आधारविधी

कोणत्याही संस्काराचा आरंभ आधारविधीने करण्यात यावा, असे शास्त्र आहे. या आधारविधीविषयी या लेखातून जाणून घेऊ.

विधी हा शब्द ‘विशेषेण धीयते’ असा बनला आहे. त्याचा अर्थ ‘धी’ नामक चांगल्या लहरी विशिष्ट पद्धतीने जातील, असे करणे.

 

१. श्री गणपतिपूजन

१ अ १. उद्देश

कोणत्याही मंगलकार्याच्या आरंभी, त्या कार्यात विघ्ने येऊ नयेत; म्हणून श्री गणपतिपूजन करण्याची पद्धत आहे.

१ अ २. सिद्धता

१ अ २ अ. स्नान

यजमान आणि यजमानिणीने स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत.

१ अ २ आ. आसन

भूमी पुसून, सारवून तीवर यजमान, यजमानीण आणि संस्कार्य व्यक्ती यांना बसण्यासाठी तीन पाट ठेवावेत. पाटावर लोकरीचे वस्त्र अंथरावे आणि पाटाभोवती रांगोळी काढावी. लाकडी पाट आणि लोकरीचे वस्त्र यांमुळे पूजेच्या वेळी निर्माण झालेली शक्ती शरिरातून लगेच भूमीत न जाता थोडा वेळ तरी शरिरात टिकते.

१ अ २ इ. आसनावर बसणे

यजमान (पती) आणि यजमानिणीने (पत्नीने) पूर्वेकडे तोंड करून बसावे; कारण पूर्व दिशा शुभकारक आहे. पत्नीने पतीच्या डाव्या अंगाला बसावे. पतीचे डावे अंग म्हणजे चंद्रनाडी. चंद्रनाडीच्या अंगाला पत्नी बसली की, शक्ती जास्त जागृत होत नाही. या पूजेत शक्तीजागृती नको असते, तर आनंददायी अनुभूतीची अपेक्षा असते. संस्कार्य व्यक्तीने पत्नीच्या डाव्या अंगाला बसावे. (पाठभेद : पत्नीने पतीच्या उजव्या अंगाला बसावे. यामुळे शक्ती जागृत होऊन विधीत अडथळे आणणार्‍या त्रासदायक शक्तींचा नाश होतो.)

१ अ २ ई. गंधधारण

सुवासिनींनी यजमान, यजमानीण, संस्कार्य व्यक्ती इत्यादींच्या कपाळावर गंध किंवा टिळा लावावा. गंधामुळे पूजाविधीतून निर्माण झालेली शक्ती आज्ञाचक्रामधून ५ टक्के अधिक प्रमाणात गंध लावणार्‍यात जाऊ शकते. तसेच वाईट शक्तींना आज्ञाचक्रातून आत येण्यास ५ टक्के प्रतिबंध होतो. शरिरात येणार्‍या चांगल्या किंवा वाईट ३० टक्के शक्ती आज्ञाचक्रातून येतात. सुवासिनी म्हणजे प्रकट शक्ती आणि कुमारिका म्हणजे अप्रकट शक्ती होय. सुवासिनीने लावलेले गंध जास्त परिणामकारक असते; कारण सुवासिनीतील प्रकट शक्तीमुळे, ती ज्यांना गंध लावते त्यांची सात्त्विकता वाढायला साहाय्य होते. विधवा स्त्रिया मंगलप्रसंगी इतरांना गंध किंवा टिळा लावीत नाहीत; कारण त्यांच्यातील प्रकट शक्तीचे प्रमाण वैवाहिक जीवन संपल्यामुळे न्यून झालेले असते.

१ अ २ उ. आचमन

यजमानाने पंचपात्रीतील थोडे पाणी पळीने हातावर घेऊन आचमन (प्राशन) करावे. स्नानाने बाह्यशुद्धी होते, तशी आचमनाने अंतर्शुद्धी होते. बर्‍याच वेळा तीनदा आचमन केले जाते. त्यामुळे आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक अंतर्शुद्धी होते.

१ अ २ ऊ. पवित्र (पवित्रक) धारण

यजमानाने सोन्याचे पवित्रक असल्यास ते आणि नसल्यास दर्भाची अंगठी ‘पवित्रक’ म्हणून बोटात धारण करावी. त्यामुळे वातावरणातील पवित्रके यजमानाकडे जास्त प्रमाणात आकृष्ट होतात. पवित्रके म्हणजे निरनिराळ्या देवतांचे सूक्ष्मातीसूक्ष्म चैतन्यकण

१ अ २ ए. प्राणायाम

यामुळे रजोगुण न्यून होऊन सत्त्वगुणाची वाढ होते.

१ अ २ ऐ. इष्टदेवता आणि कुलदेवता वंदन

यांच्यापुढे फळ (नारळ), तांबूल (विड्याचे पान) आणि सुपारी ठेवून त्यांना वंदन करावे. त्यामुळे त्यांचाही आशीर्वाद मिळतो.

१ अ २ ओ. आचमन

केशवादी चोवीस नामांनी आचमन करून प्राणायाम करावा.

१ अ ३. संकल्प

अ. हाताच्या ओंजळीत अक्षता आणि पळीभर पाणी घेऊन संकल्पमंत्र म्हणावा – ‘मम आत्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्तफलप्राप्त्यर्थं (अमुक)गोत्रोत्पन्नः (अमुक)शर्माहं (अमुक)फलप्राप्त्यर्थं (अमुक)कर्म करिष्ये ।’ नंतर हातातील उदक ताम्हणात सोडावे. उदक ताम्हणात सोडणे, हे एखादी क्रिया पूर्ण झाल्याचे दर्शक असते.

आ. नंतर पुन्हा पाणी घेऊन ‘तदंगतयादौ गणपतिपूजनं पुण्याहवाचनं मातृकापूजनं नांदीश्राद्धं च करिष्ये ।’ असा संकल्प करून उदक ताम्हणात सोडावे. (उपनयन आणि विवाह या संस्कारांत नांदीश्राद्धाच्या पुढे `ग्रहयज्ञमंडपदेवताकुलदेवतास्थापनं च करिष्ये ।’ असे म्हणावे.) कोणत्याही धार्मिक विधीच्या फलप्राप्तीत संकल्पाचा वाटा असतो.

१ अ ४. पूजन

१ अ ४ अ. मूर्तीस्थापना

तांदळाच्या लहानशा राशीवर एक सुपारी धुऊन ठेवावी. (गोव्यात सुपारीच्या ठिकाणी नारळ ठेवतात.) गणेशचतुर्थीला पाटावर तांदूळ ठेवून श्री गणपतीची मूर्ती ठेवतो, तसे हे आहे. धार्मिक कृत्यांतील तांदूळ म्हणजे अक्षता, म्हणजे न तुटलेले तांदूळ. तांदळांत फार दूरवरची पवित्रके खेचून घेण्याची क्षमता असते. सुपारीतही देवतांची (देव आणि देवींची) पवित्रके खेचून घेण्याची क्षमता असते. मंत्रामुळे ती क्षमता कार्यरत होते.

१ अ ४ आ. श्री गणपति आवाहन मंत्र

‘गणानां त्वा गणपतिं हवामहे०’ हा मंत्र म्हणावा. त्यानंतर ‘ॐ भूर्भुवः स्वः ऋद्धिबुद्धिसहितं सांगं सपरिवारं सायुधं सशक्तिकं महागणपतिमावाहयामि ।’, असे म्हणून अक्षता वाहून सुपारीचे ठायी गणपतीचे आवाहन करावे. (मधे मधे ‘ॐ भूर्भुवः स्वः’ हे त्रिपादगायत्रीप्रमाणे असते.) विधीत कोणत्याही पद्धतीचा अडथळा येऊ नये; म्हणून गणपतीला सायुध म्हणजे आयुधांसह आणि सशक्तीक म्हणजे पूर्ण सामर्थ्यानिशी बोलाविलेले असते.

१ अ ४ इ. षोडशोपचारपूजा

नैवेद्य, तांबूल, दक्षिणा इत्यादी अर्पण केले की, ‘समर्पयामि’ म्हणजे ‘हे माझे नाही, हे मी तुला अर्पण करीत आहे’, असे म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे.

१ अ ४ ई. प्रार्थना

शेवटी ‘अनया पूजया सकलविघ्नहर्ता महागणपतिः प्रीयताम् ।’ म्हणजे `मी केलेल्या या पूजेने सर्व विघ्नहरण करणारा श्री महागणपति प्रसन्न होवो’, असे म्हणून उदक सोडावे, म्हणजे हा विधी पूर्ण झाला.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘सोळा संस्कार’

Leave a Comment