अनुक्रमणिका
१. पावसाळ्यात रोगनिर्मितीस कारणीभूत घटक
पावसाळ्यापूर्वीच्या उन्हाळ्यामध्ये शरिरात कोरडेपणा आलेला असतो, शरिराची शक्ती न्यून झालेली असते. कडक उन्हानंतर वातावरणात अचानक पालट होऊन पावसामुळे गारठा निर्माण होतो. हवेतील आर्द्रताही वाढते. त्यामुळे शरिरातील वातदोष वाढतो. वातावरणात, विशेषतः वनस्पती, धान्ये, पाणी इत्यादी सर्वच ठिकाणी आम्लता वाढत असल्याने पित्त साचण्याकडे शरिराचा कल असतो. या दिवसांत पचनशक्तीही घटते. भूक मंदावल्यामुळे अपचनाचे विकार होतात. पावसाच्या पाण्यासह धूळ, कचरा वाहून आल्याने पाणी दूषित होते आणि तेही रोगनिर्मितीस कारण ठरते. या सर्व घडामोडींमुळे वाताचे विकार, उदा. संधीवात, आमवात यांसह जुलाब, अजीर्ण इत्यादी अपचनजन्य विकार बळावतात.
२. पावसाळ्यातील आहार
२ अ. पावसाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये ?
खावे | खाऊ नये | |
---|---|---|
१. आहाराची चव | किंचित आंबट-खारट, कडू, तुरट आणि तिखट | जास्त गोड |
२. आहाराची वैशिष्ट्ये | पचनाला हलका, शक्तीदायक, शुष्क (कोरडा), किंचित स्निग्ध |
पातळ |
३. वात, पित्त आणि कफ यांच्याशी संबंधित गुण |
वात, पित्त आणि कफ शामक | वात, पित्त आणि कफ वर्धक |
४. धान्ये | जुनी धान्ये (तांदूळ, गहू, जव, वर्याचे तांदूळ, नाचणी, कोद्रू (हरीक, एक प्रकारचे हलके धान्य), बाजरी), भाजणी, राजगिरा, सर्व धान्यांच्या लाह्या | नवीन धान्ये, चुरमुरे, मक्याच्या लाह्या |
५. कडधान्ये | अ. जास्त प्रमाणात : मूग, मसूर
आ. अल्प प्रमाणात : कुळीथ, उडीद |
चवळी, वाटाणा, पावटे, मटकी |
६. भाज्या | अ. आवश्यकतेनुसार : दुधी, भेंडी, पडवळ, कोबी, फ्लॉवर, ढेमसे (कच्च्या टोमॅटो सारखे फळ), श्रावणघेवडा, गवार, सुरण, माठ, वाल
आ. अल्प प्रमाणात : मेथी, मोहरी |
पाले भाज्या |
७. मसाले |
सर्व प्रकारचे मसाले | – |
८. तेल किंवा तेल बिया | तिळाचे तेल, शेंगदाण्याचे तेल | – |
९. पदार्थ | अ. बाजरीची भाकरी, फुलके, ज्वारीच्या किंवा ज्वारीच्या लाह्यांच्या पिठाचा सांजा (हेसर्व बनवतांना त्यांत सुंठ, मिरी इत्यादींची पूड घालणे चांगले.)
आ. सुंठ, मिरी, पिंपळी, ओवा, हळद इत्यादी इ. मुगाचे पदार्थ : वरण, कढण, खिचडी, वडे, लाडू इत्यादी ई. कुळथाचे पदार्थ : सूप, पिठले, शेंगोळे उ. अन्य : राजगिरा लाडू ऊ. विशेष गुण : उष्ण (गरम) आणि थेट |
अ. उसळी
आ. फार गोड आणि स्निग्ध पदार्थ, उदा. शिरा, बुंदीचे लाडू इ. शिळे पदार्थ ई. माश्या बसलेले पदार्थ |
१०. दूध आणि दुधाचे पदार्थ | अ. दूध पितांना त्यात सुंठ किंवा हळद घालावी.
आ. दह्यावरचे पाणी पादेलोण किंवा बिडलोण घालून प्यावे. इ. सैंधव, जिरे इत्यादी पदार्थ घालून ताक प्यावे. ई. जेवणात चमचाभर तूप किंवा लोणी घ्यावे. |
खवा, कुंदा, पेढे, दूध घालून बनवलेली मिठाई |
११. फळे | अ. आवश्यकतेनुसार : डाळिंब, केळी, सफरचंद
आ. अल्प प्रमाणात : काकडी, खरबूज |
फणस |
१२. सुकामेवा | अ. आवश्यकतेनुसार : मनुका, अंजीर
आ. अल्प प्रमाणात : अन्य |
– |
१३. मीठ | सैंधव, बिडलोण, पादेलोण | – |
१४. साखर | जुना गूळ, मध यांचा वापर अधिक करावा. | नवीन गूळ |
१५. पाणी | अ. गाळून किंवा तुरटी फिरवून वापरावे.
आ. पाण्याचे निर्जंतुकीकरण व्हावे यासाठी ते चांगले उकळून वापरावे. |
अ. नदी-नाल्याचे पाणी
आ. अधिक पाणी पिणे |
१६. मद्य (टीप) | प्रमाणात घेतलेले मद्य | अधिक मद्यपान करणे |
१७. मांस (टीप) | उष्ण आणि पचायला हलके मांस : शेळीचे मांस, सळईवर भाजलेले मांस, मिरीसारखे पाचक मसाले घालून केलेला मांस रस(सूप) | मासे आणि अन्य जलचर प्राण्यांचे मांस |
टीप : धर्मशास्त्रानुसार मद्य आणि मांस यांचे सेवन निषिद्ध आहे; तरीही आजकाल मद्य आणि मांस सेवन करणार्यांना त्यांचे गुणदोष समजावेत, म्हणून येथे दिले आहेत.
२ आ. लंघन (उपवास)
आठवड्यातून एकदा लंघन किंवा उपवास करावा. ज्यांना शक्य असेल त्यांनी दिवसभर काहीही न खाता रहावे.
अगदीच भूक लागल्यास साळीच्या लाह्या खाव्यात. हे शक्य नसलेल्यांनी भर्जित (भाजलेल्या) धान्याचे पदार्थ किंवा लघू आहार (साळीच्या लाह्या, मुगाचे वरण यांसारखा पचण्यास हलका असा आहार) घेऊन लंघन करावे.
पावसाळ्यात एकभुक्त रहाणे, म्हणजे दुपारी व्यवस्थित जेवण घेऊन रात्री न जेवणे अनेकांना उपयुक्त ठरते.
३. पावसाळ्यात घ्यावयाची विशेष काळजी
अ. सर्व पांघरुणे, उबदार कपडे यांना पावसाळ्यापूर्वीच उन्हाळ्यात ऊन दाखवून ठेवावे.
आ. पावसाळ्यात स्नानासाठी कोमट किंवा गरम पाणी वापरावे.
इ. ओलसर किंवा दमट जागेत राहू नये.
ई. ओलसर किंवा दमट कपडे घालू नयेत.
उ. सतत पाण्यात काम करू नये.
ऊ. पावसात भिजू नये. त्यासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. भिजल्यास त्वरित कोरडे कपडे घालावेत.
ए. पावसाळ्यातील गारठ्यापासूनही संरक्षण करावे.
ऐ. जागरणामुळे शरीरातील रूक्षता वाढून वात वाढत असल्याने रात्रीचे जागरण टाळावे.
ओ. दिवसा झोपू नये.
४. माश्या आणि डास यांना प्रतिबंध करणारे नैसर्गिक उपाय
या काळात माश्या आणि डास यांचेही प्रमाण वाढते. याला प्रतिबंध करण्यासाठी पुढील उपाय करावेत.
अ. घरात कडूनिंबाची पाने, लसणाची साले, धूप, ऊद, ओवा यांचा धूर फिरवावा.
आ. घराच्या सभोवती झाडे असल्यास त्यांवर गोमूत्राचा फवारा मारावा.
इ. घराच्या आत वेखंडाचे रोप असलेली कुंडी ठेवावी. यामुळे डासांचे प्रमाण अल्प होते.
ई. सायंकाळच्या वेळी गुडनाईटच्या कॉईलवर लसणाची पाकळी ठेऊन स्विच चालू करावा. यामुळे डासांचे प्रमाण नियंत्रित होण्यास साहाय्य होते.
५. पावसाळ्यातील विकारांना असा अटकाव करा !
पावसाळ्यातील प्रमुख लक्षण म्हणजे भूक मंदावणे. भूक मंदावलेली असतांनाही पूर्वीसारखाच आहार घेतला, तर ते अनेक रोगांना आमंत्रणच ठरते; कारण मंदावलेली भूक किंवा पचनशक्ती हे बहुतेक विकारांचे मूळ कारण आहे. पोट जड वाटणे, करपट ढेकर येणे, गॅसेस (पोटात वायू) होणे, ही भूक मंदावल्याची लक्षणे आहेत. अशा वेळी हलके अन्न, उदा.
पेज, कढणे, भाजून केलेले पदार्थ घ्यावेत. अल्प प्रमाणात खावे. पोट जड असतांनाही आहार चालू ठेवल्यास अजीर्ण, जुलाब, आव पडणे हे विकार चालू होतात.
५ अ. पचनशक्ती वाढवणारी सोपी घरगूती औषधे
५ अ १. पाचक ताक
एक पेला गोड ताजे ताक घेऊन त्यात सुंठ, जिरे, ओवा, हिंग, सैंधव, मिरे यांची १-१ चिमूट पूड घालून एकजीव करावे. दिवसातून २-३ वेळा घ्यावे.
५ अ २. पाचक मिश्रण
आले किसून त्यात ते भिजेल इतका लिंबाचा रस घालावा, चवीनुसार सैंधव घालावे. हे मिश्रण काचेच्या बरणीत भरून ठेवावे. जेवणापूर्वी १-२ चमचे प्रमाणात घ्यावे.
५ अ ३. सुंठ-साखर मिश्रण
१ वाटी सुंठ पूड आणि तेवढ्याच प्रमाणात साखर घेऊन मिक्सरमध्ये फिरवून एकजीव करून ठेवावी. हे मिश्रण बरणीत भरून ठेवावे. दोन्ही वेळा जेवणापूर्वी १-१ चमचा घ्यावे. यामुळे शुद्ध ढेकर येऊन चांगली भूक लागते, तसेच पित्ताचा त्रासही घटतो.
५ आ. सर्वांगाला प्रतिदिन तेल लावा !
पावसाळ्यात सर्वांगाला नियमितपणे तेल लावावे. हे तेल सांध्यांना जास्त वेळ चोळावे. पावसाळ्यात हवेत आर्द्रता आणि गारठा असल्याने उष्ण गुणाचे तीळ तेल किंवा मोहरीचे तेल वापरावे, खोबरेल तेल वापरू नये. (पावसाळा सोडून अन्य ऋतूंमध्ये खोबरेल तेल वापरू शकतो.) तेल लावल्यावर सूर्यनमस्कार, योगासने यांसारखा हलका व्यायाम करावा. अंग दुखणे, वेदना इत्यादी लक्षणे असल्यास गरम पाण्याच्या पिशवीने किंवा हीटिंग पॅडने शेक घ्यावा. अंघोळीच्या वेळी शेक घ्यायचा झाल्यास सोसेल एवढे कडक पाणी वापरावे.
६. जेवणासंबंधी पाळावयाचे नियम
पावसाळ्यामध्ये पचनशक्ती मंद असते. खाल्लेले पचले नाही की, रोग होतात. तसे होऊ नये म्हणून भूक लागल्यावरच जेवावे, म्हणजे जेवलेल्या अन्नाचे नीट पचन होते. भूक लागली नसेल, तर शक्य असल्यास उपवास करावा किंवा अत्यंत अल्प प्रमाणात खावे. पावसाळ्यामध्ये आठवड्यातून एखादा दिवस एकभुक्त राहणे, म्हणजे दुपारी व्यवस्थित जेवण घेऊन रात्री न जेवणे आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक ठरते.
– वैद्य मेघराज पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.४.२०१४)
७. ‘पाऊस थांबून ऊन पडू लागणे’, हे शरिरातील पित्त वाढण्यास कारण ठरणे
‘काही वेळा पावसाळ्यात सतत पडणारा पाऊस थांबून मध्येच ऊन पडू लागते. काही दिवस पाऊस न पडता असे सतत ऊन पडू लागले, तर त्यामुळे शरिरामध्ये पित्ताचा प्रकोप होऊ लागतो. (‘प्रकोप’ म्हणजे ‘अधिक प्रमाणात वाढ होणे’) अशा वेळी डोळे येणे (कंजंक्टिवायटिस), ताप येणे, अंगावर पुळ्या येणे, विसर्प (नागीण), अतीसार (जुलाब) यांसारखे विकार उद्भवू शकतात. पावसाळा संपतांना, साधारण सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये अशाच प्रकारचे वातावरण असते. तेव्हाही हे विकार उद्भवू शकतात.
वैद्य मेघराज पराडकर
८. काय टाळावे ?
आंबट, खारट आणि तिखट चवीचे, तसेच तेलकट पदार्थ पित्त वाढवतात. त्यामुळे वरीलप्रमाणे वातावरण असतांना असे पदार्थ खाणे टाळावे. मिरची किंवा लाल तिखट यांचा वापर अत्यल्प करावा. ‘आम्हाला लाल तिखटाविना होत नाही. ते जेवणात भरपूर घातल्याखेरीज जेवणाला चवच येत नाही. आम्हाला त्याची सवय आहे. त्यामुळे आम्हाला काहीही अपाय होणार नाही’, असे विचार करून स्वतःची हानी करून घेऊ नये. शेव, चिवडा, फरसाण, बाकरवडी यांसारखे फराळाचे पदार्थ, तसेच वडापाव, दाबेली, पाणीपुरी, शेवपुरी यांसारखे चटपटीत आणि तिखट किंवा तेलकट पदार्थही टाळावेत. अशा काळात भूक लागल्यावरच जेवावे. भूक नसतांना खाण्याचा प्रसंग आल्यास अल्प प्रमाणात खावे.’
अतिशय उपयुक्त माहीती खूप खूप धन्यवाद
I know Sanatan.
I went to Goa, to my native place.
At that time i visited Sanatan Ashram. – Prasad Manjrekar
पोट दुखणे यावर उपाय सांगा. ताक पीले की तात्पुरते बरे वाटते
नमस्कार प्रवीण जी,
या विषयी आपण आपल्या स्थानिक तज्ञ वैद्यांकडून मार्गदर्शन घ्यावे ही विनंती.
आपली,
सनातन संस्था