वाईट शक्तींचा त्रास असणार्या, तसेच समष्टी दायित्व घेणार्या साधकांनी
केलेली उन्नती विशेष उल्लेखनीय असणे, समष्टी दायित्व घेणारे; पण दोष, अहं
यांमुळे प्रगती करू न शकलेल्यांनी निराश न होता तळमळीने साधना चालू ठेवणे आवश्यक !
(पू.) श्री. संदीप आळशी
६० टक्क्यांपेक्षा अधिक पातळी असणार्या बर्याच साधकांची प्रगती झाली; कारण त्यांनी त्यांची सेवा भावपूर्ण, परिपूर्ण आणि अहंरहितपणे करायचा प्रयत्न केला. या सर्वांमध्ये वाईट शक्तींचा त्रास असतांनाही प्रगती करणार्यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत आणि त्या खालोखाल समष्टी दायित्व घेणार्या साधकांचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत. समष्टी कार्यात चुका होऊ न देणे, समष्टी चुकांचे दायित्व घेणे, विविध प्रकृतीच्या साधकांची मने सांभाळून त्यांना साधनेत पुढे पुढे नेणे इत्यादी तारेवरची कसरत करत असतांनाच स्वतःच्या साधनेकडेही तेवढेच लक्ष देणे, हे कठीण असते.
ज्ञान, करुणा, प्रीती आदी ईश्वराच्या अनेक गुणांपैकी महत्त्वाचा गुण म्हणजे विश्वाचे दायित्व. ७० टक्के पातळीच्या पुढे समष्टी दायित्व घेणे हा गुण स्वतःत आला, तरच पुढची प्रगती लवकर होते. समष्टी दायित्व घेणार्या साधकांचे प्रयत्न म्हणूनच उल्लेखनीय आहेत; कारण त्यांच्यामध्ये या गुणाचा संस्कार आतापासूनच होत आहे.
समष्टी दायित्व घेऊनही दोष, अहं वा त्रास यांमुळे प्रगती न झालेल्यांनी निराश न होता साधना तळमळीने चालूच ठेवावी; कारण समष्टी दायित्व घेणे, या गुणाचा संस्कार त्यांच्यावरही होतच आहे.
प्रगती न झालेल्या वा अधोगती झालेल्या साधकांनी निराश न होता असा सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा !
६० टक्क्यांपेक्षा अधिक पातळी असणार्या काही साधकांची दोष, अहं वा वाईट शक्तींचा त्रास यांमुळे प्रगती झाली नाही वा अधोगती झाली. अशा साधकांनी निराश न होता पुढील सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा.
१. येणार्या काळात आपत्काळाची तीव्रता पुष्कळ वाढणार आहे. अशा तीव्र आपत्काळातही स्थिर राहून साधनेत प्रगती करण्यासाठी स्वतःमधील दोष अन् अहं अल्प असणे अत्यावश्यक आहे. तीव्र आपत्काळात साधनेला विरोध करणार्या वा साधनेत अडथळे आणणार्या वाईट शक्तींचा जोर पुष्कळ असतो. अशा वेळी आपल्यात दोष अन् अहं यांचे प्रमाण अधिक असले, तर साधनेची पुष्कळ हानी होऊन आध्यात्मिक पातळी पुष्कळ घसरते. या पार्श्वभूमीवर देवाने आताच आपले दोष अन् अहं दाखवून देऊन एकप्रकारे येणार्या आपत्काळाला चांगल्या प्रकारे सामोरे जाण्यासाठी आपल्याला सतर्कच केले आहे. याविषयी देवाप्रती कृतज्ञता वाटायला हवी.
२. अभियांत्रिकी महाविद्यालयात असतांना मला दुसर्या वर्षाला ५९ टक्के गुण मिळाले. तेव्हा मला पुष्कळ वाईट वाटले. याचा परिणाम म्हणून तिसर्या, म्हणजे अंतिम वर्षात मी चांगला अभ्यास केला अन् त्यामुळे मला ७२ टक्के गुण मिळाले. थोडक्यात अपयशही पुढे चांगले यश देण्यास साहाय्यभूतच ठरते.
– (पू.) श्री. संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.