वजन वाढवण्यासाठी प्रतिदिन तेलाने मर्दन करावे, व्यायाम करावा आणि पौष्टिक आहारही घ्यावा. ज्यांना भूक लागत नाही, त्यांनी भूक वाढण्यासाठी औषधे घ्यावीत. या सर्व स्तरांवर प्रयत्न केल्यास शरीर पुष्ट आणि बळकट होते. यांसंबंधीचे विवेचन पुढे दिले आहे.
वैद्य मेघराज पराडकर
१. मर्दन (तैलाभ्यंग)
व्यायामापूर्वी १५ मिनिटे सर्वांगाला तेल लावून मर्दन (मालिश) करावे. मर्दनासाठी पुढीलपैकी कोणतेही एक तेल वापरावे.
अ. खोबरेल तेल
आ. तिळांचे तेल
इ. शेंगदाण्याचे तेल
ई. माष (उडीद) तेल : वाटीभर उडीद रात्रभर थोड्याशा पाण्यात भिजत घालावेत. सकाळी यात २ पेले पाणी घालून एक पेला पाणी शिल्लक राहीपर्यंत उकळावे. हा काढा गाळून त्यात एक तांब्या (१ लिटर) तिळाचे तेल घालून केवळ तेल शिल्लक राहीपर्यंत उकळावे. तेल गरम असतांनाच लोखंडी किंवा स्टीलच्या गाळण्याने गाळावे आणि थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवावे. हे माष तेल अभ्यंगासाठी वापरावे, तसेच सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यातून १-२ चमचे ते पोटातही घ्यावे. यामुळे स्नायू पुष्ट आणि बळकट होतात.
२. व्यायाम – सूर्यनमस्कार
सूर्यदेवाला प्रार्थना करून सूर्यनमस्कार घालावेत. एका नमस्कारापासून आरंभ करून प्रतिदिन एकेक नमस्कार वाढवावा. याप्रमाणे नियमितपणे न्यूनतम २४ सूर्यनमस्कार घालावेत.
३. औषधे
वजन वाढवण्यासाठी पौष्टिक आहार महत्त्वाचा असतो; परंतु पचनशक्ती मंद असल्यास, तसेच पचनासंबंधीचे विकार असल्यास घेतलेला पौष्टिक आहार पचत नाही आणि उपायाऐवजी अपायच होतो. तसे होऊ नये, यासाठी ज्यांना भूक लागत नाही किंवा ज्यांना पचनासंदर्भातील त्रास आहे, अशांनी पुढीलपैकी कोणतेही एखादे औषध घेऊन चांगली भूक लागल्यावरच पौष्टिक आहार चालू करावा.
अ. सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची ४ पाने धुवून खावीत आणि पाण्याने चूळ भरून टाकावी.
आ. जेवणाच्या अर्धा घंटा आधी अर्ध्या सुपारीएवढा (अर्धा इंच) आल्याचा तुकडा मीठ लावून चावून खावा.
४. पौष्टिक आहार
आहारामध्ये गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट या सहाही रसांचा समावेश असावा. यांपैकी गोड पदार्थ तुलनेने जास्त खावेत. पुढे पौष्टिक पदार्थांची सूची दिली आहे. तिच्यापैकी स्वतःच्या आवडीनुसार एका वेळी १-२ पदार्थ निवडावेत. प्रतिदिन एकच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. एखाद्या पदार्थाचा कंटाळा आल्यावर सूचीतील अन्य पदार्थ निवडावा. कोणताही पौष्टिक पदार्थ चांगली भूक लागलेली असतांनाच खावा. भूक नसतांना पौष्टिक पदार्थ खाल्ल्यास आरोग्य बिघडते.
सकाळी व्यायामानंतर अर्ध्या घंट्याने मूठभर शेंगदाणे आणि सुपारीएवढा गूळ एकत्र करून व्यवस्थित चावून खावे किंवा शेंगदाण्याचे गूळ घालून केलेले लाडू खावेत.
आ. एक मूठभर काळे किंवा पांढरे तीळ चावून खावेत.
इ. मूठभर पांढरे तीळ भिजवून वाटावेत आणि त्यात कपभर पाणी घालून, कोळून (कालवून) त्याचे दूध बनवावे. यात सुपारीएवढा गूळ घालून हे दूध प्रतिदिन सकाळी घ्यावे.
ई. कोमट पाण्यामध्ये ३ चमचे साल असलेले उडीद किंवा उडदाची डाळ भिजत घालावी. ३ घंट्यांनंतर हे उडीद आणि वाटीभर खोबरे मिक्सरमध्ये एकत्र वाटून त्याचा रस काढावा. हा रस गाळून त्यात गूळ घालून प्यावा.
उ. भाकरी करतांना भाकरीच्या पिठात दहावा भाग उडदाचे पीठ घालावे. ही भाकरी तूप, ताक किंवा वांग्याच्या भाजीसमवेत खावी.
ऊ. आठवड्यातून दोन वेळा दुपारच्या जेवणात उडदाच्या पिठात चिंचोक्याचे पीठ मिसळून केलेल्या पोळ्या उडदाच्या उसळीसह खाव्यात.
ए. वालाची मोड आणवून रस सोडून केलेली (थोडासा रस्सा असलेली) उसळ खावी.
ऐ. केळी, खजूर आणि अंजीर यांपैकी जे उपलब्ध असेल ते चमचाभर मध घालून भुकेच्या प्रमाणात खावे. ज्यांना सारखी सर्दी होते त्यांनी केळी आणि अंजीर न खाता केवळ मध आणि खजूर खावा.
ओ. अल्पाहारासमवेत दही खावे.
औ. साय आणि खडीसाखर यांचे मिश्रण भुकेच्या प्रमाणात खावे.
अं. १ मास (महिना) नियमितपणे प्रतिदिन सकाळी चहाचे २ चमचे (१० ग्रॅम) खवा खाऊन वर १ पेला दूध प्यावे.
क. प्रतिदिन सकाळी अल्पाहारासह चहाचे २ चमचे किसलेले चीज १ मोठा चमचा मध आणि १ लवंग यांसह खावे.
ख. नियमितपणे पनीर खावे.
४ अ. कृशता (वजन न्यून असणे) या विकारासह अन्य विकार असल्यास प्राधान्याने घ्यायचा पौष्टिक आहार :
४ अ १. भूक न लागणे, झोपेशी संबंधित समस्या आणि चिडचिडेपणा हे विकार असल्यास, तसेच यकृत अन् हृदय यांना बळ मिळण्यासाठी : आंब्यांच्या दिवसांत प्रतिदिन १ आंबा खाऊन वर पेलाभर दूध प्यावे. असा क्रम ३ मास (महिने) करावा. आंबा सोडून अन्य कोणतेही फळ दुधासह खाऊ नये.
४ अ २. पोटात आग होणे : चवळीची उसळ खावी किंवा चवळीचे सूप ओली कोथिंबीर घालून प्यावे.
४ अ ३. मलाचे खडे बनणे आणि लघवी अल्प होणे : अर्धी वाटी अदमुरे (अर्धवट विरजलेले) दही आणि सुपारीएवढा गूळ हे मिश्रण जेवतांना खावे. एक आठवडा हा उपचार करावा आणि एक आठवडा बंद ठेवावा. असे ३ आठवडे दही खावे. याने शरीरात स्निग्धता येऊन वजन वाढते.
४ अ ४. शौचाला पातळ होणे : चवळीचे सूप ओली कोथिंबीर घालून प्यावे.
४ अ ५. संग्रहणी (शौचाला कधी पातळ, तर कधी घट्ट आणि चिकट होणे) : पिवळसर रंगाचा आणि घट्ट बियांचा जून दुधी भोपळा घ्यावा. त्याची साल काढून तो किसावा आणि तो चोथा तुपावर परतून चवीप्रमाणे खडीसाखर, जिरेपूड, मिरपूड आणि सैंधव घालून खावा. यामुळे शरिराचे पोषण होते.
४ अ ६. लघवीच्या समस्या, त्वचेचे विकार : मूठभर चणे थोड्याशा पाण्यात रात्रभर भिजत घालून सकाळी व्यायामानंतर अर्ध्या घंट्याने खावेत. यामुळे त्वचा निरोगी रहाते.
४ अ ७. वीर्य न्यून असणे : फणसाच्या आठळ्यांनी मांस, मेद आणि शुक्रधातू (वीर्य) यांना पुष्टी मिळते.
– वैद्य मेघराज माधव पराडकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२०.५.२०१६)
(संदर्भ : सनातनची आगामी ग्रंथमालिका भावी आपत्काळातील संजीवनी – आयुर्वेद)