१ सहस्र साधकांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा
टप्पा गाठणे, ही सत्त्वगुणी समाजनिर्मितीची प्रचीती !
‘साधना करणार्यांसाठी ‘गुरुकृपा हि केवलं शिष्यपरममङ्गलम् ।’, म्हणजे ‘शिष्याचे परममंगल, म्हणजे मोक्षप्राप्ती ही केवळ गुरुकृपेनेच होऊ शकते.’ गुरुकृपा संपादन करणे, ही आध्यात्मिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे. सनातनचे आणि सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्या अन्य संघटनांचे साधक ‘गुरुकृपायोगानुसार साधने’चा अंगीकार करतात. त्यांचे भाग्य म्हणजे त्यांना साधनेसाठी परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे मार्गदर्शन लाभते आणि ‘स्वतःची साधनेची वाटचाल कुठपर्यंत आली’, हेही कळते. त्यामुळे त्यांना गुरूंप्रती कृतज्ञता वाटते.
सनातनच्या मार्गदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात केवळ व्यष्टी साधना नाही, तर समष्टी साधनाही आहे. म्हणजेच राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षाचाही विचार आहे. असा व्यापक विचार असल्यानेच आणि हिंदु राष्ट्राची स्थापना (सनातन धर्म राज्याची स्थापना) हे ध्येय असल्याने ईश्वराचा कृपाशीर्वाद गुरुकृपेने भरभरून मिळतो. हेच साधकांची जलद उन्नती होण्याचे खरे गमक आहे. यातील पहिला महत्त्वपूर्ण टप्पा म्हणजे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणे होय. आज १ सहस्र साधकांनी हा टप्पा गाठल्यामुळे परात्पर गुरुमाऊलींनी सांगितलेल्या हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या ध्येयाच्या दिशेने पहिले महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्यामागील महत्त्व वेळोवेळी सनातनचे ग्रंथ आणि सनातन प्रभात यांतून विशद केले आहे. यात ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्याचे महत्त्व, ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्यासाठी करावयाचे प्रयत्न, ६१ टक्के पातळी गाठल्यानंतर पुढील आध्यात्मिक उन्नतीसाठी करायचे प्रयत्न आणि ६१ टक्के पातळी गाठू न शकलेल्या साधकांनी निराश न होता लक्षात घ्यायचे दृष्टीकोन, यांविषयी आतापर्यंत लिखाण करून परात्पर गुरुमाऊलींनी सर्वांनाच योग्य दिशा दिली आहे. परात्पर गुरुमाऊलींनी आतापर्यंत दिलेले बहुमूल्य दृष्टीकोन सर्वांनाच दिशा देतील आणि त्यांना अपेक्षित असलेले हिंदु राष्ट्राचे स्वप्न लवकरच सत्यात येईल, याची यातून प्रचीतीच मिळते.’
साधकांची उन्नती उद्घोषित करण्याचे प्रसंग वारंवार घडावेत !
‘६१ टक्के पातळीचे साधक उद्घोषित करण्याचे प्रसंग वारंवार घडत आहेत; कारण सनातनची शिकवण योग्य आहे आणि साधकही चांगले प्रयत्न करत आहेत. खरेतर आतासारख्या आपत्काळात साधना करणे कठीण असते; पण साधक चिकाटीने प्रयत्न करत असल्याने ईश्वरही त्यांना भरभरून देत आहे. साधकांनी यापुढेही असेच चांगले प्रयत्न करून लवकरात लवकर संतपद गाठावे. ‘पुढील काळातही साधकांची उन्नती उद्घोषित करण्याचे प्रसंग वारंवार घडावेत’, ही श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (वर्ष २०१२)
६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठलेल्या तरुण साधकांनो, ३ – ४ वर्षांत संत व्हा !
‘६१ टक्के आध्यात्मिक स्तर गाठलेल्या तरुण साधकांनी ३ – ४ वर्षांत संत होऊन भारतात सर्वत्र प्रचाराला जाणे अपेक्षित आहे. त्यांच्यामुळे सर्वत्र वाढलेले रज-तमाचे प्रमाण कमी होण्यास साहाय्य होईल. त्यामुळे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांचे त्रास कमी होतील आणि हिंदु राष्ट्राची स्थापना करणे सुलभ होईल.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (वर्ष २०१२)
इतर संप्रदायांच्या तुलनेत सनातन संस्थेच्या साधकांची जलद प्रगती होण्याचे कारण
‘अध्यात्मात ‘व्यक्ती तितक्या प्रकृती तितके साधनामार्ग’, हा एक सिद्धांत आहे; म्हणूनच ज्याला त्याला त्याच्या मार्गानुसार साधनेची दिशा मिळावी; म्हणून भगवान श्रीकृष्णाने गीतेत कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तीयोग, असे विविध योगमार्ग सांगितले आहेत. एखाद्या आधुनिक वैद्यांकडे (डॉक्टरांकडे) ज्याप्रमाणे विविध रोगांची औषधे असतात, तसेच हे आहे. एखाद्या आधुनिक वैद्यांकडे एकच औषध असले आणि तो येणार्या प्रत्येक रुग्णाला तेच औषध देत असला, तर त्याला ‘आधुनिक वैद्य’ म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे एकच साधनामार्ग सांगणारे विविध संप्रदाय साधनेसंदर्भात योग्य मार्गदर्शन करू शकत नाहीत; म्हणून त्यांच्या भक्तांची विशेष प्रगती होतांना दिसत नाही. त्यामुळे बहुतेक ठिकाणी गुरूंच्या देहत्यागानंतर त्यांच्या पादुकांची स्थापना करावी लागते. याउलट सनातन संस्था प्रत्येक साधकाला त्याच्या प्रकृतीप्रमाणे निरनिराळी साधना सांगते. त्यामुळे साधकांची जलद प्रगती होतांना दिसते. त्यामुळेच आतापर्यंत १ सहस्र साधक ६१ टक्क्यांहून अधिक पातळीचे झाले आहेत आणि ६५ साधक संत झाले आहेत.’
-(परात्पर गुरु) डॉ. आठवले