घराला आग लागण्याच्या कठीण प्रसंगात भगवंताने पदोपदी साहाय्य केल्याची पुणे येथील कर्वे कुटुंबियांनी घेतलेली अनुभूती !

हे श्रीकृष्णा, तुझी पदोपदी आठवण रहाण्यासाठी, प्रत्येक प्रसंगात आणि प्रत्येक क्षणी स्थिर रहाण्यासाठी तूच आमच्याकडून प्रयत्न करवून घेतलेस. ते तूच शब्दबद्ध करवून घे, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.

श्री. प्रवीण कर्वे
सौ. कल्याणी कर्वे

 

१. पुण्यात घेतलेल्या नवीन घराच्या
मालकांना धनादेश देऊन कोल्हापूरहून पुण्याला परत येणे

आम्ही पुण्यात घर विकत घेतलेे. या जागेच्या मालक एक वयोवृद्ध आजी आहेत. त्या कोल्हापूरला रहातात. त्यांना प्रवास करणे शक्य नाही. त्यांचे घर विकत घेतलेल्या व्यक्तीला भेटण्याची त्यांना उत्सुकता होती; म्हणून आम्हीच त्यांना भेटून धनादेश देण्यासाठी १४.२.२०१६ या दिवशी पहाटे पुण्याहून निघून कोल्हापूरला गेलो होतो. आजींना भेटून धनादेश दिल्यानंतर श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेऊन आम्ही परत निघालो आणि रात्री ८ वाजता पुण्याला घरी परत आलो.

 

२. घरी पोचताच वडिलांना समवेत घेऊन आहे त्या कपड्यांवर बारशाला जाणे

प्रकृती अस्वास्थ्यामुळे माझे वडील २ दिवस आमच्याकडेच होते, तर प.पू. कर्वेगुरुजी ४ दिवस वास्तव्यास होते. रात्री पूजा झाल्यावर ते दुसरीकडे जाण्यासाठी निघाले. त्याच दिवशी एके ठिकाणी आम्हाला बारशाचे बोलावणे होते. प.पू. कर्वेगुरुजी निघाल्यानंतर तुम्ही कधी येणार ? आम्ही वाट पहात आहोत, असा बारशाच्या ठिकाणाहून निरोप आला. त्या वेळी माझे वडील मी घरीच थांबतो. तुम्ही जाऊन या, असे सांगत असूनही आम्ही त्यांंना समवेत घेऊन आहेत त्या कपड्यांवर जायला निघालो.

 

३. बारशाच्या ठिकाणी पोचल्यावर १० मिनिटांतच घराला आग लागल्याचा निरोप येणे

बारशाच्या ठिकाणी पोचल्यावर १० मिनिटांतच आमच्या शेजार्‍यांचा मला दूरभाषवरून निरोप आला, आहात तिथून तात्काळ घरी या. तुमच्या घराला आग लागली आहे. हा इतका अनपेक्षित धक्का होता की, मी काय ऐकत आहे ?, हे क्षणभर खरेच वाटले नाही. पहिलाच घास घेतलेले हातातले ताट तसेच ठेवले आणि यजमानांना लगेच घरी निघायला सांगितले. आम्ही पळतच गाडीपाशी गेलो. काय झाले आहे ?, हे आकलन झाल्यावर मी यजमानांना शांतपणे निरोप सांगितला आणि स्थिर रहायला सांगितले.

 

४. घराकडे परत येतांना यजमानांना सकारात्मक
विचार देऊन स्थिर करता येणे ही गुरुकृपा असल्याचे जाणवणे

घराकडे परत येतांना गाडीत आम्ही मोठ्याने नामजप आणि जयघोष करत होतो. माझ्या यजमानांना मात्र हे कसे काय झाले असेल ? आपल्यामुळे इतरांना त्रास होईल का ? त्यांची काही हानी तर झाली नसेल ना ?, अशा विचारांनी अस्वस्थ वाटू लागले. त्या वेळी त्यांना सकारात्मक विचार देऊन स्थिर करता आले. आपण सर्व जण इथे सुरक्षित आहोत ना ? घरातील सर्वच वस्तू जळून गेल्या, तरी देवाने आपल्याला व्यवस्थित ठेवले आहे. ही केवढी मोठी देवाची कृपाच आहे ! घर, वस्तू सर्व परत मिळवू शकतो; मात्र आपल्या कुणाला काहीच इजा होऊ नये, याची किती काळजी घेतली आहे भगवंताने !, असे मी त्यांना पुनःपुन्हा सांगत राहिले. खरेतर माझ्या मनातही मधूनच काय झाले असेल ?, असे विचार येत होते; पण भगवंतानेच यजमानांना सांगण्यासाठी माझ्या तोंडून सर्व बोलवून घेतले. एवढा मोठा प्रसंग घडत असतांना घरी कुणीच नसणे, ही भगवंताची लीला नाहीतर अजून काय ?

 

५. आग लागल्याच्या ठिकाणची स्थिती आणि देवाची वेळोवेळी अनुभवलेली कृपा !

५ अ. अग्नीशमन दलाच्या २ गाड्यांनी आग विझवणे आणि या कालावधीत देवाने शांत अन् स्थिर ठेवणे

घराकडे परतत असतांना वाटेतच घराचे कुलूप तोडू का ?, असा आमच्या शेजार्‍यांंचा दूरभाष आला. त्यांना हो म्हणून सांगितले. घरी पोचलो, तेव्हा घराजवळ बघ्यांची पुष्कळ गर्दी झाली होती. अग्नीशमन दलाच्या २ गाड्या आल्या होत्या. आग विझवण्याचे काम चालू होते. साधारण दोन-अडीच घंट्यांनी आग आटोक्यात आली. त्या कालावधीत देवाने आम्हाला शांत आणि स्थिरच ठेवले. मनात कोणतीही प्रतिक्रिया अथवा कुणाविषयी राग येऊ दिला नाही. यजमानांना त्यांचा मोठा चुलत भाऊ (प.पू. वसंत (अण्णा) कर्वे यांचे चिरंजीव श्री. आनंद कर्वे) आणि वहिनी भेटले. त्या वेळी ते काही वेळ हळवे आणि भावुक झाले. नंतर मात्र त्यांना परिस्थिती स्वीकारता आली. हे सगळे होत असतांना मी मात्र त्रयस्थाप्रमाणे सर्व पहात असल्याचे मला जाणवले. त्यामुळे आपल्याला काहीच कसे वाटत नाही ?, असाही माझ्या मनात विचार येऊन गेला.

(काहीच न वाटणे, प्रसंगाकडे साक्षीभावाने पहाता आले, हे आध्यात्मिक प्रगतीचे लक्षण आहे. – संकलक)

५ आ. अग्नीशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी बोलावून कपाटातील दागिने आणि अन्य वस्तू काढून देणे

आग आटोक्यात आणल्यानंतर अग्नीशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी मला बोलावले. कपाटातील दागिने अन् अन्य काही वस्तू बाहेर काढून त्यांनी माझ्या ताब्यात दिल्या आणि इतर वेळी अशा प्रसंगामध्ये कोणत्याही नातेवाइकाच्या ताब्यात दिल्या, तरी अशा वस्तू कुठेतरी गहाळ होतात, असे त्यांनी मला सांगितले. देवानेच त्यांना सुबुद्धी देऊन दागिने आणि वस्तू त्यांनी आमच्या ताब्यात देणे, यातून पुन्हा एकदा भगवंताची कृपा आम्ही अनुभवली.

५ इ. प.पू. कर्वेगुरुजी येताच काही घडलेच नाही, असे वाटणे

घरी येतांना प.पू. कर्वेगुरुजींना घडलेल्या प्रसंगाबद्दल दूरभाष करून कळवले होते. त्यामुळे आहे तिथूनच ते परत माघारी आले. त्यांना पाहून मनाला आणखी उभारी आली. काही घडलेच नाही, असे मला वाटू लागले. त्यांच्या पाया पडून तुम्ही केवळ आशीर्वाद द्या, असे म्हटल्यावर त्यांनी सांगितले, देवाचा आशीर्वाद आहेच. वाईटातून नेहमी चांगलेच घडते. त्या क्षणी देवाने मनातील उरले-सुरले विचारही नष्ट केले आणि त्यांच्या माध्यमातून दिलेला आशीर्वादरूपी विचार मनावर कोरला गेला.

५ ई. सर्वत्र पसरलेला अंधार आणि धूर यांतून तिसर्‍या माळ्यावरील
घरात जाऊन प.पू. कर्वेगुरुजींनी देवघरातील देवाला भावपूर्ण नमस्कार करणे

संभाव्य धोका लक्षात घेऊन विद्युत् यंत्रणा बंद केली होती. सर्वत्र अंधार होता. धूर ५ फुटांपर्यंत वरच्या दिशेने पसरला होता. त्यामुळे काहीच दिसत नव्हते. वासही पुष्कळ येत होता. त्या वास्तूतील लोकांना जिन्यावरून खाली येतांना पायर्‍यांवर बसून यावे लागले. प.पू. कर्वेगुरुजी मात्र माझ्या यजमानांसमवेत तिसर्‍या माळ्यावरील आमच्या घरापर्यंत चालत गेले. काही शक्यता लक्षात घेऊन अग्नीशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी घरात सर्वत्र घोट्यापर्यंत पाणी साचवून ठेवले होते. त्या पाण्यातून चालत प.पू. कर्वेगुरुजी देवघर असलेल्या खोलीत गेले आणि त्यांनी देवाला भावपूर्ण नमस्कार केला.

५ उ. अपघातात कुणीही जखमी न होणे आणि कोणाच्याही मनावर आघात न होणे

अपघातात कुणी जखमी झाले असेल किंवा मनावर झालेल्या आघातामुळे कुणी अत्यवस्थ झाले असेल, तर आवश्यकता म्हणून १ रुग्णवाहिका तिथे आली होती. परंतु देवाच्या कृपेने असे काहीच घडले नाही. ही या प्रसंगात पुन्हा ईश्‍वराने आम्हाला दाखवलेली लीला होती.

५ ऊ. वास्तूत उच्चभ्रू लोक रहात असूनही त्यांनी विचारपूस करणे

या वास्तूत सर्व उच्चभ्रू लोक रहातात. असे असूनही सर्व शेजार्‍यांनी आमची विचारपूस केली. एवढ्या रात्री कुठे झोपणार ? आमच्याकडे झोपायला चला, अशी प्रत्येकाने विनंती केली. माझी बहीण सौ. मानसी असलेकर जवळच रहात असल्याने आम्ही रात्री तिच्याकडे झोपायला गेलो आणि सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करण्यासाठी आलो.

५ ए. घटना घडल्यापासून यजमान आणि स्वतः यांनी
त्याविषयी अवाक्षरही न काढणे, ही गुरुदेवांनी केलेली कृपाच !

खोलीतील सर्व साहित्य क्षणात नष्ट झाले. हे समजल्यावरही देवाने आम्हा दोघांना स्थिर ठेवले. एकदाही आमच्याकडून या चुकीचे दायित्व एकमेकांवर ढकलले गेले नाही. आमच्यात या प्रसंगावरून एक क्षणही तणाव निर्माण झाला नाही. ही घटना घडल्यापासून आजपर्यंत आम्ही याविषयी अवाक्षरही काढले नाही. नकारात्मक दिशेने काहीच बोललो नाही. ही गुरुदेवांनी आमच्यावर केलेली मोठी कृपाच होय !

५ ऐ. आग इतर खोल्यांमध्ये न पसरल्याने उर्वरित साहित्य सुरक्षित रहाणे

आग इतर खोल्यांमध्ये पसरली नाही. त्यामुळे मुलांचे कपड्यांचे कपाट, त्यांचे शाळेचे गणवेश, वह्या, पुस्तके, दप्तरे, बैठकीची खोली, स्वयंपाकघर आणि तेथील भांडी अन् सर्व साहित्य, शीतकपाट अन् इतर विद्युत् उपकरणे, २ भरलेले गॅस सिलिंडर्स, धान्य हे सर्व उर्वरित साहित्य सुरक्षित राहिले. ही ईश्‍वराचीच लीला !

५ ओ. गोळा झालेल्या राखेतून काही सोने मिळणे

दुपारपर्यंत १५ ते २० पोती राख गोळा झाली. ती राख माझी बहीण, भाऊ आणि भावजय यांनी ३ – ३ वेळा पडताळून पाहिल्याने त्यात काही सोनेही मिळाले.

 

६. आगीमुळे झालेली हानी

६ अ. आग लागलेल्या खोलीच्या एका भिंतीचा एक थर पडणे आणि अन्य भिंतींना तडे जाणे

संपूर्ण घर आणि बाहेर एका माळ्याच्या जिन्याचा पूर्ण भाग धुराने काळाकुट्ट झाला होता. ज्या खोलीत आग लागली, त्या खोलीच्या भिंतीचा एक थरही पडला होता आणि अन्य भिंतींना तडे गेले होते. त्या खोलीची खिडकी पूर्ण तुटली होती. जाळी वितळून गेली होती.

६ आ. आगीत भस्मसात झालेले साहित्य

काही संतांनी दिलेल्या वस्तू, पूजेचे साहित्य, कपडे, १५ ते २० सहस्र रुपये, कपाट, स्नानगृहाचे दार, घड्याळे, प्लास्टिक साहित्य इत्यादी. कपाटातील काही सोने वितळून गेले, तर काही सोने राखेत गहाळ झाले.

 

७. देवाने अनेकांच्या माध्यमातून केलेले साहाय्य

सकाळपासून दोन्ही दीर आणि जावा, इतर नातेवाईक, साधक, क्लायंटस्, असे अनेक जण भेटण्यासाठी अन् साहाय्यासाठी आले.

७ अ. दैनिक सनातन प्रभातचे विज्ञापनदाते असलेल्या व्यक्तीने आपल्याकडील
कामगारांना आणून स्वच्छता करून देणे आणि आग्रहाने अल्पाहार करायला लावणे

घंटाभराने साधक, नातेवाईक आणि क्लायंटस् यांचे आमची विचारपूस करण्यासाठी दूरभाष येऊ लागले. विचारपूस करतांना प्रत्येकाच्या बोलण्यात आपुलकी, काळजी आणि साहाय्याचा भाग होता. कलाक्षेत्रम् या दुकानाचे मालक श्री. सागर पासकंटी हे दैनिक सनातन प्रभातचे विज्ञापनदाते आणि दादांचे क्लायंट आहेत. आमच्या घराची स्वच्छता करण्यासाठी ते स्वतः त्यांच्या दुकानातील ५ कामगारांना घेऊन आले. स्वच्छता करण्यासाठी आवश्यक असे साहित्यही उपलब्ध नसल्याचे पाहून तेही त्यांनीच विकत आणून दिले आणि कामगारांनी स्वच्छता केली.

आम्ही काही खाल्लेले नाही, हे लक्षात आल्यावर श्री. सागर पासकंटी यांनी अल्पाहार मागवला. पथ्य असल्याचे कळल्यावर पुन्हा दुसरा अल्पाहार मागवला आणि आग्रह करून आधी आम्हाला अल्पाहार करायला लावला. शेजारच्या ताईंनी आम्हा सर्वांना (१४ – १५ जणांना) चहा दिला. त्या वेळी देव संकटांतही त्याची प्रीतीही अनुभवायला देतो, या जाणिवेने मन भरून आले.

७ आ. भगवंताने अनेकांच्या माध्यमातून साहाय्य केल्याने कपड्यांची उणीव न भासणे

१. कपाट पूर्ण जळाल्यामुळे आम्हा दोघांना घालण्यासाठी कपड्याचा एकही जोड शिल्लक राहिला नव्हता. स्वतःला आवश्यकतेनुसारच कपडे घेणारे मधले दीर आणि जाऊ यांनी माझ्यासाठी १ पोशाख अन् यजमानांसाठी २ सदरे आणले. घरून जेवणाचा डबाही आणला.

२. वालिशा या आस्थापनाचे मालक आपले विज्ञापनदातेही आहेत. त्यांनी यजमानांना २ सदरे, २ विजारी आणि मला २ पोशाख दिले.

३. नवीन घराच्या व्यवहारातील मध्यस्थ असलेल्या गृहस्थांनी यजमानांना एक नवीन सदरा आणून दिला.

४. बहिणीने तिचे पोशाख मला वापरायला दिले.

५. श्री. असलेकर यांनी यजमानांना नवीन सदरा, रुमाल दिला. अशा प्रकारे भगवंताने आम्हाला दुसर्‍या दिवसापासून पोशाखाचीही उणीव भासू दिली नाही.

७ इ. घराची डागडुजी करण्यासाठी लागणारे
कारागीर आणि रक्कम देवानेच वेळोवेळी उपलब्ध करून देणे

घराची डागडुजी (दुरुस्ती) करण्यासाठी गवंडी, नळजोडणी करणारे (प्लंबर), जोडारी-कातारी करणारे (वेल्डर), रंगारी, विद्युत् जोडणी करणारे (इलेक्ट्रिशियन), सुतार असे वेगवेगळे कारागीर त्या त्या क्रमाने लागणार होते. देवाच्या कृपेने कुणाकुणाच्या ओळखीने कारागीर मिळत गेले. त्या सर्वांनीही तातडीने कामाला आरंभ करून वेळेत काम पूर्ण केले. या सर्वांना वेळोवेळी साहित्य खरेदीसाठी लागणारी रक्कमही देवानेच उपलब्ध करून दिली. प्रसंग लक्षात घेऊन रंगार्‍याने तर काहीच रक्कम न घेता स्वतःच्या पैशाने रंग आणि इतर साहित्य आणले.

 

८. घरात ८ दिवसांत पुन्हा रहायला आल्यावर सर्वांनी
आश्‍चर्य व्यक्त करणे आणि घर पूर्वीपेक्षा नेटके दिसू लागल्याचे सांगणे

आम्ही रहात असलेल्या वास्तूतील इतर रहिवासी, ओळखीचे, नातेवाईक आणि घटना पाहिलेल्या प्रत्येकाने आश्‍चर्य व्यक्त केले, या जागेत असे काही घडले आहे, हे खरेच वाटत नाही. आता घर पूर्वीपेक्षाही नेटके दिसू लागले आहे. इतक्या अल्पावधीत हे कसे शक्य आहे ? अशा धक्क्यातून सावरायलाच लोकांना ८ दिवस लागतात. त्यापुढे कामाला आरंभ होऊन ते पूर्ण व्हायला १ मास (महिना) तरी लागला असता. तुम्ही तर ८ दिवसांत रहायलाही आलात. तेव्हा प्रत्येक वेळी सतत देवाला कृतज्ञता व्यक्त होत होती.

 

९. मुलांनी स्थिर राहून परिस्थिती स्वीकारणे

या सर्व प्रसंगात आमच्या दोन्ही मुलांनीही (कु. नेहा आणि चि. नीरज यांनी) स्थिर राहून आहे ती परिस्थिती स्वीकारली. ईश्‍वरानेच त्यांना कोणत्याही परिस्थितीत सवलत न घेता दैनंदिन व्यवहार चालू करून प्रसंगावर मात कारायला शिकवले.

 

१०. ईश्‍वराने संकटात एक क्षणही एकटे पडू न देता कुणाच्या
ना कुणाच्या माध्यमातून भार उचलल्यामुळे प्रसंगावर मात करू शकणे

ईश्‍वराने या संकटात आम्हाला एक क्षणही शारीरिक अथवा मानसिक स्तरावर एकटे पडू दिले नाही. पहिल्या दिवशीच्या अगदी स्वच्छतेच्या सेवेपासून ते घर, सामान लागेपर्यंत सर्व सेवेचा भार त्यानेच कुणाच्या ना कुणाच्या माध्यमातून उचलला.

संकटाला सामोरे जाण्यास देवाने दिला आधार ।
त्याला मुले आणि यजमानांची मिळाली साथ ।
अनेकांच्या साहाय्याचा लागला हातभार ।
यामुळे आम्ही प्रसंगावर करू शकलो मात ॥

 

११. प्रत्येक जन्मात आणि प्रत्येक संकटात
रक्षण करणार्‍या गुरुमाऊलीप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

आजपर्यंत आम्हा प्रत्येक साधकाच्या प्रत्येक जन्मात, प्रत्येक संकटात आमचे रक्षण करणारे, आम्ही साधनेत टिकून रहाण्यासाठी अखंड प्रयत्न करणारे, आमचा प्रत्येक अपराध मातेच्या ममतेने पोटात घालून मोठ्या अंतःकरणाने आम्हाला क्षमा करणारे क्षमाशील असे आमचे महान गुरुदेव ! आम्हाला एक क्षणही आपला विसर पडू नये. आपल्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती थिटीच आहे. गुरुमाऊली, तूच आमची जन्मानुजन्मांची माऊली आहेस. आमच्याकडून पुनःपुन्हा होणार्‍या चुकांमधून आम्हाला सतत शिकण्याच्या स्थितीत ठेवा. दोष अन् अहं यांवर मात करण्यासाठी आमच्याकडून सतत प्रयत्न करवून घ्या आणि आम्हा सर्वांना आपल्या चरणी अढळ स्थान द्यावे, अशी आपल्या चरणकमली कळकळीची प्रार्थना !

– सौ. कल्याणी प्रवीण कर्वे, गावठाण, पुणे. (२३.५.२०१६)

(अशा कठीण प्रसंगात स्थिर कसे रहायचे आणि श्रद्धेने त्यावर कशी मात करायची, याचा कर्वे कुटुंबियांनी सर्वांपुढे एक आदर्शच ठेवला आहे. येणार्‍या आपत्काळात सर्वांनाच याचा उपयोग होईल. – संकलक)

 

संतांचे साहित्य आगीच्या भक्षस्थानी न पडता सुरक्षित रहाणे

१. आग लागलेल्या खोलीतील प.पू. कर्वेगुरुजींचे कपडे आणि त्यांच्या वापरातील वस्तू सुरक्षित रहाणे

एवढे होऊनही खिडकीत वाळत घातलेले प.पू. कर्वेगुरुजींचे कपडे मात्र होते तसेच राहिले. खोलीतून दिसणार्‍या बाजूने ते काळे झाले होते आणि बाहेरून, म्हणजे रस्त्याच्या बाजूने ते स्वच्छ पांढरेच होते. प.पू. कर्वेगुरुजी बसत असलेली आणि तसलीच दुसरी अशा सुखासनाच्या (सोफ्याच्या) २ आसंद्या (खुर्च्या), मोठा पलंग, त्यावरील गादी, २ उशा, चादर, पलंगामधील साहित्य, असे सर्व सहजपणे जळण्यायोग्य साहित्य त्याच खोलीत असूनही सुरक्षित राहिले. त्याला काहीच झाले नाही, अन्यथा आग वाढली असती.

२. सुरक्षित राहिलेले साहित्य पाहून येथे देवाची अद्भुत शक्ती कार्यरत असल्याचे सांगणे

आम्ही सुखासन (सोफा) नीट करून घेण्यासाठी नंतर एका व्यक्तीला बोलावले होते. आगीत सुरक्षित राहिलेल्या सर्व वस्तू पाहून त्याला आश्‍चर्याचा धक्का बसला. त्याच्या अनुभवावरून तो म्हणाला, आग लागलेल्या खोलीतच हे लाकडी साहित्य होते, तर दुसर्‍याच क्षणी पेट घेऊन ते पूर्ण जळायला हवे होते. ते सुरक्षित राहिले, हे कसे शक्य आहे ? नक्कीच इथे देवाची अद्भुत शक्ती कार्यरत असणार. त्याविना असे होणे शक्यच नाही. या प्रसंगात आम्हाला आलेली ही आणखी एक अनुभूती !

(यावरून संतांचे माहात्म्य आणि साधना करण्याचे महत्त्व लक्षात येते. साधकांनो, येणार्‍या आपत्काळात रक्षण होण्यासाठी आतापासूनच साधना वाढवा ! – संकलक)

 

देवाने केवळ आध्यात्मिकच नव्हे, तर व्यावहारिक
स्तरावरही सांभाळल्याची प्रचीती देणारे काही अनुभव

१.  सनातन प्रभातच्या विज्ञापनदात्याने काहीही न विचारता अधिकोषात १७ लक्ष रुपये जमा करणे

नवीन खरेदी केलेल्या घराच्या मालकांना दिलेला धनादेश वठण्यासाठी आवश्यक रक्कम गोळा करून अधिकोषात जमा करणे आवश्यक होते; मात्र घराला आग लागल्याचा प्रसंग घडल्यामुळे त्यासाठी वेळ मिळाला नाही. दोन दिवसांनी मी कार्यालयात जाऊ लागलो. देवाला काळजी असल्यामुळे तिथे भेटायला आलेले श्री. चंद्रकांत पासकंटी (जोगेश्‍वरी या आस्थापनाचे मालक आणि विज्ञापनदाते) मला म्हणाले, तुमचे नाही, तर आमचे घर जळाले आहे. तुम्हाला काहीही अडचण असेल, तर मनमोकळेपणाने सांगा. मला जे शक्य आहे, ते मी अवश्य करीन. दुसर्‍याच दिवशी त्यांनी अधिकोषातील आमच्या खात्यात १७ लक्ष रुपये जमा केले. किती दिवसांसाठी ? पैसे कसे अन् कधी परत करणार ? व्याजाचे काय ?, असे काहीही न विचारता !

२. नवीन घराच्या व्यवहाराशी संबंधित वकिलांनी फी घेणार नसल्याचे सांगणे

नवीन घराच्या व्यवहारात असलेल्या मध्यस्थांनी वकिलाचे शुल्क मीच देणार आहे, असे सांगितले. मध्यस्थांनी संबंधित वकिलांना आमच्या घराच्या संदर्भातील ही घटना घडल्याचे सांगितले. खरेतर त्यांची आणि माझी एकदाही प्रत्यक्ष भेट झाली नव्हती. काहीच ओळख नसतांनाही वकीलांचे शुल्क घेणार नसल्याचे मध्यस्थांना सांगितले.

३. एका हितचिंतकाने पासवर्डसहित ए.टी.एम्. कार्ड देऊ करणे

एका हितचिंतकाने पासवर्डसहित ए.टी.एम्. कार्ड देऊ केले आणि लागेल तेवढी रक्कम काढा. काही काळजी करू नका, असे सांगितले.

४. एका सनदी लेखापालांनी कोरा धनादेश देणे

एका ओळखीच्या सनदी लेखापालांनी (चार्टर्ड अकाऊंटंटनी) कोरा धनादेश देऊ केला आणि हवी ती रक्कम लिहून पैसे घ्या, असे सांगितले.

५. कर्मचार्‍यांचे वेतन देण्याचा दिनांक कधीच चुकवलेला
नसणे आणि ईश्‍वराला प्रार्थना केल्यावर पैशाची जुळणी होणे

श्रीकृष्णाच्या कृपेने आजपर्यंत कार्यालयातील सर्व कर्मचार्‍यांचे वेतन प्रत्येक मासाच्या (महिन्याच्या) पहिल्या दिनांकाला देता आले आहे. २८ फेब्रुवारीला माझ्याकडे रक्कमच जमा नव्हती. मी ईश्‍वराला म्हणालो, आजपर्यंत माझ्याकडून पहिली तारीख चुकवली गेली नाही. हे सर्व तुझ्या कृपेमुळेच शक्य झाले; मात्र याचा मला अहं झाला असेल, तर तू ही पद्धत खंडित कर. मी सर्वांची क्षमा मागून सांगीन की, मला आता हे जमत नाही; पण जर माझ्या मनात प्रामाणिकपणे असा विचार असेल की, त्यांनी पूर्ण मास (महिना) केलेल्या कष्टाचा मोबदला त्यांना वेळेत मिळायला हवा, तर तूच पैशांची व्यवस्था होण्यासाठी माझ्यावर कृपा कर. त्याच दिवशी एका क्लायंटने माझी द्यायची राहिलेली फी (कामाचा मोबदला) खात्यात जमा केली !

६. रंगार्‍याला देण्यासाठी पैशांची व्यवस्था होणे

२ मार्चला माझ्याकडे १ सहस्र ५०० रुपये होते आणि रंगारी ३ सहस्र रुपये घ्यायला येणार होता. त्याच्या आधी १५ मिनिटे एक नवीन काम आले आणि त्या व्यक्तीने मला फीचे १ सहस्र ५०० रुपये दिले.

७. सोनाराने मोडलेल्या सोन्याची घट न धरता हिशोब देणे

घराला लागलेल्या आगीच्या धगीमुळे देवाची चांदीची सर्व उपकरणे काळीकुट्ट झाली होती. आमच्या ओळखीच्या सोनाराकडे ती उजळून घेण्यासाठी (पॉलिश करण्यासाठी) दिली. आगीनंतर मिळालेल्या घरातील सोन्याच्या दागिन्यांचे तुकडे पडू लागले होते. त्यामुळे ते मोडावे लागले. ते मोडण्यासाठीही याच सोनाराकडे दिले. तेव्हा त्यांनी मोडलेल्या सोन्याची घट न धरता हिशोब दिला.

८. पत्नीसाठी दुकानातून साड्या घेतल्यावर सनातन प्रभातच्या विज्ञापनदात्यांनी पैसे न घेणे

माझी पत्नी सौ. कल्याणी हिच्या सर्व साड्या जळून गेल्यामुळे नेहमीच्या वापरासाठी साड्या घ्यायला आम्ही जोगेश्‍वरी या दुकानात गेलो. साड्या घेतल्यावर श्री. चंद्रकांत पासकंटी यांनी देयकाचे पैसे घेण्यास नकार दिला. ते म्हणाले, माझ्या बहिणीला मी साड्या दिल्या आहेत. त्याचे पैसे कसे काय घेणार ? सरतेशेवटी तीच रक्कम मी त्यांच्या नावे अर्पण देण्याचे ठरवले.

९. नवीन घराच्या खरेदीसाठी घेतलेली रक्कम परत देतांना विज्ञापनदात्याने व्याजाचे पैसे न घेणे

घराला लागलेल्या आगीमुळे आलेल्या संकटात नवीन घर खरेदी करण्यासाठी श्री. चंद्रकांत पासकंटी यांनी न मागता रक्कम देऊन साहाय्य केले होते. ती रक्कम परत देतांना व्याजाचे किती पैसे द्यायचे ?, असे त्यांना विचारले असता ते म्हणाले, तुम्ही मला अजून आपले समजत नाही. मी अजून नक्कीच कुठेतरी न्यून पडत आहे.

१०. गुरूंप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

भगवंतावर पूर्ण श्रद्धा ठेवल्यामुळे त्याने आम्हाला या कठीण प्रसंगातही काहीच न्यून पडू दिले नाही. घटना घडल्यापासून ईश्‍वर आम्हाला प्रतिदिन अनुभूती देत होता. प्रत्येक संकटामध्ये क्षणोक्षणी त्यानेच आम्हाला तारले आणि सांभाळले. गुरुकृपेने आम्ही स्थिर राहून संकटाला खंबीरपणे तोंड देऊ शकलो. गुरुदेवांनी शिकवलेल्या साधनेच्या बळावर पुन्हा उभे राहू शकलो. यासाठी त्यांच्या चरणी शरणागत भावाने कृतज्ञता !

– श्री. प्रवीण कर्वे, गावठाण, पुणे. (२५.५.२०१६)

(यावरून साधना करणार्‍या जिवाचे आध्यात्मिक आणि व्यावहारिक दोन्ही स्तरांवर भगवंत कसे रक्षण करतो, हे लक्षात येते. साधनेला पर्याय नाही, हेच खरे ! सर्वत्रच्या वाचकांनो, येणार्‍या आपत्काळातून तरून जाण्यासाठी साधना करा ! – संकलक)

प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक, दैनिक सनातन प्रभात

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment