गुढीपाडव्याचे धर्मशास्त्र जाणून योग्य कृती करा आणि आनंदाची अनुभूती घ्या !
महाराष्ट्रातील एका कीर्तनकारांनी त्यांच्या कीर्तनातून ‘गुढी कशी उभारावी ?’, या संदर्भात काही चुकीचे मार्गदर्शन केल्याचे लक्षात आले असून त्यांची वक्तव्ये व्हॉट्स अॅप आदी सामाजिक माध्यमांतून ‘व्हायरल’ होत आहेत. त्यांनी केलेली विधाने आणि हिंदु धर्मशास्त्रीय आधारावर त्यांचे केलेले खंडण आमच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.
चुकीचे विधान : नाथ महाराज नाथ रामायणात म्हणतात, ‘गुढ्या उभारती पताकांच्या ।’ कसल्या गुढ्या, तर पताकांच्या ! लोक कसली गुढी उभारतात, तर साड्यांची ! साडी टांगणे म्हणजे इज्जत टांगणे आहे. जुन्या काळात ‘साडी टांगली, तर इज्जत टांगली’, असे म्हणायचे.
खंडण : गुढीला साडी बांधणे हे अयोग्यच आहे. शास्त्रानुसार गुढी उभारतांना उंच बांबूच्या वरच्या टोकास पिवळ्या रंगाचे भरजरी कापड बांधावे.
चुकीचे विधान : भगवी गुढी उभारावी. त्याला लिंबाचा डगळा बांधायचा नाही.
खंडण : इतर कोणत्याही पदार्थापेक्षा कडुनिंबात प्रजापति-लहरी ग्रहण करण्याची क्षमता अधिक असल्याने गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाचा प्रसाद खातात. तसेच काही ठिकाणी परंपरेनुसार गुढीला कडुनिंबाची कोवळी पाने बांधतात.
कीर्तनकार किंवा प्रवचनकार यांनी हिंदूंचे सण, व्रते आणि उत्सव यांमागील धर्मशास्त्र जाणून घ्यावे. वरीलप्रमाणे काही कीर्तनकार धर्मशास्त्र ठाऊक नसल्याने त्यांच्या मनाप्रमाणे काही गोष्टी अयोग्य ठरवून पर्याय सांगतात. यामुळे हिंदूंची दिशाभूल होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात