अनुक्रमणिका
१. विकारांची संख्या अधिक असलेला शरद ऋतू
‘पावसाळा संपल्या संपल्या सूर्याचे प्रखर किरण धरणीवर पडू लागतात, तेव्हा शरद ऋतूला आरंभ होतो. पावसाळ्यामध्ये शरिराने सततच्या थंड वातावरणाशी जुळवून घेतलेले असते. शरद ऋतूचा आरंभ झाल्यावर एकाएकी उष्णता वाढल्याने नैसर्गिकपणे पित्तदोष वाढतो आणि डोळे येणे, गळू होणे, मूळव्याधीचा त्रास बळावणे, ताप येणे यांसारख्या विकारांची शृंखलाच निर्माण होते. शरद ऋतूमध्ये सर्वाधिक विकार होण्यास वाव असतो, म्हणूनच ‘वैद्यानां शारदी माता ।’ म्हणजे ‘(रुग्णांची संख्या वाढवणारा) शरद ऋतू वैद्यांची आईच आहे’, असे गमतीत म्हटले जाते.
२. ऋतूनुसार आहार
२ अ. शरद ऋतूत काय खावे आणि काय खाऊ नये ?
२ आ. आहारासंबंधी काही महत्त्वाची सूत्रे
२ आ १. भूक लागल्यावरच जेवा !
पावसाळ्यामध्ये पचनशक्ती मंद असते. शरद ऋतूमध्ये ती हळूहळू वाढू लागते. यासाठी भूक लागल्यावरच जेवावे. नियमितपणे भूक नसतांना जेवल्यास पचनशक्ती बिघडते आणि पित्ताचे त्रास होतात.
२ आ २. प्रत्येक घास ३२ वेळा चावून खा !
‘असे चावून चावून जेवल्यास फार वेळ लागेल, वेळ वाया जाईल’, असे काही जणांना वाटू शकते; परंतु अशा रितीने जेवल्यास फार थोडे जेवले, तरी समाधान होते आणि अन्नपचन नीट होते. प्रत्येक घास ३२ वेळा चावल्याने त्यामध्ये लाळ चांगल्या प्रकारे मिसळली जाते. असे लाळमिश्रित अन्न पोटात गेल्याने अमुक पदार्थाने पित्त होते, ‘अमुक पदार्थ मला पचत नाही’, असे म्हणण्याची वेळ कधीही येत नाही; कारण लाळ ही आम्लाच्या विरोधी गुणांची आहे. ती भरपूर प्रमाणात पोटात गेल्यावर अती प्रमाणात वाढलेल्या पित्ताचे शमन होते.
स्वामी रामसुखदासजी महाराज यांनी त्यांच्या एका प्रवचनामध्ये ‘प्रत्येक घास ३२ वेळा चावून झाला, हे कसे ओळखावे’, यासंबंधी सुंदर मार्गदर्शन केले आहे. प्रत्येक घास चावतांना ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ॥’ या नामजपातील प्रत्येक शब्द २ वेळा म्हणावा. प्रत्येक शब्दाला एकदा या गतीने चावावे. या जपामध्ये १६ शब्द आहेत. त्यामुळे एका घासाला २ वेळा जप केल्याने ३२ वेळा चावून होते आणि भगवंताचे स्मरणही होते.
शरद ऋतूत निरोगी रहाण्यासाठी हे करा !
‘पावसाळा संपून थंडीचे दिवस चालू होईपर्यंत शरद ऋतू असतो. या काळात निरोगी रहाण्यासाठी पुढील कृती कराव्यात.
१. ४ वेळा न खाता २ किंवा ३ वेळा आहार घ्यावा.
२. तिखट, चटपटीत आणि तळलेले पदार्थ खाणे टाळावे.
३. तेलाचा वापर मर्यादित प्रमाणात करावा.
४. दिवाळीपर्यंत दही खाऊ नये (ताक चालते).
५. दुपारचे कडक ऊन टाळावे.
६. दुपारी झोपू नये. झोप आवरतच नसल्यास १५ ते २० मिनिटेच झोप घ्यावी.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१०.२०२२)
२ इ. पिण्याच्या पाण्याविषयी थोडेसे
२ इ १. अमृतासमान असलेले हंसोदक
‘पाऊस संपल्यावर आकाशामध्ये अगस्ती तार्याचा उदय होतो. यामुळे (प्रदूषणरहित नैसर्गिक) जलाशयांतील पाणी निर्विष बनते’, असे आयुर्वेदात सांगितले आहे. दिवसभर सूर्यप्रकाशात तापलेले आणि रात्री चंद्रकिरणांचा संस्कार झालेले पाणी ‘हंसोदक’ या नावाने ओळखले जाते. हे अमृतासमान असते. ज्यांना शक्य असेल, त्यांनी संपूर्ण शरद ऋतूमध्ये प्रदूषणरहित नैसर्गिक जलाशयांतील (उदा. विहिरी, वहात्या पाण्याचे झरे यांतील) असे स्वच्छ पाणी नेहमी प्यावे.
२ इ २. कूलरमधील थंड पाणी आरोग्याला अपायकारक
‘मातीच्या मडक्यात ठेवलेले पाणी पित्तशामक असते. मातीमधून शरिराला आवश्यक ती खनिजे मिळतात. यासाठी या ऋतूत, तसेच नेहमीही मातीच्या मडक्यात ठेवलेले पाणी पिणे लाभदायक आहे. शीतकपाटातील किंवा कूलरमधील थंड पाणी पिणे आरोग्याला अपायकारक आहे. थंडाईसाठी तुळशीचे बी किंवा वाळा घातलेले पाणी, आवळा सरबत इत्यादी पर्यायही या ऋतूत लाभदायक आहेत.’
३. शरद ऋतूमध्ये उपयुक्त आयुर्वेदीय औषधे
वैद्य मेघराज पराडकर
औषधाचे नाव | कोणत्या विकारांत उपयोग करावा ? (टीप १) | |
---|---|---|
१. | यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्ण | तोंडवळ्यावर मुरुम येणे, तोंड येणे, आम्लपित्त आणि उष्णतेचे विकार (टीप २) |
२. | आमलकी (आवळा) चूर्ण | डोकेदुखी, तोंडाला कोरड पडणे, पित्तामुळे उलट्या होणे, बद्धकोष्ठता, मूत्रमार्गाची जळजळ होणे आणि हातापायांची आग होणे |
३. | वासा (अडुळसा) चूर्ण | ताप हे लक्षण असलेले साथीचे विकार, तसेच नाकातून रक्त येणे, उष्णतेचे विकार आणि रक्तप्रदर (टीप ३) |
४. | उशीर (वाळा) चूर्ण | उष्णतेचे विकार, अतीसार (जुलाब) होणे आणि शौचावाटे रक्त पडणे |
५. | मुस्ता (नागरमोथा) चूर्ण | तहान लागणे, कणकण (मंद ताप) आणि अंगदुखी |
६. | ब्राह्मी चूर्ण | झोप न लागणे, उष्णतेचे विकार, पित्त होणे, चक्कर येणे आणि मूत्रमार्गाची जळजळ होणे |
७. | शतावरी चूर्ण वटी (गोळ्या) | थकवा, शरीर कृश असणे, उन्हाळे लागणे (मूत्रमार्गाची जळजळ होणे, तसेच लघवी अल्प होणे), आम्लपित्त, उष्णतेचे विकार आणि रक्तप्रदर (टीप ३) |
८. | कुटज घनवटी (गोळ्या) | अतीसार (जुलाब), मूळव्याधीतून रक्त पडणे आणि रक्तप्रदर |
९. | सूतशेखर रस (गोळ्या) | चक्कर येणे, डोकेदुखी, तोंड येणे, आम्लपित्त, उलटी, पोटात दुखणे, पचनशक्ती अल्प असणे, अतीसार (जुलाब), उचकी, दमा, ताप, शरीर क्षीण होणे, अंगावर पित्त उठणे आणि पित्तामुळे झोप न येणे |
टीप १ – औषधांचे सविस्तर उपयोग औषधाच्या डबीसोबतच्या पत्रकात दिले आहेत. औषधे वैद्यांच्या समादेशाने (सल्ल्याने) घ्यावीत.
टीप २ – उष्णतेचे विकार : उष्ण पदार्थ न सोसणे, तोंड येणे, अंगाची आग होणे, मूत्रमार्गाची जळजळ होणे, अंगावर पुरळ उठणे, चक्कर येणे इत्यादी
टीप ३ – रक्तप्रदर : पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होणे
४. शरद ऋतूतील इतर आचार
४ अ. अंघोळीपूर्वी नियमित तेल लावणे
या ऋतूत अंघोळीपूर्वी नियमितपणे अंगाला खोबरेल तेल लावल्यास त्वचेवर पुटकुळ्या उठत नाहीत. अती घाम येणे या उष्णतेमुळे होणार्या विकारामध्येही सर्वांगाला खोबरेल तेल लावणे लाभदायक आहे.
४ आ. सुगंधी फुले समवेत बाळगणे
सुगंधी फुले पित्तशमनाचे कार्य करतात. त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी पारिजात, चाफा, सोनटक्का, अशी फुले समवेत बाळगावीत.
४ इ. कपडे
सुती, सैलसर आणि उजळ रंगाचे असावेत.
४ ई. झोप
रात्री जागरण केल्याने पित्त वाढते, यासाठी या ऋतूत जागरण करणे टाळावे. पहाटे लवकर उठावे. या दिवसांत घराच्या आगाशीत अथवा अंगणात उघड्या चांदण्यात झोपल्याने शांत झोप लागते आणि सर्व शीणही नाहीसा होतो. या ऋतूत दिवसा झोपणे वर्ज्य आहे.
५. शरदातील सर्वसाधारण विकारांवर सोपे आयुर्वेदीय उपचार
५ अ. शोधन किंवा पंचकर्म
विशिष्ट ऋतूंमध्ये शरिरात वाढणारे दोष शरिरातून बाहेर काढून टाकणे याला शोधन किंवा ‘पंचकर्म’ असे म्हणतात.
५ अ १ विरेचन
या ऋतूच्या आरंभी विरेचन म्हणजे जुलाबाचे औषध घ्यावे, म्हणजे शरीर निरोगी रहाण्यास साहाय्य होते. यासाठी सलग ८ दिवस रात्री झोपतांना १ चमचा एरंडेल तेल किंवा तेवढेच ‘गंधर्व हरीतकी चूर्ण’ (हे आयुर्वेदीय औषधांच्या दुकानात मिळते.) गरम पाण्यातून घ्यावे.
५ अ २. रक्तमोक्षण
शरीरस्वास्थ्यासाठी शिरेतून रक्त काढणे, याला आयुर्वेदात रक्तमोक्षण असे म्हणतात. स्वास्थ्यरक्षणासाठी प्रत्येक शरद ऋतूमध्ये एकदा रक्तमोक्षण करावे, असे आयुर्वेदात सांगितले आहे. रक्तमोक्षणामुळे तोंडवळ्यावर पुटकुळ्या येणे, नाकातून रक्त येणे, डोळे येणे, गळवे होणे यांसारख्या विकारांना प्रतिबंध होतो. रक्तदान करणे हेही एकप्रकारे रक्तमोक्षणच होते. त्यामुळे ज्यांना शक्य आहे, त्यांनी या ऋतूच्या आरंभीच्या १५ दिवसांमध्ये एकदाच रक्तपेढीत रक्तदान करावे. रक्तदान तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच होत असल्याने यामध्ये काळजीचे कारण नसते.
५ अ २ अ. रक्तदानासंबंधी एक वेगळा विचार
अॅलोपॅथीनुसार एकाचे रक्त दुसर्याला देतांना रक्तदान करणार्या आणि रक्त ग्रहण करणार्या व्यक्तीचे रक्तगट जुळतात की नाही, हे पाहिले जाते. देणार्याच्या रक्तामध्ये हानीकारक रोगजंतू नाहीत ना, हेही पाहिले जाते; परंतु दोघांच्या रक्तामधील वात, पित्त आणि कफ यांची स्थिती लक्षात घेतली जात नाही. तशी स्थिती लक्षात घेऊन एकाचे रक्त दुसर्याला देणे, हा खरोखर एक संशोधनाचा विषय ठरेल; कारण रक्त ग्रहण करणार्या रुग्णाच्या शरिरात पित्त वाढलेले असतांना त्याला पुन्हा पित्ताचेच प्रमाण जास्त असलेले रक्त दिले, तर रक्त ग्रहण करणार्या रुग्णाचे पित्त अजून वाढून त्याचा विकार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा विचार आज अॅलोपॅथीने केलेला नसला, तरी आयुर्वेदाचा अभ्यासक म्हणून मी हा विचार येथे मांडला आहे.
५ आ. घरगुती औषधे
या दिवसांत होणार्या उष्णतेच्या सर्व विकारांवर चंदन, वाळा, अडूळसा, गुळवेल, किराइत, कडूनिंब, खोबरेल तेल, तूप यांसारखी घरगुती औषधे फारच लाभदायक आहेत. यांचा वापर पुढीलप्रमाणे करता येतो –
१. चंदन सहाणेवर उगाळून सकाळ-संध्याकाळ अर्धा चमचा गंध वाटीभर पाण्यातून घ्यावे किंवा उगाळलेले गंध त्वचेवर बाहेरून लावावे. (४ ते ७ दिवस)
२. वाळ्याची मुळे पाण्यात ठेवून ते पाणी प्यावे.
३. अडूळसा, गुळवेल किंवा किराइत यांचा काढा करून १-१ कप दिवसातून ३ वेळा घ्यावा. (४ ते ७ दिवस)
४. कडुनिंबाच्या पानांचा वाटीभर रस सकाळी रिकाम्या पोटी प्यावा. (४ ते ७ दिवस)
५. खडीसाखरेवर खोबरेल तेल किंवा तूप घालून ती चाटावी.
टीप : ४ ते ७ दिवस घेण्याची औषधे त्यापेक्षा जास्त दिवस सतत घेऊ नयेत.
५ इ. शरद ऋतूमध्ये येणार्या तापामध्ये कोणता आहार घ्यावा ?
‘पावसाळा संपून थंडी चालू होईपर्यंतच्या काळाला शरद ऋतू म्हणतात. या ऋतूच्या आरंभीच्या काळामध्ये तापाची साथ येण्याची शक्यता असते. ताप आलेला असतांना दिवसातून २ वेळाच आहार घ्यावा. आहारामध्ये वरण, भात, तूप आणि आवश्यकता वाटल्यास चवीसाठी थोडेसे लोणचे घ्यावे. अन्य वेळी अधेमधे पिण्याच्या पाण्यामध्ये १ लिटरमागे २ चमचे धने, पाव चमचा वाळा चूर्ण, पाव चमचा नागरमोथा चूर्ण घालून उकळलेले पाणी प्यावे. (प्रमाण मोजण्यासाठी चहाचा चमचा वापरावा.) ताप असतांना दूध, दही किंवा ताक घेऊ नये. अधेमधे खाणे टाळावे.
केवळ २ वेळाच वरीलप्रमाणे आहार घेतल्याने ताप लवकर बरा होतो; परंतु काहींना घन अन्न जात नसेल, तर दिवसभरात भूक लागेल त्या वेळी मुगाच्या डाळीचे वरण, कढण (मूगडाळ शिजवून तिच्यामध्ये चवीपुरते मीठ आणि गूळ घालून बनवलेला पातळ पदार्थ) किंवा भाजलेल्या गव्हाच्या बारीक रव्याची दूध न घालता केलेली पातळ खीर प्यावी. पातळ आहार २ पेक्षा जास्त वेळा घेतल्यास चालतो.’
– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१०.२०२२)
६. हे कटाक्षाने टाळा !
या ऋतूत भर उन्हात फिरणे, पाण्याचे तुषार अंगावर घेणे, दवात भिजणे, सतत पंख्याचा जोराचा वारा अंगावर घेणे, रागावणे, चिडचिड करणे या गोष्टी या ऋतूत कटाक्षाने टाळाव्यात. या गोष्टींमुळे शरिरातील वातादी दोषांचे संतुलन बिघडते आणि विकार निर्माण होतात.
– वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.९.२०१४)