नामजप आणि इतर योगमार्ग यांची तुलना (भाग २)

Article also available in :

या लेखाचा पहिला भाग वाचण्यासाठी ‘नामजप आणि इतर योगमार्ग यांची तुलना (भाग १)’ यावर ‘क्लिक’ करा !

 

४. मंत्रजप आणि नामजप

४ अ. मंत्रजप

४ अ १. कडक बंधने

मंत्रसाधना करणार्‍याला स्थळकाळादी विविध बंधने पाळावी लागतात. मंत्रजप विशिष्ट म्हणजे पवित्र ठिकाणी, उदा. देवतेच्या मूर्तीसमोर किंवा तीर्थक्षेत्री करणे; विशिष्ट वेळी करणे; शुचिर्भूतता, सामिष पदार्थांची वर्ज्यता आदी विधी-निषेध पाळणे; विशिष्ट संख्येत करणे; उच्चार योग्य करणे इत्यादींचा समावेश मंत्रसाधना करतांना पाळावयाच्या बंधनांत होतो.

 

४ अ २. कर्मकांडासारखी साधना

यज्ञादी कर्मकांडातील विधी करतांनाही कडक विधी-निषेध पाळावे लागतात; म्हणून मंत्रजप ही एकप्रकारे कर्मकांडासारखी साधना आहे.

४ आ. नामजप

४ आ १. अल्प बंधने

मंत्रसाधनेच्या तुलनेत नामसाधना करणार्‍याला अल्प बंधने पाळावी लागतात, उदा. नामजपाला स्थळकाळाचे बंधन नाही, नामाचा उच्चार कसाही केला तरी चालतो, जपसंख्येची मर्यादा नाही. तसेच नामसाधना करतांना पाळावयाची बंधने मंत्रसाधना करतांना पाळावयाच्या बंधनांइतकी काटेकोरही नसतात.

 

४ आ २. उपासनाकांडासारखी साधना

देवळात जाणे, देवपूजा करणे इत्यादी उपासनाकांडातील साधना करतांना बंधने एवढी काटेकोर नसतात; म्हणून नामजप ही एकप्रकारे उपासनाकांडासारखी साधना आहे.

 

५. ज्ञानयोग आणि नामजप

५ अ. वेदापेक्षा नाम श्रेष्ठ

५ अ १. वेदाक्षरांचा अशुद्ध उच्चार अपायकारक ठरतो, तर नामाचा अशुद्ध उच्चारही पापदाहक आणि कल्याणकारी ठरतो़.

 

अ. वेदपठण करतांना वेदाक्षरांचा शुद्ध उच्चार होणे आवश्यक असते. अशुद्ध उच्चार झाल्यास हानी होते. या संदर्भात ‘अनक्षरं हतायुष्यं विस्वरं व्याधिपीडितम् ।’, म्हणजे `वेदाक्षर अशुद्ध उच्चारले, तर आयुष्य अल्प होते आणि स्वरहीन उच्चारल्यास व्याधी प्राप्त होतात’, असे पाणिनीय शिक्षेत सांगितले आहे; पण नामाच्या संदर्भात तो नियम लागू नाही. ते अशुद्ध उच्चारले गेले, तरी पाप जाळून टाकते. याविषयी नारदपञ्चरात्रात एक श्लोक आहे, तो असा –

 

मूर्खो वदति विष्णाय बुधो वदति विष्णवे ।
नम इत्येव अर्थं च द्वयोरेव समं फलम् ।। – नारदपञ्चरात्र, रात्र १, अध्याय ११, श्लोक ३९

 

अर्थ : मूर्ख मनुष्य ‘विष्णाय नमः’ असे (अशुद्ध) म्हणतो आणि विद्वान मनुष्य ‘विष्णवे नमः’ असे (शुद्ध) म्हणतो; पण दोघांचाही उद्देश नमनाचाच असल्यामुळे त्यांना फल सारखेच मिळते.

 

आ. ‘मंत्रचळें पिसें लागतें सत्वर । अश्रद्ध ते फार तरलें नामें ।।’, म्हणजे वेदांतील मंत्र अशुद्ध म्हटले किंवा सोवळे पाळले नाही, तर मंत्रजपकास वेड लागते आणि नामाचा उच्चार अशुद्ध झाला, तरी मनुष्य तरून जातो. नामस्मरण कोणी कसेही, कोठेही, वेडेवाकडे जरी केले, तरी अपाय होत नाही. वाल्या कोळी उलट्या नामाने (रामाचा उलटा नामजप करून) तरला आणि आद्यकवी होऊन बसला.’

 

५ अ ३. ‘आचारहीनं न पुनन्ति वेदाः । – वसिष्ठस्मृति, अध्याय ६, श्लोक ३’ म्हणजे आचारभ्रष्ट लोकांना वेद तारू शकत नाहीत; पण दुराचारी लोकांनाही नाम तारू शकते.

 

५ अ ४. वेदपाठक ब्राह्मण (साधना न केल्यामुळे ज्यांना गुरुप्राप्ती होत नाही) मृत्यूनंतर ब्रह्मराक्षस झाल्याची उदाहरणे सापडतात; पण नामधारकाला मृत्यूनंतर सद्गतीच प्राप्त होते आणि तो ब्रह्मराक्षसाचाही उद्धार करू शकतो.’

५ आ. ज्ञानयोगाप्रमाणे साधना नसली, तरी नामजपाने ईश्वरप्राप्ती होणे

श्रुतिस्मृति हे दोन्ही डोळे । येणेंवीण जे आंधळे ।
तेही हरिभजनीं धांवतां भावबळें । पडे ना आडखुळें सप्रेमयोगें ।। – एकनाथी भागवत, अध्याय २, ओवी ३२

 

अर्थ : श्रुती-स्मृती यांचा अभ्यास न केल्यामुळे ज्यांना भगवान दिसत नाही, तेसुद्धा नामस्मरण सतत भक्तीभावाने करत असतील, तर भगवंताच्या दिशेने वाट चालू लागतात; कारण अशा भक्तांचा देव पाठीराखा असतो.

५ इ. ज्ञानमार्गियापेक्षा नामधारक श्रेष्ठ

एक सहस्त्र गावातील ब्राह्मण · एक क्षेत्रस्थ ब्राह्मण
एक सहस्त्र क्षेत्रस्थ ब्राह्मण · एक वेदपाठक ब्राह्मण
एक सहस्त्र वेदपाठक ब्राह्मण · एक पंडित ब्राह्मण
एक सहस्त्र पंडित ब्राह्मण · एक संन्यासी ब्राह्मण
एक सहस्त्र संन्यासी ब्राह्मण · एक परमहंस ब्राह्मण
एक सहस्त्र परमहंस ब्राह्मण · एक ब्रह्मवेत्ता ब्राह्मण
एक सहस्त्र ब्रह्मवेत्ते ब्राह्मण · एक नामयोगी नामधारक

५ ई. साक्षीभावाने पहाणे आणि नामजप

‘सर्वत्र साक्षीभावाने पहाण्यापेक्षा नामजप महत्त्वाचा; कारण साक्षीभावाने पहाण्यात द्वैत कायम रहाते, तर नामजप करत साधक अद्वैताकडे जाऊ शकतो.’ – प.पू. भक्तराज महाराज

 

६. ध्यान आणि नामजप


ध्यानापेक्षा नामजप अधिक श्रेष्ठ कसा, हे पुढे दिलेल्या काही सूत्रांवरून लक्षात येईल.

६ अ. ध्यान, नाम आणि रूप

‘ध्यान लावणारा मनुष्य ध्यानामध्ये असेपर्यंत देवतेचे रूप बघेल; पण इतर वेळी त्याला नामातच रहावे लागेल. रूपाचे ध्यान मनामध्ये आले नाही, तरी नाम सोडू नये. पुढे रूप आपोआप येऊ लागते.’

६ आ. नामजपाने वाईट शक्तींपासून रक्षण होऊ शकणे

ध्यानावस्थेत मनाची निर्विचार अवस्था असते. मन निर्विचार असतांना एखादी वाईट शक्तीव्यक्तीला त्रास देऊ शकते. याउलट व्यक्तीचा नामजप चालू असल्यास नामाचे संरक्षक-कवच नामधारकाच्या भोवती निर्माण होत असल्याने त्याला वाईट शक्ती त्रास देऊ शकत नाही; म्हणून निर्विचार मनापेक्षा नामजप जास्त महत्त्वाचा आहे.

कलियुगात सगुण किंवा निर्गुण ध्यानापेक्षा नामजप करत ‘नामध्यान’ करणे श्रेष्ठ;
कारण असा नामजप साधकाला पंचतत्त्वाच्या पलीकडे, म्हणजे निर्गुणाकडे नेत असणे

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

‘काही जण साधना म्हणून ध्यान लावतात; पण ‘नामजप करणे, म्हणजे सतत ईश्‍वराचे ध्यान आहे’, हे त्यांच्या लक्षात येत नाही. ध्यानामध्ये ईश्‍वराचे सगुण रूप येते, तर प्रकाशबिंदू इत्यादी दिसणे हे निर्गुण ध्यान आहे. प्रत्येक ध्यानमार्गीची एकच समस्या असते की, ना त्याचे सगुण ध्यान होते, ना निर्गुण; कारण ध्यानाच्या वेळी मनात अनेक विचारांचा गोंधळ चालू होतोे. मनातील अनेक विचारांना नष्ट करण्याची क्षमता नामजपाच्या ऊर्जेमध्ये असते.

नामजपामुळे मन अनेक विचारांतून एका नामावर एकाग्र (केंद्रित) होणे, म्हणजे ‘नामध्यान’ लागणे होय. कलियुगात समाजातील सात्त्विकता अत्यंत अल्प असल्याने केवळ नामजपामुळे सर्वसामान्य जिवांचे ध्यान लागणे शक्य नाही. अध्यात्मशास्त्रानुसार देवतेच्या रूपापेक्षा नाम श्रेष्ठ असते; कारण देवतेचे रूप हे तेजतत्त्वाशी, तर नाम (अक्षर) हे आकाशतत्त्वाशी निगडित असतेे. हा नामजप साधकाला आकाशापलीकडे (पंचतत्त्वांच्या पलीकडे, निर्गुणाकडे) नेतो. परा वाणीतील नामजप (सूक्ष्मातीसूक्ष्म नाम) साधकाला त्रिगुणातीत होण्यासाठी (मोक्षप्राप्तीसाठी) साहाय्य करतेे.’

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे (२९.३.२०१७)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘नामजपाचे महत्त्व आणि लाभ’

 

Leave a Comment