श्राद्धामुळे पितरांना सद्गती मिळाली हे कसे ओळखावे ?

श्रद्धेने करतो ते श्राद्ध ! आपण श्रद्धेने केलेल्या श्राद्धाने पितरांना सद्गती मिळाली आहे का, हे ओळखण्याची काही लक्षणे या लेखातून जाणून घेऊ.

श्राद्धामुळे पितरांना सद्गती मिळाली हे ओळखण्याच्या संदर्भातील लक्षणे आणि अनुभूती

१. श्राद्ध करतांना

अ. अधिक उत्साह जाणवणे
आ. सूक्ष्म गंधाची अनुभूती येणे
इ. पिंडाभोवती सूक्ष्म तेजोवलय दिसणे
ई. पुढील प्रकारच्या अनुभूती येणे


१. श्राद्धाच्या प्रत्येक विधीतून समाधान मिळणे, पितरांसाठी केलेले पिंड तेजःपुंज दिसणे आणि पितरांचे आत्मे तृप्त झाल्याचे जाणवणे

‘३.६.२००५ या दिवशी माझ्या वडिलांच्या श्राद्धाच्या वेळी प्रत्येक विधी करत असतांना मला समाधान मिळाले. श्राद्धासाठी केलेले पिंड अतिशय तेजःपुंज दिसत होते, तसेच त्यांना वाहिलेली फुलेही फार आनंदी वाटत होती. पितरांच्या नावाने घातलेले ब्राह्मणभोजन झाल्यावर माझे वडील, तसेच इतर पितरांचे आत्मे तृप्त झाल्याचे मला जाणवले.’ – श्री. नितीन सहकारी, रामनाथी, फोंडा, गोवा.

२. श्राद्धाच्या वेळी पितरांचे अस्तित्व जाणवणे, पिंडांभोवती पिवळसर प्रकाश दिसणे आणि शास्त्रानुसार केलेल्या विधींमुळे सासरे तृप्त होऊन आशीर्वाद देत असल्याचे जाणवणे

‘३.६.२००५ या दिवशी झालेल्या माझ्या सासर्‍यांच्या श्राद्धाच्या वेळी सासरे, त्यांचे वडील आणि सासर्‍यांच्या वडिलांचे वडील या तिघांचेही अस्तित्व मला जाणवत होते. त्यांच्यासाठी बनवलेल्या ३ पिंडांभोवती पिवळसर प्रकाश दिसत होता. शास्त्रानुसार केलेल्या विधींमुळे तिघेही तृप्त होऊन आशीर्वाद देत असल्याचे जाणवले.’ – सौ. श्रुती नितीन सहकारी, सनातन आश्रम, रामनाथी, फोंडा, गोवा.

(हिंदु धर्मात वडिलांच्या श्राद्धाच्या वेळेस आजोबा आणि पणजोबा यांच्या नावेही पिंडदान केले जाते. हिंदु धर्माने सांगितलेल्या तात्त्विक भागाची प्रायोगिक अनुभूती साधिकेने घेतली. यावरून हिंदु धर्माने सांगितलेल्या शास्त्राची सत्यता लक्षात येते. – संकलक)

३. ‘एरव्ही श्राद्ध इत्यादी झाल्यावर पिंडाला शिवण्यासाठी कावळ्याला बोलवावे लागते; परंतु वडिलांच्या श्राद्धाच्या वेळी ३-४ कावळे आधीपासूनच झाडावर येऊन बसले होते.’ – श्री. नितीन सहकारी, रामनाथी, फोंडा, गोवा.

(सर्वसामान्यपणे सभोवतालचे रज-तमात्मक वातावरण भेदून पूर्वजांच्या लिंगदेहांना पिंडांमध्ये येणे कठीण जाते; परंतु इथे पूर्वजांची वैयक्तिक आध्यात्मिक पातळी, विधी करणार्‍याचा भाव आणि पूर्वजांना गती मिळावी यासाठी श्री दत्तगुरूंना केलेली प्रार्थना, यांमुळे वातावरणात चैतन्य निर्माण होऊन पूर्वजांना येणे सोपे झाले. – संकलक)

२. श्राद्धाच्या वेळी किंवा नंतर

‘वायूमंडलातून एखादी तेजशलाका वेगाने आकाशाच्या दिशेने झेपावतांना दिसून अदृश्य होणे

३. श्राद्धानंतर

अ. पितरांनी प्रत्यक्ष दृष्टांत देऊन ते संतुष्ट असल्याचा दाखला देणे
आ. लिंगदेह वातावरणात भटकत असल्याचा भास कधीही न होणे
इ. मृत्यूस्थानी शांतता जाणवणे किंवा मृत्यूस्थान प्रसन्न वाटणे (लिंगदेह वायूमंडलातच भटकत असेल, तर त्या स्थानी चक्रीवादळासारखा वारा घोंगावतांना जाणवतो. असे स्थान पाहून डोके जड होते आणि चक्कर येऊन प्राणशक्ती अल्प होते.)’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २.१२.२००५, दुपारी ४.२९)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्राद्धातील कृतींमागील शास्र’

Leave a Comment