आजकाल खोबरेल तेलाविषयी अनेक अपसमज पसरलेले आहेत, उदा. खोबरेल तेल खाल्यास कॉलेस्टेरॉल वाढते. खरे तर, खोबरेल तेल प्रत्येकाने आपल्या समवेत ठेवल्यास दुसर्या कोणत्याही औषधाची आवश्यकता भासणार नाही; मात्र हे तेल घाण्यावर काढलेले आणि कच्चे (न तापवलेले) असावे. आपल्याकडील वाळवलेले खोबरे घाण्यावर देऊन कोणतीही रासायनिक प्रक्रिया केल्याविना काढलेले तेल मिळाल्यास सर्वांत चांगले. आजकाल योगऋषी रामदेवबाबा यांच्या पतंजली आस्थापनाचे तेल सर्वत्र उपलब्ध असते.
१. प्रतिदिन जेवणामध्ये कच्चे खोबरेल तेल वापरल्याने होणारे लाभ
प्रतिदिन दुपारी आणि रात्री जेवणामध्ये १-२ चमचे कच्चे खोबरेल तेल घ्यावे, तसेच जेवण झाल्याझाल्या १-२ चमचे हे तेल प्यावे. यामुळे पुढील लाभ होतात.
अ. कधीही बद्धकोष्ठता होत नाही. तेलामुळे आतड्यांना चिकटून बसलेला मळ सुटतो आणि आतड्यांची शक्ती वाढते.
आ. पचन सुधारते आणि त्यामुळे वाताचा त्रास होत नाही.
इ. शरिरातील सर्व सांध्यांना वंगण मिळून हाडांची झालेली झीज भरून येते.
ई. खोबरेल तेल थंड असल्याने याने उष्णतेचे विकारही दूर होतात.
उ. या तेलामुळे कॅल्शियमची न्यूनता दूर होते. शरीरस्वास्थ्य सुधारल्याने शरीर अन्नातून आपल्याला आवश्यक ते घटक शोषून घेऊ लागते आणि त्यामुळे जीवनसत्त्वे आणि खनिजे यांची न्यूनता दूर होण्यास साहाय्य होते.
ऊ. शरीर सुदृढ आणि काटक बनते. (कच्च्या खोबरेल तेलामुळे जाडी वाढत नाही.)
२. खोबरेल तेल – एक बहुगुणी औषध !
२ अ. खोकला आणि दमा यांत लाभदायक
सातत्याने खोकला येणे, दम लागणे यांसारख्या विकारांमध्ये हे तेल दिवसातून २-३ वेळा १-२ चमचे प्यावे. यामुळे खोकल्याची ढास लगेच थांबते.
२ आ. धुळीच्या अॅलर्जीवर रामबाण उपाय
ज्यांना धुळीची अॅलर्जी आहे, अशांनी दिवसातून ५-६ वेळा खोबरेल तेलाच्या बाटलीत १ करंगळी बुडवून तिला लागलेले तेल दोन्ही नाकपुड्यांना आतून लावावे. असे केल्याने नाकात येणारी धूळ त्या तेलाला चिकटल्याने श्वसनमार्गात जात नाही आणि धुळीपासून होणारे त्रास न्यून होतात.
२ इ. शांतनिद्रेसाठी सोपा घरगुती उपचार
ज्यांना झोप येत नाही, अशा व्यक्तींनी प्रतिदिन रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेलाचा पुढीलप्रमाणे उपयोग करावा.
१. १ चमचा खोबरेल तेल डोक्याच्या टाळूवर जिरवावे. त्यासाठी ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी डोक्यावर ५ – १० मिनिटे थापट्या माराव्या आणि चोळावे.
२. तेलाच्या बाटलीत उजव्या हाताची करंगळी बुडवून करंगळीला लागलेले तेल दोन्ही नाकपुड्यांना आंतून लावावे आणि एकेक नाकपुडी बंद करून दुसरीने १ दीर्घ श्वास घ्यावा. घशात आलेले तेल थुंकून टाकावे.
३. त्यानंतर एका कुशीवर झोपून वर येणारा कान तेलाने भरावा.
४. १-२ मिनिटे त्याच कुशीवर झोपून रहावे.
५. त्यानंतर कानातील तेल हातावर घेऊन तळपायांना लावून १-२ मिनिटे तळपाय एकामेकांवर घासावेत. तळपाय एकामेकांवर घासणे शक्य नसल्यास हातांनी तळपायांना तेल चोळावे.
६. अशा प्रकारे दुसर्या कुशीवर झोपून वर येणारा कान तेलाने भरावा आणि १-२ मिनिटांनी पुन्हा पहिल्यासारखेच कानातील तेल हातावर घेऊन दोन्ही पायांच्या पोटर्यांना लावून खालून वरच्या दिशेने चोळावे.
२ ई. त्वचेचे आरोग्य राखणारे खोबरेल तेलाचे अभ्यंग
प्रतिदिन सकाळी अंघोळीपूर्वी संपूर्ण शरिराला खोबरेल तेल लावल्याने त्वचेचा कोरडेपणा दूर होतो, तसेच सर्व सांध्यांना वंगणही मिळते.
२ उ. केसांना पोषक
ज्यांचे केस गळतात त्यांनी नियमितपणे केसांच्या मुळाशी खोबरेल तेल लावावे. याने केसांचे उत्तम पोषण होते. बाजारातील कोणत्याही तेलापेक्षा खोबरेल तेल जास्त चांगले काम करते.
२ ऊ. डोकेदुखीला सुट्टी
जो नेहमी डोक्याला भरपूर (खोबरेल) तेल लावील त्याला कधीही डोकेदुखी होणार नाही, असे चरक ऋषींनी सांगून ठेवले आहे.
३. कच्च्या खोबरेल तेलाने कॉलेस्टेरॉल वाढत नाही
कच्च्या खोबरेल तेलामध्ये ‘लॉरिक अॅसिड’ नावाचा घटक असतो. यामुळे कॉलेस्टेरॉल न्यून होण्यास साहाय्य होते. त्यामुळे ‘खोबरेल तेलामुळे कॉलेस्टेरॉल वाढते’, हा निवळ अपसमज आहे.
– वैद्य सुविनय दामले, कुडाळ, सिंधुदुर्ग यांच्या व्याख्यानावरून संकलित