ते शिकवणे
- १६. महत्त्वाकांक्षेला अंत नाही, त्यामुळे ती सोडूनच द्यायला हवी, हे प.पू. डॉक्टरांनी स्वत:च्या उदाहरणातून शिकवणे
- १७. पारदर्शकता ठेवणे
- १८. आश्रमात साधकांना वाचण्यासाठी लागणारे सनातन प्रभातचे अंक मुद्रणालयात खराब म्हणून टाकून दिलेल्या प्रतींतून (‘वेस्टेज’मधून) घ्यायला प.पू. डॉक्टरांनी सांगणे
- १९. महनीय व्यक्तीला भेटतांनाही आध्यात्मिक दृष्टी ठेवण्यास सांगणारे प.पू. डॉक्टर !
- २०. अंक वेळेत सिद्ध होण्यासाठी ठामपणे नियोजन राबवण्यास सांगणारे प.पू. डॉक्टर
१. ‘पी.टी.आय्.’ या वृत्तसंस्थेविषयीची चौकशी करायला पाठवणे
मी सप्टेंबर १९९८ मध्ये मुंबई येथे रहात असतांना प्रथम गोव्यातून दैनिक सनातन प्रभात चालू करायचे ठरले. प.पू. डॉक्टरांनी मला ‘पी.टी.आय्.’ (प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया) या वृत्तसंस्थेच्या मुंबईतील कार्यालयात जाऊन त्यांच्याकडून ‘वृत्त कसे मिळणार ? त्यांचे महिन्याचे भाडे किती ? त्यांचे वर्गणीदार होण्याची कार्यपद्धत’ इत्यादींविषयीची चौकशी करून येण्यास सांगितले. तसे केल्याने ‘पी.टी.आय्.’कडून वृत्ते कशी मिळतात, आपल्याला गोव्यात ती कशी मिळू शकतील, यांविषयी माहिती मला मिळाली. यांतून ‘दायित्व घेऊन सेवा करणे’ हा संस्कार माझ्यावर होण्यास साहाय्य झाले.
२. लिखाण वाचतांना कायम पेन समवेत
ठेवणा-या प.पू. डॉक्टरांकडून लिखाण नेहमीच सतर्कतेने वाचण्याची शिकवण मिळणे
प.पू. डॉक्टर कोणतेही लिखाण वाचतांना त्यांच्या समवेत पेन असे. त्यायोगे ते मजकुरावर आवश्यकतेनुसार शुद्धलेखन, व्याकरण किंवा संकलन आदी स्तरांवरील सुधारणा, कोणता मजकूर कशासाठी संरक्षित करायचा यासंबंधीच्या खुणा, अशा विविध खुणा करायचे. त्यातून दैनिक कार्यालयात सेवा करणा-या साधकांना शिकायला मिळाले की, आपण पण कायम पेन समवेत बाळगायला हवी आणि वाचत असलेल्या लिखाणावर आवश्यकतेनुसार शुद्धलेखनादी संस्करण त्या त्या वेळीच करायला हवे. यातून वेळही वाचतो आणि सतर्कतेने वाचण्याची अन् शुद्धलेखनाच्या दृष्टीने पहाण्याची सवय लागते.
३. संपादकीय लिखाण करण्यास पूर्ण मुभा देणे
साधक वैचारिक लिखाण करत असतांना प.पू. डॉक्टरांनी त्यांना कधी ‘अमुक विषयावर करा’, ‘तमुक विषयावर करू नका’, असे काही सांगितले नाही. क्वचित सनातनसंबंधी काही घटना घडली, तर कार्यकारी संपादकांना संपादकीय लेखातून भूमिका मांडण्यास ते सूचित करायचे. एरव्ही त्या संपादकियातील शुद्धलेखनादी चुका ते दुस-या दिवशी दाखवून देत असत. यातून साधक दायित्व घेऊन लिखाण करायला शिकले. एखाद्या विषयावर स्वतंत्रपणे काही लिखाण करायला शिकले.
३ अ. साधक घडणे महत्त्वाचे आहे, हे संपादकीय लिखाणाच्या अनुषंगाने लक्षात आणून देणे
एकदा असा प्रसंग आला की, दैनिकातील साधकांचे वेळेचे नियोजन नीट होत नसे. वेळेत सेवा पूर्ण होत नसत. अंक छपाईला जाण्यात विलंब होत असे. त्यामुळे ‘आपल्याकडे छापण्यासाठी लिखाण पुष्कळ आहे. त्यात वैचारिक लिखाणही आहेच. त्याचप्रमाणे एरव्हीही सनातन प्रभातमध्ये अन्य अनावश्यक वृत्ते नसतातच, तर मग संपादकीय लिखाण करणे बंद करूया का, जेणेकरून त्या त्या संबंधित साधकांचा वेळ वाचून अंक लवकर सिद्ध होण्यास साहाय्य होईल’, असा विचार आम्ही प.पू. डॉक्टरांकडे मांडला. त्यावर त्यांनी सांगितले, ‘‘तेवढीच तर जागा आहे साधकांना स्वत:हून लेखन करायला. ती असू देत. त्यातून ते शिकतील.’’ यातून शेवटी ‘साधक घडणे’ याला प्राधान्य आहे, हे शिकायला मिळाले. यातून पुढे स्वतंत्रपणे संपादकीय लिखाण करणारे साधक घडले.
४. लिखाणातील अयोग्य शब्दप्रयोग लक्षात आणून देणे
दैनिक सनातन प्रभातमध्ये संपादकीय किंवा अन्य लेख मी लिहित असे. त्या वेळी माझ्याकडून अयोग्य शब्दप्रयोग झाल्यावर त्यांनी ते मला वेळोवेळी लक्षात आणून दिले आहे. येथे ‘भले जरी अन्य प्रतिष्ठित वर्तमानपत्रे त्यांच्या संपादकीय लेखात अशा शब्दांचा उपयोग करत असली, तरी आपण तसा अयोग्य शब्दप्रयोग करू नये. अन्य लेखकांचे अंधानुकरण टाळावे’, हे त्यांनी शिकवले. ‘संपादकीय हे योग्य शब्दप्रयोग, लिखाण आदींच्या आधारे स्वत:चे स्थान सांभाळणारे असे असायला हवे’, हे त्यांनी शिकवले. एकदा माझ्याकडून एका लेखात एका चित्रपटातील स्त्री-पुरुष संबंधांचे चित्रण आणि त्याचा परिणाम यांसंबंधाने लिखाण केले गेले. प.पू. डॉक्टरांनी असे लिखाण करतांना अतिशय संयतपणे करावे, हे त्यातील चूक दाखवून स्पष्ट केले. यावरून ‘काही विषयांवर आपली भूमिका संयतपणे मांडण्याचे पथ्य काही झाले, तरी पाळायलाच हवे’, हे शिकायला मिळाले.
५. दैनिक कार्यालयातील साधकांचे
शुद्धलेखन सुधारावे, यासाठी सतत प्रयत्नशील रहाणारे प.पू. डॉक्टर !
गोव्यात दैनिक सनातन प्रभातचा प्रारंभ झाला. तेव्हा ती सेवा करणा-या साधकांचा त्यापूर्वी मराठी लेखनाशी संबंध आलाच असला, तर तो कधी तरी कोणाला तरी दोन-चार ओळींचे पत्र लिहिण्यापुरताच असे. त्यामुळे ‘शुद्धलेखन म्हणजे काय ?’, हेही साधकांच्या लक्षात येत नसे. प.पू. डॉक्टरांनी दैनिकातील चुका परत परत दाखवण्याच्या जोडीला एकमेकांचे शुद्धलेखन पडताळणे, कोणी तरी वाचून दाखवलेला परिच्छेद वाचून दाखवून तो लिहिणे आणि त्यातून शुद्धलेखन तपासणे असे विविध उपक्रम साधकांकडून करवून घेतले. प्रारंभी ‘यासाठी वेळ दिला, तर प्रत्यक्ष दैनिकाशी संबंधित सेवा वेळेत कशा होणार’, असे वाटून साधकांच्या मनाची हे उपक्रम करण्यास तितकी सिद्धता नसायची. त्या वेळी वेळेची कितीही ओढाताण होत असली, तरी यासाठी वेळ देण्यास प.पू. डॉक्टर सांगत. त्याचा पाठपुरावाही ते घेत असत. त्यामुळे दैनिकातील सेवा करतांना शुद्धलेखनाचा प्राधान्यक्रम साधकांच्या मनावर ठसला.
६. सनातनच्या पत्रकारितेविषयी ग्रंथ सिद्ध करणे
‘सनातनची पत्रकारिता’ हा ग्रंथ प.पू. डॉक्टरांनी दैनिक सनातन प्रभात चालू होताच वर्षभरात सिद्ध केला. त्यातून साधकांना आणि इतरांना ‘आपण काय अन् कशासाठी करत आहोत’, हे स्पष्ट झाले. एखाद्या दैनिकाने आपल्या पत्रकारितेविषयी स्वतंत्र ग्रंथ लिहिल्याचे हे एकमेव उदाहरण असावे.
सनातन संस्थेसारख्या आध्यात्मिक संस्थेचे वर्तमानपत्र चालवण्याचा
|
७. कारगील युद्धाविषयीचे सनातन प्रभातमधील
लिखाण वाचून वाचकांना सनातनचा विशेष ‘युद्ध वार्ताहर’ असल्याचे वाटणे
कारगील युद्ध चालू झाल्यानंतर राज्यकर्त्यांकडून त्या संबंधाने झालेल्या चुका, उणिवा सनातन प्रभातमधून मांडल्या जात असत. हे लिखाण अर्थातच प.पू. डॉक्टरांनी केलेल्या खुणांवर आधारित असे. ते वाचून कार्यालयात दूरभाष करून काही वाचकांनी विचारले, ‘‘सनातन प्रभातचा विशेष ‘युद्ध वार्ताहर’ आहे कि काय ?’’ ‘राज्यकर्त्यांच्या चुका आणि उणिवा शोधण्यासाठी आवश्यक संवेदनशीलता कशी असावी ?’, हे यातून आम्हाला शिकायला मिळाले.
८. ‘दैनिक वितरणातील समस्यांकडे लक्ष देणे’,
हेही आपलेच दायित्व आहे, हे प.पू. डॉक्टरांनी शिकवणे
घराघरात दैनिक सनातन प्रभात नेऊन देणे, ही सेवा साधकच करत असत. त्यांना त्यांच्या वाट्याचा गठ्ठा वेळेवर मिळणे, त्यात मागणीप्रमाणे नेमके तेवढेच अंक असणे, हे महत्त्वाचे होते. त्या वेळी ‘वितरकांना समस्या येऊ लागल्यानंतर त्यांनी त्याच दिवशी, त्याच वेळी सुखसागर येथे समस्या कळवण्यासाठी दूरभाष करावा’, हे प.पू. डॉक्टरांनी सांगितले. यातून ‘नुसते दैनिक सिद्ध करणे महत्त्वाचे नाही, तर ते यथास्थित वेळेत वितरित होणेही तितकेच महत्त्वाचे आहे’, हे शिकायला मिळाले. ‘तसे झाले नाही, तर नुसते दैनिक छापून त्याचा काय उपयोग’, हाही भाग लक्षात आला. त्याचप्रमाणे वितरक साधकांच्या अडचणीही समजल्या.
९. दैनिक कार्यालयातील वाहनचालकांच्या समस्यांकडे लक्ष देणारे प.पू. डॉक्टर !
दैनिक कार्यालयातील वाहनचालक रात्री दैनिकाचे वितरण करून पहाटे कार्यालयात येत असत. त्यामुळे रात्री दैनिकाचा बटरपेपर वेळेत सिद्ध होऊन जातो कि नाही, हे पहाणे येथपासून त्यांना पुरेशी झोप मिळणे, त्यांना जेवण मिळणे इत्यादी गोष्टींकडे लक्ष देण्याविषयी प.पू. डॉक्टरांनी वेळोवेळी सूचित केले. त्यातून त्या सेवांचे महत्त्व आणि त्या साधकांच्या समस्या सोडवण्याचे महत्त्व आम्हा साधकांवर बिंबले. ‘वेळप्रसंगी आपणही त्या सेवा शिकून सिद्ध असायला हवे’, हे साधकांच्या लक्षात आले.
१०. दैनिकातील चुकांविषयी साधकांना विचारायला शिकवणे
प्रारंभीच्या काळात दैनिकात विविध प्रकारच्या चुका होत असत. त्या वेळी प.पू. डॉक्टर ‘अमुक चुकीविषयी कार्यालयातील साधकांना विचारलेत का’, असेही विचारत. त्यामुळे ‘दैनिकातील चुकांविषयी संबंधित साधकांना विचारायला हवे’, त्याविषयी जाणून घ्यायला हवे, हा संस्कार मनावर झाला.
११. कार्य नवीन साधकांच्या हाती देऊन आणि ते करणा-या जुन्या
साधकांना पुढची सेवा देऊन सगळ्यांच्या क्षमतांचा विकास करणारे प.पू. डॉक्टर
दैनिक कार्यालयात समयमर्यादेत वर्तमानपत्र सिद्ध होऊन ते वेळच्या वेळी छपाईला जाणे हे प्रतिदिन चालणारे एक प्रकारचे युद्ध होते. काही काळानंतर काही प्रमाणात हे सर्व नीट होत आहे, हे लक्षात आल्यानंतर मला वाटले की, आता हीच घडी आणखी नीट बसवूया. अजून ब-याच गोष्टी व्हावयाच्या बाकी आहेत. अशा वेळी प.पू. डॉक्टरांनी मला दैनिक सनातन प्रभातच्या अन्यत्रच्या कार्यालयांना भेटी द्यायला सांगितले. त्यामुळे गोवा सोडावे लागणार होते. मी म्हटले, ‘‘संपादकीय लिहायला कोणी सिद्ध नाहीत.’’ प.पू. डॉक्टर म्हणाले, ‘‘जेथे असाल तेथून लिहून पाठवा.’’ माझ्या मनात ‘संपादकीय लिखाण आणि त्याचा दैनिकाच्या वेळांशी असणारा समन्वय या गोष्टी मला नीट जमत नाहीत, तर मी बाहेर जाऊन ते कसे काय करणार’, असा अडथळा होता. प.पू. डॉक्टरांनी निर्देश दिल्यानंतर तो अडथळा माझ्या मनाचाच आहे, हे स्पष्ट झाले. त्यामुळे ‘प्रत्यक्षात प्रयत्न केल्यास तो दूर होऊ शकतो आणि मी त्यासाठी त्यावर प्रयत्न करूनच उपाय काढायला हवा’, हे माझ्या लक्षात आले. माझे तसे प्रयत्न चालू झाले. दैनिक कार्यालयाचे दायित्व मग अन्य साधकाकडे गेले. ईश्वरकृपेने मी बाहेर असतांनाही संपादकीय लिहून वेळेत पाठवू शकलो.
१२. अन्य साधकांच्या चुका हाताळतांना मी कुठे न्यून पडलो, हे दाखवणे
गोव्यातील कार्यालय सोडून मी अन्यत्रच्या दैनिक सनातन प्रभातच्या कार्यालयांत जाऊ लागलो. त्या वेळी गोव्यातील दैनिक कार्यालयाची सेवा पहाणा-या साधकाचे दोष आणि चुका प.पू. डॉक्टरांनी त्यांना वेळोवेळी दाखवण्यास प्रारंभ केला. त्यानंतर एकदा प.पू. डॉक्टर मला म्हणाले, ‘‘तुम्ही गेलात आणि यांनी आधी घातलेल्या सर्व कार्यपद्धती मोडून टाकल्या. त्यांचे अमुक अमुक दोष आहेत.’’ त्या वेळी ‘मी दैनिकाची घडी बसवण्यात, तसेच साधकांच्या चुका न्यून करण्यात अल्प पडलो आहे’, हे लक्षात आले. मी त्या साधकाचे मला स्पष्ट झालेले दोष आणि चुका प.पू. डॉक्टरांना वेळोवेळी सांगितल्या नव्हत्या. तेही मग लक्षात आले. त्यानंतर तसे सांगण्याचा प्रयत्न करू लागलो.
१३. साधकांकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटवून
समस्येकडे नव्या दृष्टीनेे पहायला शिकवणारे प.पू. डॉक्टर
सेवा चांगल्या रितीने पूर्ण होण्यासाठी ती करणारा साधक महत्त्वाचा आहे. सेवेतील समस्यांचा विचार करतांना काही प्रसंगी प.पू. डॉक्टरांनी ‘अरे, त्यांची पार्श्वभूमी तर अमुक अशी आहे. त्यांना कसे जमणार ?’, असे काही सांगून किंवा कधी ‘असे उणीवा असणारे दोष असणारा साधक घेऊन कार्य करायचे आहे’, हे आधीच सांगून त्या साधकाकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोनच पालटवला आहे. त्यामुळे त्या साधकाकडून माझ्या अपेक्षा व्हायच्या नाहीत. त्याच्यासमवेत सेवा करतांना काही प्रतिक्रिया यायच्या नाहीत.
१४. कार्यालयाच्या पूर्ण स्वच्छतेचेे महत्त्व मनावर बिंबवणे
दैनिक कार्यालय म्हणजे प्रतिदिन समयमर्यादेत पूर्ण करायची सेवा. त्यामुळे प्रारंभीच्या काळात तेथे सध्या सनातनच्या आश्रमांत करतो, त्याप्रमाणे मासिक स्वच्छता करण्याची पद्धत नव्हती. प.पू. डॉक्टरांनी ती पद्धत घालून दिली. त्यासाठी वेळोवेळी छताला लागणारी जळमटे दाखवली. अन्य त्रुटीही दाखवून दिल्या. ‘स्वच्छता करून दैनिक वेळेवर कसे पूर्ण करणार’, हा प्रश्न प्रत्यक्ष कृती करतांना सुटला.
१५. परिपूर्ण स्वच्छता कशी करायची, ते शिकवणे
सुखसागर, फोंडा येथील कार्यालयाची स्वच्छता साधक कोणत्या क्रमाने करत आहेत, याकडे प्रारंभीच्या काळात प.पू. डॉक्टरांनी बारकाईने लक्ष घातले. त्यांनी वरचे आधी स्वच्छ करायचे नंतर क्रमाने खालच्या स्तरावरील गोष्टी स्वच्छ करायच्या, हे त्यासंदर्भातील चुका प्रत्यक्ष दाखवून सांगितले. हे सर्व आम्हा साधकांना नवीन होते. त्यांनी स्वच्छता वरून खाली, अशा क्रमानेच करण्याचे महत्त्व परत परत सांगून साधकांच्या मनावर बिंबवले.
१६. महत्त्वाकांक्षेला अंत नाही, त्यामुळे ती
सोडूनच द्यायला हवी, हे प.पू. डॉक्टरांनी स्वत:च्या उदाहरणातून शिकवणे
एकदा बोलता बोलता प.पू. डॉक्टरांनी सांगितले, ‘‘मी अमुक (त्यांनी तत्कालीन दोन-तीन संतांची नावे घेतली) संत किती मोठे आहेत, त्यांचे कार्य किती पसरलेले आहे, त्यांचे शिष्य किती आहेत’, असा विचार करत नाही. तसा विचार करणे, ही महत्त्वाकांक्षा झाली. ती आधीच सोडली नाही, तर ती कितीही मोठे झालात, तरी शिल्लक रहाते.’’ त्यातून आपण आपल्या कार्याकडे कसे पहायला हवे, ते मला शिकायला मिळाले. माझ्यातही असलेली ‘मी कोणीतरी विशेष व्हायला हवे’, अशा स्वरूपाची महत्त्वाकांक्षेची इच्छा मला समजली. ती कशी त्यागायला हवी, ते समजले.
१७. पारदर्शकता ठेवणे
प.पू. डॉक्टरांकडे विविध प्रकारची सूत्रे विविध मार्गांनी येत असत. सूत्र कशाही स्वरूपाचे असले, तरी प.पू. डॉक्टर त्याविषयी कोणा ना कोणा साधकाकडे सांगत असत. काही वेळा ते स्वत: जरी एखाद्या प्रसंगात उपस्थित रहाणार असले, तरी तेथे अन्य साधकाला प्रत्यक्ष उपस्थित रहायला सांगत. जेणेकरून साधकही त्यासंबंधी शिकेल आणि कार्यात पारदर्शकता राहील.
१८. आश्रमात साधकांना वाचण्यासाठी लागणारे
सनातन प्रभातचे अंक मुद्रणालयात खराब म्हणून टाकून
दिलेल्या प्रतींतून (‘वेस्टेज’मधून) घ्यायला प.पू. डॉक्टरांनी सांगणे
आश्रमात साधकांना वाचायला लागणा-या दैनिक सनातन प्रभातच्या प्रतींविषयी प.पू. डॉक्टर विचारायचे. त्यातून ‘या प्रतींची संख्या किती असावी ? अनावश्यक प्रत आणायला नको’, याविषयी अभ्यास होऊ लागला. त्याचप्रमाणे आश्रमात वाचण्यासाठी वितरणासाठी जाऊ शकत नसलेल्या म्हणून मुद्रणालयात बाजूला काढलेल्या; परंतु वाचण्यायोग्य असणा-या प्रती (‘वेस्टेज’ अंक) प.पू. डॉक्टर आवर्जून आणण्यास सांगायचे. यातून सतर्क राहून बारकाईने परत परत अभ्यास करत राहून योग्य ती कृती करत रहाणे शिकायला मिळाले.
१९. महनीय व्यक्तीला भेटतांनाही आध्यात्मिक दृष्टी ठेवण्यास सांगणारे प.पू. डॉक्टर !
दैनिकातील सेवांचे दायित्व सांभाळतांना कधी मुख्यमंत्री आदी महत्त्वाच्या व्यक्तींना भेटण्याची संधी मिळायची. भेट झाल्यानंतर त्याविषयी प.पू. डॉक्टरांशी बोलतांना ते आवर्जून विचारायचे, ‘त्यांचा अहं किती होता ? त्यांना काय वाटले ?’ इत्यादी. यातून या भेटींकडे आध्यात्मिक स्तरावर पहायला शिकायला हवे, हे लक्षात आले.
२०. अंक वेळेत सिद्ध होण्यासाठी ठामपणे नियोजन राबवण्यास सांगणारे प.पू. डॉक्टर
प्रारंभीच्या काळात अंक वेळेत छपाईला जात नसे. अंक छपाईला जाण्यास उशीर झाल्याने पुढचे सर्व वेळापत्रक कोलमडून जायचे. सेवा करणा-या साधकांनाही पुरेशी विश्रांती मिळायची नाही, असे घडायचे. अशा वेळी प.पू. डॉक्टरांनी काहीही झाले तरी ‘अमुक वेळेपर्यंत अंक छपाईला जायलाच हवा’, असे ठाम रहाण्यास सांगितले. यातून साधकांना कधी, कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचे ते शिकायला मिळाले.’
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळेच हे सर्व अनुभवता आणि शिकता आले, यासाठी त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !
– आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत, माजी संपादक, सनातन प्रभात नियतकालिक समूह.