उपवास

Article also available in :

अनुक्रमणिका

‘पुष्कळसे श्रद्धाळू भारतीय नियमितपणे ठराविक दिवशी, पर्वासारख्या विशेष दिवशी किंवा व्रताच्या वेळी उपवास करतात. त्या दिवशी काही जण दिवसातून एकदाच भोजन करतात किंवा काही जण फलाहार करतात, तर काही जण साधा आहार घेतात. काही जण पाणीही न पिता अगदी कडक निर्जल उपवास करतात. ईश्वराला प्रसन्न करणे किंवा स्वतःला शिक्षा म्हणून प्रायश्चित्त घेणे आणि कधी कधी विरोध प्रकट करणे यांसाठी उपवास केला जातो.

 

१. उपवास

दक्षिणायनात वर्षा, शरद व हेमंत हे ऋतू येतात. या तीन ऋतूंमध्ये सणवार जास्त प्रमाणात आहेत. त्यातल्यात्यात वर्षा ऋतूत सणवार सर्वाधिक आहेत. पावसाळा असल्यामुळे रोगराईचे प्रमाण जास्त असते. प्रकृतीस्वास्थ्याकडे लक्ष देण्याची गरज असते. सणवाराच्या निमित्ताने अधूनमधून उपवास घडतो, सात्त्विक अन्न पोटात जाते, तसेच बाहेरचे खाण्यावर काही प्रमाणात तरी मर्यादा येतात.

१. अ. ‘उपवास’ या शब्दाचा अर्थ

संस्कृतमध्ये उपवास या शब्दाची फोड ‘उप + वास’, अशी आहे. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे रहाणे; म्हणून ‘उपवास’ म्हणजे ईश्वराच्या जवळ रहाणे किंवा ईश्वराच्या सतत अनुसंधानात रहाणे.

२. उपवास – भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य !

‘निरनिराळे उपवास हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. या उपवासांना साधुसंतांचे, ऋषी-मुनींचे आशीर्वाद असल्याने उपासकांना दैवी तेज प्राप्त होते. सत्पुरुषांच्या सांगण्यावरून उपवास आणि उपासना केली, तर त्यांचे अधिक तेेज प्राप्त होते. याशिवाय उपासाला आयुर्वेदातील आरोग्यशास्त्राचा आधार आहेच. योगशास्त्रातही उपवास अंतर्भूत आहे.

 

३. उपवासाची अद्वितीय वैशिष्ट्ये

३ अ. अपथ्य केल्याने शरिरातील ७२ सहस्र नाड्यांमधून होणार्‍या प्राणशक्तीच्या वहनाला अडथळा येणे

सर्वेषाम् एव रोगाणां निदानं कुपिता मलाः ।
तत्प्रकोपस्य तु प्रोक्तं विविधाहितसेवनम् ॥ – अष्टांगहृदय, निदानस्थान, अध्याय १, श्‍लोक १२

अर्थ : प्रकुपित झालेले (बिघडलेले) वात, पित्त आणि कफ हे सर्व रोगांचे कारण आहे. शरिराला अपथ्यकारक असे अन्न ग्रहण करणे हे वात, पित्त आणि कफ प्रकुपित होण्यास कारणीभूत आहे.

मनुष्याच्या शरिरात ७२ सहस्र नाड्या (प्राणशक्तीवाहिनी) आहेत. विविध प्रकारच्या अपथ्य सेवनाने (दूषित) वायू निर्माण होतो. त्या वायूने, तसेच (अपथ्यकारक) अन्नरसांतून निर्माण होणार्‍या आमाने (म्हणजेच विषारी घटकांनी) त्या नाड्या भरून जातात. अशा आमवायूने (दूषित वायू आणि आम यांनी) भरलेल्या वायूनलिकांमध्ये प्राणशक्तीचा संचार होऊ शकत नाही.

३ आ. उपवासामुळे शरिरात दैवी किरणांचा प्रवेश होणे आणि पचन सुधारून आरोग्य लाभणे

उपवासामुळे प्राणवायूचा संचार योग्य रितीने होऊ लागतो. प्राणवायूमध्ये इतरही अनेक (दैवी) शक्तींचा (किरणांचा) समावेश असतो. उपवासामुळे ते दैवी किरण शरिरात प्रवेश करतात. त्यामुळे सूक्ष्म शरिराचे तेज वाढते. आयुर्वेदानुसार उपवास केल्याने शरिरातील द्रव पदार्थांचे वहन करणार्‍या नाड्यांतील अन्नाचे पचन होते. शरिरातील (जठरातील) स्थूल पचनाप्रमाणे सप्तधातूंतील पचनही योग्य प्रकारे होऊन शरिराला लघुता (हलकेपणा) प्राप्त होते आणि आरोग्य लाभते.’

– वैद्य वि. भि. परदेशी, पुणे (संदर्भ : मासिक ‘धार्मिक’, एप्रिल १९८९)

३ इ. भगवत्प्राप्ती

कूर्मपुराणानुसार व्रतामुळे भगवंताची प्राप्ती होते.

व्रतोपवासैर्नियमैर्होमैर्ब्राह्मणसंतर्पणैः ।
तेषां वै रुद्रसायुज्यं जायते तत् प्रसादतः ।।

अर्थ : व्रत, उपवास, नियम (योगमार्गातील यम-नियम), होम, ब्राह्मणसंतर्पण यांचा प्रसाद म्हणून सायुज्य मुक्ती मिळते.

३ ई. पापांचे परिमार्जन

व्रतोपवासनियमैः शरीरोत्तापनैस्तथा ।
वर्णाः सर्वेऽपि मुच्यन्ते पातकेभ्यो न संशयः ।। – देवल

अर्थ : व्रत, उपवास, नियम व शारीरिक तप यांमुळे सर्व वर्ण पातकांपासून मुक्त होतात, यात शंका नाही.

३ उ. कायिक (शारीरिक) व्रते

उपवास करणे, एकभुक्त रहाणे, हिंसा न करणे वगैरे.

दात घासणे : उपवासाच्या दिवशी व श्राद्धाच्या दिवशी दात घासू नयेत.
जरूर वाटल्यास पाण्याने गुळण्या कराव्यात. बारा चुळा भराव्यात अथवा आंब्याच्या पानाने, काष्ठाने किंवा बोटाने दात स्वच्छ करावेत.

कायिक (शारीरिक) व्रते : उपवास, एकभुक्त रहाणे वगैरे तपांमुळे मोठी फळे मिळतात. यांमुळे परपिडेचे निवारण होते.

 

४. उपवासासंबंधी व्रते

‘कोणतेही लहान-मोठे व्रत असो, त्यात उपवास बहुतेक सांगितलेलाच असतो. व्रताचे ते अविभाज्य अंग असल्यासारखे असते. उपवासाचेही काही प्रकार आहेत. ते अयाचित, चांद्रायण व प्राजापत्य या व्रतांत पहावयास सापडतात. व्रत आणि उपवास या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, असा लोकांचा समज आहे. वास्तविक व्रत आणि उपवास दोन्ही एकच आहेत. फरक इतकाच आहे की, व्रतामध्ये भोजन केले जाते आणि उपवासात भोजन केले जात नाही. व्रत हा शास्त्राने सांगितलेला एक नियम असून उपवास हे त्याचे लक्षण होय.

४ अ. एकभुक्त व्रत

या व्रताचे पुढील प्रकार आहेत.
४ अ १. स्वतंत्र : अर्धा दिवस संपल्यानंतर स्वतंत्र व्रत होते.
४ अ २. अन्यांग : अपराण्हकाळी (तिसर्‍या प्रहरी, दुपारी) अन्यांग व्रत होते.
४ अ ३. प्रतिनिधी : सकाळी, दुपारी केव्हाही प्रतिनिधी व्रत होते.

या एकभुक्त व्रतात दिवसातून विहितकाळी फक्त एकवेळ भोजन करावयाचे असते.

४ आ. नक्त व्रत

‘नक्त’ म्हणजे काळाचा एक विभाग. सूर्यास्तानंतर नक्षत्रे दिसण्यापूर्वीचा काळ ‘नक्तकाळ’ समजला जातो. दिवसभर न जेवता या नक्तकाळात मनुष्य भोजन करून व्रत करतो. हे उपवासाशी संबंध नसलेले विशिष्ट व्रत आहे. संन्यासी व विधवा स्त्रिया हे व्रत सूर्य असतांना, म्हणजे दिवसा करतात.

४ इ. अयाचित व्रत

अयाचित म्हणजे याचना न करता किंवा कोणाला विनंती न करता मिळेल तेवढ्या अन्नावर रहाणे. हे व्रत घेतलेला मनुष्य दिवसा किंवा रात्री एकदा भोजन करतो. या व्रतामध्ये दुसर्‍या कोणाजवळ अन्नाची याचना करावयाची नसते. एवढेच नव्हे, तर आपल्या पत्नीला अथवा सेवकाला अन्न वाढण्याची विनंती करण्यालादेखील बंदी असते. जर एखाद्याच्या पत्नीने अगर सेवकाने शिजविलेले अन्न घेऊन येण्यास सांगितलेले नसतांना आणले, तरच त्या मनुष्याला ते अन्न घेता येते. एरव्ही त्या अन्नाचे त्याला भोजन करता येत नाही. हे व्रत घेतलेल्यास दिवसातला निषिद्ध काळ भोजनास वर्ज्य असतो.

४ ई. चांद्रायण व्रत

आकाशस्थ चंद्राला प्रसन्न करून घेण्यासाठी चंद्रलोकाच्या प्राप्तीसाठी, तसेच जीवनात झालेल्या पापाच्या क्षालनासाठी या व्रताचे आचरण केले जाते. याचे पुढील प्रकार आहेत.

१. या व्रतातील अन्नग्रहण चंद्राच्या कलेप्रमाणे वाढत जाते आणि कमी होते. अमावास्येनंतरच्या प्रतिपदेपासून चंद्राच्या वाढत्या कलेप्रमाणे दुपारच्या भोजनाच्या वेळी एकेक घास वाढवून पौर्णिमेला पंधरा घास घेतात व पौर्णिमेनंतरच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदेपासून एकेक घास कमी करून अमावास्येला उपवास घडतो. हे एक चांद्रायण व्रत होय.

२. अमावास्येनंतरच्या शुक्ल प्रतिपदेला १४ घास, दि्वतीयेला १३ घास, असे प्रती दिवशी एकेक घास कमी कमी करत चतुर्दशीला भोजनास एक घास, पौर्णिमेलाही एक घास व पौर्णिमेनंतरच्या प्रतिपदेला एक याप्रमाणे दररोज एकेक घास वाढवत अमावास्येच्या आदल्या दिवशी म्हणजे चतुर्दशीला चौदा घास भोजनसमयी घेतात व अमावास्येदिवशी उपवास घडतो.

४ उ. प्राजापत्य व्रत

हे व्रत बारा दिवसांचे आहे. व्रताच्या प्रारंभी पहिल्या तीन दिवसांत व्रत करणार्‍याने प्रती दिवशी भोजनाच्या वेळी बावीस घास घ्यायचे. नंतरच्या तीन दिवसांत दररोज सव्वीस घास व पुढचे तीन दिवस चोवीस घास प्रतीदिनी घ्यायचे व नंतर व्रतातले शेवटचे तीन दिवस संपूर्ण उपवास करावयाचा. याप्रमाणे बारा दिवसांत एक प्राजापत्य व्रत होते. ‘तोंडात मावेल एवढाच घास असावा’, असे या व्रतात सांगितले आहे.’

 

५. व्रत, उपवास इत्यादींचे महत्त्व ठाऊक नसलेले रजनीश !

टीका : ‘भूक मारल्यामुळे ती आणखीन वाढते आणि खाण्यास अयोग्य असे पदार्थ, उदा. फूल इत्यादी काहीही मानव खातो. (भूखको दबानेसे भूख जोर पकड़ती है और न खाने योग्य फूल आदिको भी प्राणी खाने लगते हैं ।) एक साधक अरण्यात रहात असतो. त्याचे उपवासाचे व्रत असते. त्याचा मित्र त्याला भेट पाठवू इचि्छतो. ‘काय पाठवायचे, उपवास असल्यामुळे खाण्याचे पदार्थ कसे पाठवायचे ?’, असा त्याला प्रश्न पडतो. तो फुलांचा गुच्छ पाठवतो. भूक अशी जोर करते की, उपवास करणारा व्रती ती फुलेच खातो. – रजनीश

खंडण : व्रत, उपवास यांवर रजनिशांनी शस्त्र धरले आहे. गेली २० वर्षे अखंड निर्जला एकादशीचे व्रत करणारे माझे मित्र आहेत. ते सांगतात, ‘‘आदल्या दिवसापासूनच मला एकादशीच्या उपवासाचे वेध लागतात. दशमीला रात्री जेवायचे नसते. मी जेवत नाही. व्रत असते तो दिवस परम प्रसन्न आणि परम सुखात जातो.’’

जैन लोकांमध्येही एक मास केवळ गरम पाणी पिऊन उपवास करतात. नव्या व्रतीला भूकेची वेदना होते; पण व्रताच्या दिवशी तो ती वेदना सहजतेने (संयमाने) सहन करू शकतो. त्यामुळे अन्नाची स्मृतीही त्याला होत नाही. ‘व्रताचे पालन होत आहे. प्रभूचरणी वृत्ती खिळत आहे’, ही धारणा असल्यामुळे प्रसन्नता असते.

याउलट उपवास न करणार्‍याला एखाद्या दिवशी जेवण मिळाले नाही, तर तो व्यथित आणि चिंताग्रस्त होतो. त्याचा उत्साह मावळतो. दुसर्‍या कामातही त्याचे मन लागत नाही. दृष्टी आणि अंतरीची वृत्ती पालटल्यावर एकच घटना एका दिवशी सुख देते, तर दुसर्‍या दिवशी दुःख देते.

माणसात मोठेपणा आला म्हणजे ‘आपण अभ्यास न करता काही म्हणावे आणि लोकांनी ते ऐकावे’, असे मानणार्‍यांपैकी हे रजनीश दिसतात.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (संदर्भग्रंथ : काय ? संभोगातून समाधी ??)

 

६. उपवासाच्या दिवशी पाळायचे नियम

६ अ. प्रातःकाळी करायच्या गोष्टी

अ. ‘नेहमीपेक्षा लवकर उठावे.

आ. जाग आल्यावर आपल्या इष्टदेवाचे स्वरूप आठवून त्याचे स्मरण करावे.

इ. शौच, व्यायाम, स्नान इत्यादी गोष्टी केल्यानंतर एक किंवा त्यापेक्षा अधिक माळा नामजप करावा.

६ आ. संकल्प

त्या दिवशी ‘ईश्‍वराच्या भक्तीत पूर्ण समर्पित होऊन उपवास करीन आणि त्याच्या सहवासात राहीन’, असा संकल्प करावा. या संकल्पाला मानसिक महत्त्व आहे.

६ इ. आहार

अ. रजोगुणी अन् तामसिक पदार्थ खाणे पूर्णपणे टाळावे.

आ. पचायला हलका, पौष्टिक आणि सात्त्विक आहार घ्यावा.

इ. शक्य असल्यास रसाळ मधुर फळे आणि दूध घ्यावे.

६ ई. लक्षात ठेवायच्या काही गोष्टी

अ. काम (वासना, इच्छा), क्रोध, मद आणि लोभ या मनोविकारांना दूर ठेवावे. कुणालाही मानसिक आणि शारीरिक कष्ट न देता अधिकाधिक आनंदी रहाण्याचा प्रयत्न करावा.

आ. काही घंटे वाचिक (तोंडाने) आणि मानसिक स्तरावर मौन पाळावे.

६ उ. इष्टदेवाचे दर्शन

सायंकाळी इष्टदेवाचे दर्शन घ्यावे.

६ ऊ. रात्री झोपण्यापूर्वी काय करावे ?

अ. इष्टदेवाचे स्वरूप आठवून त्याचे चिंतन करावे.

आ.‘दिवसभरात कुठे कोणत्या चुका झाल्या ?’, याचे आत्मपरीक्षण करावे.

अशा प्रकारे एक दिवसाचा उपवासही शारीरिक आणि मानसिक सुख देणारी एक दिवसाची तपस्याच होईल.’

संदर्भ : मासिक कल्याण’, ऑक्टोबर १९९३

 

७. उपवास केल्याने होणारे लाभ

अ. मनुष्याचा पुष्कळसा वेळ आणि शक्ती ‘खाण्या-पिण्याच्या वस्तू गोळा करणे, स्वयंपाकाची सिद्धता करणे, स्वयंपाक करणे, जेवणे अन् ते पचवणे’, यांमध्ये व्यतीत होते. काही विशेष प्रकारचे भोजन आपल्या मेंदूला मंद आणि विचलित करते. त्यामुळे काही ठराविक दिवशी व्यक्ती हलका आणि साधा आहार घेऊन किंवा काहीच न खाता स्वतःचा वेळ अन् शक्ती वाचवण्याचा निश्चय करते. त्यामुळे तिचे मन सतर्क आणि निर्मळ होते.

आ. परिणामी माणसाचे मन भोजनाच्या विचारांमध्ये मग्न रहाण्यापेक्षा ते चांगले विचार ग्रहण करू लागते.

इ. माणसाला कार्यक्षम रहाण्यासाठी थोड्या विश्रांतीची किंवा पालटाची आवश्यकता असते. उपवास केल्यामुळे शरिराला विश्रांती मिळते आणि आहारातील पालटामुळे पचनशक्ती सुधारते. त्यामुळे उपवास करणे संपूर्ण शरिरासाठी पुष्कळ लाभदायक ठरते.

ई. मनुष्य जेवढा अधिक इंद्रियांच्या अधीन जातो, तितक्या त्याच्या इच्छा वाढत जातात. उपवासामुळे मनुष्याला इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्यासाठी साहाय्य होते. उपवासामुळे हळूहळू इच्छा नाहीशा होतात आणि मन संतुलित अन् शांत रहाण्यासाठी साहाय्य होते.

 

८. उपवास करण्यामागील उद्देश

‘उपवासामुळे आपण दुर्बल आणि चिडचिडे होऊ किंवा नंतर आपली खाण्याची इच्छा अधिकच वाढेल’, असा उपवास करू नये. सहसा उपवास करण्यामागे उत्तम आणि उदात्त हेतू नसल्यासच असे होते. काही लोक केवळ वजन घटवण्यासाठी, तर काही लोक ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी किंवा इच्छापूर्तीसाठी उपवास करतात. काही लोक आपल्या संकल्पशक्तीचा विकास करण्यासाठी, काही जण इंद्रियांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि काही तपश्चर्या म्हणून उपवास करतात.

 

९. भगवद्गीतेत शुद्ध आणि सात्त्विक आहाराचे महत्त्व सांगितलेले असणे

भगवद्गीता उपयुक्त आहारावर भर देते. युक्त आहार म्हणजे अगदी अल्प नाही आणि पुष्कळही नाही, असा आहार. उपवास न करतासुद्धा ‘शुद्ध, सात्त्विक, साधा आणि पौष्टिक आहार घ्यावा’, असे भगवद्गीता सांगते.’

(साभार : मासिक ‘सत्संग पथ’, सप्टेंबर २००३)

Leave a Comment