अनुक्रमणिका
१. महत्त्व
१ अ. सोळा संस्कारांमागील तत्त्वज्ञान आणि विज्ञान
१ आ. पोषण, संवर्धन आणि रक्षण करणार्या सोळा संस्कारांचा विध्वंस म्हणजेच संस्कारहीनता!
२. जीवन सुखमय होण्यासाठी संस्कार आवश्यक
३. मानसशास्त्रदृष्ट्या महत्त्व
४. वैदिक संस्कृतीच्या महानतेचे प्रतीक !
५. संस्कारांचे तौलनिक महत्त्व
६. संस्कार आणि इतर साधना
६ अ. गुणांचे महत्त्व
१. महत्त्व
१ अ. सोळा संस्कारांमागील तत्त्वज्ञान आणि विज्ञान
‘पूर्वीच्या ऋषींनी मानवजातीच्या उन्नतीसाठी प्रत्येक मानवाला प्राधान्य दिले. त्याला संस्कारित करून पूर्ण उन्नत केल्यास त्याला त्याचा लाभ होईल. तो सर्वसंपन्न होऊन स्वतःचे आयुष्य समर्थतेने आणि आनंदाने व्यतीत करील, तसेच तो समाज उन्नत करण्यासही साहाय्य करील. त्यामुळे समाज सुदृढ होऊन राष्ट्र समर्थ होईल. ही प्रक्रिया समाजात सतत चालू राहिल्यास समाज पुन्हा व्यक्तीला पोषक बनण्यास साहाय्य करील. हे रहाट-गाडगे सतत चालू रहावे, यासाठी सोळा संस्कारांची योजना केली आहे. यातील जन्मापासून मृत्यूपर्यंतचे सोळा संस्कार हे त्या-त्या वयानुसार आणि परिस्थितीनुसार योग्य आहेत.’ – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
१ आ. पोषण, संवर्धन आणि रक्षण करणार्या सोळा संस्कारांचा विध्वंस म्हणजेच संस्कारहीनता !
‘गर्भाधान’ हा पहिला आणि ‘अंत्येष्टी’ हा शेवटचा संस्कार आहे. या दोन्ही संस्कारांत जीव परतंत्र आहे. इथे परंपरा आमचे रक्षण, पोषण आणि संवर्धन करते. आम्हाला ऐश्वर्यशाली करते. आज (अंत्येष्टी संस्कार होतो); पण तो नावापुरताच. श्राद्ध-पक्ष वाळीत टाकले आहेत. आजच्या दोन पिढ्या गर्भाधान संस्काराविना जन्माला आल्यामुळे ज्यांना जाणीव असेल, त्यांनी प्रायश्चित्तपूर्वक संस्कार करावा. आमचे पोषण, संवर्धन आणि रक्षण करणार्या ऐश्वर्यशाली परंपरेचा विध्वंस म्हणजे ज्या फांदीवर आपण बसतो, तीच मोडून टाकणे, हे आहे. आम्ही केव्हा जागे होणार ?’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी, वडाळामहादेव, श्रीरामपूर, अहमदनगर.
२. जीवन सुखमय होण्यासाठी संस्कार आवश्यक
‘खाणीतील कोळशावर संस्कार करूनच प्रकाश देणारा हिरा बनतो. त्या हिर्यावर आणखी संस्कार केले, अधिकाधिक पैलू पाडले, तर तो `कोहिनूर’ होईल. हिंदु धर्मात मानवी जीवनाला अधिकाधिक पैलू पाडणारे असे सोळा संस्कार आहेत. मृत्यूनंतरचे जीवन सुखाचे जावे; म्हणून संस्कार आहेत. त्या संस्कारांचे पालन करून आपले आणि दुसर्याचे जीवन सुखी करा.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
३. मानसशास्त्रदृष्ट्या महत्त्व
‘संस्कार हे मनाची ठेवण एका विवक्षित प्रकाराची बनविण्यास साहाय्य करतात. मनाची ठेवण आणि ध्येयरूप उद्दिष्ट यांत मानसशास्त्रदृष्ट्या अत्यंत घनिष्ठ संबंध आहे.’ – गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
भगवंताचे विस्मरण न होण्यासाठी संस्कार आवश्यक
‘गर्भाशयात असतांना चार-पाच मासांपासून (महिन्यांपासून) आपल्याला आपल्या दुःखाची तीव्रतेने जाणीव होते. त्या वेळी आपल्याला आपले मागील शेकडो जन्म आठवतात. त्या त्या जन्मात `मानवजन्माची सार्थकता कशात आहे, हे कळूनसुद्धा आपण भगवंताच्या प्राप्तीसाठी काहीही न करता जन्म फुकट घालविला’, अशी तीव्र जाणीव असते; म्हणून आपण भगवंताला प्रार्थना करीत असतो, ‘हे भगवंता, मला या गर्भाशयरूपी दुःखातून सोडव. या कोंडवाड्यातून मला बाहेर सोडविल्यावर मी मागच्याप्रमाणे पुन्हा संसाराच्या मायाजाळात सापडणार नाही. तुझी भक्ती करून जन्माचे सार्थक करून घेईन.’ बाहेर आल्यावर आपण भगवंताला पुन्हा विसरतो. गर्भाच्या बाहेर पडल्यावर विस्मरण होण्याचे कारण आपण सुखात पडतो, म्हणजे स्वतःला सुखी मानतो, हे असते. म्हणजे भगवंताची भक्ती न होण्याचे एकमेव कारण ‘संसारसुख किंवा सुखाचा लोप (दुःख)’, हेच असू शकते, असे सिद्ध होते. यासाठी जन्माला आल्यापासून करावयाचे संस्कार आहेत; म्हणून आई-वडिलांनी मुंज होईपर्यंत मुलाच्या वृत्तीकडे काटेकोरपणे लक्ष द्यायला लागते. मुंज झाल्यावर १२ वर्षे गुरुगृही राहून वेदाध्ययनासह इतर काही शास्त्राभ्यास, तसेच प्रवृत्ती आणि निवृत्ती लक्षणात्मक धर्माचे यथार्थ ज्ञान होऊन पूर्ण विचारांती लग्न करणे किंवा न करणे (ब्रह्मचारी रहाणे) या मार्गाचा निश्चय करूनच मुलगा घरी येतो.
गर्भाशयात असतांना त्याला जे ज्ञान असते, ते ज्ञान त्याला योगाने झालेले असल्यामुळे आणि ते दृष्टप्रत्यय असल्यामुळे वेद, ईश्वर आणि सद्गुरु यांच्या ठिकाणी समान निष्ठा उत्पन्न होऊनच तो घरी आलेला असतो. त्यामुळे प्रवृत्तीमार्ग किंवा निवृत्तीमार्ग यांपैकी कोणत्याही मार्गाचे तो अनुष्ठान करीत असला, तरी मरेपर्यंत केव्हातरी त्याला आत्मलाभ होतोच. असा या धर्मशिक्षणाचा हेतू असतो. प्रवृत्तीमार्गियाला (म्हणजे लग्न केलेल्याला) ‘निवृत्तीमार्गियाच्या योगक्षेमाचे दायित्व (जबाबदारी) आपल्यावर आहे’, अशी अखंड जाणीव असते आणि त्यांच्या योगक्षेमाचे ते दायित्व तो ईश्वर आणि सद्गुरु यांचे भिन्नस्वरूप जाणून ‘ती त्यांची सेवाच आहे’, या जाणिवेने करीत असतो.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.
४. वैदिक संस्कृतीच्या महानतेचे प्रतीक !
`पूर्वीच्या ऋषींनी व्यक्तीला संस्कारित करून त्याद्वारे व्यक्तीचे आणि तदनुषंगाने संपूर्ण समाजाचे जीवन उन्नत अन् सुदृढ करण्यासाठी आणि ही प्रक्रिया समाजात सतत चालू रहाण्यासाठी, जन्म ते मृत्यूपर्यंतच्या त्या त्या वयानुसार आणि परिस्थितीनुसार १६ विधीयुक्त संस्कारांची योजना केली. या संस्कारांद्वारे जिवाच्या विचारांत परिवर्तन करता येते. त्यामुळे त्याचे शरीर, मन आणि आत्मा या तिन्हींची शुद्धी होते. ज्या जिवावर असे संस्कार होत नाहीत, तो अतिरेकी, भ्रष्टाचारी आणि व्यभिचारी होतो. त्यामुळे तो स्वतःचे आणि इतरांचेही जीवन दुःखी बनवतो.’ – प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
५. संस्कारांचे तौलनिक महत्त्व
‘संस्कार | महत्त्व (टक्के) |
---|---|
१. गर्भाधान (ऋतूशांती) | २ |
२. पुंसवन (पुत्रप्राप्ती) | २ |
३. सीमंतोन्नयन (पत्नीचा भांग पाडणे) | २ |
४. जातकर्म (जन्मविधी) | २ |
५. नामकरण | ५ |
६. निष्क्रमण (बाळाला घराबाहेर नेणे) | २ |
७. अन्नप्राशन (बाळाला प्रथम अन्न देणे) | २ |
८. चौलकर्म (चूडाकर्म, शेंडी ठेवणे) | २ |
९. उपनयन (व्रतबंध, मुंज) | १० |
१०. मेधाजनन (पळसोल्याचा विधी) | २ |
११ ते १४. चतुर्वेदव्रत | ४ |
१५. समावर्तन (सोडमुंज) | २ |
१६. विवाह | ६३ |
एकूण | १००’ |
– संकलक प.पू. डॉ. जयंत आठवले यांना ध्यानात मिळालेले ज्ञान
मात्र आजकाल १. उपनयन (मुंज अर्थात व्रतबंध), २. समावर्तन (सोडमुंज) आणि ३. विवाह असे तीनच संस्कार प्रचलित आहेत. उरलेले संस्कार प्रायश्चित्तावरच भागविले जातात. प्रायश्चित्त म्हणजे संस्कार न केल्यामुळे करावे लागणारे विधी.
६. संस्कार आणि इतर साधना
‘महत्त्व (टक्के) | |
---|---|
१. सोळा संस्कार | २ |
२. स्वतःहून केलेली धार्मिक कृत्ये | २ |
३. स्वतःच्या मनाने केलेली साधना | १० |
४. गुरूंनी सांगितलेली साधना | १००’ |
६ अ. गुणांचे महत्त्व
‘माणसाचे ४० भौतिक संस्कार सांगून गौतम त्यापुढे दया, क्षमा, अनसूया, शौच, शम, योग्य व्यवहार, निःस्पृहता आणि निर्लोभता या आठ आत्मगुणांचा संस्कारांत समावेश करतो. ‘या आठ आत्मगुणांना विध्यात्मक भागापेक्षाही विशेष महत्त्व आहे’, असे सांगतांना तो म्हणतो, ‘व्यक्तीने ४० संस्कारांचे यथाविधी अनुष्ठान केले; पण आठ आत्मगुण आत्मसात केले नाहीत, तर त्याला ब्रह्मसान्निध्य प्राप्त होत नाही. याउलट संस्कार शक्य तेवढेच केले आणि आठही आत्मगुण मिळवले, तर त्याला ब्रह्मप्राप्ती निश्चित होते.’