श्राद्धात वापरण्यात येणार्‍या वस्तूंचे अध्यात्मशास्रीय महत्त्व

श्राद्धात दर्भ, काळे तीळ, अक्षता, तुळस, माका इत्यादी वस्तूंचा वापर केला जातो.

आपल्याला हे माहिती आहे का …
१. दर्भाविना श्राद्धकर्म का केले जात नाही ?
२. श्राद्धासाठी देव आणि पितर यांच्या स्थानांवर बसण्यासाठी ब्राह्मण उपलब्ध होत नसल्यास त्या स्थानांवर दर्भ का ठेवावेत ?
३. श्राद्धविधीमध्ये काळे तीळ का वापरतात ?
४. श्राद्धामध्ये तांदळाचीच खीर का करतात ?
५. माका आणि तुळस यांच्या वापराने वायूमंडल शुद्ध होऊन पितरांना श्राद्धस्थळी प्रवेश करणे सोपे कसे जाते ?

या लेखातून आपण या प्रश्नांमागील अध्यात्मशास्रीय कारणमीमांसा पहाणार आहोत.

१. दर्भ

१ अ. दर्भाविना श्राद्धकर्म का केले जात नाही ?

दर्भामुळे श्राद्धातील रज-तम कणांच्या हस्तक्षेपाचे प्रमाण अल्प होत असल्याने दर्भाविना श्राद्ध न केले जाणे

‘दर्भ हे तेजोत्पादक, म्हणजेच तेजाच्या निर्मितीला कारक आणि पूरक असल्याने दर्भाच्या साहाय्याने विधी केला असता, त्यातून प्रक्षेपित होणार्‍या तेजोमय लहरींमुळे श्राद्धातील प्रत्येक विधीकर्मातील रज-तम कणांच्या हस्तक्षेपाचे प्रमाण अल्प होऊन विधीकर्माला गती मिळून वाईट शक्तींच्या आक्रमणांचे प्रमाण अल्प झाल्याने पितरांना विधीतील त्या त्या स्तरावरील ऊर्जा ग्रहण करता येऊन त्यायोगे पुढची गती प्राप्त करता येते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ५.८.२००६, दुपारी ४.१०)

१ आ. श्राद्धविधीत दर्भ वापरण्याने काय परिणाम होतो ?

दर्भामुळे श्राद्धविधीतील हवन किंवा संकल्प थोड्या कालावधीत सिद्ध होणे

‘दर्भात सुप्त असणारा वायू तेजकणांशी संबंधित असून तो परिणामप्रक्रियेच्या स्तरावर वायूतत्त्वाच्या संबंधी अतिशय संवेदनशील असतो. विधीतील मंत्रोच्चारामुळे दर्भातील तेजतत्त्वरूपी वायू कार्यरत होऊन, बाह्य वायूमंडलातील वायूतत्त्वाच्या साहाय्याने ऊर्ध्व दिशेने गतिमान होतो. या अतीसंवेदनशील वायूच्या माध्यमातून मंत्रोच्चारातून निर्माण झालेल्या तप्त ऊर्जेचे अतिशय वेगाने ऊर्ध्व दिशेने गमन झाल्याने, ते ते हवन किंवा तो तो संकल्प त्या त्या स्थळी पोहोचून थोड्या कालावधीत सिद्ध होतो.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.११.२००५, सायं. ६.२०)

१ इ. मुळांसह असणार्‍या दर्भांनी रज-तमांचे विघटन आणि पितरांना तेजाचे बळ
प्राप्त होत असल्याने श्राद्धामध्ये वापरण्यात येणारे दर्भ मुळासकट असणे आवश्यक

संकलक : शास्त्रात असे सांगितले आहे, ‘श्राद्धामध्ये वापरावयाचे दर्भ मुळासकट घ्यावेत. त्याने पितृलोकांना जिंकता येते.’ यामागील कारण काय ?

एक विद्वान : ‘मुळासकट असलेल्या दर्भामध्ये आपतत्त्वयुक्त तेजक्षारांचे प्रमाण जास्त असल्याने आणि प्रवाही तेजयुक्त क्षार रज-तम कणांच्या विघटनास अन् उत्सर्जनास पोषक असल्याने मुळासकट असलेल्या दर्भाने केलेल्या कृतीतून प्रक्षेपित होणारी ऊर्जा तेजोमय, तसेच जास्त प्रमाणात प्रवाही बनून पितरांच्या कोषाला अल्प कालावधीत स्पर्श करणारी असल्याने असा श्राद्धविधी थोड्या कालावधीत फलप्राप्ती करून देणारा ठरतो. पितृलोकांना जिंकणे, म्हणजेच मत्र्यलोकात प्रत्येक स्तरावर येणार्‍या रज-तमात्मक कणांचे विघटन करून त्यातून पुढे तेजाच्या मार्गावर मार्गस्थ होऊन पितरयोनी पार करणे.

मुळेविरहित दर्भांनी रज-तमाचे उच्चाटन होते; परंतु पितरांना त्यामानाने अल्प प्रमाणात तेजाचे अधिष्ठान प्राप्त होते. परंतु मुळासकटच्या दर्भांनी रज-तमांचे विघटन होतेच, तसेच पितरांना तेजाचे बळ प्राप्त होते.’

– (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ५.८.२००६, दुपारी ४.२०)

१ ई. दर्भ अनेक आघात करून किंवा नखांनी का तोडू नये ?

दर्भ अनेक आघात करून किंवा नखांनी तोडल्यास त्याची संवेदनशीलता अल्प होणे

‘रज-तम कणांच्या संयोगातूनच नखांची निर्मिती झालेली असल्याने नखे मूलतःच रज-तम प्रवृत्तीदर्शक असतात. दर्भावर अनेक आघात केल्याने किंवा तो नखांनी तोडल्याने निर्माण होणार्‍या रज-तमात्मक ध्वनीलहरींचे संक्रमण दर्भात झाल्याने दर्भाची सत्त्वाशी संबंधित संवेदनशीलता अल्प होऊन, त्याची विधीतील फलनिष्पत्तीच्या दृष्टीने परिणामकारकताही न्यून होते. रज-तमयुक्त लहरींचे संक्रमण दर्भात झाल्याने आणि या लहरी जडत्वदर्शक असल्याने दर्भातून प्रक्षेपित होणार्‍या वायूची ऊध्र्व दिशेने गमन करण्याची क्षमता अल्प होते. असा दर्भ फलप्राप्तीच्या दृष्टीने विघातक ठरतो.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २९.११.२००५, सायं. ६.२०)

१ उ. श्राद्धासाठी देव आणि पितर यांच्या स्थानांवर बसण्यासाठी
ब्राह्मण उपलब्ध होत नसल्यास त्या स्थानांवर दर्भ का ठेवावेत ?

दर्भ हा कोणत्याही कनिष्ठ, तसेच उच्च स्तरांवरील घटकांचे प्रतिनिधित्व करणारा असल्याने श्राद्धासाठी ब्राह्मण उपलब्ध होत नसल्यास त्या स्थानावर दर्भ ठेवणे उपयुक्त असल्याचे सिद्ध होणे

‘दर्भ हा त्यातील सुप्त तेजकणयुक्त वायूमुळे आवश्यकतेप्रमाणे ब्रह्मांडातील सगुण अन् निर्गुण लहरी आकृष्ट करून घेण्यात अग्रेसर असल्याने तो देवतांच्या उच्च, तसेच पितरांच्या कनिष्ठ अशा दोन्ही लहरी आकृष्ट करून, त्यांना श्राद्धस्थळी पाचारण करण्याच्या क्षमतेचे निदर्शक आहे. दर्भातील तेजाशी संबंधित सुप्त वायू श्राद्धातील संकल्पयुक्त मंत्रोच्चाराने कार्यरत झाल्याने, दर्भ आपल्या तेजरूपी उत्सारणाने वाईट शक्तींना प्रतिबंध घालून, पितरांना श्राद्धस्थळी आकृष्ट करून घेऊ शकतो. म्हणून दर्भ हा कोणत्याही कनिष्ठ, तसेच उच्च स्तरांवरील घटकांचे प्रतिनिधित्व करणारा असल्याने, त्याला त्या त्या घटकांच्या प्रत्यक्ष अनुपस्थितीत त्या त्या स्थानावर आसनस्थ करून त्याद्वारा त्या त्या नियोजित लहरींची स्थापना करून विधीतील संकल्प सोडला जातो.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २.१२.२००५, दुपारी २.४३)

२. काळे तीळ

२ अ. श्राद्धविधीमध्ये काळे तीळ का वापरतात ?

काळ्या तिळांतील रज-तमात्मक शक्तीच्या आधारे पितरांच्या लिंगदेहांना विधीच्या ठिकाणी येणे सोपे होत असल्यामुळे श्राद्धात काळ्या तिळांचा वापर केला जाणे

‘श्राद्धामध्ये काळे तीळ वापरणे, म्हणजे काळ्या तिळांतून प्रक्षेपित होणार्‍या रज-तमात्मक लहरींच्या साहाय्याने मत्र्यलोकात अडकलेल्या पूर्वजांच्या लिंगदेहांना आवाहन करणे. श्राद्धात पूर्वजांना उद्देशून केलेल्या आवाहनात्मक मंत्रोच्चारातून उत्पन्न होणार्‍या नादशक्तीमुळे काळ्या तिळांतील सुप्त रज-तमात्मक शक्ती जागृत होते. ही शक्ती ज्या वेळी रज-तमात्मक स्पंदनांचे वलयांकित रूपात वातावरणात प्रक्षेपण करते, त्या वेळी श्राद्धात आवाहन केल्याप्रमाणे ते ते लिंगदेह या स्पंदनांकडे आकृष्ट होतात आणि पृथ्वीच्या वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करतात. या प्रक्रियेमुळे लिंगदेहांना काळ्या तिळांतून प्रक्षेपित होणार्‍या रज-तमात्मक लहरींवर आरूढ होऊन श्राद्धविधीच्या ठिकाणी येणे सोपे जाते. श्राद्धात अर्पण केलेला नैवेद्य लिंगदेहांनी वायूरूपात भक्षण केल्याने ते ते लिंगदेह संतुष्ट होतात. काळ्या तिळांतून प्रक्षेपित होणार्‍या लहरींमुळे लिंगदेहाभोवती असलेला वासनात्मक कोष कार्यरत होतो आणि श्राद्धातील आपापला वाटा ग्रहण करून तृप्त होतो.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ४.६.२००५, दुपारी ३.५०)

२ आ. श्राद्धकर्मात गूळमिश्रित अन्न, तीळ आणि मध यांचे दान का करावे ?

श्राद्धात गूळमिश्रित अन्न, तीळ आणि मध यांचे दान केल्याने लिंगदेह सर्व प्रकारच्या भावनिक देवाणघेवाणीतून १० टक्के प्रमाणात मुक्त होणे

‘श्राद्धकर्मात वापरलेले गूळमिश्रित अन्न, तीळ आणि मध हे घटक लिंगदेहाच्या वासनात्मक देवाणघेवाणीशी संबंधित कर्माचे निदर्शक आहेत. हे घटक लिंगदेहाच्या मायेतील वेगवेगळ्या वासना दानात्मकरीत्या फेडतात.

१. गूळ : हा सर्वांत चटकन मिसळणारा, म्हणजेच जिवाच्या त्या त्या कार्यस्तरावर निर्माण होणार्‍या समष्टी देवाणघेवाणीचे प्रतीक आहे.

२. तीळ : हे वैयक्तिक स्तरावर नकळत निर्माण होणार्‍या देवाणघेवाणीचे प्रतीक आहे.

३. मध : हा प्रत्यक्ष मायेतील वैयक्तिकरीत्या; परंतु भावनेवर आधारलेली आणि जाणतेपणी केलेली देवाणघेवाण अल्प करण्याचे प्रतीक आहे.

ज्याच्या हातून पितृकर्म केले जाते, तो पितृऋण फेडण्यासाठी सर्व पितरांचे दायित्व आपल्या खांद्यावर घेऊन, पितरांभोवती असणारे वासनामय कोषांचे जाळे भेदण्यासाठी प्रार्थनेसहित दान करून, प्रत्यक्ष ते ते कर्म करून पितरांना गती प्राप्त करून देतो.

गूळ, तीळ आणि मध यांच्या दानाने ब्रह्मांडातील रज-सत्त्व, सत्त्व-रज अन् रजोगुणात्मक आपतत्त्वात्मक चैतन्य कार्यरत होऊन लिंगदेहांभोवतीचे ते ते वासनात्मक कोष नष्ट करते, म्हणजेच हे दान एक प्रकारे लिंगदेहाला सर्व प्रकारच्या भावनिक देवाणघेवाणीतून १० टक्के प्रमाणात मुक्त करते. दत्ताची प्रार्थना करून त्याला शरण जाऊन हा विधी भावपूर्ण करून विधीवत सांगता केल्याने जिवाला पूर्ण फलप्राप्ती होऊन त्याची साधना निर्विघ्नपणे पार पडते. म्हणून त्या त्या विधीत ते ते यथायोग्य दान भावपूर्ण अन् शास्त्र समजून घेऊन करणे अधिक महत्त्वाचे ठरते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १.८.२००५, दुपारी २.४२)

३. अक्षता (तांदूळ)

३ अ. श्राद्धामध्ये तांदळाचीच खीर का करतात ?

श्राद्धामध्ये तांदळाचीच खीर केल्याने तिच्याकडे लिंगदेह आकर्षित होऊन खीररूपी नैवेद्याच्या भोवती संरक्षककवच निर्माण होणे

‘श्राद्धामध्ये पितरांना नैवेद्य दाखवून त्यांना संतुष्ट करण्यासाठी गोड पदार्थ म्हणून तांदळाची खीर बनवतात. यात वापरलेल्या घटकांमध्ये साखर हा मधुर रसाचे दर्शक, दूध हे चैतन्याचा स्रोत अन् तांदूळ हे सर्वसमावेशक म्हणून वापरले जातात. हे सर्व घटक आपतत्त्वात्मक आहेत.

खिरीमध्ये लवंगांचा वापर केल्याने तिच्यातून प्रकट होणार्‍या तमोदर्शक लहरी या खिरीतील इतर घटकांतून प्रक्षेपित होणार्‍या आपतत्त्वात्मक लहरींशी संयोग पावतात. या संयोगातून उत्पन्न होणार्‍या आपतत्त्वात्मक सूक्ष्म-वायूकडे रजतमात्मक लिंगदेह अल्प कालावधीत आकर्षित होतात. लवंगांतून प्रक्षेपित होणारा सूक्ष्म-वायू हा नैवेद्याभोवती उष्ण गतीमान लहरींचे सूक्ष्म-कवच निर्माण करतो. यामुळे नैवेद्याभोवती संरक्षक-कवच निर्माण होण्यास साहाय्य होते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २६.६.२००५, दुपारी २.५०)

४. माका आणि तुळस

४ अ. वायूमंडल शुद्ध होऊन पितरांना श्राद्धस्थळी प्रवेश
करणे सोपे जावे, यासाठी श्राद्धामध्ये माका आणि तुळस वापरणे

‘माका हा तेजदायी, तर तुळस ही प्राणदायी आहे. माक्याच्या पानातून वायूमंडलात प्रक्षेपित होणार्‍या तेजोमय लहरींमुळे वायूमंडलातील रज-तम कणांच्या गतीवर बंधन येते. रज-तम कणांची गती मंदावल्याने तुळशीच्या पानातून प्रक्षेपित होणार्‍या श्रीकृष्णतत्त्वाच्या चैतन्यमय लहरींमुळे सहजतेने रज-तम कणांना नष्ट केले जाते. अशा प्रकारे वायूमंडलाची शुद्धी करण्यासाठी माका आणि तुळस हे एकमेकांना पूरक ठरतात.

वायूमंडलाच्या शुद्धतेमुळे, तसेच श्राद्धातील संकल्पामुळे पितरांना श्राद्धस्थळी प्रवेश करणे सोपे जाते.’

– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २.१२.२००५, सकाळी १०.५९)

संकलक : माक्याच्या पानातून वायूमंडलात प्रक्षेपित होणार्‍या तेजोमय लहरींमुळे वायूमंडलातील रज-तम कणांच्या गतीवर बंधन कसे येते ? त्यांची गती कशामुळे वाढू शकते ?

एक विद्वान :

१. रज-तम कणांची गती मंदावणे

अ. हालचालीच्या माध्यमातून रज-तम कणांमध्ये बनलेल्या आकर्षणशक्तीच्या कक्षांचे माक्याच्या पानातून प्रक्षेपित होणार्‍या तेजोमय लहरींमुळे विघटन होते. त्यामुळे रज-तम कणांची भ्रमणकक्षेत होणारी गतीमान हालचाल मंदावते.

आ. तेजतत्त्वाच्या लहरींमुळे रज-तम कणांचे विभाजन होऊन त्यांचे विलगीकरण झाल्याने त्यांची एकत्रितपणे कार्य करण्याची क्षमता उणावते आणि त्यामुळेही त्यांच्या गतीवर बंधन येते.

२. रज-तम कणांची गती वाढणे

ज्या वेळी वातावरणात दूषित वायूचे प्रमाण वाढते किंवा एखाद्या तमोगुणी वस्तूतून होणार्‍या लहरींच्या प्रक्षेपणाचा वेग वाढतो, त्या वेळी या वेगवान ऊर्जेच्या साहाय्याने रज-तम कणांच्या हालचालींना वेग प्राप्त होतो.

(सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ६.१२.२००५, सकाळी ११.१६)

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्राद्धातील कृतींमागील शास्र’

2 thoughts on “श्राद्धात वापरण्यात येणार्‍या वस्तूंचे अध्यात्मशास्रीय महत्त्व”

    • नमस्कार अश्विनी जी

      ‘देव, ऋषी आणि समाज या तीन ऋणांसह पितृऋण फेडणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे आणि त्यांना संतोष होईल अशी कृत्ये करणे, हे वंशजांचे कर्तव्य आहे. श्राद्ध करणे, हा धर्मपालनाचाच एक भाग आहे’, असे धर्मशास्त्र सांगते. श्राद्ध करण्यामागील शास्त्र आणि केल्याने होणारे लाभ याविषयी सनातनवर अनेक लेख आहेत. आपण ते अवश्य वाचून घ्यावे – https://www.sanatan.org/mr/shraddha

      आपली,
      सनातन संस्था

      Reply

Leave a Comment