अ. साधनेत देवाच्या दिशेने १ पाऊल
पुढे टाकले की, देव आपल्या दिशेने १० पावले
टाकतो, याची अध्यात्माच्या सर्वच क्षेत्रांत आलेली अनुभूती
मी वयाच्या ४३ व्या वर्षी (वर्ष १९८५ मध्ये) साधनेकडे वळलो. ४५ व्या वर्षी (वर्ष १९८७ मध्ये) मला प.पू. भक्तराज महाराज (बाबा) यांच्या रूपात गुरुप्राप्ती झाली. वर्ष १९९० मध्ये प.पू. बाबांनी देश-विदेशात सर्वत्र धर्मसार करा, असे सांगितले. त्यासाठी त्यांनी आवश्यक असे ज्ञानच दिले असे नाही, तर धर्मसाराला जाता यावे; म्हणून स्वतःची कार दिली आणि वर डिझेलसाठी पैसेही दिले. त्या वेळी त्यांनी असेही सांगितले, डॉक्टर, तुम्ही पाय पसरा. आम्ही तुमचे अंथरुण त्याहून अधिक पसरू. (अंथरुण पाहून पाय पसरावे या म्हणीला अनुसरून त्यांचे हे उद्गार होते.) त्यांच्या संकल्पामुळे आपण साधनेत देवाच्या दिशेने १ पाऊल पुढे टाकले की, देव आपल्या दिशेने १० पावले टाकतो, याची अनुभूती मला अध्यात्माच्या सर्वच क्षेत्रांत आली. सनातनचे कार्य शीघ्र गतीने वाढले. मला पहिल्यापासून ज्ञानाची जिज्ञासा आहे. आतापर्यंत प.पू. बाबांनी मला अनेक साधकांच्या माध्यमातून सहस्र ग्रंथ होतील इतके ज्ञान दिले आहे आणि ते अजूनही ज्ञान देत आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांवरील उपाय म्हणजे नामजप, एवढेच माहीत होते. आता देवाने आध्यात्मिक उपायांच्या अक्षरशः शेकडो पद्धती शिकवल्या आहेत आणि अजूनही शिकवतो आहे.
आ. धर्मसारक आणि धर्मरक्षक
साधकांमुळे हिंदु राष्ट्राची स्थापना होईल, याची निश्चिती !
वर्ष १९८५ मध्ये मी सत्संग घेण्यास आरंभ केला. समाजात धर्मप्रसार व्हावा, यासाठी पुढे मी सनातन संस्थेची स्थापनाही केली. पुढे सनातनचे साधक सत्संग घेऊ लागले. गेली अनेक वर्षे प्राणशक्ती अल्प
असल्यामुळे मी बाहेर कोठेही जाऊ शकत नाही; मात्र आज सनातनच्या साधकांच्या रूपाने शेकडो धर्मप्रसारक निर्माण झाले आहेत. आज ते तन, मन आणि धन यांचा त्याग करून स्वयंस्फूर्तीने धर्मप्रसार करत आहेत. साधकांनी धर्महानी रोखल्याच्या अनेक घटनाही घडत आहेत. यामुळेच हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) स्थापना होईल, यासंदर्भात मी निश्चिंत आहे.
इ. साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती होत असणे
नवीन साधकांमध्ये तळमळ, भाव इत्यादी निर्माण करण्यात उत्तरदायी साधक आणि संत यशस्वी झाले आहेत. साधकांनी केलेल्या यत्नांमुळे केवळ भारतातच नव्हे, तर विदेशांतही शेकडो साधक साधना करून आध्यात्मिक उन्नती करू लागले आहेत. मला भेटायला येणार्या साधकांच्या व्यष्टी अनुभूती आणि
जगभर होणारा प्रचार यांवरून साधकांची जलद आध्यात्मिक उन्नती होत आहे, हे माझ्या लक्षात आले. आज सहस्रो साधकांनी ६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठला असून ते येत्या काही वर्षांत संत बनतील.
ई. कार्य करणारी पुढील पिढी
सिद्ध झाल्याने कार्यात अनेक पटींनी वाढ !
माझ्या कार्याची पुढची पिढी सिद्ध होत आहे. आता प्रकृती ठीक नसल्याने आणि वय झाल्यामुळे मी वर्ष २००७ पासून कुठे बाहेर जाऊ शकत नाहीत, तरीही माझे सर्व तर्हेचे कार्य शेकडो साधक करत आहेत. त्यामुळे कार्य अनेक पटींनी वाढत आहे.
उ. हिंदु राष्ट्र कोण चालवणार, याची चिंता दूर करणारी दैवी बालके !
जगभरच्या मानवाची स्थिती पाहिल्यास ती भयावह आहे. सत्त्वप्रधान माणसे शोधूनही सापडत नाहीत. या परिस्थितीत मानवाचे पुढे काय होईल ?, याची चिंता मला होती. भगवंताने उच्च स्वर्गलोक आणि महर्लोक येथील शेकडो जिवांना पृथ्वीवर जन्माला घातले आहे. ही दैवी बालके सात्त्विक असल्यामुळे हिंदु राष्ट्राची स्थापना झाल्यानंतर पुढच्या पिढीत ते कोण चालवणार, याची मला असलेली चिंता भगवंताने दूर केली आहे. जीवन कृतार्थ झाले, असे वाटण्यासारख्या आणिक कितीतरी गोष्टी आहेत. त्या सर्वांची सूची करणेही अशक्य आहे.
ऊ. करण्यासारखे काही न उरणे !
आता स्थुलातील आणि सूक्ष्मातील करण्यासारखे काही उरले नाही; म्हणूनच जीवन कृतार्थ झाले, असे वाटते. त्यामुळे मी आता भगवान श्रीकृष्णाची पुढे दिलेली स्थिती थोड्याफार प्रमाणात का होईना; पण अनुभवत आहे.
न मे पार्थास्ति कर्तव्यं त्रिषु लोकेषु किञ्चन ।
नानवाप्तमवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि ॥
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ३, श्लोक २२
अर्थ : हे पार्थ, या तिन्ही लोकांमध्ये माझ्यासाठी कोणतेही कर्म नियत करण्यात आले नाही. मला कशाची उणीव नाही, तसेच मला काही प्राप्त करायची आवश्यकताही नाही आणि तरीसुद्धा मी नियत कर्मांचे आचरण करतो.
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१.३.२०१७)