नम्र, निरागस आणि साधकांवर प्रेम करणार्‍या सोलापूर येथील श्रीमती नंदिनी नारायण मंगळवेढेकरआजी

पू. (श्रीमती) नंदिनी मंगळवेढेकर

‘साधनेत प्रगती झाल्यावर वयाचा विशेष परिणाम शरिरावर होत नाही. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे मंगळवेढेकरआजी ! त्यांच्या चेहर्‍याचे छायाचित्र पाहून ‘त्यांचे वय ५५ वर्षे असावे’, असे वाटले. प्रत्यक्षात त्यांचे वय ७७ वर्षे आहे. वयाच्या संदर्भात मला हरवल्याबद्दल आजींचे अभिनंदन !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. नम्रता

‘सर्व साधक आजींपेक्षा वयाने पुष्कळच लहान आहेत, तरीही आजी त्यांच्याशी फार आदराने, नम्रतेने आणि प्रेमाने बोलतात.

 

२. प्रेमभाव

२ अ. साधकांची काळजी घेणे

एकदा आम्ही सेवाकेंद्राच्या स्वच्छतेची सेवा करण्यासाठी तेथे थांबलो होतो. तेव्हा आजींना चालताही येत नव्हते, तरी ‘साधक जेवले आहेत का ?’, हे विचारण्यासाठी त्या आल्या आणि प्रेमाने म्हणाल्या, ‘‘तुम्ही सकाळपासून किती करत आहात ! मी तुमच्यासाठी खिचडी करू का ? सकाळपासून तुम्ही सेवा करून दमला असाल.’’ आजींच्या प्रेमळ बोलण्याने सर्वांना कृतज्ञता वाटली. त्या प्रत्येक साधकाची अशी काळजी घेतात.

२ आ. साधकांची प्रेमाने विचारपूस करणे

सत्संग नसला, तरी साधक आलेले पाहून त्यांना फार आनंद होतो. त्या सर्व साधकांना प्रेम देतात. शरिरात शक्ती नसेल किंवा पुष्कळ थकवा असला, तरीही भिंतीला धरून येऊन त्या साधकांची प्रेमाने विचारपूस करतात. आजींकडे गेल्यावर त्या म्हणतात, ‘‘तुम्ही सर्व साधक माझ्याजवळ इथेच रहात जा.’’ त्यांच्यातील प्रेमाने आमची भावजागृती होतेे.

२ इ. साधकांच्या मुलांना प्रेमाने बोलावून खाऊ देणे

सेवाकेंद्रात बैठक चालू असतांना सौ. वर्षा कुलकर्णी यांचा लहान मुलगा आलेला दिसल्यास त्याला बोलावून त्या खाऊ देतात. जेवणाची वेळ झालेली असेल आणि बैठक संपली नसेल, तर त्या त्याला जेवणाविषयी विचारतात.

२ ई. आजी त्यांची सून, मुले आणि नातवंडे यांच्याशीही पुष्कळ प्रेमाने वागतात.

 

३. सत्संगाची ओढ

आजींच्या घरातील दोन खोल्या सेवाकेंद्रासाठी दिल्या आहेत. तेथे आठवड्याचे भावसत्संग आणि स्वभावदोष निर्मूलन सत्संग होतात. त्या सत्संगाला आजी स्वतःहून येऊन बसतात. पाठीचे दुखणेे असूनही त्या पूर्ण सत्संग ऐकतात.

 

४. साधनेची तळमळ

आजींना भेटल्यावर त्या म्हणतात, ‘‘मला ‘साधनेसाठी काय प्रयत्न करायचे ?’, ते सांगा. तुम्ही किती प्रयत्न करत असता. माझ्याकडून काहीच प्रयत्न होत नाहीत.’’

 

५. चूक झाल्यावर क्षमायाचना करणे

प्रतिदिन सेवाकेंद्रात गेल्यावर आजींना भेटणे आणि त्यांच्याशी बोलणे होते. आज त्यांनी मला विचारले, ‘‘तूच दीपाली का ?’’ मी ‘हो’ म्हणाल्यावर त्या हात धरून म्हणाल्या, ‘‘क्षमा कर. मी तुला नेहमी भेटते; पण मी तुझे नावच विचारले नाही. नाव विचारायला हवे होते.’’ त्या मोठ्या असूनही लहानांची क्षमा मागतात.

 

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील दृढ श्रद्धा

आजींची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा आहे. त्यांच्या मोठ्या मुलाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या दुसर्‍या मुलाचाही मृत्यू झाला, तरी त्या पुष्कळ स्थिर होत्या.

 

७. भाव

अ. त्यांच्यामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञताभाव आहे. त्यामुळे त्यांच्याशी बोलतांना आपलाही कृतज्ञताभाव जागृत होतो.

आ. आजींना कधीही भेटले की, त्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी बोलतात. त्या सतत त्यांच्याशी बोलत असतात.

इ. श्रीमती साखरेकाकू यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्यावर त्यांचा सत्कार सोहळा चालू असतांना आजीही तेथे होत्या. त्यांना विचारले, ‘‘आजी तुम्हाला काही सांगायचे आहे का ?’’ तेव्हा त्या हात जोडून म्हणाल्या, ‘‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे सर्वच साधक ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाल्यासारखेच आहेत. सर्वच जण किती सेवा करत असतात ! सर्वांचाच किती त्याग आहे !! ‘ते सगळ्यांनाच पुढे घेऊन गेल्याविना रहाणार नाहीत’, असे मला वाटते.’’

 

८. आजींविषयी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

अ. आजी बाळासारख्या वाटतात. त्यांचे हसणेे निरागस, निर्मळ वाटते.

आ. त्यांची त्वचा लोण्यासारखी मऊ वाटते.

इ. त्यांचा स्पर्श दैवी जाणवतो.

ई. त्यांच्या तोंडवळ्यावर पुष्कळ तेज असून ‘ते वातावरणात पसरत आहे’, असे जाणवते.’

– कु. दीपाली मतकर आणि सौ. उल्का जठार, सोलापूर

 

आजींना भेटण्यासाठी पाय आपोआप त्यांच्या घराकडे वळणे
आणि आजींना बघताच ‘त्या संत झाल्या असणार’, असा विचार मनात येणे

‘२०.२.२०१७ या दिवशी सेवाकेंद्रात, म्हणजे आजींच्या घरी धर्माभिमान्यांसाठी मार्गदर्शन ठेवले होते. त्यासाठी मी गेले होते. मार्गदर्शन झाल्यानंतर मला दुसर्‍या एका ठिकाणी जायचे होते; म्हणून गाडीत बसण्यासाठी निघत होते, तेवढ्यात आपोआपच माझे पाय आजींच्या घराकडे वळले. मनात विचार आला, ‘आजींना भेटूनच जाऊया.’ आजींना बघताच माझ्या मनात ‘आजी संत झाल्या असणार’, असा विचार आला. ‘आजींकडे बघतच रहावे’, असे वाटत होते. त्यांच्या तोंडवळ्यावर पुष्कळच चैतन्य जाणवत होते.’ – (सद्गुरु) कु. स्वाती खाडये

Leave a Comment