१. असे घडवले प.पू. डॉक्टरांनी अभ्यासवर्गाच्या माध्यमातून…
‘वर्ष १९८७ ते १९९० या कालावधीत प.पू. डॉक्टरांचे ३ – ४ अभ्यासवर्ग गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी झाले. त्या वेळी मी (श्री. प्रकाश जोशी) आणि श्री. गुरुनाथ बोरकर यांनी त्याचे आयोजन केले. त्यामुळे थोड्या लोकांना अभ्यासवर्गांचे स्वरूप आणि महत्त्व कळले. त्यानंतर काही साधकांच्या तळमळीने आणि पुढाकाराने वर्ष १९९१ पासून प.पू. डॉक्टरांचे अभ्यासवर्ग एक ते दीड मासाच्या (महिन्याच्या) अंतराने नियमितपणे चालूू झाले. ते वर्ष १९९४ पर्यंत चालू होते. त्याचा कालावधी पूर्ण दिवसाचा असायचा. एक ते दीड मासाच्या (महिन्याच्या) अंतराने हे वर्ग असायचे. यामध्ये आम्ही (श्री. प्रकाश जोशी आणि श्री. विवेक पेंडसे), श्री. गुरुनाथ बोरकर, श्री. अरविंद ठक्कर, आधुनिक वैद्या (सौ.) आशा ठक्कर, आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे, श्री. सदानंद जोशी इत्यादी सर्व जण या अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेत असू. त्या वेळी प.पू. डॉक्टर मुंबईला सोमवार ते शुक्रवार आपले संमोहन उपचाराचे चिकित्सालय चालवत असत. रविवारी आमचा अभ्यासवर्ग घेण्यासाठी ते शनिवारी सकाळी मुंबईहून स्वतःची गाडी घेऊन येत असत. अभ्यासवर्ग झाल्यावर परत रविवारी रात्री निघून सोमवारी मुंबईला परतत असत किंवा आवश्यकतेनुसार रहात असत. मुंबईहून ते गोव्यात आल्यावर साधकांना भेटणे, त्यांच्या समस्या सोडवणे, पुढील अभ्यासवर्गाविषयी नियोजन करणे, यासाठीच पूर्णवेळ देत असत.
१ अ. अभ्यासवर्ग म्हणजे आनंदाची पर्वणी !
प.पू. डॉक्टरांचे अभ्यासवर्ग ही म्हणजे आम्हा साधकांसाठी एक आनंदाची पर्वणी असायची; कारण प.पू. डॉक्टरांच्या प्रत्येक अभ्यासवर्गात काहीतरी नवनवीन शिकायला मिळायचे. या अभ्यासवर्गांत प.पू. डॉक्टर अध्यात्माबद्दल तात्त्विक माहिती सांगायचे आणि प्रात्यक्षिक भाग म्हणून सूक्ष्मातील प्रयोग करून घ्यायचे. साधकांना आलेले अनुभव आणि अनुभूती यांविषयी अभ्यासवर्गात चर्चा व्हायची. त्यातून साधनेच्या दृष्टीकोनातून ‘योग्य काय आणि अयोग्य काय ?’, हे आम्हाला कळत होते.
१ आ. स्वतःच्या चुका आणि शिकायला मिळालेली सूत्रे सांगणे
अभ्यासवर्ग चालू व्हायचा, तेव्हा पहिल्यांदा ते स्वतःच्या चुका सांगायचे. त्यानंतर एक ते दीड मासाच्या (महिन्याच्या) कालावधीत ‘प.पू. भक्तराज महाराज यांच्याकडे गेल्यावर किंवा एखाद्या संतांकडे गेल्यावर काय शिकायला मिळाले ?’, ते सांगायचे. त्याचा भावार्थ किंवा ‘संत असे का वागतात ? त्यांच्याकडे गेल्यावर नम्रपणा कसा असायला हवा ? भाव कसा असायला हवा ?’, हे सांगायचे.
१ इ. नाम, सेवा, त्याग आणि प्रेम इत्यादींचे महत्त्व सांगणे
वरील प्रसंगांत नाम, सेवा, त्याग आणि प्रेम यांची सूत्रे आली, तर त्या वेळी ‘त्यातील चूक काय अन् योग्य काय ?’, हे सांगायचे. त्यानंतर नाम, सेवा आणि त्याग यांचे महत्त्व सांगायचे. ‘कुणी सेवा चांगली केली ? त्याग कुणाला करायला जमला ?’, त्या साधकांची नावे घेऊन सांगायचे. त्यामुळे त्या साधकांना प्रोत्साहन मिळायचे आणि इतरांना ‘सेवा, त्याग कसा करायला पाहिजे ?’, हे शिकायला मिळायचे.
१ ई. साधकांमध्ये सेवाभाव रुजवणे
‘आपण सेवा म्हणून काय करू शकतो ?’, याविषयी ते सांगायचे, उदा. ‘अभ्यासवर्गासाठी सभागृहात आसंद्या लावणे, ध्वनीक्षेपकाची व्यवस्था करणे, फलक लावणे, मध्यंतरामध्ये सर्वांना चहा देणे, चहा देऊन झाल्यावर चहाचे कप धुणे इत्यादी गोष्टी आपण सेवा म्हणून करू शकतो’, असे ते सांगायचे. त्यामुळे येणार्या साधकांमध्ये त्यांनी हळूहळू सेवाभाव रुजवला. त्यानंतर स्वतःहून काही जण सेवाभावाने अभ्यासवर्गाची सिद्धता करायचे.
१ उ. प्रयोग करवून घेणे
१ उ १. प्रत्यक्ष वस्तू बघणे : अध्यात्म हे कृतीचे शास्त्र आहे, हे ते आवर्जून प्रत्येक वर्गात सांगायचे. ते काही प्रयोग करवून घ्यायचे, उदा. डाव्या सोंडेचा गणपति, उजव्या सोंडेचा गणपति, ‘दोन साधकांना उभे करून काय जाणवते ?’, दोन वस्तू दाखवून ‘काय जाणवते ?’, ते विचारायचे आणि नंतर त्याचे विश्लेषण करायचे.
१ उ २. वस्तू कागदात गुंडाळून ‘तिच्याकडे पाहून काय जाणवते ?’, हे विचारणे : ‘दोन वस्तू कागदात गुंडाळून काय जाणवते ?’, ते विचारायचे आणि त्यानंतर त्या उघडून दाखवत असत. ‘अध्यात्म हे मन आणि बुद्धी यांच्या पलीकडचे शास्त्र आहे’, हे सूत्र सांगून वरील प्रयोग करवून घ्यायचे. यातून ते मन आणि बुद्धी यांचा वापर न करता ‘सूक्ष्म कसे ओळखायचे ?’, हे शिकवत होते. त्यामागचे शास्त्रही सांगत होते.
१ ऊ. प्रत्येकाच्या समस्येनुसार त्याला उपाय सुचवणे
१. एखाद्या साधकाचा प्रश्न असायचा, ‘‘माझा नामजप होत नाही.’’ त्यावर त्या साधकाला बोलावून ‘काय जाणवते ?’, ते इतरांना विचारायचे आणि मग विश्लेषण करून सांगायचे. सात्त्विकता अल्प असल्याने नामजप होत नाही. त्यासाठी सेवा करणे, देवळात जाणे, ग्रंथ वाचणे इत्यादी उपाय करायला हवेत, असे सांगायचे.
२. एखाद्याला सेवा करावीशी वाटत नव्हती. तेव्हा ते सांगायचे, ‘सेवा, त्याग आणि प्रेम हे पुढचे टप्पे आहेत. जसजशी सात्त्विकता वाढते तसे ते जमते; पण नाम घेणे, जमेल तशी सेवा, जमेल तसा त्याग, प्रेम व्यापक करणे इत्यादी गोष्टी करत रहायच्या, म्हणजे लवकर प्रगती होते. केवळ नाम घेत राहिलो, तर प्रगती व्हायला पुष्कळ वर्षेे लागतील. याच जन्मात प्रगती करायची असेल, तर सेवा, त्याग, प्रेम आणि आज्ञापालन या गोष्टी आचरणात आणणे पुष्कळ महत्त्वाचे आहे.’ असे सांगून ते त्याप्रमाणे त्याच्याकडून करवून घ्यायचे.
३. एखाद्या साधकाला पुष्कळ त्रास असतील, तर त्याला वर्गात उभे करून प्रयोग करून घ्यायचे. साधकांना ‘कसला त्रास आहे ?’, ते सांगायला सांगायचे आणि साधकांची सूक्ष्मातील जाणण्याची सिद्धता करून घ्यायचे. त्रास कसला आहे, उदा. चांगल्या शक्तीचा, वाईट शक्तीचा. त्यामध्ये मग अजून खोल जाऊन नेमका कोणता, उदा. कुलदेवी, ग्रामदेवी, पूर्वज, करणी, ग्रह इत्यादी
४. ‘एखाद्याच्या घरी पुष्कळ देव आहेत’, असे सांगितल्यावर ‘अनेकातून एकात जाणे’ हे तत्त्व सांगून ‘देवघरात कोणते देव असावेत ?’, याविषयी ते सांगायचे. हे सर्व करत असतांना ‘ऐकणार्याला न दुखवता कसे सांगायचे ?’, हे त्यांनी शिकवले.
१ ए. साधकांना पाहिजे ते न देता आवश्यक आहे, ते देणे
वरील सर्व गोष्टी शिकवून होईपर्यंत वेळ संपत यायची. अभ्यासवर्ग सकाळी १० वाजता चालू व्हायचा. तो संध्याकाळी ५ वाजता संपायचा. एवढा वेळ असूनही वेळ पुरायचा नाही. शेवटी एक घंट्यामध्ये ते नामसंकीर्तनयोग, भक्तीमार्ग, कर्मयोग, कुंडलिनीयोग, त्राटक, वेगवेगळे देह (प्राणदेह, मनोदेह, कारणदेह इत्यादी) यांविषयी शिकवायचे. पहिल्यांदा बर्याच जणांना मुख्य विषय सोडून वरील सर्व गोष्टींचा कंटाळा यायचा. सगळ्यांना विषय जाणून घ्यायचा असायचा; पण प.पू. डॉक्टर साधकांना पाहिजे ते न देता आवश्यक आहे, ते देत राहिले. पहिल्यांदा काही वर्ग विषय शिकवला आणि त्यानंतर प्रायोगिक भागावरच भर दिला. ज्यामुळे साधकांची प्रगती होऊ लागली आणि साधकांना तशा अनुभूती येऊ लागल्या.
१ ऐ. अनुभूतींचे विश्लेषण
‘अध्यात्म हे अनुभूतींचे शास्त्र आहे’, हे सांगून ते साधकांच्या अनुभूतींचे विश्लेषण करायचे. ‘अनुभूती मानसिक, आध्यात्मिक आहे कि वाईट शक्तींमुळे आली आहे ?’, यातून ‘अनुभूती कशाला म्हणतात ?’, हे वर्गाला येणार्यांना कळायला लागले. त्यामुळे अनुभूतींतून साधकांना प्रोत्साहन मिळणे, आनंद मिळणे इत्यादी गोष्टी व्हायला लागल्या.
अभ्यासवर्ग झाल्यावर पुढील आठ दिवस आम्ही त्याच आनंदात असायचो. आम्ही एक अभ्यासवर्ग संपल्यावर दुसर्या अभ्यासवर्गाची चातकाप्रमाणे वाट पहायचो.
१ ओ. पुढील अभ्यासवर्गांचे नियोजन करणे
गोव्यात अभ्यासवर्ग झाल्यावर ‘पुढील अभ्यासवर्ग कधी घेणार ?’, याविषयी ते आधीच नियोजन करत असत. अभ्यासवर्ग संपल्यानंतर आम्ही १० ते १२ जण पणजीला प.पू. डॉक्टर रहात असलेल्या ठिकाणी श्री. गुरुनाथ बोरकर यांच्या घरी जमत होतो. त्यानंतर पुढच्या अभ्यासवर्गाचे नियोजन होत असे. ‘या अभ्यासवर्गांना जोडून कुठे एखादे व्याख्यान ठेवता येईल का ?’, याविषयी श्री गुरूंचे नियोजन असायचे.
१ औ. अभ्यासवर्गात येणार्या प्रत्येकाला प्रकृतीनुसार योग्य असे मार्गदर्शन करणे
अभ्यासवर्गात अनेक जण आपले अनुभव सांगत असत किंवा प.पू. डॉक्टरांना काही प्रश्न विचारत असत. त्या प्रश्नांची उत्तरे देणे किंवा त्याचे अनुभव ऐकल्यानंतर त्याविषयी चर्चा करणे, हे करतांना त्यांच्या मनात प्रत्येक साधकाबद्दल प्रेमभाव असायचा. साधकाची प्रकृती ओळखून त्याला समजेल अशा भाषेत ते नेमकेपणाने सांगायचे. काही वेळा त्याची कृती अयोग्य असेल, तर ‘आध्यात्मिक स्तरावर ते अयोग्य कसे आहे ?’, हे ते सांगायचे. त्यामुळे चूक सांगितल्यावरही साधकांना वाईट न वाटता त्यांच्याबद्दल प्रेमच वाटायचे. काही लोक मात्र केवळ चिकित्सक म्हणून अभ्यासवर्गाला यायचे आणि उगीच काहीतरी तात्त्विक प्रश्न विचारायचे. अशांना मात्र ते तेव्हाच थांबवून ‘तुम्ही साधना करा, म्हणजे तुम्हाला त्याचा अनुभव येईल’, असे सांगायचे.
१ अं. साधकांचा वेळ वाया जाऊ नये, याची काळजी घेणे
अभ्यासवर्ग झाल्यावर आम्ही काही साधक प.पू. डॉक्टरांसमवेत पणजीला श्री. गुरुनाथ बोरकर यांच्याकडे जमत होतो. त्या वेळी प.पू. डॉक्टरांना भेटायला काही जण यायचे. साधकांना वैयक्तिक स्तरावर त्यांच्याशी बोलायचे असायचे. असे असतांना आम्हा बाहेर बसलेल्या साधकांना ते काहीतरी विषय द्यायचे आणि ‘त्यासंबंधी चर्चा करा’, असे सांगायचे. नंतर मध्ये येऊन ‘काय चर्चा झाली ?’, याविषयी विचारायचे. तिथे जाणार्या कुणाचा वेळ उगीच फुकट जाऊ नये, असा त्यामागचा उद्देश असायचा.
१ क. आजारी साधकाला भेटणे आणि साधकांच्या विवाहाला आवर्जून उपस्थित रहाणे
अभ्यासवर्गाला येणार्या साधकांपैकी ‘कुणी आजारी आहे’, असे कळले, तर ते अभ्यासवर्ग घेण्यास गोव्यात आल्यावर त्या साधकाला भेटायला आवर्जून जायचे, उदा. एकदा श्री. सदानंद जोशी यांच्या पत्नी सौ. स्वाती जोशी या आजारी होत्या. तेव्हा प.पू. डॉक्टर त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले. कुणा साधकाचा विवाह ठरलेला असेल आणि त्या वेळी ते अभ्यासवर्गाच्या निमित्ताने गोव्यात आलेले असतील, तर आवर्जून त्या साधकाच्या विवाहाला जायचे.
१ ख. संतांची भेट घेण्यासाठी साधकांना समवेत नेणे आणि ‘संतांशी कसे वागावे ?’, हे शिकवणे
अभ्यासवर्ग चालू असलेल्या भागात जवळपास कुणी संत असतील, तर प.पू. डॉक्टर त्यांची भेट घेण्यासाठी साधकांना समवेत नेत असत. त्या वेळी ‘समाजात अजूनही संत आहेत’, हे आम्हाला ठाऊकच नव्हते. त्या संतांची ओळख प.पू. डॉक्टरांनी आम्हा साधकांना करून दिली. ‘संतांशी कसे वागायचे ? त्यांच्याकडून काय घ्यायचे ?’ इत्यादी भाग ते आम्हाला सांगत असत. त्या संतांनाही ‘तुमच्याकडे आता साधकांना पाठवतो’, असे सांगत असत. संतांना भेट देऊन आल्यावर त्या संतांची वैशिष्ट्ये ते आम्हाला सांगायचे, उदा. त्या संतांची साधना कोणत्या मार्गानुसार आहे ? त्यांची पातळी किती आहे ? त्यांच्यामध्ये शांती, आनंद याचे प्रमाण किती आहे ? इत्यादी.
‘संतांच्या भेटीसाठी जातांना नारळ आणि काहीतरी अर्पण घेऊन जावे. ‘जिज्ञासूच ज्ञानाचा अधिकारी असतो’, या न्यायाने संतांकडे जातांना व्यावहारिक प्रश्न न विचारता शिकण्याच्या दृष्टीकोनातून जावे’, हे ते आम्हाला सांगायचे. ‘संतांच्या प्रकृतीनुसार त्यांना आवडेल असे कसे वागावे ?’, हे ते आम्हाला सांगायचे. ‘संत म्हणजे देह नसून ईश्वरी तत्त्व असते. संतांकडे जातांना अहंभाव नको नम्रपणा, लीनता हवी’, असे ते सांगायचे. ते आम्हाला काही संतांकडे जायला सांगायचे आणि नंतर ‘तिथे काय शिकायला मिळाले ?’, ते विचारायचे किंवा अभ्यासवर्गात सांगायला लावून सर्वांना त्यांच्याविषयी माहिती द्यायचे, उदा. गोव्यातील अभ्यासवर्गानंतर त्यांनी सावंतवाडीला अभ्यासवर्ग चालू केले होते. तेव्हा ते आम्हाला तेथील संत प.पू. भाऊ मसुरकर यांच्याकडे जायला सांगायचे. भाऊ मसुरकर यांचा संख्याशास्त्राचा पुष्कळ अभ्यास होता. त्यामुळे आम्ही गेल्यावर ते आम्हाला संख्याशास्त्राबद्दल सांगायचे. ते सांगत असतांना आम्हाला हळूहळू झोप यायची आणि ती अनावर व्हायची. आम्ही जेव्हा हे श्री गुरूंना सांगितले, तेव्हा ‘भाऊ मसुरकर यांच्यामध्ये शक्तीचे प्रमाण पुष्कळ असल्याने तुम्हाला झोप येते’, असे त्यांनी आम्हाला सांगितले. प.पू. काणे महाराज यांच्याबद्दल त्यांनी साधना कशी केली, त्यांना सरस्वती प्रसन्न आहे इत्यादी त्यांनी आम्हाला सांगितले. आमच्यापैकी काही साधक काणे महाराजांसमवेत त्यांच्या सेवेसाठी जायचो. ‘त्यांच्याकडे काय अनुभव आले ?’, त्याविषयी साधक श्री गुरूंना सांगायचे आणि मग त्याविषयी प.पू. डॉक्टर विश्लेषण करायचे.
– श्री. विवेक पेंडसे आणि श्री. प्रकाश जोशी, फोंडा, गोवा. (१९.४.२०१६)