भारतीय संस्कृतीतील एक अनमोल ‘पान’, म्हणजे खाण्याचे ‘पान’ अर्थात विडा. आयुर्वेदानुसार आणि व्यवहारानुसार त्यातील गुण-दोष आपण पाहू.
१. विड्याच्या पानाचे भारतीय संस्कृतीतील महत्त्व
‘सर्व देवकार्यार्ंत विड्याच्या पानाला अनन्यसाधारण महत्त्व आहेे. लग्न, मुंज, वास्तुशांत असो किंवा सत्यनारायणाची वा अन्य कोणतीही पूजा असो, पान आणि सुपारी हे त्यातील अविभाज्य घटक आहेत ! जेवणाची पूर्णता पान खाण्यानेच होते. अन्यथा ‘जेवण पूर्ण झाले’, असे वाटत नाही. पूर्वी घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करायची भारतीय पद्धत म्हणजे, पानाचे तबक पुढे करणे. आता याची जागा चहाने घेतली आहे. पान खाणे हे व्यसन कधीच नसते; पण चहाचे मात्र व्यसन लागते. त्यापूर्वी पाहुण्याला गूळपाणी आणि त्यानंतर पानाचे तबक दिले जात असे. या तबकामध्ये तंबाखू मात्र नव्हता, तर कळीचा चुना, रंगीत कात, खडखडीत सुकलेली किंवा ओली सुपारी, लवंग, वेलची, बडीशेप आणि नारळाचा तुकडा किंवा गुलकंद असायचा ! आयुर्वेदानुसार झोपून उठल्यावर, आंघोळीनंतर, देवपूजा झाल्यावर, जेवणानंतर, असे दिवसभरात १० ते १२ वेळा पान चघळून खायला सांगितले आहे. चित्रपटांत पानाची महती सांगणारी अनेक गाणी आपण आजही ऐकतो ! ‘विडा घ्या हो नारायणा’, अशी एक आरतीही आहे.
२. विडा बनवण्याची आणि खाण्याची आयुर्वेदानुसार आदर्श पद्धत
विडा बनवण्यापूर्वी पानाचे देठ आणि टोकाचा भाग खुडून टाकावा. पानाच्या मागील शिरा हातांनी काढून टाकाव्यात. नंतर चणाडाळीएवढा चुना पानाला लावावा. त्यावर कात घालावा. त्यानंतर सुपारी, वेलची, बडीशेप आदी ठेवून विशिष्ट पद्धतीने घडी घालून पान बंद करावे. घडी सुटू नये म्हणून वर लवंग टोचावी. झाले विड्याचे पान सिद्ध ! पान चावल्यानंतर पहिल्या आणि दुसर्या वेळी येणारे रस गिळू नयेत. प्रथम येणारा रस गिळला, तर तो विषतुल्य आहे. दुसर्या वेळी येणारा रस पचण्यास जड असून प्रमेह (शरिरातील मूत्रप्रवृत्ती वाढवणारा रोग) निर्माण करणारा असतो. तिसर्या वेळी किंवा त्यापुढे निघणारा रस अमृततुल्य असल्याने तो गिळावा. शक्य असेल तेवढा वेळ पान चघळावे आणि नंतर चोथा गिळावा.
३. अनेक विकारांवरील औषध असणारा विडा
दात दुखणे, हलणे, किडणे, तसेच हिरड्यांतून रक्त येणे, वारंवार तोंड येणे, गळ्यातील गाठी सुजणे, आवाज बसणे, कान दुखणे, कानातून पाणी येणे, सारखी सर्दी होणे, नाकाचे हाड वाढणे, दृष्टीदोष, अशा अनेक व्याधींमध्ये चिकित्सा म्हणून आणि हे रोग होऊ नयेत म्हणून पान खावे, असे आयुर्वेदात सांगितले आहे.
४. विडा खाल्ल्यानंतर थुंकी गिळण्याचे महत्त्व
एक लक्षात ठेवावे की, पान खाल्ल्यावर पहिल्या २ पिचकारींनंतर थुंकू नये. एका थुंकीच्या पिचकारीतून तोंडातील किती लाळ बाहेर पडेल, याचा अभ्यास केल्यावर लक्षात आले की, एक वेळा पिचकारी टाकली, तर न्यूनतम ५ मि.लि. लाळ बाहेर पडते. एकदा पान खाल्ले, तर ३ वेळा पिचकारी टाकली जाते, म्हणजेच १५ मि.लि. लाळ बाहेर पडेल. अशी १० पाने खाल्ली, तर १५० मि.लि. लाळ बाहेर पडेल. लाळ ही ‘अल्कली’ (आम्लाच्या विरोधी) गुणधर्माची आणि उत्तम जंतूनाशक असते. जेवणानंतर पोटात वाढलेले अतिरिक्त आम्ल या लाळेने घटवले जाते. ही १५० मि.लि. लाळ पोटात गेली, तर अॅसिडटी, अपचन, गॅस, अजीर्ण हे नेहमी त्रास देणारे विकार आपोआप पळून जातील.
५. विड्यातील विविध घटकांचे औषधी गुणधर्म
५ अ. कोलेस्टेरॉल, कफ आणि कृमी यांचा नाश करणारे हिरवे पान
हिरवे पान हे हृदयरोगावरील अप्रतिम औषध आहे. रक्तातील कफ म्हणजेच आजचे कोलेस्टेरॉल घटवणे, घशातील कफाचा चिकटा काढून टाकणे, हे काम पान स्वतः करते. अन्नपचन होण्यासाठी जो तंतूमय आणि रेषादार पदार्थ आवश्यक असतो, तो या पानातून मिळतो. पानाचा तिखटपणा कृमींचा नाश करतो.
५ आ. नैसर्गिक कॅल्शियमचा साठा असलेला कृमीनाशक चुना
पानाला लावलेला चुना हे एक अप्रतिम औषध आहे. चुन्यामुळे कधीही कृमी होत नाहीत. याचाच अर्थ तो जंतूंची वाढ थांबवतो. या गुणधर्मामुळेच पान खाण्याने दात किडत नाहीत आणि पोटातील जंतही मरतात. पोटात असणारे जंत हे खूप हट्टी असतात. आजच्या बहुतेक औषधांना ते मुळीच प्रतिसाद देत नाहीत; पण या लहान-मोठ्या कृमींसाठी चुन्याची निवळी, हे अप्रतिम औषध आहे. चुना हा नैसर्गिक कॅल्शियम आहे. त्यामुळे रक्तातील कॅल्शियम वाढायला आपोआप साहाय्य होते. नैसर्गिक असल्याने तो सहज पचतो आणि अतिरिक्त झालेला बाहेरही पडून जातो. त्यामुळे कोणताही अतिरिक्त दुष्परिणाम होत नाही. आज डॉक्टरांच्या समादेशानुसार (सल्ल्यानुसार) मिळणारी कृत्रिम रितीने बनवलेली कॅल्शियमची औषधे मूत्रपिंडातील (किडनीतील) किंवा पित्ताशयातील खडे वाढवतात. विकतच्या महागड्या कॅल्शियमपेक्षा एक किंवा दोन पैसे किमतीचा चुना आपले आर्थिक ‘बजेट’ही सांभाळतो. अर्थात, डॉक्टरांचे आणि औषध कंपन्यांचे पुष्कळ नुकसान होत असल्याने त्यांचा पानाला विरोध असणे साहाजिकच आहे. चुना उत्तम अल्कली असल्याने लाळेप्रमाणेच पित्त घटवण्यास साहाय्य करतो. असा हा बहुगुणी चुना प्रत्येकाच्या घरी असावाच ! कुठेही मुरगळले, लचकले, मुका मार बसला, तर वरून लावण्यासाठी चुन्यासारखे दुसरे औषध नाही. खायचा चुना बाहेरून लावल्यास काहीही अपाय होत नाही.
५ इ. रक्तवर्धक आणि रक्तस्तंभक कात
कात हा रक्तवर्धक आणि रक्तस्तंभक (रक्तस्राव थांबवणारा) आहे. ज्यांना शरिरातून कोणत्याही मार्गाने रक्तस्राव होण्याची सवय असते, त्यांना कात हे अमृतच आहे. कात पानातून खाल्ल्यास दातांतून, हिरड्यांतून, घशातून वा नाकातून रक्त येणे लगेचच थांबते.
५ ई. कर्करोगाला (कॅन्सरला) प्रतिरोध करणारी आणि शुक्रधातू वाढविणारी सुपारी
सुपारी ही शुक्रधातू वाढवणारी आहे. कच्च्या किंवा भाजक्या सुपारीने कर्करोग होत नाही. पेठेत मिळणारी वासाची सुगंधित गोड सुपारी मात्र गडबड करणारी आहे; कारण तिच्यामध्ये सॅक्रिन मिसळलेले असते, जे कर्करोग वाढवणारे आहे.
६. विडा खाणे ही आरोग्यदायी सवय
एवढे गुण जर विड्यात असतील, तर कोणी काहीही म्हणो, विडा खाणे ही आरोग्यदायी सवय आहे, हे निश्चित ! हां, फक्त एक साईड इफेक्ट दिसतो, तो म्हणजे पान खाल्ले की दात, ओठ आणि तोंड रंगते ! आता ‘लीपस्टिक’ लावून तोंड रंगवण्यापेक्षा विडा खाऊन रंगलेलेे काय वाईट ? अर्थात, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.’