‘भारतात सूर्याची अनेक मंदिरे आहेत. त्यातील कोणार्कचे जगप्रसिद्ध असे सूर्यमंदिर सुपरिचित आहे. असेच एक कलात्मक मंदिर बिहारच्या औरंगाबाद येथील देव येथेही आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे देशातील सर्व सूर्यमंदिरे पूर्वाभिमुख असतांना सूर्याचे हे एकमेव मंदिर पश्चिमाभिमुख आहे. १०० फूट उंचीचे हे सूर्यमंदिर सहस्रो वर्षे पुरातन असल्याचे सांगितले जाते. कोणार्क मंदिराप्रमाणेच येथेही सूर्यरथ आहे. या मंदिरातील ७ रथांवर दगडांत सुंदर कोरीवकाम आणि शिल्पे कोरण्यात आली आहेत. काळ्या दगडांमध्ये उगवता, मध्यान्हीचा आणि मावळता सूर्य यांच्या अप्रतिम प्रतिमा कोरल्या आहेत. या मंदिराचे शिल्प ओडिशाच्या जगन्नाथ मंदिराशी साधर्म्य दर्शवते.
या मंदिराचा उल्लेख सूर्यपुराणात दिसून येतो. त्यातील कथेनुसार या मंदिराची लूट करण्यासाठी लुटारूंची एक टोळी आली होती. तेव्हा मंदिरातील पुजार्यांनी ‘मंदिर तोडू नका’, अशी विनवणी लुटारूंना केली. लुटारूंच्या पुढार्याने ‘या मंदिरात खरोखरच देव असेल, तर त्याने त्याच्या शक्तीचा प्रत्यय द्यावा. एका रात्रीत या मंदिराचे तोंड पूर्वेकडून पश्चिमेकडे गेले, तर मंदिर तोडले जाणार नाही’, असे तो म्हणाला. त्यानंतर पुजार्यांनी रात्रभर देवाची अत्यंत तळमळीने आराधना केली आणि आश्चर्य म्हणजे दिवस उजाडला, तेव्हा हे मंदिर पश्चिमाभिमुख झाले होते. परिणामी लुटारूंनी मंदिर लुटले नाही.’