देवदर्शनासाठी येणार्‍यांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ आणि समस्येचे उत्तर

देवदर्शनासाठी येणार्‍यांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ, त्यामुळे पुजारी आम्हाला देवाचे डोळे भरून दर्शनही घेऊ देत नाहीत, उलट धक्के देऊन बाहेर काढतात, असा पुजार्‍यांना ठपका लागणे आणि समस्येचे उत्तर

 

१. देवदर्शनासाठी येणार्‍यांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ

शेकडो वर्षांपूर्वी जेव्हा देवळे बांधली, तेव्हा एकूण लोकसंख्या आणि दर्शनाला येणार्‍या हिंदूंची संख्या मर्यादित होती. देवळात दर्शनाला येणार्‍यांच्या संख्येला देवळांचा आकार आणि रचना पूरक होती. आता लोकसंख्या आणि देवदर्शनाला येणार्‍यांची संख्या ५ – ६ पटींनी वाढली असल्याने देवळांत दर्शन घेणे कठीण झाले आहे.

 

२. दर्शनासाठी लागणार्‍या वेळेचे गणित

प्रत्येक भक्ताला देवाचे डोळे भरून दर्शन घेण्यासाठी कमीत कमी ३ – ४ मिनिटे तरी लागतात. एका वेळी गाभार्‍यात ५ – ६ जण दर्शन घेऊ शकत असले, तर तासाभरात फक्त ७५ ते १०० जणांनाच दर्शन घेता येते. दर्शनासाठी गाभारा पहाटेपासून रात्रीपर्यंत १० – १२ तास उघडा ठेवला, तरी फक्त ७५० ते १२०० एवढेच दर्शनार्थी दर्शन घेऊ शकतात. दर्शनासाठी मात्र हजारो आलेले असतात.

 

३. दर्शनार्थींचा वाईट अनुभव

३ अ. भक्तांच्या अतोनात गर्दीमुळे अधिकाधिक जणांना
काही क्षण तरी देवाचे दर्शन व्हावे, यासाठी पुजार्‍यांना दर्शनार्थींना
गाभार्‍यातून ओढून बाहेर काढावे लागणे आणि त्यासाठी त्यांना भक्तांच्या रागाला तोंड द्यावे लागणे

मी वाराणसी येथील प्रसिद्ध मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्या वेळी तेथे अनेक भक्तही दर्शनासाठी आले होते आणि त्यांची मोठी रांग होती. भक्तांची गर्दी असल्यामुळे ते दर्शनासाठी गर्भकुडीत गेल्यावर तेथील पुजारी अवघ्या ५ सेकंदांमध्ये त्यांना ओढून बाहेर काढत होते. घंटोन्घंटे (तासन्तास) रांगेत उभे राहिलेल्या भक्तांना डोळे भरून देवाचे दर्शन घ्यायलाही दिले जात नव्हते. भक्तगण नमस्कार करत असतांनाच तेथील पुजारी त्यांना घाईगडबडीत प्रसादाचे फूल देणे, त्यांच्यावर फुलांचा हार (प्रसाद म्हणून) फेकणे आणि प्रसाद देणे, अशी कृत्ये करत होते, तर इतर पुजारी दर्शनार्थींना बाहेर ओढत होते. त्यामुळे नमस्कार करण्यासाठी आणि प्रसाद घेण्यासाठी भक्ताला धडपडावे लागत होते.

 

४. देवळे वापरत असलेला लज्जास्पद उपाय – दर्शनासाठी पैसे घेणे !

अनेक देवळांत दर्शनासाठी १०० ते ५००० रुपये इतके शुल्क आकारले जाते. देवदर्शनाचा व्यापार होणे, हे हिंदूंसाठी अत्यंत लज्जास्पद आहे.

 

५. काही तात्त्विक; पण व्यवहारात आणता न येण्यासारखे विचार

५ अ. देवाप्रती भाव असलेल्यांनाच दर्शन देणे

यासाठी अर्थातच दर्शनाथींमध्ये भाव आहे कि नाही ?, हे ओळखण्याची क्षमता असलेले व्यवस्थापक देवळात असले पाहिजेत. सरकारीकरण झालेल्या एकाही देवळात असे व्यवस्थापक नाहीत.

५ आ. धर्मशिक्षण

देवदर्शनापेक्षा देवाचा नामजप, भाव इत्यादी साधना पुढच्या टप्प्याच्या असल्यामुळे त्यासंदर्भात भक्तांना मार्गदर्शन केले पाहिजे. त्यामुळे शेवटी केवळ प्राथमिक अवस्थेतील भक्त दर्शनाला येतील आणि इतर देवाच्याअनुभूती घेतील.

 

६. व्यावहारिक सूचना

६ अ. वस्तूस्थिती दर्शक फलक लावणे

दर्शनार्थींना दर्शनासंदर्भात वस्तूस्थिती कळावी, यासाठी मंदिरात फलक लावावेत. त्यामुळे पुजारी आणि मंदिर व्यवस्थापन यांच्या संदर्भात दर्शनार्थींच्या मनात विकल्प निर्माण होणार नाही.

६ आ. दर्शन सुलभ व्हावे, यासाठीचा पर्याय

देवदर्शन होईल, देवाचे पूजाविधी आवारात सर्वत्र दिसतील, अशा तर्‍हेने ध्वनीचित्रीकरणाची आणि दूरदर्शन संचांची सोय सर्वत्र केली, तर काही वर्षांनी पुढील पिढ्यांच्या मनात देवदर्शनाची ही पद्धत रूजेल.

 

७. देवदर्शनासाठी काही सोय करण्याची
आवश्यकता नसण्याची आध्यात्मिक कारणे !

अ. खर्‍या भक्ताला देवदर्शनासाठी देवळांत जावे लागत नाही. देवच त्याच्याकडे येऊन त्याला दर्शन देतो.

आ. अनेक भविष्यवेत्त्यांच्या सांगण्यानुसार काही वर्षांतच तिसर्‍या महायुद्धाला आरंभ होऊन पृथ्वीवरील बरीच लोकसंख्या नष्ट होईल. त्यात देवाची भक्ती न करणारेही नष्ट होतील. त्यामुळे पुढे होणार्‍या हिंदु राष्ट्रात देवदर्शनाला येणार्‍यांची अतोनात गर्दी नसल्याने सर्वांना भावपूर्ण हवा तेवढा वेळ दर्शन घेता येईल.

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.५.२०१५)

Leave a Comment