‘मी कलेचे शिक्षण घेत असतांना जे शिकायला मिळाले नाही, ते बारकावे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधनेत आल्यावर मला शिकवले. ‘कलेतील सेवा ही साधनाच आहे’, हेही त्यांनीच आमच्या मनावर बिंबवले. आपण ‘आपली कला देवासाठी अर्पण करत आहोत’, हा अहं न ठेवता ‘मला देवाच्या जवळ जायचे आहे आणि ही सेवा, म्हणजे देवाजवळ नेणारे साधन आहे’, हे शिकायला मिळाले. ‘कलेच्या माध्यमातून साधना कशी करायची ?’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला शिकवले. या कालावधीत मला शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी प्रथम भेटीतच ‘
तुझी प्रगती कलेच्या माध्यमातून आहे’, असे सांगणे
मी प्रथम आश्रमात आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांना भेटले. तेव्हा ‘मी आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करू शकेन कि नाही ?’, हेही मला ठाऊक नव्हते. आमच्या त्या पहिल्याच भेटीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितले, ‘‘तुझी प्रगती कलेच्या माध्यमातून आहे.’’ त्या वेळी त्यांच्या बोलण्याचा अर्थ मला समजला नव्हता. ‘साक्षात् श्रीविष्णूनेच त्याच्याजवळ येण्यासाठीचा माझा मार्ग आधीच ठरवला होता आणि मला त्याची जाणीवही नव्हती’, हे आता लक्षात येते.
२. सूक्ष्म चित्रांच्या सेवेच्या माध्यमातून साधकांना घडवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
२ अ. ‘सूक्ष्मातील विषय कठीण असूनही समाजातील कुठल्याही वाचकाला चित्र पहातांना
प्रश्न न पडता ते सहजतेने समजण्यासाठी कसे सादर करायचे ?’, ते टप्प्याटप्प्याने शिकवणे
मी सूक्ष्म चित्रांची सेवा शिकत होते. चित्रकारांनी काढलेली सूक्ष्म चित्रे ग्रंथात छापण्यासाठी संगणकावर सिद्ध करणे, अशी ती सेवा होती. ही सेवा पडताळतांना परात्पर गुरु डॉ. आठवले त्यांना सूक्ष्म चित्रातील काहीच ठाऊक नसल्याप्रमाणे मला प्रश्न विचारायचे. खरेतर त्यांना सर्वच ठाऊक होते; पण ‘सेवा पूर्णपणे समजून घ्यायला हवी’, हे त्यांना मला शिकवायचे होते. मी सूक्ष्म चित्रकार साधकांशी बोलून ‘त्यांना नेमके काय दिसले आहे ?’, हे समजून घेत असे, जेणेकरून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना त्याविषयी काही प्रश्न विचारावे लागणार नाहीत; परंतु प्रत्येक वेळी ते मी समजून घेतलेल्या भागावर प्रश्न न विचारता निराळेच प्रश्न विचारायचे. असे करत करत त्यांनी टप्प्याटप्प्याने मला ही सेवा शिकवली. कालांतराने त्यांनी सांगितले, ‘‘आता मी सूक्ष्म चित्र पडताळणार नाही. तुम्हीच अंतिम करू शकता.’’ ‘सूक्ष्मातील विषय कठीण असूनही समाजातील कुठल्याही वाचकाला चित्र पहातांना प्रश्न न पडता ते सहजतेने समजण्यासाठी कसे सादर करायचे ?’, ते त्यांनीच शिकवले.
२ आ. सेवा करतांना अभ्यास आणि वेळ यांची सांगड घालण्यास शिकवणे
एका सूक्ष्म चित्राच्या वेळी मी आणि माझ्यासह सेवा करणार्या एका साधिकेने भाषांतराचा समन्वय आणि ते समजून घेण्यासाठी अभ्यास करायला २ दिवस लावले. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘चित्र कोणत्या टप्प्यापर्यंत पूर्ण झाले आहे ?’, हे विचारल्यावर त्यांना हे समजले. त्यानंतर त्यांनी आमच्याकडून त्या चित्राचे मूळ कागद घेतले आणि त्यावर ‘अमुक दिवशी हे चित्र दिले होते. ३ दिवसांत ही सेवा पूर्ण केली नाही’, असे लिहिले. त्या वेळी आम्ही चित्र करायला अधिक वेळ दिला आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित कृती केली नाही; म्हणून आम्ही पुष्कळ रडलो. नंतर काही वेळातच श्रीविष्णूने (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) आम्हाला बोलावून त्याच्या दयाळू आणि प्रेमळ तारक रूपाचे दर्शन देऊन ‘चित्र कसे करायला हवे होते ?’, हेही सांगितले. त्यांनी आम्हाला सेवेचे नियोजन करतांना अभ्यास आणि वेळ यांची सांगड घालण्यास शिकवले. (परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णु आहे. असा साधिकेचा वैयक्तिक भाव आहे. – संकलक)
२ इ. प्रयोग करवून घेऊन त्यातून शिकवणे
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला चित्रातील बरेच बारकावे आमच्याकडून प्रयोग करवून घेऊन शिकवले. आम्हाला काही वेळा योग्य उत्तरे देता आली नाही, तर ते वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग करायला सांगायचे. आम्हाला दोन चित्रांकडे पाहून तुलना करता येत नसल्यास पुढील प्रयोग करायला सांगायचे.
१. संगणकाच्या पडद्यावर दोन्ही चित्रे एकमेकांशेजारी ठेवून मन एकाग्र करून प्रयोग करणे
२. हातांचे तळवे चित्रांवर ठेवून हातात जाणवणार्या संवेदनांच्या माध्यमातून उत्तर शोधणे
३. प्रथम एका चित्राकडे पाहून नामजप करणे आणि नंतर दुसर्या चित्राकडे पाहून नामजप करणे, ‘नामजप करतांना मनाला काय जाणवते ?’, यावरून उत्तर शोधणे
४. चित्र वरून खाली पहातांना ‘दृष्टी सहज फिरते कि अडखळते ?’, यावरून ‘कोणत्या चित्रात चांगली स्पंदने आहेत ?’, ते शोधणे
५. त्यांनी आम्हाला ‘मनाला जाणवणार्या आणि बुद्धीने विचार करून मिळालेल्या उत्तरात कसा भेद असतो ?’, हे शिकवले.
२ ई. शिकण्याची आणि जिज्ञासू वृत्ती अन् चिकाटी हे गुण मनावर बिंबवणे
असे त्यांनी ज्यांना जसा जमतो, तसा दोन चित्रांचा अभ्यास करायला शिकवला. आम्हाला प्रयोग करून उत्तर शोधता आले नाही; म्हणून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सोडून दिले, असे कधीच झाले नाही. अगदीच कुठल्याच प्रयोगातून आम्हाला उत्तर मिळाले नाही, तर ते तेथे उपस्थित साधकांना ‘काय वाटते ?’, हे विचारायचे आणि ज्यांनी अचूक ओळखले, त्यांना ‘कसे ओळखले ?’, हे विचारायचे. यातून मला ‘प्रकृतीनुसार साधना वेगळी असते’, हे समजले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकण्याची आणि जिज्ञासू वृत्ती, तसेच चिकाटी हे गुण आमच्या मनावर बिंबवले.
२ उ. इतरांचा विचार करण्यास शिकवणे
आपण कलाकृती केली, म्हणजे आपली सेवा झाली, असे नाही. ‘माहिती सोप्या भाषेत आहे ना ?, चित्र आणि माहिती यांची रचना सुंदर, समान आणि वाचतांना अडचण येणार नाही, अशी आहे ना ?, त्याचा आकार चष्मा असलेल्या किंवा वयस्करांनाही लगेच वाचता येईल, असा आहे ना ?’, या सर्वांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी आम्हाला अभ्यास करायला शिकवले. यातून आम्हाला समष्टीचा विचार करण्याची शिकवण मिळाली.
२ ऊ. आश्रमात राहून सेवा करणारे साधक आणि बाहेर कलाक्षेत्रात
काम करणारे साधक यांना एकमेकांच्या अनुभवाचा लाभ करून घेण्यास सांगणे
आश्रमात रहात नसलेले काही साधक थोडे दिवस आश्रमात येऊन सेवा करायचे. हे साधक अनेक वर्षे बाहेर कलेच्या क्षेत्रात काम करत होते. त्यांनी त्यांच्या कलाकृती दाखवल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले नेहमी त्यांच्या कलाकृतीचे कौतुक करायचे आणि आम्हाला ‘त्यांच्याकडून अमुक भाग शिकून घ्या’, असे सांगायचे. परात्पर गुरु डॉ. आठवले त्या साधकांच्या अनुभवाचा आदर करून ते साधक सांगतील, त्याप्रमाणे आम्हाला कलाकृतीत पालट करायला सांगत. काही साधक कला क्षेत्रातील नसूनही त्यांचा समाजातील लोकांची मानसिकता आणि आवड-निवड यांचा अभ्यास असल्याने परात्पर गुरु डॉ. आठवले साधक काम करत असलेल्या क्षेत्रानुसार त्या त्या साधकाला विचारून घेऊन संकल्पना ठरवायला आणि चित्रात पालट करायला सांगत. कलेची सेवा करणार्या साधकांचा अहं वाढू नये, यासाठी ते साहाय्य होते. परात्पर गुरु डॉ. आठवले त्या साधकांना ‘चित्र सात्त्विकतेच्या दृष्टीने कसे असायला हवे ?’, ते कलेची सेवा करणार्या साधकांना विचारायला सांगत. तेे अशाप्रकारे दोघांचीही शिकण्याची वृत्ती जागृत ठेवायचे आणि एकमेकांच्या अनुभवाचा आदर करण्यास शिकवायचे.
२ ए. साधकामध्ये शरणागत भाव येईपर्यंत चित्रात पालट
सांगत रहाणे आणि शरणागत भाव आल्यावर हसून समाधान व्यक्त करणेे
साधक-कलाकार किंवा बाहेरून आलेले कलाकार यांच्यातील अहं वाढण्याची शक्यता दाट असते. परात्पर गुरु डॉ. आठवले कलाकारांमधील ‘देवाप्रतीचा भाव कसा आहे ?’, हे ओळखून त्यांच्या कलाकृतीत पालट सांगायचे. कलाकार जोपर्यंत शरणागत स्थितीत राहून कलाकृती करत नाही, तोपर्यंत परात्पर गुरु डॉ. आठवले त्यात वेगवेगळ्या सुधारणा सांगायचे. शेवटी त्या साधकाने देवाला शरण जाऊन ‘देवा, तूच करवून घे’, अशा स्थितीत राहून सेवा केल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले गोड हसून ‘झाले’ असे म्हणायचे. त्या वेळी वाटायचेे, ‘इतके सोपे होते. केवळ शरणच जायचे होते. मग इतका वेळ का लागला ?’, असे त्यांना म्हणायचे होते.’
२ ऐ. कलाकृती आकर्षक दिसण्यापेक्षा सात्त्विक होण्याला महत्त्व देण्यास शिकवणे
काही वर्षांपूर्वी सनातन उदबत्तीच्या बांधणीची खोकी बनवायची होती. ‘या उदबत्त्या बाहेरच्या दुकानांमध्ये वितरणासाठी ठेवणार आहोत’, असे दायित्व असलेल्या साधिकेने सांगितले. तेव्हा आम्ही बाहेर अधिक विक्री होणार्या उदबत्तीची पाकिटे शोधून त्यांचे रंग आणि त्यावरील कलाकृती पाहिल्या. त्याविषयी आम्ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांना सांगितले आणि काही पाकिटे दाखवून ‘आपणही तसे करायचे का ?’, असे त्यांना विचारले. त्यावर त्यांनी सांगितले, ‘‘वेष्टन पाहून लोकांनी उदबत्त्या घ्याव्यात, यासाठी वेष्टने आकर्षक करणे, हा आपला हेतू नाही. सनातनच्या उत्पादनांमुळे समाजात सात्त्विकता निर्माण व्हायला हवी. समाजातील सात्त्विक व्यक्ती आपोआप सनातनच्या उत्पादनांकडे ओढल्या जातील. साधकांनी आदर्श कलाकृती करायची आहे आणि सात्त्विकतेच्या संदर्भात तडजोड करायला नको.’’ ‘आमची कलेच्या माध्यमातून साधना होण्यासाठी ‘कलाकृतीतून चैतन्य, भाव आणि आनंद किती प्रमाणात जाणवतो ?’, हेच आमचे प्रमाणपत्र असेल. ते बाह्यांगाने कसे दिसते ?, याला महत्त्व नाही’, हे त्यांनी आमच्या मनावर बिंबवले.
२ ओ. ‘क्षमतेबाहेरचे करण्यासाठी शरणागती पत्करल्यावर
परात्पर गुरु डॉ. आठवले खाऊ देतात’, हे लक्षात आणून देणारा प्रसंग
दोन साधिका मेंदीच्या ग्रंथाची सेवा करत होत्या. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांना नक्षी अजून सात्त्विक होण्यासाठी त्यात पालट करण्यास सांगितले. साधिकांनी त्यांना २ – ३ वेळा पालट करून दाखवले; पण ‘अजून नक्षी सात्त्विक वाटत नाही’, असे सांगून त्यावर त्यांनी अजून विचार करण्यास सांगितले. त्या वेळी त्या साधिकांनी ‘काय करायला हवे ?’, असे मला विचारले. मी त्यांना काही पालट सुचवले. साधिकांनी नक्षीत पालट करून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दाखवल्यावर त्यांनी साधिकांना ‘आता छान झाले. खाऊ घ्या. इतके चांगले कुणी केले ?’, असे विचारले. साधिकांनी माझे नाव सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘तिला नको खाऊ द्यायला. तिच्याकडून हे अपेक्षितच आहे.’’ २ वेळा वेगवेगळ्या सेवांमध्ये त्यांनी असे सांगितले. त्या वेळी मला शिकायला मिळाले, ‘आपल्या क्षमतेबाहेरचे करण्यासाठी आपण शरणागती पत्करतो. त्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले आपल्याला खाऊ देतात.’ त्या वेळी लक्षात आले, ‘आपल्याला आपली क्षमता ओळखता येत नाही. त्याविषयी केवळ देवच सांगू शकतो.’ आपली पूर्ण क्षमता न वापरताच ‘आपण पुष्कळ करतो’, असे आपल्याला वाटत असते. ते कळल्यावरच आपल्याला जाणीव होते की, आपल्याला देवासाठी आणि देवाचे साहाय्य घेऊनच आपली क्षमता वाढवायची आहे.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सर्वज्ञता !
३ अ २. आणखी ३ प्रकारची वलये काढल्यावर पू. गाडगीळकाकांनी ‘यातीलच एक निवडा आणि देवाला प्रार्थना करा’, असे सांगणे, त्याप्रमाणे एक वलय निवडल्यावर अपेक्षित असे होणे : स्मरणिकेच्या मुखपृष्ठासाठी मी आधी ३ प्रकारची वलये केली; पण मनाचे समाधान झाले नाही. मग परत ३ प्रकारची वलये केली. ‘त्यात कुठलेतरी एक झाले आहे’, असे वाटले. मी प्रत्येक चित्र करतांना देवाला कळवळून प्रार्थना करत होते. त्याच क्षणी तेथे पू. गाडगीळकाका आले. त्यांनी मला सेवेविषयी विचारले. त्या वेळी मी त्यांना सर्व सांगितले. त्यांनी शेवटचे ३ भाग पाहून म्हणाले, ‘‘त्यांना जे हवे आहे, ते यात आता यायला लागले आहे. तुमचे योग्य दिशेने चालू आहे. यातलेच एक निवडा आणि देवाला विचारा.’’ त्याप्रमाणे मी त्या ३ मधले १ निवडून ते मोठे करून पहात होते. तेवढ्यात परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले, ‘‘हां, झाले ! असेच हवे होते.’’
३ अ ३. ‘भाविनीने पुष्कळ मेहनत घेतली आहे’, असे म्हणणे आणि ‘शरणागतभाव निर्माण होण्यासाठी पुष्कळ मेहनत घेतली आहे’, असेच त्यांना म्हणायचे असेल’, असे लक्षात येणे : काही दिवसांनी स्मरणिका पहाण्यात आल्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले, ‘‘भाविनीला दाखवा. तिने पुष्कळ मेहनत घेतली आहे.’’ त्या वेळी मला वाटले, ‘मी पुष्कळ वेळ देऊन काही केले नव्हते. त्यामुळे ‘शरणागतभाव निर्माण होण्यासाठी पुष्कळ मेहनत घेतली आहे’, असेच त्यांना म्हणायचे असेल’, असे माझ्या लक्षात आले. ‘माझ्या मनात काय चालू आहे ?’, हे त्यांना सर्वच ज्ञात होते.
३ आ. मनातील विचार न सांगताच समजणारे मनकवडे परात्पर गुरु डॉ. आठवले !
मी ‘शंकरा’ वाहिनीला दिल्या जाणार्या धर्मसत्संगासाठी सूक्ष्म चित्रांची सेवा करत होते. त्यामध्ये अनेकदा शेवटच्या क्षणापर्यंत संहितेत पालट व्हायचे आणि ते सत्संगाचे ‘व्हिडिओ’ त्या त्या दिवशीच द्यावे लागत असे. माझे जवळजवळ प्रत्येक रात्री जागरण होत असे आणि मी लवकरही उठत असे. ‘साधक नवीन असल्याने त्यांची संहिता लवकर अंतिम होत नाही’, असे वाटून मला ‘साधकांची चूक आहे’, असे कधी वाटले नाही. एका रात्री मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आत्मनिवेदनस्वरूप पत्र लिहिले आणि माझ्या सेवेच्या ठिकाणी मी ठेवत असलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राजवळ ठेवले. त्यात ‘मला जमत नाही. तुम्हीच आता माझ्याकडून तुमची सेवा करवून घ्या. मी दमले आहे’, अशा प्रकारचे लिखाण होते. जवळजवळ २ घंट्यांनी संबंधित एक साधिका माझ्याकडे आल्या. त्यांनी मला विचारले, ‘‘तुझे फार जागरण होते का ? परात्पर गुरु डॉ. आठवले मला म्हणाले, ‘‘भाविनीचे फार जागरण होते का ?’, ते पहा आणि ‘संहिता लिहिणार्या साधकांचे नियोजन कुठे चुकते ?’, हेही पहा.’’ त्या वेळी माझा भाव दाटून आला. काही न सांगता त्यांना सर्वच कळले होते. मी कोणत्याही साधकाला माझ्या मनाची स्थिती सांगितली नव्हती. मी साधिकेला ती चिठ्ठी दाखवली. तिलाही आश्चर्य वाटले की, त्यात जे लिहिले होते, तसेच त्यांनी सर्व विचारले होते.
३ इ. प्रत्यक्ष काहीही न बोलता मानसरूपात अर्पण केलेले विचार परात्पर गुरु डॉ.
आठवले यांच्या चरणी पोहोचल्याची साक्ष त्यांनी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून देणे
असे माझ्यासमवेत नंतरही २ – ३ वेळा झाले. मी त्यांना काहीच न सांगता ते माझ्या मनातले ओळखायचे आणि मला विचारायचे. नंतर ‘त्यावरील उपाययोजना योग्य आहे का ?’, हे तेच मला सांगायचे. ‘मानसरूपात त्यांना अर्पण केलेले विचार त्यांच्या चरणी पोहोचल्याची साक्ष (संकेत) ते कुठल्या न कुठल्या माध्यमातून देतात’, हे मी प्रत्येक वेळी अनुभवले.
४. अल्पसंतुष्ट न रहाता साधनेतील पुढचे पुढचे ध्येय देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
एकदा मी सेवा करतांना मनातल्या मनात हसत होते. त्यांनी मला विचारले, ‘‘काय झाले हसायला ?’’ मी म्हणाले, ‘‘तुम्हाला पाहून आणि आवाज ऐकून माझी भावजागृती झाली. तेच आठवून मी हसत होते.’’ यावर ते म्हणाले, ‘‘तुला आता पुढच्या टप्प्याला जायचे आहे. मला बघून आणि माझा आवाज ऐकून भावजागृती झाली, असे नको. मी नसतांनाही तुला निर्गुण तत्त्वाशी जोडले जाऊन भावजागृती करायची आहे पू. फडकेआजींप्रमाणे !’’ (तेव्हा केवळ पू. फडकेआजीच संत होत्या.)
५. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘परात्पर गुरु डॉ. आठवले, तुम्ही आम्हाला कलेच्या माध्यमातून ईश्वराकडे नेत आहात. ही प्रक्रिया तुम्ही इतकी सहजतेने करवून घेतली आहे की, आम्हाला त्याची जाणीवही झाली नाही. त्यामुळे आमच्याकडून कृतज्ञताही व्यक्त झाली नाही. आज हे लिखाण करतांना मला त्याची जाणीव झाली. याविषयी मी तुमच्या चरणी क्षमायाचना करते आणि हे कृतज्ञतारूपी पुष्प अर्पण करते. ‘तुम्ही जसे आम्हाला घडवले, तशी जडणघडण अखंड चालू राहून कलेतील ज्ञानाच्या माध्यमातून अनेक पिढ्यांत कलाकार घडावेत आणि त्यांचा उद्धार व्हावा’, हीच तुमच्या चरणी प्रार्थना !’
– कु. भाविनी कपाडिया, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.