महान योगी परमतपस्वी अग्नीस्वरूप संत प.पू. रामभाऊस्वामी !

Article also available in :

प.पू. रामभाऊस्वामी

तंजावूर, तमिळनाडू येथील श्री गणेश उपासक आणि समर्थ रामदासस्वामी यांच्या परंपरेतील महान योगी प.पू. रामभाऊस्वामी ! ईश्वरी संकेतानुसार ते विविध ठिकाणी यज्ञयाग करतात. गेल्या ४० वर्षांपासून त्यांचा केवळ २ केळी आणि १ पेला दूध असा आहार आहे. प.पू. रामभाऊस्वामी यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अखंड योगसाधनेद्वारे तेजतत्त्वावर प्रभुत्व मिळवले असल्याने ते प्रज्ज्वलित यज्ञकुंडात १० ते १५ मिनिटे सहज बसू शकतात. साधकांचे रक्षण आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी प.पू. रामभाऊस्वामी यांनी जानेवारी २०१६ मध्ये सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात उच्छिष्ट गणपति यज्ञ केला होता. प.पू. रामभाऊस्वामी यांची साधना, त्यांनी केलेली गुरुसेवा, त्यांनी केलेली हवने, त्यांचा अग्नीप्रवेश इत्यादी विषयांसंदर्भात सनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी त्यांच्याशी साधलेल्या संवादातील सूत्रे  प्रसिद्ध करत आहोत.

 

१. प.पू. रामभाऊस्वामी यांनी केलेली आई-वडिलांची सेवा

१ अ. आई-वडिलांची ८ वर्षे भावपूर्ण सेवा केल्याने त्यांची कृपा होणे

श्री. रामचंद्र गोस्वामी यांनी मला दत्तक घेतले होते. ते वाचनालयात थोर पंडित होते. त्यांनी मला मराठी आणि संस्कृत शिकवले. गुरूंची सेवा पुष्कळ महत्त्वाची आहे. गुरु मिळण्यासाठी सर्वप्रथम आई-वडिलांची सेवा करणे महत्त्वाचे असते. सेवा करण्यासाठी आपण पहाटेपासून रात्रीपर्यंत त्यांच्या जवळच असले पाहिजे. आई-वडिलांमध्ये भगवंताचे सान्निध्य कल्पून त्यांना अभिषेक करत आहे, या भावाने मी त्यांना स्नान घालत असे. रुद्र, पुरुषसूक्त इत्यादी म्हणत मी त्यांना अभिषेक करत असे. मी ८ वर्षे आई-वडिलांची पुष्कळ सेवा केली. वडिलांच्या ८४ व्या वर्षापर्यंत मी त्यांची सेवा केली. हे करता-करता त्यांची कृपा झाली.

१ आ. आई-वडिलांना बरे वाटण्यासाठी गुरुचरित्र
वाचणे आणि नंतर वंशावळीत दत्तात्रेयाची उपासना असल्याचे समजणे

मला लहानपणापासून ईश्वराची ओढ होती. आई-वडिलांची सेवा करतांना त्यांना बरे वाटावे, म्हणून मी गुरुचरित्राचे पारायण चालू केले. शेवटी मला दत्तात्रेयांचे महत्त्व कळले; म्हणून मी आता नेमाने गुरुचरित्राचा सप्ताह करतो. मला नंतर समजले, आमच्या वंशावळीत दत्तात्रेयाची उपासना होती.

१ इ. प्रतिदिन मनाचे श्‍लोक आणि दासबोध वाचणे अन् मनन करणे

समर्थ रामदास मठाने मला स्वीकारलेे आहे; म्हणजे दत्तक घेतलेले आहे. मी त्यांचा दत्तकपुत्र आहे. माझे शालेय शिक्षण मठानेच केले. मला वडिलांकडून समर्थांविषयी उपदेश झाला. त्यांच्या अनुग्रहामुळे मी मनाचे श्‍लोक आणि दासबोध वाचत असे. वाचलेल्याचे मनन करत असे. मी समर्थ मठात रोज एक मनाचा श्‍लोक शिकायचो. तमिळ भाषेत एकेक विषयाचा दुहेरी अर्थ निघतोे, असे वडील मला सांगायचे. आम्ही एकेका विषयावर बोलायचो. मी आणि वडील बोलत असतांना ते जे सांगायचे, त्याचा अंतर्गत अर्थ (गर्भितार्थ) वेगळा असायचा आणि बोलण्याचा भाग वेगळा असायचा. मला त्यातून आनंद आणि उत्साह मिळायचा. शेजार्‍याला ते काही कळत नसे.

 

२. गुरुभेट

२ अ. भेटीची पार्श्‍वभूमी

वडिलांच्या देहत्यागाच्या वेळी तेथे आलेल्या सौभाग्यवतीने (देवीने) गुरूंकडे घेऊन जाणे, आई-वडिलांच्या सेवेत झालेल्या पापामुळे रडू आल्यावर गुरूंनी त्यांच्या गुरूंचे चरित्र वाचण्यास देणे.माझे गुरु म्हणजे प.पू. राम नंदेन्द्र सरस्वती. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव महाकवी सुंदरेश शर्मा. ते मन्नारगुडीला होते. त्यानंतर ते तंजावूर येथे आले. मी गुरूंकडे गेलो.

माझ्या वडिलांच्या देहत्यागाची वेळ आल्यानंतर त्यांनी मला सांगितले, आमची जाण्याची वेळ आली आहे. त्यानंतर मला त्यांच्या आठवणी येऊ लागल्या. मी त्यांचे ध्यान केले. त्यामुळे आपोआप अन्न आणि पाणी वर्ज्य करण्याचा थोडा थोडा प्रयत्न झाला. नंतर एक सौभाग्यवती (देवी) प्रत्यक्ष आली आणि तिने सांगितले, गुरूंकडे जाऊन त्यांचा आशीर्वाद घे. तुझे गुरु संस्कृत पंडित आहेत. ज्ञानवंत आहेत. देवी मला गुरूंकडे घेऊन गेली. त्यानंतर मी कधीच तिला बघितले नाही. तेथे गेल्यानंतर प्रथम गुरूंनी म्हटले, या. कण्णा वाळा कण्णा. द्रविड भाषेमध्ये कण्णा वाळा कण्णा म्हणजे ये बाळा ये. लेकरांना; म्हणजे लहान बाळांना बोलावतो ना, तसे त्यांनी मला बोलावले. ते मला कण्णा या नावानेच बोलावत होते. घरात मला याच नावाने बोलावत असल्याने माझे अंतःकरण भरून आले. माझ्या डोळ्यांत पाणी आले. ते त्यांनी पाहिले आणि विचारले, काय झाले ? मी म्हटले, माझ्याकडून पुष्कळ पाप झाले आहे. आई-वडिलांची सेवा केली पाहिजे. वडीलधार्‍यांना संतुष्ट ठेवायला हवे; पण मी तसे केले नाही; म्हणून या अश्रूधारा येत आहेत. त्यामुळे पाप वाढते ना ? त्यावर ते हो म्हणाले. त्यानंतर त्यांनी लिहिलेले त्यांच्या गुरूंचे (त्यागराजस्वामी यांचे) चरित्र मला वाचायला सांगितले. त्याने तुला बरे वाटेल, असे ते म्हणाले.

२ आ. गुरूंनी लिहिलेल्या त्यागराजस्वामी यांच्या
चरित्रात शांतानिकेतनवंदनम् म्हणजे रामाच्या लोकाचे वर्णन केलेले असणे

माझ्या गुरूंनी त्यागराजस्वामी यांचे चरित्र वाल्मीकि रामायणाप्रमाणे लिहिले आहे. त्यातील अध्याय मी पूर्ण वाचले. सगळे शांतानिकेतनवंदनम् आहे; म्हणजे तो रामाचा लोक आहे. एकेका देवाचा एकेक लोक असतो. शांतानिकेतन म्हणजे रामाचा लोक. म्हणून शांतानिकेतनवंदनम्, असे वर्णन आहे. त्यागराजस्वामी हे वाल्मीकि यांच्याप्रमाणे अवतार आहेत, असे गुरूंनी त्यात लिहिले आहे. हे सर्व वाचता वाचता उत्साह वाढून मी त्यागराजस्वामींचे संपूर्ण चरित्र वाचून पूर्ण केले.

 

३. गुरूंनी घेतलेल्या परीक्षा

३ अ. पापाचे क्षालन होण्यासाठी गुरूंनी गंगास्नान करण्यास सांगणे

त्यागराजस्वामी यांचे संपूर्ण चरित्र वाचून पूर्ण झाल्याच्या दुसर्‍या दिवशी गुरु मला म्हणाले, तुला पाप केले असे वाटले ना ? ठीक आहे. आता मी तुला गंगेकडे घेऊन जातो. गंगेत स्नान केल्यावर आपले पाप न्यून होते. मी काशीही पाहिली नव्हती आणि गंगाही पाहिली नव्हती. त्याविषयी केवळ पुस्तकांत वाचले होते.

३ अ १. वडीलबंधूंना आई-वडिलांची सेवा करण्यास सांगणे

दुसर्‍या दिवशी निघायचे ठरले; पण पैशाचे काय करायचे ? आई-वडिलांचे काय करायचे ? वडिलांच्या सेवेचे काय करायचे ?, या सर्वांचा मला ताण आला. वडील म्हणाले, माझे वय झाले आहे. वडील जे सांगतात, ते मनावर घ्यायचे नाही, असे मी आधीच ठरवले होते. तिकिटाचे आरक्षण करतांना मनात आले, आता मी वडिलांना सोडून कसे जाऊ ? गुरूंनी घेतलेली ही पहिली परीक्षा ! तेव्हा माझे वडीलबंधू वेगळे रहात होते. त्यांना बोलावले आणि समजावून सांगितले, आई-वडिलांना तू बघ. मग गुरूंनीही वडीलबंधूंना आई-वडिलांची सेवा उत्साहाने करायला सांगितली.

३ अ २. गुरूंनी बनारसमध्ये गणपतीचा गुरुमंत्र देऊन त्याचा १ लक्ष जप करण्यास सांगणे आणि १८ दिवसांत जप पूर्ण झाल्यावर १८ दिवस हवन करण्यास सांगणे

त्यानंतर गुरु मला प्रथम चेन्नईला (मद्रासला) घेऊन गेले. मी मद्रास पूर्ण पाहिलेच नाही. तेथून आम्ही कोलकात्याला गेलो. कोलकात्याला एक मोठे कारखानदार होते. आम्ही त्यांच्या घरी गेलो. तेथे आमची सोय होऊ शकते का, ते पाहिले. तेव्हा गुरूंना सर्वजण मानत असलेले पाहून मनाला पुष्कळ उत्साह आणि आनंद वाटला. तेथून गुरु मला बनारसला घेऊन गेले. बनारसमध्ये हनुमानघाटावर तिसर्‍या माळ्यावर (माडीवर) त्यांनी मला उपासना मंत्रोपदेश केला. त्यांनी मला गुरुमंत्र दिला. गणपतीचा गुरुमंत्र दिल्यावर मला त्याचा १ लक्ष जप करायला सांगितला. १८ दिवसांत मी जप पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी मला १८ दिवस हवन करायला सांगितले. ते माझे पहिले हवन ! त्यामध्ये किती परीक्षा घेतल्या त्यांनी ?

३ अ ३. गुरु पुष्कळ आजारी पडणे आणि त्यांचे पैसे वापरण्यासाठी त्यांची आज्ञा नसल्याने एका बंगाली आधुनिक वैद्याचे पाय धरून त्याला गुरूंना तपासण्यासाठी बोलावणे

गुरूंकडेे कुठून कोण जाणे, जेवढे पैसे यायचे, त्याची सर्व देयके माझ्याकडे असायची. त्यांच्याकडे जे होते, ते सर्व त्यांनी माझ्याकडे दिले होते. त्याच दरम्यान एकदा सकाळी ते रुग्णाईत झाले. दुपारपर्यंत त्यांचा त्रास पुष्कळ वाढला. तेव्हा बनारसमध्ये माझ्या ओळखीचे कुणी आधुनिक वैद्य (डॉक्टर) नव्हते. तेव्हा गुरूंचे काय होणार, अशी मला पुष्कळ काळजी वाटली. त्यांची आज्ञा नसल्याने मी त्यांच्या पैशांना हात लावला नाही. मी एका बंगाली आधुनिक वैद्यांचे पाय धरले. ते वैद्य मोठे होते. माझ्यासाठी त्यांनी तिथे येऊन गुरूंना तपासले. तेव्हा ते म्हणाले, मला क्षमा कर. ईश्‍वर महान आहे. ही दुसरी परीक्षा !

३ अ ४. ‘गुरूंच्या आजाराविषयी कसे करायचे ?’, असे वाटून अश्रूंच्या वर्षावात पूर्ण रात्र देवाला प्रार्थना करणे

तेव्हा गंगेला पूर आला होता. पाऊसही पडत होता. वीज गेली होती. मी तंजावूरला तार (टेलिग्राम) पाठवली. देवाजवळ लावलेल्या दिव्याच्या प्रकाशात मी गुरूंना मांडीवर घेतले. तंजावूरला तार पोेचायला ४ दिवस लागणार होते. तेव्हा ‘कसे करायचे ?’, असे वाटून मी अश्रूंच्या वर्षावात पूर्ण रात्र देवाला प्रार्थना केली. हनुमानघाट आणि मणिकर्णिकाघाट येथे महास्मशान भाग होता. मी असे कधी पाहिलेच नव्हते. मला कुणाचा आधार नव्हता.

३ अ ५. घरमालकाने गुरूंना धर्मशाळेत घेऊन जाण्यास सांगणे

‘गुरूंचे सर्व पैसे माझ्याकडे आहेत. त्यांना काही झाले, तर मला बोलणारे कोण आहे ?’, असेही माझ्या मनात आले. ‘आता कुणाकडे जायचे ? कुणाला विचारायचे ?’, असे वाटले. थोड्या वेळाने घरमालक आले. ते म्हणाले, ‘‘तू यांना (गुरूंना) धर्मशाळेत घेऊन जा.’’ मी त्यांना काहीच उत्तर दिले नाही. ‘‘गुरु उद्या उठणार आहेत. तुम्ही त्यांच्याशी बोला’’, असे म्हणून मी दार बंद केले.

३ अ ६. गुरूंनी केवळ भस्मप्रसादाचा उपयोग होणार असल्याचे सांगितल्याने केलेल्या हवनाचे भस्म त्यांना लावणे

त्याच वेळी गुरूंना ज्वरामुळे जुलाब झाल्याने त्यांची सर्व वस्त्रे भिजली. त्यांना घालण्यास वस्त्रे शिल्लक नव्हती. मी सर्व वस्त्रे धुऊन वाळत घातली. त्यांच्या अंगावर केवळ कौपीन (लंगोटी) होती. मी त्यांना मांडीवर घेऊन प्रार्थना करीत होतो. तेव्हा त्यांचा स्वर माझ्या कानांवर पडला, ‘‘अरे, किती वेळा तुला सांगायचे ? केवळ भस्मप्रसादाचा उपयोग होणार आहे. अन्य कशाचाही उपयोग होणार नाही.’’ त्यानंतर केलेल्या हवनाचा प्रसाद (भस्म) काढून त्यांना लावला.

३ अ ७. सकाळी गुरूंनी डोळे उघडल्यावर आनंद होणे आणि ‘देवाने कृपा केली’, असे वाटणे

सकाळी सूर्योदय झाल्यावर माझ्या डोळ्यांतील अश्रू गुरूंच्या डोळ्यांवर पडले आणि त्यांनी डोळे उघडले. मला पुष्कळ आनंद झाला. ‘देवाने कृपा केली’, असे वाटून मनाला बरे वाटले.

३ अ ८. गुरुसेवा करणार्‍या शिष्याला त्रास दिल्याने घरमालकाला त्रास होणार असून तो पाय धरणार असल्याचे गुरूंनी सांगणे

५ – १० मिनिटांनी गुरु उठून बसले. मी त्यांना म्हटले, ‘‘काल आपण या स्थितीत नव्हता. माझ्या मनाची एवढी तगमग होत होती की, उद्या काय होईल, ते कळत नव्हते. घरमालक पहाटेच येऊन ‘हिंदु दैनिक’ वाचत बसले होते. ‘काल काय झाले’, हे मी त्यांना सांगत होतो. त्यांना तमिळ भाषा येत नव्हती; परंतु समजत होती.’’ गुरु म्हणाले, ‘‘तू एवढा दुःखी होतास. एवढी गुरुसेवा करत होतास, तरी याने तुला इतका त्रास दिला ! तो आपोआप तुझ्या पायांशी येईल !’’ मी अधिक लक्ष दिले नाही.

३ अ ९. घरमालकाचा अपघात होऊन त्याने वाचवण्याची विनंती करून पाय धरणे

थोड्या वेळाने मी काशी विश्‍वनाथाच्या मंदिरात गेलो. घंटा वाजवली. तेव्हा माझ्या कानांवर आवाज आला, ‘कृपा करून माझे रक्षण करा ! कल्याणजी, कृपा करून माझे रक्षण करा !’ काय झाले म्हणून पाहिले, तर घरमालकाला रुग्णशिबिकेवरून (स्ट्रेचरवरून) आणले होते. रस्त्यावरून जातांना घरमालकाला एका रिक्शाचालकाने धडक दिली होती. ते अंतःकरणपूर्वक मला म्हणाले, ‘‘हे पाय बरे होईपर्यंत तुम्ही इथेच रहा. मी तुमचे पाय सोडणार नाही.’’ असे म्हणून त्यांनी माझे पाय धरले. मी त्यांना गुरूंकडे घेऊन गेलो.

गुरु म्हणाले, ‘‘अरे, हे मी म्हटले त्यामुळे झाले का ? हे त्याचे प्रारब्ध होते !’’ त्यांनी घरमालकांच्या पायाला भस्म लावले. घरमालकांनी सांगितले, ‘‘माझा हा पाय बरा होईपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. हे सारे तुमचे आहे.’’ नंतर आम्ही हरिद्वार आणि हृषिकेश येथे गेलो. अशा परीक्षा घेऊन मला गुरूंनी देवाचा प्रभाव दाखवून दिला. यामुळेे मला दैवी सान्निध्य मिळाले.

३ आ. गुरुद्रोह केलेल्याच्या पत्नीच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी गुरूंनी प्रार्थना करण्यास सांगणे

३ आ १. ‘गुरुद्रोह केलेल्याच्या पत्नीच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी प्रार्थना कशी करायची’, असे वाटणे आणि ‘तुला सर्व दिल्याने तूच प्रार्थना कर’, असे गुरूंनी सांगणे

मी समर्थ रामदासस्वामींच्या मठात रहायचो. गुरूंनी कशा परीक्षा घेतल्या, त्याचे एक उदाहरण सांगतो. आमच्या शेजारी रहाणार्‍यांना गुरूंप्रती प्रेम नव्हते. त्यांच्या पत्नीची हृदयाची शस्त्रक्रिया होणार होती; म्हणून पत्नी आश्रमात येऊन १०० रुपये देऊन माझ्या पाया पडली. तेव्हा मला ते संकट वाटले; कारण ज्यांनी गुरुद्रोह केला, त्यांच्यासाठी मी प्रार्थना कशी करणार ? तेव्हा मी स्वामींना विचारले, ‘‘मी काय करायला हवे ?’’ ते म्हणाले, ‘‘त्यांनी माझ्याकडे येऊन काही मागितले, तर त्यांच्यासाठी तूच प्रार्थना करायचीस; कारण मी तुला सर्व दिले आहे !’’

३ आ २. गुरूंनी सांगितल्यावरही प्रार्थना करण्याविषयी साशंकता असणे आणि ‘स्त्रीला काही झाल्यास तुझे तोंड पहाणार नाही’, असे गुरूंनी सांगितल्यावर प्रार्थना करून रात्रभर हवन करणे

मला वाटले, ‘आता कसे करायचे ? माझ्याने हे होणार नाही. कुणी माझा द्रोह केला, तर चालेल; पण माझ्या गुरूंचा द्रोह केल्यावर मी कशी आणि काय म्हणून प्रार्थना करायची ?’ तेव्हा गुरूंनी सांगितले, ‘‘पुढे आश्रमात असे काही झाले, तर मी तुला मोकळा करीन; पण आता तसे नाही. आता त्या स्त्रीला काही झाले, तर ते तुझ्यामुळे ! मग मी तुझे तोंड बघणार नाही.’’ त्यानंतर माझ्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. गुरु नाही, तर मी कुणाला भेटणार ? कुणाच्या पाया पडणार ? कोणता देव माझे रक्षण करणार ? नंतर मी प्रार्थना केली. रात्रभर बसून हवन केले. मी जमतील ते पदार्थ घेऊन हवन केले.

३ आ ३. पहाटे स्त्रीची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे समजल्यावर डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागणे

पहाटेच्या वेळी शेजार्‍यांचा दूरध्वनी आला, ‘‘शस्त्रक्रिया यशस्वी झाली.’’ मी हवन करत असलेल्या ठिकाणी येऊन गुरु मला म्हणाले, ‘‘शस्त्रक्रिया कशी यशस्वी केलीस ?’’ माझ्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. माझ्या मनात विचार आला, ‘तुमचे कार्य झाले ना ? आता मी तुमचे मुख अवलोकन करणार नाही (तोंड पहाणार नाही).’ तेव्हा मी गुरूंकडे पाठ करून बसलो. त्या वेळी गुरु मला सूक्ष्मातून म्हणाले, ‘अरे, तू असे करणार, हे मला ठाऊक होते; म्हणूनच मी असे केले. माझ्याशी काही बोलू नको.’ त्यांनी थोडा हास्यविनोद करून माझ्या अंतःकरणात प्रेम उत्पन्न केले. नंतर सर्व ठीक झाले. एकेका विषयाच्या संबंधाने ते अशा परीक्षा घेत होते.

३ इ. गुरूंनी एका प्रसंगातून दैवी सान्निध्याचे महत्त्व लक्षात आणून देणे

३ इ १. केवळ १०० रुपये दक्षिणा मिळाल्याने कर्ज फेडणे अवघड होणे आणि दक्षिणा अधिक घेतल्यास त्याचे फळ मिळणार नसल्याचे गुरूंनी सांगणे

मी गुरूंसमवेत आश्रमात असतांना माझ्यावर पुष्कळ कर्ज होतं. गुरु असतांना (गुरूंच्या देहत्यागापूर्वी) कर्ज फिटावं, असं माझ्या मनात होतं. एकदा एकाने मला लोककल्याणाकरता हवन करण्यासाठी बोलावले. मी हवनासाठी गेलो. त्यांनी मला केवळ १०० रुपये दक्षिणा दिली; परंतु तेवढी दक्षिणा मिळाल्याने कर्ज फेडणं अवघड झालं. त्या वेळी माझ्या मनात आले, मी दिवसभर हवन केलं; पण मला १०० रुपयेच दक्षिणा मिळाली. यातून कर्ज कसे फेडायचे ? गुरूंनी मला विचारले, तू हवन कुणासाठी केलेस ? त्याच्यासाठी कि तुझ्यासाठी ? मी म्हटले, मला कर्ज फेडायचं होतं आणि लोककल्याणही करावं म्हणून केलं मी ! त्यावर ते म्हणाले, दक्षिणा अधिक घेतलीस, तर तुला त्याचे फळ मिळणार नाही. मी मनातच स्वामींना म्हटले, तुम्ही असे म्हणता, मग मी एवढे कर्ज कधी फेडणार ? त्यावर स्वामी म्हणाले, मी तुला आता काही सांगणार नाही. जेव्हा प्रसंग येईल, तेव्हाच मी बोलेन. गुरु सांगतात, ते ऐकायलाच पाहिजे, असे वाटून मी हवन पूर्ण केले.

३ इ २. प्रार्थना करतांना भेटण्यासाठी आलेल्या व्यक्तीने पायांजवळ ताट ठेवणे आणि त्या ताटात कर्जाच्या रकमेइतके पैसे असणे आणि दैवी सान्निध्य असल्यास अडचण येत नसल्याचे लक्षात येणे

त्यानंतर मी मद्रासला (चेन्नईला) आलो. एके ठिकाणी मी प्रार्थना करत असतांना मला भेटण्यासाठी एक जण आला. त्याच्या हातांत एक ताट होते. ताटावर रेशमी कापड झाकलेले होते. त्याने माझ्या पायांजवळ ताट ठेवून मला नमस्कार केला. ताटात काय होतं, ते मला दिसलं नाही. ताटात बिस्किटे किंवा फळे असतील, असे वाटून मी ताट गुरूंकडे नेऊन ठेवले. गुरु मला म्हणाले, ताट उघडून पहा. मी उघडून पाहिले, तर माझ्यावर जेवढं कर्ज होतं, तेवढं धन त्या ताटात होतं. गुरूंनी मला विचारले, मागे एकाचा त्रास दूर करण्यासाठी तू प्रार्थना केलीस. तेव्हा त्याने १०० रुपये दिल्यावर तुला वाईट वाटले. आता हे धन मिळाले, तेव्हा तू कुणासाठी प्रार्थना करत होतास ? त्या दिवसापासून मी पैशाचा विचारच करत नाही. कितीही अडचण आली, तरी दैवी सान्निध्य असल्यास आपल्याला काही होत नाही. प्रसंग काय होतो, याकडे लक्ष न देता प्रसंग घडतांना उपासना करायची, असे करू लागलो.

३ ई. गुरूंच्या अनुग्रहामुळे साधनेतील परीक्षा उत्तीर्ण होणे आणि पावित्र्य वाढून कसलीच अडचण न येणे

वर्ष १९७९ मध्ये मी संन्यास घेणार होतो. संन्यास घ्यायचा, तर तेवढे पवित्र असायला हवे. मी पवित्र असलो, तरच गुरूंची सेवा करू शकेन. गुरु एकदा घरी आले, तर मी दोनदा त्यांच्याकडे जायला हवे. गुरूंनी एक वेळचे जेवण सोडले, तर आपण दोन वेळचे जेवण सोडायला हवे, तरच ते पवित्र होते. मी त्यांना सांगितले, तुम्ही एक वेळचा आहार सोडा. मी दोन वेळचा आहार सोडतो. त्यांनी आहार सोडला, तर मी पाणीही सोडायचे असते. त्यामुळे खरे काय, ते पहायला गुरु परीक्षा घेत होते. गुरूंच्या अनुग्रहामुळेच मी परीक्षा उत्तीर्ण झालो. असं आमचं पावित्र्य वाढत गेलं. कधी कसलीच अडचण आली नाही.

 

४. गुरुसेवेसाठी पत्नीची अनुकूलता

४ अ. पत्नीची अनुमती मिळाल्याने गुरूंची सेवा करता येणे

गुरूंनीच माझे लग्न करून दिले. लग्नानंतर मी गुरूंना विचारले, मला सेवा करायची आहे. ते म्हणाले, तू जाऊन सेवा कर. पत्नीने सांगितले, मी बायको आहे. माझ्याने सेवा करणे होणार नाही. तुम्ही सेवा करा. मग मी सेवा करायला लागलो. तिची अनुकूलता असल्यानेच मी सेवा करू शकलो.

– प.पू. रामभाऊस्वामी, तंजावूर, तमिळनाडू.

४ आ. वडिलांच्या साधनेसाठी माझ्या आई अनुकूलच होत्या

त्यांना ठाऊकच होते की, हे विश्‍वकार्यासाठी बाहेर जाणार आहेत. पतिव्रताच ! हे (वडील) गुरूंकडे रहात होते अन् त्या (आई) दुसरीकडे रहात होत्या.

– श्री. गणेश गोस्वामी (प.पू. रामभाऊस्वामी यांचे सुपुत्र आणि शिष्य)

 

५. गुरूंच्या अनुग्रहाचे महत्त्व

५ अ. ‘वाचनाने अल्प अनुभव येतो; पण गुरूंचा अनुग्रह झाला, तर सर्व अवगत होते.

५ आ. लोकसेवा करण्यासाठी गुरूंचा अनुग्रह घेऊन समर्पण भावाने सर्व करणे आवश्यक !

लोकांच्या कल्याण्याकरता लोकांची सेवा केली पाहिजेे. लोकसेवा करण्यासाठी प्रथम गुरूंचा अनुग्रह घेतला पाहिजे. तन, मन आणि धन हे सर्व भावपूर्ण अर्पण केले पाहिजे. समर्पण भावाने सर्व केले पाहिजे. त्यात काही स्वार्थ नको.

 

६. गुरुबळाचे महत्त्व

६ अ. गुरुबळ नाही, तर काहीच नाही !

गुरूंमुळे मला अन्न-पाणी वर्ज्य करणे शक्य झाले. गुरूंनी मला ‘अन्न-पाणी वर्ज्य कर’, असे सांगितले नाही. केवळ गुरुबळामुळे झाले. गुरुबळ नाही, तर काहीच नाही. समर्थ सांगतात,

गुरु पाहता पाहता लक्ष कोटी । बहूसाल मंत्रावळी शक्ति मोठी ।

मनीं कामना चेतके धातमाता । जनीं व्यर्थ रें तो नव्हे मुक्तिदाता ॥

– समर्थ रामदासस्वामी

६ आ. गुरुबळामुळे गुरूंच्या समाधीच्या आत बसून जप करण्याची सिद्धी प्राप्त होणे

स्वामींना मला सिद्धी द्यायचा प्रसंग आला, तेव्हा मी त्यांच्या समाधीच्या आत बसून जप करत होतो. मी दिवसभरात ८ ते १० घंटे आत असायचो. आत ऊब असायची. वारा आत शिरत नव्हता. दिवा लावला, तर विझून जायचा. २७ दिवसांचे हवन करतांना यज्ञकुंडातील अग्नी काढून घेऊन तो आत घेऊन रात्रभर आत बसून जप करत असे. हे केवळ गुरुबळामुळे झाले.

 

७. प.पू. रामभाऊस्वामी यांचा अग्नीप्रवेश

७ अ. आईच्या मांडीवर निर्धास्त निजलेल्या मुलाप्रमाणे आपोआपच अग्नीत प्रवेश होणे

अग्नीत प्रवेश करणे हे आपोआप होते. आईवर विश्‍वास असल्यामुळे लेकरू तिच्या मांडीवर जाऊन निजते. मुलाला ठाऊक असतेे की, आई आपल्याला मारणार नाही. ‘आई आपल्याला अंतःकरणातून दूध देणारी आहे’, हे लेकराला उमजतेे. तेव्हा ते आपोआप तिच्या मांडीवर निजते. असे झाले, तर बाळाचा आक्रोश कसा होईल ? कुणी सांगून मी काही करत नाही. सर्व आपोआप होते.’

– प.पू. रामभाऊस्वामी, तंजावूर, तमिळनाडू.

७ आ. गुरूंनी स्वयंस्फूर्तीने अग्नीप्रवेश करायला सांगणे

‘त्यांना गुरूंनी स्वयंस्फूर्तीने अग्नीप्रवेश करायला सांगितला. प्रारंभी प.पू.रामभाऊस्वामी यांनी अग्नीप्रवेश केला. तेव्हा आम्हा सर्वांना थोडी भीती वाटली. माझ्या माहितीप्रमाणे १९८७ – १९८८ मध्ये कोलकात्यामध्ये थोडा थोडा अग्नीप्रवेश करण्यास प्रारंभ झाला.’

– श्री. गणेश गोस्वामी (प.पू. रामभाऊस्वामी यांचे सुपुत्र आणि शिष्य)

७ इ. अग्नीस्पर्शाच्या वेळी प्रार्थना आणि मंत्रजप
करत असल्याने दैवी सान्निध्यात गेल्याने भीती न वाटणे

‘हा हात आत अग्नीमध्ये असतो. आत जातांना अग्नीचा प्रभाव माझ्या आत जातो. अग्नीस्पर्शाच्या वेळी मी प्रार्थना करत असतो. मंत्र म्हणत असतो. मी दैवी सान्निध्यात जातो. त्यामुळे ज्वाळा काय करणार ? अग्नी काही करत नाही. मला भीतीही वाटत नाही.

७ ई. मंत्रजपाने देहात पुष्कळ ऊर्जा निर्माणझाल्याने यज्ञकुंडातील अग्नी देह जाळू न शकणे

मंत्रजपाने माझ्या देहात पुष्कळ ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे यज्ञकुंडातील साक्षात् अग्नीही मला जाळू शकत नाही.

७ उ. पंचमहाभूतांतील अग्नीचा थोडा अंश आपण स्वीकारल्यास अन्य चार महाभूते आपली होणे

अग्नी पुष्कळ प्रभावी आहे. अग्नीचा दाह कोणी सोसणार नाही. अग्नीचे अंतःकरण इतके उदार आहे की, जितके तुम्ही स्वतःचे देऊन त्याच्याकडे सेवा करता, तितके प्रेम तुमच्यात उत्पन्न होते. पंचमहाभूतांतील अग्नीचा थोडा अंश आपण स्वीकारला, तर अन्य चार महाभूते आपली होतात. हे बीज आहे. त्याला ‘योग’ म्हणतात.

७ ऊ. प.पू. रामभाऊस्वामी यांनी यज्ञाच्या वेळी शाल पांघरण्याचे कारण

१. शाल पांघरल्याने शरिराचे तापमान संतुलित रहाते

यज्ञ करतांना मंत्र म्हटल्याने ऊर्जा निर्माण होते. वारा लागल्यावर ऊर्जा कमी होते. वारा लागू नये, यासाठी मी शाल पांघरतो. शाल पांघरल्याने शरिराचे तापमान संतुलित रहाते.’

– प.पू. रामभाऊस्वामी, तंजावूर, तमिळनाडू.

२. शालीमुळे शरीर गरम रहाते

‘शालीमुळे शरीर गरम रहाते. ती शाल जाड असून लोकरीची आहे. आपण ती पांघरल्यास आपल्याला पुष्कळ गरम होते.

७ ए. प.पू. रामभाऊस्वामींचे वय ७५ वर्षे असूनही त्यांच्या रक्ताभिसरण संस्थेत काही अडथळे नसणे

प.पू. रामभाऊस्वामी यांच्या रक्ताच्या चाचण्या केल्या. वयोमानानुसार मनुष्याच्या रक्ताभिसरण संस्थेत अडचणी निर्माण होतात; परंतु प.पू. रामभाऊस्वामींचे वय ७५ वर्षे असूनही त्यांच्या रक्ताभिसरण संस्थेत काही अडथळे नाहीत.’ – श्री. गणेश गोस्वामी

७ ऐ. ‘स्वामीजी अग्नीप्रवेश करतांना काय युक्ती करतात, ते पहायचे आहे’, असे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगणे आणि स्वामीजींनी केलेल्या अग्नीप्रवेशावर त्यांनी लेख लिहिणे

प.पू. रामभाऊस्वामीजी : अग्नीप्रवेश करत असतांना अग्नीचा प्रभाव असतो. आपल्या भक्तीप्रमाणे अग्नीचा अनुभव येतो. भक्तीमुळे आपल्याला सर्व लाभ होतो.

श्री. गणेश गोस्वामी : वर्ष १९९७ – १९९८ मध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आले होते. ते म्हणाले, ‘‘स्वामीजी जे करतात, ते सर्व आम्हाला जवळून बघायचे आहे. काय ट्रिक करतात, ते पहायचे आहे.’’ आम्ही त्यांना सांगितले, ‘‘बसून काळजीपूर्वक बघा.’’ त्या लोकांनी स्वामीजींनी केलेला अग्नीप्रवेश बघून लेख (आर्टिकल्स) लिहिले.

 

८. गेल्या ४० वर्षांपासून प.पू. रामभाऊस्वामी यांचा आहार केवळ २ केळी आणि १ पेला दूध !

‘माझे वडील ३५ वर्षे स्वामीजींकडे होते. त्यांचेे आहाराचे पुष्कळ नियम होते. वडील पूर्वी लाह्या आणि दूध घेत होते. त्यांनी तसे ५ – ६ वर्षे केले. त्यानंतर त्यांनी लाह्या घेणे बंद केले. आता गेल्या ४० वर्षांपासून त्यांनी सर्व आहार सोडला आहे. आता त्यांचा आहार म्हणजे केवळ २ केळी आणि १ पेला दूध. त्यांनी पाणी प्यायचेसुद्धा सोडून दिले आहे. आता त्यांचे जीवन असेच असून ते तपश्‍चर्येला पुष्कळ उपयुक्त असल्याचे ते सांगतात.’ – श्री. गणेश गोस्वामी

 

९. गुरूंकडून मिळालेली संगीताची शिकवण

९ अ. स्वरज्ञान असलेल्या आणि ज्ञानवंत अशा गुरूंनी संगीतातील सर्व देणे

‘गुरूंमुळे माझा संगीताचा अभ्यास झाला. बीजाक्षरे एकत्र करून गायत्रीमंत्र, सरस्वतीमंत्र, गणपतिमंत्र सिद्ध करून ऋषींनी ते आपल्याला अनुभवायला दिले. सा, रे, ग, म, प, ध आणि नि या सप्त स्वरांमध्ये सर्व शब्द सामावलेलेे असल्याने संगीत पूर्ण आहे. सर्व राग सप्त स्वरांमध्ये सामावलेले आहेत. गुरूंनी मला संगीताचे सर्व ज्ञान दिले. गुरूंकडे स्वरज्ञान होते. ते अधिक ज्ञानवंत होते. त्या वेळी मी अर्धज्ञानवंत होतो.

९ आ. उत्सवाच्या वेळी संगीताचे ज्ञान असलेल्या ढोल वाजवणार्‍याला बोलावणे
आणि त्याच्याकडून अपस्वर उत्पन्न झाल्याने गुरूंनी सामान्य वाजवणार्‍याला बोलावण्यास सांगणे

एकदा एका उत्सवाच्या वेळी गुरूंनी मला एका ढोल वाजवणार्‍याला बोलावण्यास सांगितले. मी संगीतात ज्ञानवंत असलेल्या ढोल वाजवणार्‍याला बोलावून आणले. स्वामी पूजा करून प्रारंभ करणार तोच याने ढोल वाजवला. स्वामींनी मला बोलावून म्हटले, ‘‘अरे कण्णा (बाळा), माझ्यावर एक उपकार करशील का ?’’ गुरूंनी असे म्हटल्यावर ‘माझे काय झाले असेल ? मला किती त्रास झाला असेल ? ते असे का विचारतात ?’, असे विचार माझ्या मनात आले. ते म्हणाले, ‘‘तू ज्या ढोल वाजवणार्‍याला घेऊन आला आहेस, त्याला किती पैसे द्यायचे, ते देऊन टाक. मी दीपाराधना आणि कर्पूरारती करणार आहे. त्या वेळी कुणालातरी, सामान्य वाजवणार्‍याला वाजवायला सांग. आरती करतात तेव्हा ढण-ढण-ढण वाजवतात. तेवढे वाजवले तरी पुरे.’’ मी ज्याला ज्ञानवंत म्हणून आणले होते, त्याच्याकडून ढोल वाजवतांना थोडे अपस्वर उत्पन्न झाले होते.

 

१०. गुरूंचा देहत्याग

१० अ. जीवनाचा शेवट जवळ आल्याचे गुरूंनी सांगणे आणि गुरूंना
रुग्णालयातून आश्रमात आणून रात्रभर प्रार्थना करून दीपासह पूजा केल्यावर त्यांनी देहत्याग करणे

शेवटच्या दिवसांत गुरूंनी मला सांगितले, ‘‘वैद्यकीय क्षेत्रातले लोक माझी चाचणी करतील. परिस्थिती अशी असेल की, हा माझा शेवट असेल. तेव्हा सर्व सिद्धता झाली पाहिजे; म्हणून तुला सांगतो.’’ तेव्हा मला पुष्कळ काळजी वाटली. मी रुग्णालयात गेल्यावर ते मला म्हणाले, ‘‘मी १०० वर्षे जगलो, तरी तुला ‘मी असावं’, असंच वाटेल.’’ मी म्हटले, ‘‘तुम्ही जाणार नाही. मी तुम्हाला सोडणार नाही.’’ त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. हात ठेवताच माझं मन खंबीर झालं. त्यानंतर मी आश्रमात आलो. माझ्यात धैर्य उत्पन्न झालं. मी आधुनिक वैद्यांना गुरूंची स्थिती सांगितली. ‘‘त्यांना आश्रमात घेऊन जाण्यास अनुमती द्या’’, असे सांगून त्यांची अनुमती घेऊन गुरूंना आश्रमात आणले. रात्रभर प्रार्थना करून त्यांची दीपासह पूजा केली. शेवटी त्यांनी सहजतेने प्राण सोडले. रामनवमीच्या दिवशी त्यांनी देहत्याग केला.

 

११. प.पू. रामभाऊस्वामी यांनी केलेली हवने

११ अ. एखाद्या ठिकाणी असलेल्या यज्ञाला जावे किंवा जाऊ नये, याविषयी ईश्‍वरी संकेत मिळणे

अंत:करणात दैवी सान्निध्यत्व येते. देवाकडून आज्ञा मिळाली, तरच संकेत येतात. प्रथमत: आम्हाला संकेत येतो, ‘जा किंवा जाऊ नका.’ मनाला स्पष्ट संकेत येतो. पूर्वी मी सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात येण्यासाठीचा एक दिनांक दिला होता. त्या वेळी इतकी अडचण आली की, आम्ही येऊ शकलो नाही. मी स्वामींना (मनाने) विचारले, ‘असं काही होऊ शकतं का ? इतक्या अडचणी ! आमचा ठरवलेला कार्यक्रम कधी रहित झाला नाही. याचे कारण काय आहे ?’ एक मासानंतर (महिन्यानंतर) स्वामीजी (आतून) म्हणाले, ‘आता वातावरण चांगले आहे. आता निघू शकता.’

११ आ. गावातील व्यक्तींनी मंदिर अशुद्ध केल्याने १४ वर्षे
गावात पाऊस न पडणे आणि स्वामीजींनी हवन केल्यानंतर ३ घंटे पाऊस कोसळणे.

११ आ १. गावातील व्यक्तींनी मंदिर अशुद्ध केल्याचे समजल्यावर तेथे पाऊस पडला असण्याविषयी मनात शंका येणे, गावकर्‍यांनी १४ वर्षे पाऊस पडला नसल्याचे सांगणे आणि पाऊस पडण्यासाठी हवन चालू करणे

मद्रास (चेन्नई) पासून १०० किलोमीटर अंतरावर कांचीपूरम्जवळ ‘दामल’ नावाचे एक खेडेगाव आहेे. त्या गावामध्ये एक मंदिर आहे. ते लोकांनी अशुद्ध केले होते. मी विचार केला, ‘मंदिर अशुद्ध केले, तर वार्षिक वृष्टी (पाऊस) कशी होईल ?’ मी विचारल्यावर तेथील लोकांनी सांगितले, ‘‘मागील १४ वर्षांपासून त्या गावात पाऊस पडलेला नाही.’’ मी त्यांना सांगितले, ‘‘वृक्षाच्या मुळाशी पाणी दिल्याने वृक्षात पालट होतो. वृक्षावर पाणी ओतून काय लाभ ? वृक्षाचे मूळ म्हणजे गावातील मंदिर आहे. ते मंदिर तुम्ही प्रेमभावाने शुद्ध करा. त्याच दिवशी मी तुम्हाला पाऊस पाडून दाखवतो.’’ त्या वेळी मी हैद्राबादला (भाग्यनगरला) हवनासाठी गेलो होतो. मी त्यांना सांगितले, ‘‘येथील एक यज्ञ संपवून परत येतांना मी तेथे येईन. तुम्ही सिद्धता करून ठेवा. मी पाऊस पाडून दाखवीन.’’ त्या गावात पाऊस पडला नसल्याने मला पुष्कळ वाईट वाटत होते; म्हणून मी प्रार्थना केली. तेथील लोक गरीब असल्याने मी माझ्या चेन्नईतील भक्तांना सांगितले, ‘‘तुम्ही सर्व तयारी करा. मी हवन करतो.’’ पुढील ९ घंट्यांत मी त्या मंदिरात हवन चालू केले. गावकर्‍यांनी माझा उत्साह वाढवला. त्यांच्या मनामध्ये देवसान्निध्य (भाव) नसूनही त्यांनी माझ्यासाठी छत्र, चामर आदी उपचार केले. शेवटी मला कळले की, त्यांनी हे उपचार पावसासाठी केले.

११ आ २. यज्ञ चालू केल्यानंतर ३ घंटे होऊनही पाऊस न पडल्याने अग्नीत विलीन व्हायचे ठरवणे

यज्ञाचे आरंभीचे ३ घंटे वाळवंटासारखे वातावरण होते. पाऊस पडला नाही, तर माझा मानच गेला असता. देवाचे सान्निध्यत्व जाते; म्हणून मी अग्नीतच विलीन व्हायचे ठरवले. अग्नीला सांगितले, ‘मी तुझ्या चरणांपासून मागे येणार नाही. हे लोक मग कुणाला विचारणार ? मी तेथून परत आलो, तरच विचारणार ना ?’ नंतर मी यज्ञात उतरलो. तेव्हा मला या लोकांचा त्रास झाला. त्रास म्हणजे काय, तर कुणी माझे हात ओढले, तर कुणी पाय ओढले. ‘मी भावपूर्ण प्रार्थना करत होतो’, हे त्यांना ठाऊक नव्हते.

११ आ ३. यज्ञाची पूर्णाहुती झाल्यावर स्वामीजी बेशुद्ध होणे, नंतर पावसाळी वातावरण निर्माण होऊन जमलेले लोक स्वामीजींकडे येऊ लागणे, गर्दीत चेंगरले न जाण्यासाठी स्वामींना एका गुहेत नेणे आणि ३ घंटेे पाऊस कोसळणे

‘आपल्यासाठी स्वामी अग्नीत प्रवेश करत आहेत’, हे पाहून लोकांनी डोळ्यांत पाणी आणून प्रार्थना केली. कुणी कितीही नास्तिक असला, तरी ‘एखाद्या जिवाला त्रास होत आहे’, हे पाहिल्यावर त्याच्यातील करुणा जागृत होतेच. यज्ञाची पूर्णाहुती झाल्यावर मी पुष्कळ थकून गेलो. मी बेशुद्ध झालो. त्यानंतर मला शुद्ध आली. तेव्हा मी एका गुहेत होतो. मी माझ्या मुलाच्या पत्नीच्या (सुनेच्या) मांडीवर डोके ठेवलेले होते. तिने मला इलेक्ट्रॉलचे पाणी प्यायला दिले. मी तिला विचारले, ‘‘मी येथे कसा आलो ?’’ तिने सांगितले, ‘‘तुम्ही बेशुद्ध झाला होता. वातावरणात एकदम पालट होऊन थंड वारे वाहू लागले. पावसाळी वातावरण निर्माण झाले. त्यामुळे जनसमूह तुमच्याकडे येण्यासाठी गर्दी करत होता; म्हणून मी तुम्हाला येथे आणले.’’ मी तेथे जाऊन पाहिले, तर खरंच पुष्कळ गर्दी होती. पाऊस अक्षरशः ३ घंटे कोसळत होता.

११ इ. पूर्ण फलश्रुती मिळेपर्यंत उपासना करणे आवश्यक !

मला लोककल्याणार्थ बोलावतात, तेव्हा मला जावेच लागते. मी एखाद्या व्यक्तीसाठी कधीच यज्ञ केले नाहीत. केवळ वातावरणातील अनिष्ट शक्तींचे निवारण करणे एवढेच नाही, तर पूर्ण फलश्रुती मिळेपर्यंत उपासना केली पाहिजे. फलश्रुती प्राप्त झाल्याचा आम्हाला दूरभाष यायला पाहिजे ना ? म्हणूनच मी बेंगळूरूमध्ये सलग २७ दिवस यज्ञ केला. यज्ञानंतर कावेरीचे पाणी तमिळनाडूमध्ये आले.

 

१२. प.पू. रामभाऊस्वामी यांनी विविध विषयांवर केलेले मार्गदर्शन

१२ अ. पंचमहाभूते आणि शरीर यांचा संबंध

१२ अ १. पंचभूतात्मक सूक्ष्म शक्तीचे सान्निध्यत्व मनात एकवटले असल्याने षड्रसांची चव कळणे

कितीतरी लोकांनी मला विचारले, ‘‘तुम्ही असे हवन करता. मोदक वगैरे अग्नीमध्ये घालता. त्याने काय होणार आहे ? त्यापेक्षा ते एखाद्याला खायला का देत नाही ? ज्याला जे आवडतं, ते दिल्याने त्याचं पोट भरेल. तुम्ही हे अग्नीमध्ये का घालता ? हवनात इतकं तूप घालायचं असतं का ?’’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी देह उत्पन्न झाला आहे. देहाला खाद्य पाहिजे; म्हणून आपण खातो. त्याची शक्ती कुठे जाऊन मिळते ? पंचभूतात्मक सूक्ष्म शक्तीचे सान्निध्यत्व मनामध्ये एकवटले आहे. म्हणूनच जे खातो, त्याच्या रसामुळे षड्रस ‘हे गुळचीट (गोड)’, ‘हे तिखट’, ‘हे आंबट’ हे कळतात. सूक्ष्म रूपाने यांतील जो अंश आपल्याकडे जास्त असतो, तो पदार्थ आपल्याला जास्त आवडतो; म्हणजे एखाद्याला गोड जास्त आवडतं. एखाद्याला तिखट आवडतं. एखाद्याला आंबट आवडतं. त्याला तिखट कशामुळे आवडतं ?, तर त्याच्यात अग्नीचे सान्निध्यत्व जास्त आहे म्हणून ! मासोळीमध्ये जलांश जास्त असतो; म्हणून ती पाण्यात रहाते. आपल्यामध्ये पृथ्वीतत्त्वाचा अंश जास्त आहे; म्हणून आपण पृथ्वीवर रहातो. आपण जलामध्ये राहू शकणार नाही. म्हणून ज्या पंचभूताचा अंश अधिक असतो. त्याच्यामुळे ते प्रभावीपण येते.’’

१२ अ २. अग्नीउपासनेद्वारे एकेका पंचभूताच्या अंशाचा थोडा थोडा त्याग केल्यानंतरच त्याचा अनुग्रह मिळणे आणि त्यामुळे कठीण प्रारब्धातून बाहेर पडता येणेे

ज्या पृथ्वीअंशाला प्रार्थना करून शरीर वाढवतात, तशी शक्तीही (पॉवरही) वाढते. कृतज्ञतेेने अग्नीला प्रार्थना करून हवन केल्यावर त्याची शक्ती मिळते. अग्नीच्या सान्निध्यामुळे त्याचा अनुग्रह मिळतो. अग्नीमध्ये काही अर्पण केल्यास त्याचे भस्म होते. ते परत मिळत नाही. असा एकेक पंचभूताच्या अंशाचा थोडा थोडा त्याग केल्यानंतरच त्यांचा अनुग्रह मिळतो. म्हणूनच एकेका अंशाला पूजा इत्यादी करून अग्नीला आहुती देतात. पृथ्वी पुष्कळ धान्य देते. दैवी सान्निध्यामुळे धान्य भरभरून येते. जमीन (भूमी) धान्य देते; म्हणून जे उत्पन्न मिळते, ते सगळेच खात नाहीत. त्यातला एक अंश जमिनीत पेरतात. जेवढे पेरतो, तेवढा अंश वाढत जातो. आम्ही जमिनीत का पेरायचं ? आम्ही जमिनीला का द्यायचं ? आम्हीच खायचं म्हटलं तर ? पुढे कसं उत्पन्न होणार ? दैवी सान्निध्यामध्ये पंचभूतांचे अंश आहेत. त्यामुुळे एकेकाने एकेक अंशाला प्रार्थना करून त्याचे सान्निध्यत्व घेतलं पाहिजे. म्हणूनच ही अग्नीउपासना ! अग्निहोमामुळे आणि त्याच्या सान्निध्यामुळे कठीण प्रारब्धातून बाहेर पडता येते.

१२ आ. मन आणि आत्मा यांची एकरूपता

१२ आ १. शरीर त्यागण्याची वेळ आली, तरी मन आणि आत्मा एकरूप असणे

शरीर पंचमहाभूतांपासून बनलेले आहे. त्यामधे आत्मा आणि मन हे दोन्ही एकमेकांत अडकलेले आहेत. ते निवडून बाहेर काढणे पुष्कळ कठीण असते. शरिराचा त्याग करण्याची वेळ आली, तरी मन आणि आत्मा एकरूपच असतात. त्यांना वेगळं करता येत नाही. हे शरिराने अनुभवता येतं.

१२ आ २. मनाला आत्म्यापासून दूर करणे कठीण असणे

त्यागेनैकेन अमृतत्त्वमानशुः ।

अर्थ : त्यागामुळे अमृताची प्राप्ती होते.

शरिराचा त्याग करूनच पाप दूर करता येते. शरीर नाही, तर पापाचे विमोचन कसे करणार ? मनाला आत्म्यापासून दूर करणे, याला ‘मोक्ष’ म्हणतात. ते दोन्ही वेगळं करणं पुष्कळ कठीण असतं. मनामध्ये सकारात्मक (पॉझिटिव्ह) आणि नकारात्मक (निगेटिव्ह) जोर असतो. मनातील नकारात्मक जोर सकारात्मक होतो, तेव्हाच मोक्ष मिळतो.

१२ इ. पाप-पुण्य

१२ इ १. आपण पुण्याचा अनुभव घेतो, तेव्हा संतोष (सुख) वाटतो. पापाचा अनुभव घेतो, तेव्हा दुःख असते.

१२ इ २. पापांचा नाश शरिराने करणे आवश्यक !

मुंगी चावली, तर आपण म्हणतो, ‘पाप झालं आणि मुंगी चावली; पण विंचू चावला, तर आपण असे म्हणू शकतो का ? बोलायला सोपे असते; पण त्या दुःखाचा प्रभाव किती असतो, हेे ज्याला विंचू चावला त्याला विचारले, तरच कळेल. आपल्या पापांचा विनाश आपण शरिरानेच केला पाहिजे.

१२ ई. श्राद्धाचे महत्त्व

कर्म केल्यामुळे अधिक प्राप्ती होते; म्हणूनच आमच्या हिंदुत्वामध्ये ज्यांनी आम्हाला वाढवले आणि आमच्यासाठी सगळे केले, त्यांचे प्राण निघून गेल्यानंतर वर्षातून एकदातरी त्यांचे चिंतन अन् मनापासून प्रार्थना करून डोळ्यांवाटे अश्रू ढाळून कृतज्ञता व्यक्त करायला हवी. म्हणूनच आदल्या दिवशी उपवास करतात. दुसर्याा दिवशी अन्नदान आणि तीळदान करतात. मागील तीन पिढ्यांचे (पितृ, पितामह, प्रपितामह आणि मातृ, मातृक, मातामह) स्मरण करून त्यांचे श्राद्ध करतात. त्या दिवशी रात्री फलाहार करतात.

१२ ई १. पितरांना अन्न अर्पण केल्यावर ते तृप्त होऊन त्यांचे आशीर्वाद मिळणे आणि त्यांच्याविषयी कृतज्ञ राहिल्यास देवाचे सान्निध्य आपोआपच मिळणे

जेव्हा श्राद्धविधी करायला जमत नाही, तेव्हा पितरांचे स्मरण करून जे अन्न आपण खातो, ते कोणालातरी देतात. ते तृप्त झाल्याने त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. आता कुणी असे विचारेल, ‘जे मृत्यू पावले, ज्यांनी आता दुसरा जन्म घेतला असेल, तर त्यांचे स्मरण करून त्यांच्यासाठी प्रार्थना का करायची ?’ याचे उत्तर असे आहे, ‘त्यांनी आम्हाला जन्म दिला. आमच्याकरता इतकी कर्मे केली. ती कधीही पुसली जात नाहीत. त्यांच्या कर्मांनुसार त्यांना पुढचा जन्म मिळतो; परंतु देह सोडून जातांना आयुष्यात जे जे घडलेले असते, ते ते सर्व भगवंताला अर्पण करून जातात. तेव्हा भगवंत काय करतो ? प्रतिनिधी म्हणून आई-वडिलांना पाठवतो. ते आपल्याला वाढवतात आणि मोठे करतात. जातांना ते आपल्यासाठी संपत्ती इत्यादी सर्वच त्याग करतात. तेव्हा त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता व्यक्त केली नाही, तर अदृश्य रूपातील भगवंतावर आपला किती विश्वायस असेल ? मग प्रत्यक्ष देवाला कसे अनुभवणार ? म्हणूनच जे पितर आहेत, त्यांना प्रार्थना करायला हवी. त्यांच्याविषयी कृतज्ञ रहायला हवे. म्हणजे आपोआपच देवाचे सान्निध्य मिळते.’

१२ ई २. भगवंत आपल्याला जे देत आहे, त्याविषयी मनात कृतज्ञता असणे आवश्यक !

दैवी सान्निध्यामुळे आपल्याला भगवंत लौकिकासाठी प्रतिदिन देत आहे. भगवंताने द्रौपदीला जसे वस्त्र पुरवले, तसे तो आपल्याला सर्वकाही देतच असतो. आपण ते सगळे उपभोगतो; पण आपण रसास्वाद घेतला पाहिजे नां ! किती स्वयंपाक केला, तरी तो खाणार्याने रसास्वाद घेतला नाही, तर त्याचा स्वयंपाक करणार्याला काय लाभ ? भगवंत आपल्याला जे जे देत आहे, त्याविषयी मनात कृतज्ञता असली पाहिजे. आपण जे खातो, त्यातला पहिला घास त्याच्यासाठी ठेवला पाहिजे. कॉफी, चहा जे काही आपण घेतो, ते मनात कृतज्ञता ठेवून कुणालातरी एकाला द्यायचे. मनातून स्मरण करून दिले, तर ते त्या जिवात्म्यापर्यंत पोेचते. यात प्रार्थना महत्त्वाची असते. लोकांचा त्याग पुष्कळ न्यून पडतो; म्हणून मला दु:ख वाटतं. वैदिकांनी केवळ कृती करून लाभ होणार नाही; पण ते साधना करतात, तशी प्रार्थना, नियम, आहार, जसे करतील, तशी त्यांची साधना होईल. मग त्यांच्या मनातील हेतू पूर्ण करण्यासाठी भगवंताचा अनुग्रह होतो. हे मला स्पष्ट दिसतं.’

१२ उ. मूलाधारातून सहस्रारापर्यंत जाण्याचे महत्त्व

१२ उ १. मूलाधारातून सहस्रारात आल्यावर जपाचे माहात्य कळणे

मूलाधारवरक्षेत्रनायकाय । (संदर्भ : अज्ञात)

अर्थ : ‘मूलाधार’ या श्रेष्ठ स्थळाचा स्वामी असलेल्या (गणपतीला माझा नमस्कार असो.)
मूलाधार चक्रातून सहस्रार चक्रात आल्यावर आपल्याला जपाचे माहात्म्य कळते. कळ चालू केल्यानंतर दिवा लागतो, तसे मूलाधारातून सर्व उत्पन्न होते. तुम्ही त्याच्याशी (परमेश्वनराशी) एकरूप होता. एक तुमचे मन आहे, एक माझे मन आहे आणि सर्वांचे मन आहे. साध्या एका सेल (बॅटरी)चे उदाहरण घ्या. कळ चालू केल्यावर एका सेलमधून ऊर्जा दुसर्याा सेलमध्ये जाते. साध्या सेलमध्ये इतके आहे, तर मनामध्ये किती चुंबकीय ऊर्जा (मॅग्नेटिक पॉवर) असली पाहिजे !

१२ उ २. मूलाधारातून सहस्रारापर्यंत लीन होऊन प्रार्थना केली, म्हणजे आपोआप डोळ्यांतून अश्रूधारा येतातच.

१२ ऊ. उपासनेचे महत्त्व

१२ ऊ १. दैवी सान्निध्यत्वाची वृद्धी करण्यासाठी योग्य आहार अन् वडीलधार्यां्नी सांगितलेली नेमादी व्रते करणे आवश्यक

दैवी सान्निध्यत्व पुष्कळ महत्त्वाचे आहे. ते प्रारब्ध टाळू शकतं. दैवी सान्निध्यत्व आपल्या मनामध्ये उत्पन्न करून त्याची वृद्धी केली पाहिजे. याला ‘मन नियंत्रणात ठेवणारी शक्ती’ (‘कंट्रोलिंग पॉवर ऑफ द माइंड’), असे म्हणतात. मन आटोक्यात ठेवायला आहार, वडीलधार्यांनी सांगितलेली नेमादी व्रतं केली पाहिजेत.

२ ऊ २. सांगितलेल्या पद्धतीने पठण केल्यास मंत्रांचा लाभ होणे आणि विष्णुसहस्रनाम म्हणतांना प्रार्थनेची जोड दिल्यास ते प्रभावी होणे

मननात् त्रायते इति मन्त्रः ।

अर्थ : ज्याचे मनन केल्यावर रक्षण करतो, तो मंत्र.

श्रीविष्णुसहस्रनामाच्या फलश्रृतीत सांगितले आहे,

रोगार्तो मुच्यते रोगाद् बद्धो मुच्येत बन्धनात् ।

भयान्मुच्येत भीतस्तु मुच्येतापन्न आपदः ॥

अर्थ : विष्णुसहस्रनामाचे पठण केल्याने रोगी रोगमुक्त होतो. बंदी बंधनमुक्त होतो. मनात भय उत्पन्न झाले असेल, तर तो भीतीतून बाहेर येतो. मोठ्या आपत्तीत अडकला असेल, तर आपत्तीतून बाहेर येतो.

एखादा विष्णुसहस्रनामाचे पारायण करतो, तरी त्याला काही साध्य होत नाही; पण विष्णुसहस्रनामाचे रचयिता तर महर्षि व्यास आहेत !

ऋषिनां पुनर्रादारं आचमनोंत्भावति ।

अर्थ : ऋषींनी सांगितलेली गोष्ट कधीही खोटी होणार नाही.

म्हणजे चूक आपलीच आहे. पारायण करतांना चूक होते. आपण मंत्र ओरडून म्हणतो. जमिनीवर बसून म्हणतो. आमचे मन बाहेर गुंतलेले असते. अशा स्थितीत केलेल्या पारायणाचे फळ मिळत नाही. एकाग्रता साधण्यासाठी ज्या पद्धतीने पारायण करण्यास सांगितले आहे, त्या पद्धतीने ते केले पाहिजे. आपण एक बैठक घालून त्यावर आसन घालून बसावे. तेव्हा त्या मंत्राचा प्रभाव मिळतो. विष्णुसहस्रनामाला प्रार्थनेची जोड दिली, तरच ते प्रभावी होते.

१२ ऊ ३. केवळ वेदपठण केल्याने ईश्‍वराचे सान्निध्य न मिळता केवळ शब्दजाल होणे, तर पठण करण्याबरोबर नियमांचे पालन केल्यास ज्ञान मिळणे

लोक वैदिक संस्कृतीचे शिक्षण घेतात; परंतु त्यांच्याकडून नियमांचे पालन होत नाही. आहारात नियम असले, तरच आपल्या इंद्रियांवर नियंत्रण येते, उदा. आपण काही गोळ्या घेतो. काही जण झोपेची गोळी घेतात; पण ‘झोपेची गोळी घेतली, तरी मी झोपणार नाही’, असे शक्य आहे का ? तसेच इंद्रियनिग्रहाचे आहे. म्हणून आहारामध्ये नियम असायला हवेत. त्या नियमांचे पालन करून प्रार्थना, मंत्र, नियम, आसन या सर्व गोष्टी करायला हव्यात. असं केलं, तरच वैदिक मंत्रांचं पठण उपयुक्त ठरतं आणि एक अमूल्य शक्ती प्राप्त होते; म्हणून वैदिक उपासना करणार्‍यांना नमस्कार केला पाहिजे. वेदमंत्रांचे केवळ शब्द आपल्याला उपयोगी पडत नाहीत. वेदमंत्रांचे पठण करणारा नियमांचे पालन करणारा असायला हवा. जप, तप, नियम, आसन, श्रद्धा सगळंच असायला पाहिजे. इंद्रियनिग्रह करायला लागल्यानंतर आपल्याला ज्ञान मिळू लागते. मनाला नियंत्रणात ठेवणारी शक्ती महत्त्वाची आहे. केवळ वेदपठण केल्यास आपल्याला ईश्‍वराचे सान्निध्य मिळत नाही. ते केवळ शब्दजाल होते.

१२ ऊ ४. दुसर्‍यासाठी काही कार्य केल्याने तृप्ती मिळते. त्यासाठी ‘साधना करायला पाहिजे’, असं वाटायला पाहिजे.

१२ ऊ ५. संसारात पद्मपत्रासारखे रहा आणि संसारात काम करणे अनुकूल होण्यासाठी उपासना करा !

गुरु सांगतात, ‘साधना म्हणून हे कार्य कर. बाकी वाटेल ते कर.’ गुरु संकल्प सांगतात. तो पूर्ण करायचा असतो. गुरु काळ सांगतात, ‘१८ दिवस कर. १९ दिवस कर.’ पद्मपत्रावर (कमळाच्या पानावर) पाणी टाकले असता, पाणी पानाला लागत नाही. ते वेगळे रहाते. पद्मपत्रासारखे रहा. संसारामध्ये काम करणे अनुकूल व्हावे, यासाठी संत झाले पाहिजे. रामाची उपासना केली पाहिजे. संसार केला नाही, तर रामाला अनुकूल होणार नाही. लौकिक सेवा होणार नाही. लोककल्याण करायला हवे. सर्व त्याग करून आपण एकटे बसून काय करायचे ? मात्र त्यागपण पाहिजे; म्हणूनच असे सांगितले आहे,

यथा नदीनदाः सर्वे सागरे यान्ति संस्थितिम् ।

तथैवाश्रमिणः सर्वे गृहस्थे यान्ति संस्थितिम् ॥ (संदर्भ : अज्ञात)

अर्थ : ज्याप्रमाणे लहानमोठ्या नद्या समुद्राकडे गेल्यावर स्थिर होतात, त्याप्रमाणे अन्य सर्व आश्रमवासी गृहस्थाश्रमी माणसाकडे गेल्यावर स्थिर होतात. (अन्य आश्रमवासियांची स्थिती गृहस्थाश्रमी माणसांवर अवलंबून असते.)

१२ ऊ ६. प्रार्थनेचे महत्त्व – गुरुसेवेत अडथळा आणणार्‍या शनिदेवांना मारुतीने अद्दल घडवणे आणि पुढे स्वतःला अन् स्वतःची उपासना करणार्‍यांना त्रास न देण्यास बजावणे

रामायणकाळी राम-रावण युद्धाच्या वेळी मारुतीला शनीची साडेसाती होती. शनिदेव मारुतीला म्हणाले, ‘‘मला तुझ्या डोक्यावर बसायचे आहे.’’ मारुति शनिदेवांना प्रार्थना करून म्हणाले, ‘‘मी सध्या श्रीरामाच्या सेवेत आहे. तोपर्यंत तू थांब. नंतर तू सांगशील ते मी ऐकीन.’’ शनिदेव ऐकायला तयार नव्हते. ते म्हणाले, ‘‘मी तुझ्या डोक्यावर बसणारच.’’ ते मारुतीच्या डोक्यावर जाऊन बसले. मारुतीने एक मोठा पर्वत डोक्यावर घेतला. त्यामुळे मारुतीचे डोके आणि पर्वत यांच्यामध्ये शनिदेव चेपले गेले. मारुति त्यांना म्हणाला, ‘‘अरे, तू मला धरलेस. धरूनच बसणार ना ? मग बैस. ‘शनीने धरले, तर काय होते’, हे लोकांना ठाऊक असते; आता ‘मारुतीने धरले, तर काय होते’, हे तुला कळेल. आता तू मला धरून सतव. मी तुला सोडणार नाही. तू सोडलेस, तरी मी सोडणार नाही.’’ तेव्हा पर्वत घेऊन ते दोघे नरकात गेले. मारुतीने पर्वताला खाली ठेवले. शनिदेव खाली पडल्याने त्यांचा पाय लंगडा झाला. म्हणून शनिदेवांना पुन्हा मारुतीने धरले आणि डोक्यावर ठेवले. तेव्हा शनिदेव पाया पडले आणि म्हणाले, ‘‘मला सोडून द्या. मी आता तुम्हाला परत त्रास देणार नाही.’’ त्यावर मारुतिरायांनी शनिदेवाला आज्ञा केली की, येथून पुढे तू मला त्रास द्यायचा नाहीस आणि माझी उपासना करणार्‍यांनासुद्धा त्रास द्यायचा नाहीस.’’ शनिदेव म्हणाले, ‘‘माझी दोन गोष्टींवर प्रीती आहे, एक उडीद आणि दुसरे तेल.’’ तेव्हा मारुतीने रामाला प्रार्थना करून रामाची आज्ञा म्हणून शनिदेवाला सोडून दिले. प्रार्थनेचे हे असे महत्त्व आहे; म्हणून आम्ही मनापासून प्रार्थना करतो अन् शनिवारी शनीला उडीद आणि तेल वहातो. याला काय हवे ते देतो.

 

१३. प.पू. रामभाऊस्वामी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले

१३ अ. प.पू. रामभाऊस्वामी यांनी त्यांना स्वतःला आणि परात्पर गुरु
डॉ. आठवले यांना अध्यात्माच्या दृष्टीने काय म्हणून संबोधायचे, याविषयी केलेले मार्गदर्शन

१. प.पू. रामभाऊस्वामी : तुम्ही अंतःकरणातून ज्या भावाने पहाल, तसे आम्हाला म्हणा. मला योगी म्हणा, असे मी कधी सांगितले नाही.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले – लोककल्याणाकरता जे सिद्धपुरुष असतात त्यांना सिद्ध म्हणून संबोधावे !

लोककल्याणाकरता जे सिद्धपुरुष पृथ्वीवर आले आहेत, त्यांना सिद्ध म्हणूनच संबोधायचे. ते लोककल्याणासाठी प्रयत्न करतात. साधना करतात. हे सर्वकाही त्यांच्या त्यागामुळेच होते. त्यामुळे ते त्यागपुरुषच असतात. त्यांनी त्याग केला नाही, तर तुम्ही सेवा कोठून करणार ? मी भगवंताची सेवा करायला सिद्ध आहे; पण भगवंतच नाही, तर सेवा कोणाची करू ? म्हणूनच त्यागपुरुष असायला पाहिजे ना ! काहीतरी त्याग केला, तरच सेवा करायला मिळेल. त्यामुळे ते शेवटी त्यागीपुरुषच असतात. म्हणूनच हा इतका मोठा रामनाथी आश्रम, सर्वकाही मनासारखे झाले. प.पू. डॉक्टरांना साधकांची किती काळजी असते ! ती सर्व काळजी दूर करून ते समर्थ होतात ना !

१३ आ. प.पू. रामभाऊस्वामी यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले
यांची भेट आणि रामनाथी आश्रमातील साधक यांच्याविषयी काढलेले उद्गार !

१३ आ १. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट होणे, ही भाग्याची गोष्ट 

प.पू. डॉक्टरांच्या भेटीचे विशेष महत्त्व आहे. हे रहस्य म्हणजे एकमेकांमधील अंतर्गत विश्‍वास असतोे. ते मनातून आले पाहिजे.

मनो हि जन्मान्तरसङ्गतिज्ञम् । – महाकवी कालिदास

अर्थ : जन्मांतर (सत्)संगतीत झाले, तर असे भाग्य मिळते.

१३ आ २. रामनाथी आश्रमातील साधकांची प्रत्येक कृृती, वृत्ती आणि बुद्धी यांत त्याग दिसणे आणि त्यात आश्रमाचा विकास व्हायला हवा, असा विचार असणे

प्रत्येक ठिकाणच्या (मृत्तिकेचा) मातीचा त्या त्या ठिकाणी प्रभाव असतो. काश्मीरमध्ये सफरचंद पिकते. ते इतरत्र पिकत नाही. प्रदेशानुरूप त्या त्या भूमीची एक अनुकूल शक्ती असते. रामनाथी आश्रमातील साधकांची प्रत्येक कृृती, वृत्ती आणि बुद्धी यांत त्याग दिसला. त्यागामध्ये आश्रमवृद्धी (आश्रमाचा विकास) झाली पाहिजे, असे वाटले. तुम्ही सर्वांगीण त्याग करून आश्रम बनवलेला आहे, असे वाटले.

त्यागेनैकेन अमृतत्त्वमानशुः ।

अर्थ : त्यागामुळे अमृताची प्राप्ती होते.

 

१४. प.पू. रामभाऊस्वामी आणि अनिष्ट शक्ती

१४ अ. साधना करतांना अनिष्ट शक्तींचा त्रास होतोच !

आपण साधना करत असलो की, तेथे अनिष्ट शक्ती येतच असतात. कुणीतरी ढकलून देतं. कार्य पुढे पुढे जातं. सोबत येणार्‍या लोकांना अडचणी येतात. जे काम करू त्यात अडचणी येतात इत्यादी.

१४ आ. रुग्ण बरे होण्यासाठी देवाला प्रार्थना केल्यावर रुग्णांना दैवी
सान्निध्य मिळून त्यांना त्रास देणारी अनिष्ट शक्ती सकारात्मक होऊ लागणे

आमच्याकडे कितीतरी रुग्ण बरे वाटावे म्हणून येतात. मनोरुग्ण येतात. कर्करोगी, क्षयरोगी तपासणीचे अहवाल (रिपोर्ट) घेऊन येतात. मी त्यांच्याकडे आणि देवाकडे बघून प्रार्थना करतो. त्यामुळे त्यांची शक्ती आमच्याकडे न येता त्यांना दैवी सान्निध्य मिळते. त्यांचे कार्य पूर्ण होते. कर्म पूर्ण होऊ लागते. अनिष्ट शक्ती चांगली सकारात्मक व्हायला लागते.

 

१५. अन्य सूत्रे

१५ अ. जलसाधना करणारे राजस्थानमधील सिद्धपुरुष !

राजस्थानमध्ये एक सिद्धपुरुष एका सरोवरातील पाण्यात तप करतात, असे मी ऐकले आहे. ते सिद्धपुरुष १ घंटा किंवा २ घंटे पाण्याखाली रहातात. पंचमहाभूतांमध्ये त्यांची पाण्याची, म्हणजे जलसाधना आहे. – प.पू. रामभाऊस्वामी, तंजावूर, तमिळनाडू.

१५ आ. चेन्नईमध्ये झालेल्या वर्ल्ड योगी कॉन्फरन्सच्या
अध्यक्षांनी प.पू. रामभाऊस्वामींना पाहून ते एकमेवाद्वितीय असल्याचे सांगणे

चेन्नईला वर्ल्ड योगी कॉन्फरन्स (जागतिक योगी संमेलन) झाली होती. त्या वेळी संमेलनाचे अध्यक्ष म्हणाले, आम्ही आजपर्यंत अनेकांचे ऐकले होते; पण स्वामीजींना (प.पू. रामभाऊस्वामी यांना) प्रत्यक्ष बघायला मिळाले. ते एकमेवाद्वितीय आहेत. – श्री. गणेश गोस्वामी (प.पू. रामभाऊस्वामी यांचे सुपुत्र आणि शिष्य)

(सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी प.पू. रामभाऊस्वामी यांच्याघेतलेल्या मुलाखतीतील सूत्रे)

Leave a Comment