श्राद्धकर्मातील काही कृतींमागील अध्यात्मशास्त्र (भाग २)

७. श्राद्धामध्ये ‘ॐ’चा उच्चार का करू नये ?

‘ॐ’च्या उच्चाराने कनिष्ठ पितरलहरी,
तसेच यमलहरी यांचे वायूमंडलातच विघटन
होत असल्याने श्राद्धामध्ये ‘ॐ’चा उच्चार वज्र्य असणे

‘ॐ’चा उच्चार हा ब्रह्मांडव्यापक आणि निर्गुणाशी संबंधित नादरूपी तेजाचे उत्सर्जन करणारा असल्याने तो दीर्घकाळ वायूमंडलात भ्रमण करत रहातो. या तेजोत्सर्गक नादामुळे श्राद्धस्थळी येणार्‍या रज-तमात्मक लहरींसहच कनिष्ठ पितरलहरी, तसेच यमलहरी यांचे वायूमंडलातच विघटन झाल्याने श्राद्धविधीचा परिणाम शून्य टक्क्यावर येण्याची शक्यता असते; म्हणून श्राद्धविधीत ‘ॐ’चा उच्चार वर्ज्य सांगितला आहे.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ५.८.२००६, दुपारी ४.३०)

 

८. श्राद्धात जानवे उजव्या खांद्यावर (अपसव्य) का घ्यावे ?

प्रत्यक्ष विधीसाठी लागणारे बळ मिळून पूर्ण फलप्राप्ती
व्हावी, यासाठी श्राद्धकर्म करतांना जानवे उजव्या खांद्यावर घेणे

‘उजव्या खांद्यावर जानवे घेणे (अपसव्य करणे), हे प्रत्यक्ष पितृऋणातून मुक्त होण्यासाठी पितरांचे दायित्व घेऊन त्यांच्यासाठी केलेल्या कर्तव्यपालनाचे निदर्शक आहे. जिवाची उजवी नाडी ही त्याची कर्तव्यातील कार्यक्षमता स्पष्ट करते. उजवी नाडी ही कर्तव्यदक्ष असून जिवाला प्रत्यक्ष कर्म करण्यास भाग पाडते किंवा प्रत्यक्ष कर्म करण्यास प्रवृत्त करते; म्हणून उजव्या खांद्यावर मंत्राने भारित जानवे घेतल्याने जिवाची उजवी नाडी कार्यरत होऊन जिवाला प्रत्यक्ष विधी करतांना लागणारे बळ पुरवते आणि त्याच्याकडून विधीची यथासांग सांगता करून घेऊन त्याला पूर्ण फलप्राप्ती करून देते.

याउलट डावी नाडी ही तटस्थ आहे. ती कर्म करतांना जिवाला बाह्यात्मक अन् अंतरात्मक दृष्ट्या तटस्थ ठेवण्याचे आणि कुठल्याही कर्मात विचलित न होण्यासाठी लागणारे बळ पुरवते; परंतु प्रत्यक्ष कर्मात भाग घेत नाही. म्हणून जिथे प्रत्यक्ष विधीकर्म करावयाचे असते, त्या ठिकाणी जानव्याचा भार अपसव्याकडे करून उजव्या नाडीला कार्यरत करून जिवाने ते कर्म पूर्णत्वाला न्यायचे असते आणि कार्यभार आटोपला की, परत ते सव्याकडे, म्हणजे डाव्या खांद्यावर आणायचे असते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.७.२००५, दुपारी २.३३)

 

संकलक : श्राद्धामध्ये अर्घ्य देतांना जानवे डाव्या खांद्यावर (सव्य), तर तिलोदक अर्पण करतांना उजव्या खांद्यावर (अपसव्य) का घ्यावे ?

 

एक विद्वान : मंत्रोच्चाराने भारित जानव्याच्या स्पर्शाने विधीकर्मात त्या त्या प्रक्रियेला आवश्यक अशी नाडी जागृत होते. उजव्या खांद्यावर जानवे घेतल्याने सूर्य नाडी चालू होते आणि पितरांच्या आसक्तीदर्शक लहरींचे विघटन करण्यासाठी पूरक असणार्‍या कर्माला रजोगुणाची साथ मिळते. जानवे डाव्या खांद्यावर घेऊन देवतांना आवाहन केल्याने जिवाची डावी नाडी कार्यरत होऊन देवतांच्या कार्यरत आशीर्वादरूपी तारक लहरींचे बळ यजमानाला प्राप्त होते. म्हणजेच सव्यातून देवतांची कृपा संपादन करून अपसव्यातून मारक लहरींच्या साहाय्याने उजव्या नाडीच्या बळावर प्रत्यक्ष पितरांशी संबंधित कर्म करावयाचे असते.

डावी नाडी देहातील रजोगुणावर अंकुश ठेवते, तर उजवी नाडी देहातील रजोगुणाला कार्यरत करते. देवतांविषयक विधी सव्यातून, तर पितरांशी संबंधित विधी अपसव्यातून केले जातात. (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ५.८.२००६, दुपारी ४.४६)

 

९. श्राद्धामध्ये पितृतर्पण करतांना तर्जनी
आणि अंगठा यांच्या मध्यभागामधून पाणी का सोडावे ?

अंगठ्यावरील मीनाक्षीतत्त्वामुळे श्राद्धकर्त्याच्या पितरांशी संबंधित इच्छित मनोकामना पूर्ण होत असल्यामुळे तर्जनी आणि अंगठा यांच्या मध्यभागामधून पाणी सोडणे

 

 

‘अंगठ्यावर शिव आणि मीनाक्षी या देवतांच्या तत्त्वांचा वास असल्याने अन् मीनाक्षी ही इच्छेला गती देणारी असल्याने अंगठा आणि तर्जनी यांच्या मध्यभागातून पाणी सोडल्याने शिवरूपी पुरुषत्वाशी संबंधित कर्त्याला मीनाक्षीरूपी स्वयंचलित इच्छेचे शक्तीरूपी बळ प्राप्त होऊन इच्छित मनोकामना पूर्ण होतात; म्हणून श्राद्धादी कर्म या पितरांशी निगडित इच्छाधारी विधीत अंगठा अन् तर्जनी यांच्यामधून पाणी सोडण्याला महत्त्व दिले जाते. ही एक इच्छेशी निगडित निर्मितीजन्य प्रक्रिया आहे.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २६.७.२००६)

 

१०. ब्राह्मणांना वस्त्रदान केल्यामुळे लिंगदेह विविध वासनांपासून मुक्त होणे

‘श्राद्धविधी हा रज-तमात्मक क्रियेशी, म्हणजेच वासनात्मक लिंगदेहांशी संबंधित अशुभ विधी आहे. मायेतील विविध वासनांपासून लिंगदेह मुक्त झाला, तरच त्याला पुढची गती प्राप्त होते. यास्तव पितृऋण उचलणार्‍या उत्तरदायी व्यक्तीकडून तो तो विधी करून वस्त्रांच्या माध्यमातून, पितरांच्या वासना अडकलेल्या कोषांतून त्यांना मुक्त केले जाते. यालाच ‘लिंगदेहांचे वस्त्राच्या माध्यमातून वासनापांग फेडणे’, असे म्हणतात. या विधीतून लिंगदेहांच्या वासनांचे त्या त्या स्तरावर निर्दालन करण्याचा प्रत्यक्ष कर्तव्यकर्मातून प्रयत्न केला जातो. वस्त्र दान करणार्‍या व्यक्तीने वस्त्राच्या माध्यमातून इच्छाधारी लिंगदेहांची आसक्ती सुटण्यासाठी दत्ताला प्रार्थना करावी. हा श्राद्धातील पितरांशी संबंधित पापमार्जन विधी आहे. हा विधी भावपूर्ण केल्याने पितरांना १० टक्के लाभ होतो. वस्त्र हे लिंगदेहाच्या भोवती असलेल्या वासनात्मक कोषांचे प्रतिनिधित्व करते; म्हणून श्राद्धकर्मात वस्त्रदान विधीला, म्हणजेच एक प्रकारे लिंगदेहांचे वासनात्मककोष उतरवण्याला विशेष महत्त्व आहे.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ३०.७.२००५, दुपारी २.२३)

 

११. श्राद्धामध्ये ब्राह्मणांना देण्यात येणार्‍या
दानांमध्ये यज्ञोपविताचे दान न दिल्यास श्राद्ध निष्फळ का ठरते ?

‘यज्ञोपवित हे ब्राह्मयुक्त तेजनिर्मितीचे प्रतीक असल्याने ते ब्राह्मणातील देवत्वरूपी तेजाला जागृत करते. यज्ञोपवित ब्राह्मणांना दान करणे, म्हणजेच त्यांच्यातील ब्राह्मतेजाला कार्यरत करून त्याला श्राद्धादी कर्मात कार्य करण्यास उद्युक्त करणे. यामुळे ब्राह्मणातील देवत्वरूपी अंश जागृत होऊन संतुष्ट झाल्याने त्या त्या ब्राह्मयुक्त तेजोलहरींचे बळ पितरांना मिळून त्यांच्यात तेजाच्या अधिष्ठानरूपी बिजाचे संस्करण होण्यास साहाय्य झाल्याने श्राद्धाची पूर्तता होते. कोणत्याही विधीची पूर्तता ही त्या त्या विधीतील सात्त्विक संस्कारांचे संस्करण त्या त्या जिवांवर होण्यावर अवलंबून असते. पितरांवर करण्यात येणारे तेजाचे संस्करण यज्ञोपवित दानातून सफल होण्यास साहाय्य झाल्याने यज्ञोपविताचे दान न केल्यास श्राद्ध निष्फळ ठरते, असे म्हटले आहे.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १३.८.२००६, दुपारी ३.२५)

 

१२. श्राद्धामध्ये केळे देठाच्या दिशेने सोलण्याचे महत्त्व काय ?

केळ्याच्या देठातील शक्ती इच्छालहरींशी, तर देठाच्या विरुद्ध दिशेची शक्ती क्रियालहरींशी संबंधित असल्याने श्राद्धादी उद्देशानुसार केळे देठाच्या दिशेने सोलणे आणि वैष्णवपंथियांनी देवतेला केळे अर्पण करतांना ते देठाच्या विरुद्ध दिशेने सोलणे

‘केळ्याच्या देठात घनीभूत झालेली शक्ती इच्छालहरींशी संबंधित असते. ज्या वेळी देठाकडून केळे सोलले जाते, त्या वेळी स्पर्शाने देठातील इच्छालहरी कार्यरत होतात. इच्छालहरींच्या कार्यरत स्तरामुळे लिंगदेहातून प्रक्षेपित होणार्‍या वासनात्मक लहरी केळ्याकडे लवकर आकर्षित होतात. अशा प्रकारे श्राद्धाच्या संकल्पातून केळ्याच्या माध्यमातून अर्पण केलेली एखादी गोष्ट लिंगदेहांना प्राप्त होऊन त्यांची इच्छापूर्ती लवकर होते.

वैष्णवपंथीय श्रीविष्णूचे उपासक असल्याने ते ज्या वेळी नैवेद्य म्हणून देवतेला केळे अर्पण करतात, त्या वेळी ते देठाच्या विरुद्ध दिशेने केळे सोलतात. देठाच्या विरुद्ध बाजूत तेजतत्त्वरूपी क्रियालहरी संपुटित झालेल्या असतात. स्पर्शाने या लहरी कार्यरत होतात. क्रियालहरींच्या वायूमंडलातील प्रक्षेपणामुळे या कक्षेत श्रीविष्णूचे तत्त्व लगेच आकृष्ट होते; कारण श्रीविष्णु हे क्रियालहरींच्या बळावर कार्य करणारे तत्त्व आहे. श्रीविष्णूच्या उपासनाविधीमध्ये विष्णूला नैवेद्य दाखवतांना देठाच्या विरुद्ध दिशेने अर्धवट केळे सोलून तसे अर्पण करतात. अर्धवट सोललेल्या केळ्यातून प्रक्षेपित होणारी शक्ती ही कारंजाच्या रूपात गतिमान अवस्थेत वायूमंडलात प्रक्षेपित होऊन वायूमंडलाची शुद्धी करते.

केळे सोलतांना ते नेहमी देठाकडून, म्हणजेच ज्या ठिकाणी इच्छालहरींचे घनीकरण झालेले असते, तेथून सोलावे; कारण इच्छालहरी या पृथ्वी आणि आप या तत्त्वांच्या कणांशी संबंधित असल्याने सर्वसामान्य जिवाला या लहरींच्या प्रक्षेपणातून त्रास होण्याची शक्यता अल्प असते. क्रियालहरी या तेजतत्त्वाशी संबंधित असल्याने या लहरी पेलवण्याची क्षमता सर्वसामान्य जिवात नसते. उपासनाविधीत देवतेचे तत्त्व आकृष्ट करून ते क्रियालहरींच्या बळावर अल्प कालावधीत कार्यरत करण्याच्या उद्देशाने केळे देठाच्या विरुद्ध दिशेने सोलतात.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १.१२.२००५, सकाळी ११.५३)

 

(धार्मिक विधींच्या संदर्भात इतकी सखोलता केवळ हिंदु धर्मातच आहे. – संकलक)

 

१३. श्राद्धाच्या जेवणामध्ये उडदाचे वडे का करावेत ?

सालविरहित उडिदाच्या डाळीतून प्रक्षेपित होणारा सूक्ष्म-उग्र गंध
पितरांना प्रिय असल्याने श्राद्धाच्या जेवणासाठी उडदाचे वडे बनवले जाणे

‘सालविरहित उडिदाच्या डाळीतून प्रक्षेपित होणारा सूक्ष्म-उग्र गंध हा पितरांना प्रिय असतो; कारण वासनायुक्त लिंगदेहांच्या कोषांतून प्रक्षेपित होणार्‍या रजोगुणी लहरींच्या गंधाशी या उग्र गंधाचे साधर्म्य असते. या साधर्म्ययुक्त वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे त्या त्या कक्षेत पितर लवकर आकृष्ट होऊन अन्नातील सूक्ष्म-वायू ग्रहण करू शकतात, तसेच त्यांना चमचमीत अन्न आवडते; म्हणून श्राद्धाच्या जेवणात उडदाचे वडे करतात.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १३.८.२००६, सायं. ६.२१)

 

१४. पितर प्रेतयोनीतून मुक्त होऊन त्यांना उत्तम लोक प्राप्त व्हावा, यासाठी बैलाचे पूजन का करतात ?

लिंगदेहाभोवती असलेल्या रजतमात्मक टाकाऊ वायूंच्या
आवरणाचे विघटन होऊन ते प्रेतयोनीतून मुक्त होण्यासाठी बैलाचे पूजन केले जाणे

अ. तत्त्व

‘रज-तमात्मक टाकाऊ वायूंचे आधिक्याने आवरण असलेले लिंगदेह प्रेतयोनीला प्राप्त होतात. लिंगदेहाच्या कोषात चालू असलेल्या टाकाऊ वायूंच्या भ्रमणाच्या गतीशी बैलाच्या पोटातील अंतःस्थ पोकळीत चालू असलेल्या टाकाऊ वायूंच्या भ्रमणाची गती साधम्र्य दर्शवते. या महत्त्वाच्या एकत्व असलेल्या वैशिष्ट्यामुळे लिंगदेहाभोवती असलेल्या टाकाऊ वायूंच्या आवरणाचे विघटन करण्यासाठी बैलाचे माध्यम वापरतात. यामुळे वृषोत्सर्ग विधीला फार महत्त्व आहे.

 

आ. कृती आणि त्यामागील शास्त्र

या विधीत प्रेतयोनीतून मुक्त होण्यासाठी त्या त्या प्रेताच्या नावासहित मंत्रोच्चार करून बैलाची पूजा केल्याने बैलाच्या पोटातील कार्यरत झालेल्या टाकाऊ वायूंच्या भ्रमणातील नादाकडे तो तो प्रेतात्मा आकृष्ट होतो. वृषोत्सर्ग विधीत म्हटल्या जाणार्‍या मंत्रांनी बैलाच्या पोटातील अंतःस्थ पोकळीतील टाकाऊ वायू कार्यरत होतात आणि त्याच्या शेपटीवर मंत्रोच्चाराने भारित पाणी ‘प्रेताचे नाव अन् गोत्र उच्चारून त्याला देतो’, असे म्हणून ओतल्याक्षणी टाकाऊ वायूंचे अधोदिशेने वायूमंडलात उत्सर्जन होते. बैलाच्या पाठीमागे उजव्या पायाजवळ भस्माने त्रिशूळ आणि डाव्या पायाजवळ चक्र काढले असता, त्यातून प्रक्षेपित होणार्‍या तेजोमय लहरींमुळे बैलाने उत्सर्जित केलेल्या टाकाऊ वायूंचे विघटन होते. याचा परिणाम होऊन प्रेताच्या भोवती असलेले टाकाऊ वायूंचे आवरणही विघटित झाल्याने त्याची प्रेतयोनीतून मुक्तता होते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ६.८.२००६, रात्री ८.२९)

 

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्राद्धातील कृतींमागील शास्र’

Leave a Comment