विश्वामित्रांची प्रतिभा लाभलेले पू. गोळवलकर गुरुजी
गांधी-नेहरूंनी ही प्राचीन भूमी निर्हिंदू करण्याची प्रतिज्ञा केली. त्याच वेळी विश्वामित्राच्या प्रतिभेने आणि जिद्दीने हिंदूंची नवी सृष्टी निर्माण करण्याचा विडा उचलून माधव गोळवलकर नावाचा एक तपस्वी संन्यासी या देशात अवतीर्ण झाला, याची दखल किती साहित्यिकांनी घेतली ? – श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.
(संदर्भ : ‘साप्ताहिक राष्ट्रपर्व’, २७.१२.२०१०)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक पू. गोळवलकर गुुरुजी यांनी राजधानी देहलीतून प्रसिद्ध होणार्या ‘मदरलॅण्ड’ या संघविचारांच्या नियतकालिकाशी केलेल्या वार्तालापाचा सारांश पुढे देत आहोत.
१. राष्ट्र शक्तीशाली आणि संघटित रहाण्यासाठी समरसता आवश्यक !
‘समरसता (हार्मनी) आणि एकरूपता (युनिफॉर्मिटी) या २ वेगवगळ्या गोष्टी आहेत. एकविधता आवश्यक नाही. भारतात सदैव अपरिमित अशा विविधता नांदत आल्या आहेत. तरीही आपले राष्ट्र दीर्घकाळापर्यंत अत्यंत शक्तीशाली आणि संघटित राहिलेले आहे. एकतेसाठी एकविधता नव्हे, तर समरसता आवश्यक आहे.
२. काँग्रेसची मनोवृत्ती
मुसलमानांना राजकारण खेळणार्यांनी बिघडवले आहे. ‘मुस्लिम लीग’ला केरळमध्ये पुन्हा जिवंत करून देशभर मुसलमान सांप्रदायिकता वाढवणारी काँग्रेसच आहे.
३. कायदा आणि शास्त्र यांपेक्षा रूढी अधिक प्रभावी असणे
‘हिंदु कोड बील’, हे राष्ट्रीय एकता आणि एकसूत्रता यांच्या दृष्टीने पूर्णपणे अनावश्यक आहे’, असे मी निश्चितपणे मानतो. युगानुयुगांपासून आपल्या येथे असंख्य संहिता चालत आल्या आहेत. आतापर्यंत केरळमध्ये ‘मातृसत्ताक’ पद्धती होती. त्यात वाईट काय होते ? प्राचीन आणि आधुनिक अशा सर्व विधीशास्त्रज्ञांचे याविषयी एकमत आहे की, कायद्यापेक्षा रूढी अधिक प्रभावी असतात आणि असेच असावयास हवे. ‘शास्त्रात् रूढिर्बलीयसी ।’ म्हणजे ‘रूढी शास्त्रापेक्षा अधिक प्रभावी असते.’ (हे सूत्र केवळ धर्मसंमत रूढींना लागू पडते. – संकलक) तसेच रूढी ही स्थानिक किंवा समूह संहिता असते. स्थानिक रीतीरिवाज किंवा संहिता यांना सर्वच समाजांकडून मान्यता मिळालेली आहे.
४. विविधता राष्ट्राच्या एकतेला साहाय्यकारी असली पाहिजे
एकविधता ही राष्ट्राच्या विनाशाची सूचक आहे. प्रकृतीला (निसर्गाला) एकविधता मान्य नाही; पण हे लक्षात ठेवले पाहिजे की, या विविधता राष्ट्राच्या एकतेला साहाय्यकारी ठरल्या पाहिजेत. राष्ट्रीय एकतेच्या मार्गात त्या अडसर बनता उपयोगी नाही.’
संदर्भ : ‘दैनिक लोकसत्ता’, २५.७.२००३