१. प्रस्तावना आणि उद्देश
संतांचे जीवन अद्भुत असते. संत जसजसे ईश्वराच्या समीप जातात, तसतसे त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक गुणवैशिष्ट्यांत पालट होत जातात. साधनेमुळे हे पालट होतात; कारण त्यांच्यात सत्त्वगुण वाढतो. संतांच्या गुणांतील पालटांसह त्यांच्या शरिरामध्येही स्थूलातून पालट होतात, म्हणजे त्यांच्यातील दैवीपण स्थुलातूनही दिसू लागते; म्हणूनच याला दैवी पालट म्हणतात. संतांच्या चैतन्याचा परिणाम त्यांच्या वापरातील वस्तूंवरही होतो. अशा दैवी पालटांचा अभ्यास केल्यास अध्यात्मातील अनेक नवीन गोष्टी उलगडतील आणि मिळालेल्या ज्ञानाचा मानवाच्या कल्याणासाठी उपयोग होईल. या उद्देशाने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वतःचा देह, वस्तू आणि वास्तू यांमधील पालटांचा अभ्यास केला आहे.
आधुनिक वैद्यांनी (डॉक्टरांनी) वैद्यकीय चाचणीसाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रक्त घेतले होते. या रक्तातून प्रक्षेपित होणार्या स्पंदनांचा वातावरणावर होणार्या परिणामाचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्यासाठी १८.८.२०१५ या दिवशी गोवा येथील सनातनच्या आश्रमात घेण्यात आलेल्या चाचणीत पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) या वस्तू आणि व्यक्ती यांच्या ऊर्जाक्षेत्राचा (ऑराचा) अभ्यास करण्यासाठी उपयुक्त असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.
२. चाचणीचे स्वरूप
या चाचणीत पटलावर रक्त नसलेली परीक्षानळी ठेवून पिप तंत्रज्ञानाद्वारे छायाचित्र घेतले. ही मूळची नोंद होय. त्यानंतर प्रथम एका साधकाचे रक्त असलेली परीक्षानळी आणि नंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रक्त असलेली परीक्षानळी पटलावर ठेवून पिप तंत्रज्ञानाद्वारे छायाचित्र घेतले. या छायाचित्रांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर रक्ताच्या दोन्ही नमुन्यांतून प्रक्षेपित होत असलेल्या स्पंदनांचा वातावरणावर काय परिणाम होेतो ?, हे जाणता आले.
३. वैज्ञानिक चाचणीतील घटकाविषयी माहिती
३ अ. परीक्षानळी
रक्तचाचणीसाठी रक्त ठेवण्याकरता वापरण्यात येणारी ही नेहमीची परीक्षानळी आहे. या चाचणीत एकसारख्याच असलेल्या तीन परीक्षानळ्यांचा वापर केला. मूळची नोंद घेण्यासाठी रक्त नसलेली पहिली, साधकाचे रक्त ठेवण्यासाठी दुसरी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रक्त ठेवण्यासाठी तिसरी परीक्षानळी वापरली.
३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि एक साधक यांच्या रक्ताचे नमुने
१८.८.२०१५ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि ६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला एक साधक यांच्या नियमित वैद्यकीय चाचणीअंतर्गत घेण्यात आलेल्या रक्ताचे हे नमुने आहेत. हे दोन्ही नमुने एकाच प्रकारच्या दोन वेगवेगळ्या परीक्षानळ्यांत ठेवले होते. या परीक्षानळ्यांतील रक्ताच्या स्पंदनांचा एकमेकांवर परिणाम होऊ नये यासाठी रक्ताचे नमुने घेतल्यापासून ते चाचणी पूर्ण होईपर्यंत दोन्ही परीक्षानळ्या एकमेकांपासून दूर ठेवल्या होत्या.
४. पिप (पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी) तंत्रज्ञानाची ओळख !
या तंत्रज्ञानाद्वारे आपण एखाद्या वस्तूची सामान्यपणे डोळ्यांना न दिसणारी अशी रंगीत प्रभावळ (ऑरा) पाहू शकतो. पिप या संगणकीय प्रणालीला व्हिडिओ कॅमेर्याशी जोडून त्याद्वारे वस्तू, वास्तू किंवा व्यक्ती यांची ऊर्जाक्षेत्रे विविध रंगांत पहाता येतात. यात सकारात्मक आणि नकारात्मक स्पंदने रंगांच्या माध्यमातून दिसण्याची सुविधा आहे. हे रंग कशाचे दर्शक आहेत, ते सूत्र ७ अ या सारणीतील दुसर्या उभ्या स्तंभात दिले आहे.
५. चाचणीसंबंधाने घेतलेली दक्षता
अ. या चाचणीची पिप छायाचित्रे घेण्यासाठी विशिष्ट कक्ष (खोली) वापरण्यात आला. या कक्षाच्या भिंती, छत आदींच्या रंगांचा चाचणीतील घटकाच्या प्रभावळीतील रंगांवर परिणाम होऊ नये, यासाठी भिंती, छत आदींना पांढरा रंग दिला होता.
आ. संपूर्ण चाचणीच्या वेळी कक्षातील प्रकाशव्यवस्था एकसारखीच ठेवली होती, तसेच कक्षाबाहेरील हवा, प्रकाश, उष्णता यांचा कक्षातील चाचणीवर परिणाम होऊ नये, यासाठी चाचणीच्या वेळी कक्ष बंदिस्त ठेवण्यात आला होता.
६. चाचणीतील निरीक्षणे समजून घेण्याच्या दृष्टीने उपयुक्त सूत्रे
६ अ. मूळची नोंद (वातावरणाची मूलभूत प्रभावळ)
चाचणीमध्ये एखाद्या घटकामुळे (उदा. या चाचणीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रक्त असलेली परीक्षानळी ठेवल्यामुळे) वातावरणात झालेला पालट अभ्यासण्यासाठी त्या घटकाचे पिप छायाचित्र घेतात; पण वातावरणात सातत्याने पालट होत असल्यामुळे घटकाची चाचणी करण्यापूर्वी घटक ठेवणार असलेल्या वातावरणाचे पिप छायाचित्र प्रथम घ्यावे लागते. याला मूळची नोंद म्हणतात. घटकाच्या पिप छायाचित्राची मूळच्या नोंदीशी, म्हणजेच वातावरणाच्या मूलभूत प्रभावळ दर्शवणार्या पिप छायाचित्राशी तुलना केल्यानंतर त्या घटकामुळे वातावरणात झालेला पालट लक्षात येतो.
६ आ. मूळच्या नोंदीच्या (वातावरणाच्या मूलभूत
प्रभावळीच्या) तुलनेत वस्तूची प्रभावळ दर्शवणार्या पिप
छायाचित्रातील रंगांच्या प्रमाणात वाढ किंवा घट होण्यामागील तत्त्व
चाचणीसाठी वस्तू (उदा. या चाचणीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रक्त असलेली परीक्षानळी) ठेवण्यापूर्वीच्या (मूळच्या नोंदीच्या) तुलनेत वस्तू ठेवल्यानंतरच्या प्रभावळीतील रंगांच्या प्रमाणात वाढ किंवा घट होते. ही वाढ किंवा घट त्या वस्तूतून प्रक्षेपित होणार्या त्या रंगांशी संबंधित स्पंदनांच्या प्रमाणानुसार असते, उदा. चाचणीसाठी वस्तू ठेवल्यानंतर त्यातून चैतन्याच्या स्पंदनांचे प्रक्षेपण पुष्कळ प्रमाणात झाल्यास प्रभावळीतील पिवळ्या रंगाचे प्रमाण वाढते, तर चैतन्याच्या स्पंदनांचे प्रक्षेपण न झाल्यास किंवा इतर स्पंदनांच्या तुलनेत अल्प प्रमाणात झाल्यास प्रभावळीतील पिवळ्या रंगाचे प्रमाण घटते. (हे लक्षात घेऊन ७ अ आणि ७ इ या सारण्या वाचाव्यात.)
६ इ. प्रभावळीत दिसणार्या रंगांची माहिती
चाचणीतील वस्तूच्या (किंवा व्यक्तीच्या) पिप छायाचित्रात दिसणार्या प्रभावळीचे रंग हे त्या वस्तूच्या ऊर्जाक्षेत्रातील विशिष्ट स्पंदने दर्शवतात. प्रभावळीतील प्रत्येक रंगाविषयी पिप संगणकीय प्रणालीच्या निर्मात्यांनी उपलब्ध केलेल्या कार्यपुस्तिकेतील (मॅन्युअलमधील) माहिती आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेल्या शेकडो चाचण्यांतील निरीक्षणांचा अनुभव यांच्या आधारे प्रत्येक रंग कोणत्या स्पंदनाचा दर्शक आहे ?, ते निश्चित केले आहे. ते सूत्र ७ अ या सारणीतील दुसर्या उभ्या स्तंभात दिले आहे.
६ ई. सकारात्मक स्पंदने
पिप छायाचित्रातील फिकट गुलाबी, पोपटी, निळसर पांढरा, पिवळा, गडद हिरवा, हिरवा, निळा आणि जांभळा हे रंग अनुक्रमे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक लाभदायक ते अल्प लाभदायक स्पंदने दर्शवतात. या सर्व आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक असणार्या स्पंदनांना (रंगांना) लिखाणात एकत्रितपणे सकारात्मक स्पंदने असे संबोधले आहे.
६ उ. नकारात्मक स्पंदने
पिप छायाचित्रातील राखाडी, गुलाबी, नारिंगी आणि भगवा हे रंग अनुक्रमे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक त्रासदायक ते अल्प त्रासदायक स्पंदने दर्शवतात. या सर्व आध्यात्मिकदृष्ट्या त्रासदायक असणार्या स्पंदनांना (रंगांना) लिखाणात एकत्रितपणे नकारात्मक स्पंदने असे संबोधले आहे.
६ ऊ. पिप छायाचित्रात सर्वसाधारणपेक्षा
उच्च सकारात्मक स्पंदनांचे दर्शक रंग दिसणे अधिक चांगले !
पिप छायाचित्रात पोपटी किंवा निळसर पांढरा हे उच्च सकारात्मक स्पंदनांचे दर्शक असलेले रंग दिसू लागल्यास काही वेळा पिवळा, गडद हिरवा किंवा हिरवा या सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांच्या दर्शक रंगांचे प्रमाण घटते किंवा ते रंग पूर्णपणे दिसेनासे होतात. हा चांगला पालट समजला जातो; कारण त्या वेळी सर्वसाधारण सकारात्मक स्पंदनांची जागा त्यापेक्षाही उच्च प्रतीच्या सकारात्मक स्पंदनांनी घेतलेली असते.
६ ए. पिप छायाचित्रातील रंगांच्या वैशिष्ट्यांचा
त्या रंगाच्या प्रत्यक्षातील आध्यात्मिक वैशिष्ट्याशी संबंध नसणे
पिप संगणकीय प्रणालीच्या निर्मात्यांनी पिप छायाचित्रात नकारात्मक स्पंदनांसाठी भगवा आणि नारिंगी, हे रंग निर्धारित केले आहेत. त्याचा आणि त्या रंगांच्या प्रत्यक्षातील आध्यात्मिक वैशिष्ट्यांचा (उदा. भगवा रंग त्याग अन् वैराग्य यांचे प्रतीक आहे.) कोणताही संबंध नाही.
७. निरीक्षणे
७ अ. निरीक्षण १ – पिप छायाचित्रांत दिसणार्या प्रभावळीचे रंग,
ते कशाचे दर्शक आहेत आणि त्यांच्या प्रमाणात झालेली वाढ किंवा घट
चाचणीतील एका साधकाचे रक्त आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रक्त यांच्या प्रभावळींची तुलना मूळच्या नोंदीशी केली आहे, हे लक्षात घेऊन पुढील सारणी वाचावी.
टीप १ : घटकाच्या केवळ बाह्य स्तरांवरील नकारात्मक स्पंदने नष्ट करण्याची आणि सकारात्मक स्पंदनांची वृद्धी करण्याची क्षमता
७ आ. निरीक्षण ३ – पिप छायाचित्रांतील प्रत्येक स्पंदनाचे (रंगाचे) प्रमाण (टक्के)
टीप : छायाचित्रांत दिसणार्या विविध रंगांचे प्रमाण ठरवण्यासाठी पिप छायाचित्रावर आलेख कागदावर असतात, तशा अनेक चौकटी संगणकीय प्रणालीद्वारे योजल्या. त्यानंतर छायाचित्रातील एकूण चौकटी आणि त्यांच्या तुलनेत प्रभावळीतील प्रत्येक रंगाने व्यापलेल्या चौकटी यांची संख्या मोजली. त्यांचे टक्क्यांमध्ये रूपांतर करून प्रभावळीतील प्रत्येक रंगाचे प्रमाण (टक्के) सर्वसाधारणपणे निश्चित केले.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रक्तातील सकारात्मक स्पंदनांचे एकूण प्रमाण ६७ टक्के, म्हणजे मूळची नोंद आणि ६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या साधकाचे रक्त यांतील सकारात्मक स्पंदनांच्या प्रमाणापेक्षा पुष्कळ अधिक आहे, हे वरील सारणीवरून स्पष्ट होते.
८. निरीक्षणांचे विवरण आणि निष्कर्ष
८ अ. साधकाच्या रक्तातून थोड्या प्रमाणात सकारात्मक स्पंमदने प्रक्षेपित होणे
मूळच्या नोंदीच्या तुलनेत साधकाच्या रक्ताच्या प्रभावळीतील सकारात्मक स्पंदने दर्शवणार्या रंगांपैकी पिवळा रंग पुष्कळ वाढला, तर नकारात्मक स्पंदने दर्शवणारे भगवा आणि नारिंगी हे रंग थोडे घटले आहेत. साधकाच्या रक्तातून प्रक्षेपित होणार्या आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक स्पंदनांचा हा परिणाम आहे. कलियुगात सर्वसाधारण व्यक्तीमध्ये रज-तम गुणांचे प्रमाण अधिक असते. त्याच्या तुलनेत नियमितपणे काही वर्षे साधना करणार्या साधकामध्ये सत्त्वगुणाचे प्रमाण अधिक आहे. यातून साधनेचे महत्त्व लक्षात येते.
८ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या
रक्तातून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रक्ताच्या प्रभावळीत सकारात्मक स्पंदने दर्शवणार्या रंगांपैकी पिवळा रंग पुष्कळ वाढला, तर गडद हिरवा आणि हिरवा या रंगांपेक्षा उच्च प्रतीचा पवित्रतेचा निळसर पांढरा रंग पुष्कळ प्रमाणात दिसू लागला आहे. (गडद हिरवा आणि हिरवा रंग अल्प होण्यासंदर्भातील स्पष्टीकरणासाठी सूत्र ६ ऊ पहा.) भगवा आणि नारिंगी हे नकारात्मक स्पंदने दर्शवणारे रंग पुष्कळ घटले आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रक्तातून पुष्कळ प्रमाणात आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक स्पंदने प्रक्षेपित होत आहेत. त्यांच्यातील सात्त्विकतेचा हा परिणाम आहे. आध्यात्मिक पातळी जेवढी अधिक असते, तेवढ्या अधिक प्रमाणात व्यक्तीच्या देहातून सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखे उच्च आध्यात्मिक स्तर असणारे संत हे सात्त्विकतेचे स्रोत आहेत, हे या चाचणीतून लक्षात येते.
– श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२०.१२.२०१६)
ई-मेल : [email protected]
सूचना : पिप छायाचित्रांत नकारात्मक स्पंदनांविषयी लिखाण तपकिरी रंगात, तर सकारात्मक स्पंदनांविषयी लिखाण निळ्या रंगात दिले आहे.