पंढरपूर येथील श्री विठ्ठलाची पूजा करणारे सेवेकरी
श्री. मुकुंद भगवान पुजारी यांनी सांगितलेले श्री विठ्ठलाचे मूर्तीविज्ञान
१. विठ्ठलमूर्तीची वैशिष्ट्ये
पूर्ण मूर्ती
कटीच्या खालचा भाग ब्रह्मास्वरूप, कटीपासून मानेपर्यंतचा भाग श्रीविष्णुस्वरूप, तर मस्तकाचा भाग शिवस्वरूप आहे.
काळा रंग
मूर्तीचा रंग काळा असला, तरी खर्या भक्ताला सूक्ष्म- दर्शनेंदि्रयाने मूर्ती पांढरीच दिसते.
भालप्रदेश
हा आज्ञाचक्रातून तेजाची उधळण करतो.
कटेवर हात
कटीप्रदेशाच्या वर ज्ञानेंदि्रये, तर खाली कर्मेंदि्रये आहेत. कटेवर हात म्हणजे, कर्मेंदि्रये अधीन आहेत.
२. ‘भक्त पुंडलिकाने दिलेली वीट
वीट हे पृथ्वीतत्त्वाचे प्रतीक आहे. पृथ्वीतत्त्वापासून संसाराचा आरंभ होतो. अशा प्रकारे संसार आणि अध्यात्म याची सांगड विठ्ठलाच्या मूर्तीत चांगल्या प्रकारे घातली गेली आहे.
२. पांडुरंग
योगमार्गामध्ये पांढरा रंग निर्गुण तत्त्वाचे प्रतीक समजला जातो. सगुण रूपाला ‘श्री विठ्ठल’, तर निर्गुण रूपाला ‘पांडुरंग’ असे म्हटले जाते. हिमालयात अधिकांश शिवलिंगे पांढर्या रंगाची आहेत. त्यामुळे पांडुरंग हाच महादेव आणि विठ्ठल आहे.
३. मुक्तकेशी दासी
मुक्तकेशी दासीची बोटे पांडुरंगाच्या पायांत रुतली आहेत. बोटाची तशी खूण श्री विठ्ठलाच्या चरणावर आहे. श्री विठ्ठलाच्या चरणांशी मुक्ती मिळते; परंतु पुंडलिकासाठी प्रत्यक्ष पांडुरंग अवतरला आहे. त्यामुळे मुक्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. ‘भक्ती करूनच मुक्ती मिळते’, असा याचा आध्यात्मिक अर्थ आहे.
४. श्री विठ्ठलाचे समचरण
श्री विठ्ठलाला सर्व समान आहे. कुणी लहान नाही, मोठा नाही. पांडुरंग हा समानतेचे प्रतीक आहे.
५. श्री विठ्ठलाच्या पायांतील तोडे
मनुष्याने स्वतःला बंधन घालून घ्यावे. कोणत्या मार्गानेे जायचे, ते ठरवून घ्यावे. वाममार्गाला जात आहोत कि चांगल्या मार्गाने, हे पहावे. ‘चांगल्या मार्गाने जातांनासुद्धा अहंकाराची बेडी पडता कामा नये. त्यामुळे चांगल्या मार्गाने जातांनाही काही बंधने पाळणे आवश्यक आहे’, असे हे तोडे सांगतात. शिवाय तोडे असेही सांगतात की, चांगले-वाईट काही न मानता साक्षित्वाने रहा.
६. श्री विठ्ठलाच्या दोन्ही पायांतील काठी
गुरे सैरावैरा धावत असतांना गुराखी काठीच्या साहाय्याने त्यांच्यावर नियंत्रण मिळवतो. तसे आपले षड्रिपू मधे मधे उधळत असतात. त्यांना साधनारूपी काठीने नियंत्रित ठेवायचे असते. संयमाने रहायचे असते. त्याचे प्रतीक ही काठी आहेे.
७. श्री विठ्ठलाच्या पितांबराचा सोगा
देवाचे पितांबर सोन्याचे असते. ध्यानमार्गामध्ये तेजाचे प्रतीक म्हणून नील वर्ण, पांढरा रंग आणि शेवटी सुवर्णाचा रंग असे सांगितले आहे. त्या सुवर्णतेजाचे प्रतीक म्हणजे श्री विठ्ठलाच्या पितांबराचा सोगा आहे.
८. कमरेचा वासरीवेलाचा करगोटा (करदोडा)
वासना, षड्रिपू देवाने स्वतःच्या कमरेला बांधले आहे. देव कंबर कसून सर्व गोेष्टींसाठी सिद्ध आहे. तसेच मानवानेही करायचे आहे.
९. अर्धांगिनी रुक्मिणीला बसायला दिलेली जागा
स्त्री आणि पुरुष एकच आहेत. स्त्री शिवाय पुरुष अपूर्ण आहे, याचे प्रतीक ही जागा आहे.
१०. श्रीवत्सलांच्छन
भृगुऋषींनी देवाच्या छातीवर लाथ मारल्याची ही खूण आहे. देवाने ऋषींची लाथ छातीवर झेलली. या ठिकाणी देवाने कुठलाही अहंकार बाळगला नाही. त्रागा न करता संयमाने ती खूण देव छातीवर मिरवत आहे. यातून देव आपल्याला राग आणि अहं घालवायला सांगत आहे. रागावर नियंत्रण मिळवावे, हे श्री विठ्ठल यातून आपल्याला सांगत आहे.
११. उजव्या हातातील कमळाची पाकळी
हे शांतीचे प्रतीक आहे.
१२. कानातील मकराकार कुंडले
ही कुंडले आपल्याला विकार विसरण्यास सांगत आहेत. ध्यानसाधनेद्वारे आपण नवद्वारांपैकी कान सोडून अन्य सर्व द्वारे बंद करू शकतो. कान बंद करणे, हे केवळ निर्विकल्प समाधीमध्येच शक्य असते. मत्स्य हे आपतत्त्वाचे प्रतीक आहे. जोपर्यंत आपण आपतत्त्वावर विजय मिळवत नाही, तोपर्यंत वायूतत्त्वापर्यंत पोहोचू शकत नाही. वायूतत्त्वापर्यंत पोहोचल्यानंतर आपण निर्विकल्प समाधीत जाणे आणि ध्वनीवर नियंत्रण मिळवणे; म्हणजे कान बंद करणे सुलभ होते, हेच ही मकराकार कुंडले आपल्याला सांगतात.
१३. श्री विठ्ठलाच्या मस्तकावरील महादेवाच्या पिंडीचा आकार
भ्रूमध्याच्या वर चिदाकाश आहे. या चिदाकाशातील शुद्ध जाणिवेलाच आपण परमात्मा म्हणतो. हे महादेवाचे निर्गुण तत्त्व आहे.
श्री विठ्ठलाच्या दर्शनाचा आरंभ होतो, तो वीटेपासून म्हणजे देवाच्या सगुण रूपापासून आणि शेवट होतो, तो महादेवाच्या पिंडीच्या आकाराच्या दर्शनात. साधनेत ‘सोहम्, सोहम्’ सांगितले जाते किंवा ‘हंसोहम्’ असे म्हटले जाते. ‘सोहम्, सोहम्’ म्हणतांना आपला श्वास स्थिरावतो आणि हंस होतो. त्यानंतर तो चिदाकाशात जातो. या चिदाकाशातील जी अहंविरहीत पूर्ण शुद्ध जाणीव आहे, ती म्हणजे ‘सोहम्’ किंवा ‘अहं ब्रह्मास्मि ।’ म्हणजे ‘मी ब्रह्म आहे’, ही जाणीव.’
(‘श्रीक्षेत्र पंढरपूरचा महिमा आणि श्री विठ्ठलाचे मूर्तीविज्ञान या प्रकल्पातील ध्वनी ऐकून संकलित केलेली महत्त्वाची सूत्रे)
पंढरपूरला आद्य शंकराचार्यांनी ‘महायोगपीठ’ म्हणण्याचे कारण
‘तीर्थक्षेत्र एकतर योगपीठ असते किंवा शक्तीपीठ असते; परंतु शंकराचार्यांनी पंढरपूरला ‘महायोगपीठ’ म्हटले आहे. तीर्थक्षेत्री भक्त देवाच्या किंवा शक्तीपिठावर देवीच्या दर्शनासाठी जात असतात; मात्र पंढरपूरला पांडुरंग भक्त पुंडलिकाची वाट पहात तिष्ठत उभा आहे. परमेश्वर भक्ताची वाट पहात आहे; म्हणून हे महायोगपीठ आहे. ‘पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये सगुण आणि निर्गुण रूपांचा उत्कृष्ट संयोग (मिलाफ) आहे’.
– श्री. मुकुंद भगवान पुजारी, पंढरपूर
‘हिंदु धर्मामध्ये वास्तूशास्त्राप्रमाणे असलेली तीन पीठे
१. भक्तीपीठ, २. गजपीठ आणि ३. शक्तीपीठ
१. भक्तीपीठ
जी जागा कूर्माकार, म्हणजे कासवाच्या पाठीप्रमाणे असते, तेथे भक्तीपीठ वसलेले असते. या जागेला चारही बाजूंना उतार असतो. या पिठाला कूर्मपीठ असेही म्हटले जाते. ज्याप्रमाणे कासव त्याचे अवयव स्वतःच्या शरिरात लपवून ठेवते, तसे भक्तांनीही आपला अहंकार, दोष इत्यादींचा संकोच करून लीन भावाने भगवंताच्या दर्शनासाठी यावे. असे ते दशर्वते. अशा पिठावर केवळ भक्तच नव्हे, तर देव आणि दानवसुद्धा लीन होतात.
१ अ. पंढरपूरला भक्तीपीठ म्हणण्याचे कारण
एखादी व्यक्ती कितीही नास्तिक असली, तरी पंढरपूरला आल्यावर भक्तीमय होते; म्हणूनच पंढरपूरला ‘भक्तीपीठ’ म्हणतात.
२. गजपीठ
ज्या पिठामध्ये ईशान्येला पाण्याचा प्रवाह आणि साठा असतो आणि दक्षिणेला अन् नैऋत्येला उंच उंच डोंगर असतात, त्याला ‘गजपीठ’ असे म्हणतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे तिरुपती बालाजीचे पीठ. हे पीठ ‘सर्वोत्कृष्ट गजपीठ’ मानले जाते.
३. शक्तीपीठ
शक्तीपिठामध्ये ज्या जागेवर मंदिर असते, तेथील उतार पूर्णतः पश्चिमेला असतो. ‘शक्तीपीठ’ बहुतांशी देवीशी संबंधित आहे. तुळजापूरचे श्री भवानी मंदिर, कोल्हापूरचे श्री महालक्ष्मी मंदिर यांचा उतार पश्चिमेला आहे.
श्री विठ्ठल म्हणजे भगवंताचा नववा अवतार – बौद्धावतार होय !
‘पंढरपूर हे देवाच्या नवव्या अवताराचे कलीयुगातील पीठ आहे. श्री विठ्ठल हा श्रीविष्णूचा अवतार आहे. भगवंताचा नववा अवतार हा बौद्धावतार आहे. बौद्ध म्हणजे बांधलेला. जो भक्ताच्या शब्दाला बांधला आहे, भक्तासाठी बांधलेला आहे, तो हा बौद्धावतार.’
– श्री. नरसिंह उपाख्य प्रशांत सखाराम पुजारी, पंढरपूर (श्री विठ्ठलाच्या ७ सेवेकर्यांपैकी एक सेवेकरी)
bhaktipit