स्वत:च्या प्राणांचे बलीदान करून देशाच्या स्वातंत्र्याचे खरे शिल्पकार बनलेल्या अनेक ज्ञात-अज्ञात क्रांतीकारकांच्या शौर्याचा मागोवा !

देशाला स्वातंत्र्य प्रदान
करणार्‍या क्रांतीकारकांची महान परंपरा !


जीवनाच्या सर्व अंगोपांगांना क्रांती स्पर्श करत असते. राजकीय क्रांतीविना आपल्या राष्ट्रीय जीवनाशी संबंधित इतर काही क्रांतींचा, त्या घडवून आणणार्‍या क्रांतीकारकांचा आणि समुदायांचा अल्पसा परिचय येथे दिला आहे.

हिंदुस्थानावर परकियांनी अनेक आक्रमणे केली. त्याविरुद्ध लढलेले सर्वच क्रांतीकारक हे स्वातंत्र्ययोद्धे होते. अनेक ब्रिटीश अधिकार्‍यांना मारणारे विविध क्रांतीकारक, आझाद हिंद सेनेत सहभागी झालेले सैनिक जितके महान, तितकेच सर्व क्रांतीकारकांचे खटले विनामूल्य चालवणारे विधीज्ञ आणि क्रांतीकारकांना आश्रय देणार्‍या माता-भगिनीही महान आहेत. इंग्रजांविरुद्ध लढलेला आद्य क्रांतीकारक कोण ? हे ठरवणे, थोडे अवघड आहे; परंतु उपलब्ध विवरणानुसार आद्य क्रांतीकारक पाहूया.

 

१. देशप्रेमाने भारल्यामुळे इंग्रजांविरुद्ध लढा देणारे महान क्रांतीकारक !

१ अ. इंग्रजांविरुद्ध आवाज उठवणारा आणि बंदीशाळेत मृत्यू
पावलेला पहिला क्रांतीकारक रामाजी कामत !

उपलब्ध माहितीनुसार इ.स. १७२० मध्ये जेव्हा इंग्रजांची सत्ता केवळ मुंबई बेटापुरतीच मर्यादित होती, त्या वेळी मुंबईतील प्रसिद्ध वाळकेश्‍वराच्या देवालयासहित अनेक देवळे ज्याने बांधली, त्या रामाजी कामत नावाच्या श्रीमंत तंबाखू व्यापार्‍यास इंग्रजांनी हिंदी सैन्याचे सेनापती केले; मात्र त्याने आरमारावर प्रभुत्व असलेल्या कुलाब्याच्या कान्होजी आंग्रेंशी मैत्री केली. त्यांच्याशी इंग्रजांच्या विरोधात पत्रव्यवहार केला; म्हणून मुंबईचेे गव्हर्नर चार्लस् ब्रून याने रामाजी कामतच्या विरोधात चौकशी समिती नेमली. चौकशी समितीने रामाजीवर सात आरोप ठेवून त्यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. इ.स. १७२८ मध्ये रामाजी कामत बंदीशाळेत मृत्यू पावला. इंग्रजांविरुद्ध आवाज उठवणारा आणि बंदीशाळेत मृत्यू पावलेला रामाजी कामत हा कदाचित् पहिला क्रांतीकारक असावा.

१ आ. ५ सहस्र संन्यासी

सिराज उद्दौला इ.स. १७६४ मध्ये बंगालवर सत्ता गाजवत होता. त्याने राष्ट्र आणि धर्म प्रेमाने भारलेल्या सुमारे ५ सहस्र संन्याशांचे साहाय्य ब्रिटिशांशी लढण्यासाठी घेतले होते. इ.स. १७७६ – १७७७ मध्ये मेजर डॅनियलने अशा ८०० संन्याशांशी लढा दिल्याची नोंद आहे.

१ इ. तवक्कला चंदू

इ.स. १८०५ मध्ये तवक्कला चंदू यांनी केरळमधील वायनाड जिल्ह्यात कुरुचिया जमातीच्या वनवासींना संघटित करून ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला होता. मलबारच्या जिल्हाधिकार्‍याने त्याला फाशी दिली.

१ ई. ब्रिटिशांशी दिलेल्या लढ्यामुळे फाशी देण्यात आलेले उमाजीराजे नाईक !

मॅकिन्टाश या इंग्रजी लेखकाने ज्यांची तुलना छत्रपती शिवाजीराजांशी केली होती, त्या रामवंशी समाजाच्या उमाजीराजे नाईक यांनी ब्रिटिशांशी दिलेल्या लढ्यामुळे त्यांना फाशी देण्यात आली.

१ उ. इंग्रजांविरुद्ध लढणारी राणी चेनम्मा, बाबासाहेब भावे नरगुंदकर आणि गंगाधर चिंतामण सहस्रबुद्धे !

स्वातंत्र्यासाठी इ.स. १८२२ मध्ये इंग्रजांविरुद्ध लढणारी पहिली स्त्री क्रांतिकारक म्हणून कित्तूरच्या राणी चेनम्मा हिला दिलेला मानही यथोचितच आहे. इ.स. १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्याची ठिणगी विझत असतांनाच वीर भास्कर बाबासाहेब भावे नरगुंदकर यांनी जेम्स मॅन्शनला मारून ब्रिटीश-विरोध प्रकट केला. त्यांना आणि त्यांच्यासमवेत गंगाधर चिंतामण सहस्रबुद्धे यांना ३ जून १८५८ ला माल्कनने पकडले आणि बेळगाव येथे १२ जून १८५८ ला फाशी देण्यात आली.

१ ऊ. प्रतिसरकार स्थापणारे रामसिंग कुका !

पंजाबात रामसिंग कुका यांनी प्रतिसरकार स्थापले. ब्रिटिशांनी ५० कुकांना (कुका हे एका समाजाचे नाव आहे.) तोफेच्या तोंडी दिले आणि रामसिंग कुकाला ब्रह्मदेशात (आताचे म्यानमार) हद्दपार करण्यात आले. ते १८८५ मध्ये मृत्यू पावले.

१ ए. डेप्युटी कलेक्टरचे शिर राणीसमोर ठेवणारे मुसाईसिंग !

मिर्झापूरच्या डेप्युटी कलेक्टर मूर याचे मुंडके (शिर) भेदाईच्या राणीसमोर ठेवणार्‍या मुसाईसिंगला अंदमान येथे ५० वर्षांची जन्मठेप आणि काळ्या पाण्याची शिक्षा झाली. तेथील अत्याचाराला पुरेपूर उरून ५० वर्षांची शिक्षा भोगून बाहेर पडणारा बहुदा तो एकच क्रांतीकारक असेल.

१ ऐ. क्रांतीकार्यात भाग घेणारा शचिंद्रनाथ संन्याल !

हा असा एक क्रांतीकारक होता की, त्याने अंदमानातून बाहेर पडल्यानंतरही पुन्हा क्रांतीकार्यात भाग घेतला. काकोरी खटल्यात तो पुन्हा अंदमानात आला. त्याची पुढे बिनशर्त सुटका झाली.

१ ओ. बिरसा भगवान मुंडा

मुंडा वनवासींचा छोटा नागपूर (बिहार) येथे उठाव करणार्‍या बिरसा भगवान मुंडाला रांची कारागृहात इतर दोन सहस्र वनवासींसह ठार करण्यात आले.

१ औ. जनतेला वन्दे मातरम् या गीतातून प्रेरणा देणारे अरविंद घोष !

लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केल्याचे २० जुलै १९०५ ला प्रकट केले. फाळणीला हिंदूंकडून प्रचंड विरोध चालू झाला. अनुशीलन समिती आणि युगांतर या क्रांतीकारकांच्या संघटना उभ्या राहिल्या. बाबू अरविंद घोष यांनी इंद्रप्रकाशमध्ये वन्दे मातरम् या गीताची अलौकिक विशेषता विशद करणारे सात लेख लिहिले. जनतेला त्यातून प्रेरणा मिळाली, हे ओळखून अरविंदबाबूंना ब्रिटिशांनी कारागृहात टाकले.

१ अं. असंतोषाचे जनक ही उपाधी पावलेले लोकमान्य टिळक !

लोकमान्य टिळक यांनी केसरी या मराठी वृत्तपत्रातून क्रांतीकारकांच्या कृतीचे समर्थन करणारे लेख लिहिले; म्हणूनच त्यांना असंतोषाचे जनक ही उपाधी दिली गेली. ब्रिटिशांनी त्यांना मंडाले येथे कारागृहात ठेवले. वन्दे मातरम् हे शब्द उच्चारायला बंदी घालणार्‍या गव्हर्नर जनरल फुलरची पिसाळलेला कुत्रा, या शब्दांत लोकमान्य टिळकांनी संभावना केली.

१ क. सशस्त्र क्रांतीकारकांचा उठाव करण्याची योजना आखणारे महेंद्रप्रताप !

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचे सहकारी लंडनमध्ये कार्यरत असतांना महेंद्रप्रताप यांनी जर्मनचा कैसर, रशियाचे लेनिन आणि ट्रॉटस्की यांच्या भेटीगाठी घेऊन परराष्ट्रांच्या साहाय्याने सशस्त्र क्रांतीकारकांचा उठाव करण्याची योजना आखली. ब्रिटिशांनी त्यांना हद्दपार केले.
त्यांच्याप्रमाणे रासबिहारी बोस, लाला हरदयाळ, लाला लजपतराय हेही कार्यरत होते. पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी उभारलेल्या आझाद हिंद सेनेला सावरकरांप्रमाणेच रासबिहारींचे संपूर्ण मार्गदर्शन मिळाले.

१ ख. आझाद हिंद सेनेचे युरोपातील सल्लागार सरदार अजितसिंह !

हुतात्मा भगतसिंहांचे चुलते सरदार अजितसिंह यांनी इ.स. १८५७ च्या क्रांती युद्धाचा अर्धशत सांवत्सरिक कार्यक्रम आयोजित केला; म्हणून त्यांना लाला लजपतराय यांच्यासह मंडालेच्या कारागृहात ठेवण्यात आले. तेथून त्यांची सुटका होताच त्यांनी तुर्कस्तानच्या आतातुर्क केमालपाशाच्या सहकार्याने हिंदी स्वातंत्र्य सैन्याची उभारणी केली. त्याकरता त्यांनी इराण, ब्राझील आणि इटली या देशांचा दौरा केला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेचे युरोपातील सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले. ब्रिटिशांनी त्यांना हद्दपार केले. पुढे १९४६ मध्ये ते भारतात आले; परंतु फाळणीच्या दुःखानेच त्यांचा अंत झाला.

१ ग. सशस्त्र क्रांती करणे का अपरिहार्य झाले ? याविषयी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेले विचार !

सशस्त्र क्रांतीकडे सावरकर (आणि अर्थातच इतर सशस्त्र क्रांतिकारक) का वळले, हे सावरकरांनी अंदमानमधून इ.स. १९२० मध्ये लिहिलेल्या एका पत्रात स्पष्ट केले आहे. मानवता ही श्रेष्ठतर देशभक्ती असल्यामुळे ज्या वेळी मनुष्यजातीचा (ब्रिटीश, पोर्तुगीज आणि फ्रेंच) एक भाग स्वतःचे महत्त्व अवास्तवपणे वाढवत आहे आणि एकंदर मानवी जीवनासच वाढत जाणार्‍या विषारी कर्करोगाप्रमाणे धोका देत आहे, असे पाहून आम्ही अस्वस्थ झालो. इतर परिणामकारक उपाय नसल्यामुळे आम्हाला शस्त्रवैद्याचा चाकू हातात घेणे भाग पडले. हा उपाय तीव्र वाटला, तरी शेवटी दयाळू होता. शक्तीचा प्रतिकार शक्तीनेच करत असतांना आम्ही हिंसेचा मनापासून तिरस्कार केला आणि आजही करतो.

 

२. ब्रिटीशेतर परकियांशी लढा देणारे क्रांतीकारक !

२ अ. भूमिगत राहून कार्य करणारे डॉ. टी.बी. कुर्‍हा !

पोर्तुगीज गोव्यात पाय रोवत असतांनाच १५ जुलै १५८३ ला कुंकळ्ळी येथील स्थानिक जनतेने दिलेला लढा इतिहासात नोंदला गेला पाहिजे. भूमिगत राहून कार्य करणार्‍या डॉ. टी.बी. कुर्‍हा यांच्या नेतृत्वाखाली अनेक क्रांतीकारकांनी पोर्तुगीज सत्तेविरुद्ध लढा दिला. डॉ. कुर्‍हा आणि त्यांच्या सहकार्‍यांची धरपकड झाली. डॉ. कुर्‍हा यांना ८ वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली. त्यांना पोर्तुगालमध्ये जेरबंद करण्यात आले. इ.स. १९५३ मध्ये त्यांची सुटका झाल्यानंतर त्यांनी वृत्तपत्रांद्वारे लोकांमध्ये जागृती निर्माण केली.

२ आ. लोकांमध्ये जागृती निर्माण करणारे डॉ. राम मनोहर लोहिया
आणि गोव्यात सशस्त्र हालचाली करणारे श्री. मनोहर रानडे !

इ.स. १९४७ मध्ये डॉ. राम मनोहर लोहिया यांनी मडगाव, गोवा येथे लोकांमध्ये जागृती निर्माण करणारे भाषण केले; म्हणून त्यांना हद्दपार करण्यात आले. ते आणि सांगलीचे श्री. मनोहर आपटे, ज्यांनी आपले नाव मनोहर रानडे, असे सांगितले आणि त्याच नावाने प्रसिद्ध झाले. त्या मनोहर रानडेंनी आझाद गोमंतक दल ही संघटना उभी करून गोव्यात सशस्त्र हालचाली केल्या. एका पोलीस ठाण्यावरील आक्रमणाच्या मोहिमेत ते घायाळ झाले आणि पोर्तुगीजांनी त्यांना पोर्तुगालमधील कारावासात ठेवले. त्यांचे अत्यंत हाल करण्यात आले. गोवा मुक्त झाल्यानंतरच त्यांची सुटका झाली. सुटका होताच ते प्रथम मुंबईस स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या दर्शनासाठी गेले.

२ इ. दादरा, नगर हवेली आणि सिल्व्हासा येथे भारतीय राष्ट्रध्वज फडकवला !

इ.स. १९५४ मध्ये फ्रान्सिस मस्कारन्हिस यांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांनी व्यापलेल्या दादरा, नगर हवेली या भागात स्वातंत्र्याच्या जयजयकारात भारतीय राष्ट्रध्वज फडकवला. २ ऑगस्ट १९५४ या दिवशी सिल्व्हासा येथील कचेरीवरील पोर्तुगीजांचा ध्वज ११६ जणांच्या तुकडीने उतरवून तेथे आपला तिरंगा फडकवला. सुप्रसिद्ध संगीतकार कै. सुधीर (बाबूजी) फडके, पंढरपूर हिंदुसभेचे कै. वसंतराव बडवे आणि शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी त्यात प्रमुख भूमिका बजावली.

२ ई. पोर्तुगिजांच्या बेछूट गोळीबारात स्त्री-पुरुष धारातीर्थी पडले !

१५ ऑगस्ट १९५५ या दिवशी भाई विष्णुपंत चितळे यांच्या नेतृत्वाखालील तुकडीने गोव्यात प्रवेश केला. त्या वेळी पोर्तुगीजांनी केलेल्या बेछूट गोळीबारात केशव गोरे, रमण, त्यागीबाबा, हिरवे, कर्नालसिंग, मंदा यालगी, कमला उपासनी, प्रभा साठे, शांता राव आणि आणखी कितीतरी स्त्री-पुरुष धारातीर्थी पडले. अर्थात त्यांचे बलीदान वाया गेले नाही.

२ उ. स्वातंत्र्यासाठी बलीदान करणार्‍या सर्व क्रांतीकारकांची राष्ट्रीय क्रांतीकारक म्हणून नोंद व्हावी !

ज्याप्रमाणे पोर्तुगीजांनी गोवा, दमण-दीव, नगर हवेलीचा ताबा सोडला नव्हता, त्याप्रमाणे फ्रेंचांनीसुद्धा त्यांच्या ताब्यातील पुदुच्चेरी (पाँडेचेरी), कराईकल (तमिळनाडू), माहे (केरळ), यामन (आंध्रप्रदेश), हे भूभाग १ नोव्हेंबर १९५४ पर्यंत सोडले नव्हते. १९४८ मध्ये झालेल्या नगरपालिका निवडणुकीत फ्रान्सधार्जिण्या फ्रेंच इंडिया सोशालिस्ट पार्टी ने यश मिळवल्याने हे भूभाग प्रत्यक्षात १ जुलै १९६३ मध्ये हिंदुस्थानात विलीन झाले. या भूभागांच्या स्वातंत्र्यासाठी ज्या क्रांतीकारकांनी प्रयत्न केले, त्यांची नावे सर्व हिंदुस्थानाला कळतील, अशी व्यवस्था होणे आवश्यक आहे.

निजाम संस्थानाविरुद्ध हिंदु महासभेच्या नेतृत्वाखाली १९३९ मध्ये लढला गेलेला निःशस्त्र प्रतिकाराचा लढा आणि रझाकाराविरुद्ध मराठवाड्यातील स्थानिक जनतेने केलेले आंदोलन यांमध्ये अनेक क्रांतीकारकांनी भाग घेतला होता. त्यात जालना जिल्ह्यातील कोलते टाकळीच्या दगडाबाई शेळके या वीरांगनेचाही समावेश होता. त्यांचीही राष्ट्रीय क्रांतीकारक म्हणून नोंद केली जावी.

– श्री. श्रीकांत विठ्ठल ताम्हनकर (स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच, केडगाव, दिवाळी अंक २०१४)

अलीकडेच दैनिक सामना आणि सनातन प्रभात सारखी वृत्तपत्रे विविध क्रांतीकारकांचा थोडक्यात परिचय प्रसिद्ध करत आहेत. या आणि अशा वृत्तपत्रांना धन्यवाद. – श्री. श्रीकांत विठ्ठल ताम्हनकर (स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच, केडगाव, दिवाळी अंक २०१४)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment