प्रस्तूत वैशिष्ट्यपूर्ण लेखातून आपण श्राद्ध कोणत्या ठिकाणी करावे, त्यांमागील कारणे आणि होणारे लाभ यांविषयी पाहू.
१. आपल्या घरात श्राद्ध केले असता तीर्थक्षेत्री श्राद्ध
करण्याच्या तुलनेत आठपट पुण्य प्राप्त होते, असे का सांगितले आहे ?
५० टक्के पितरांचे वास्तव्य त्यांच्या पारंपरिक वास्तूतच असल्याने
घरात श्राद्ध केले असता त्यांना तीर्थक्षेत्री श्राद्ध करण्याच्या तुलनेत आठपट लाभ होणे
‘जवळजवळ ५० टक्के पितर साधनेच्या अभावामुळे आणि वासनांच्या आधिक्यामुळे प्राप्त झालेल्या जडत्वामुळे गती धारण करू शकत नसल्याने त्यांचे वास्तव्य त्यांच्या पारंपरिक वास्तूतच अधिक असते. याच क्षेत्रात श्राद्धादी विधी केल्याने तो तो हविर्भाग घेण्यास पितरांना सहज शक्य झाल्याने पितरसंतुष्टीचे प्रमाणही जास्त असते. म्हणजेच पितरांचे वंशाला आशीर्वाद मिळण्याचे प्रमाण इतर ठिकाणांपेक्षा जास्त असल्याने ‘तीर्थापेक्षा आठपट पुण्य प्राप्त होते’, असे म्हटले आहे. याव्यतिरिक्त या विधीतून पितरांचे वास्तूशी असलेले घनिष्ट संबंध अल्प होण्यास साहाय्य होऊन त्यांना मर्त्यलोकात प्रवेश करण्याचे बळ प्राप्त झाल्याने भूतलावर एकाच ठिकाणी अडकून (बंदिस्त होऊन) कंठाव्या लागणार्या यातनांचे प्रमाण न्यून होते.
२. दक्षिण दिशेकडे उतरते असणारे ठिकाण श्राद्धासाठी चांगले का मानले जाते ?
दक्षिणेकडे प्राबल्याने कार्यरत असलेल्या यमलहरींची प्रवृत्ती भूमीशी संलग्न असलेल्या जास्त दाबाच्या उतारदर्शक पट्ट्यात, म्हणजेच जडत्व-धारकतेशी संलग्न होऊन स्थिर होण्याची असल्याने, या पट्ट्यात श्राद्धादी विधी केल्याने पितरांना ग्रहण करता येणार्या यमलहरींच्या कार्यरत आधिक्याने आणि साहाय्याने तो तो हविर्भाग पितरांना जलद मिळून त्यांना संतुष्ट करणे शक्य होते. म्हणून दक्षिण बाजूला उतरते असलेले ठिकाण श्राद्धविधीसाठी पूरक आणि पोषक असते.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १३.८.२००६, सकाळी ११.४५ आणि दुपारी १.५९)
३. कोकण किनारपट्टी, सिंधु नदीचा उत्तर तट,
नर्मदेचा दक्षिण तट यांसारख्या ठिकाणी श्राद्ध का करू नये ?
कोकण किनारपट्टी, सिंधु नदीचा उत्तर तट, नर्मदेचा दक्षिण तट
यांसारखी ठिकाणे ही सात्त्विक आणि तेजाने भारित असल्याने ती श्राद्धासाठी वर्ज्य असणे
‘कोकण किनारपट्टी, सिंधु नदीचा उत्तर तट आणि नर्मदेचा दक्षिण तट या सर्वांत जास्त सात्त्विक अन् तेजाने भारित किनारपट्ट्या समजल्या जातात. यांतून प्रक्षेपित होणार्या तेजतत्त्वात्मक लहरींमुळे वायूमंडल सातत्याने शुद्ध बनत असते. या किनारपट्ट्यांवर अनेक दिव्यात्मे आणि ऋषीमुनी आजही सुप्तावस्थेत ध्यान लावून बसलेले आहेत. त्यांच्या ध्यानातून प्रक्षेपित होणार्या अनेक प्रकारच्या तारक-मारक संयुक्त लहरींमुळे आजही लोकांचे रक्षण होत आहे आणि हिंदु धर्माचे बीज अजूनही शिल्लक आहे.
सृष्टीत लयासारखी कितीही स्थित्यंतरे आली, तरी भारतीय संस्कृती डळमळीत होणार नाही; कारण ती वेदप्राचीनस्वरूप, म्हणजेच अनादी-अनंत आहे. या किनारपट्ट्यांवर कुठलेही रज-तमाशी संबंधित श्राद्धासारखे विधी करू नयेत, तसेच या किनारपट्ट्यांवर लघुशंका करणे, हेही धर्मपातक समजले जाते.
श्राद्धविधीतून केलेल्या आवाहनात्मक मंत्रोच्चारामुळे पृथ्वीच्या वातावरणाच्या कक्षेत प्रवेश करणार्या अनेक वासनात्मक लिंगदेहांमुळे ही भूमी दूषित बनण्याची शक्यता असते, तसेच यामुळे होणार्या रज-तमाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या किनारपट्ट्यांवरून होणार्या प्रक्षेपणात्मक सात्त्विक लहरींच्या प्रवाहीपणावर परिणाम होण्याची आणि तो खंडित होण्याची शक्यता असल्याने, विधी करणार्याला याचे महापातक लागण्याची शक्यता असते. म्हणून या किनारपट्ट्यांवर श्राद्धादी कर्म करू नये, असे सांगितले आहे.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २८.७.२००५, सायं. ७.४८)
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘श्राद्धातील कृतींमागील शास्र’
सनातनच्या संतांच्या सांगण्यानुसार धर्मशास्त्राप्रमाणे
श्राद्धविधी केल्यावर मनातील प्रतिक्रियांचे प्रमाण आपोआप ९०
टक्के न्यून होणे आणि त्यावरून हिंदु धर्मातील श्राद्धविधीचे महत्त्व लक्षात येणे
‘१९९९ या वर्षी माझ्या यजमानांचे निधन झाले. मी प्रतिवर्षी एकदा याप्रमाणे ५ वर्षे श्राद्धविधी केले. त्यानंतर मी यजमानांच्या तिथीला श्राद्धविधी न करता केवळ जेवणाचे पान बाहेर ठेवत होतेे. या वर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी मी देवद येथील सनातन आश्रमात होते. तेथे सनातनच्या सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्याशी माझी भेट झाली. तेव्हा त्यांनी मला यजमानांसाठी श्राद्धविधी न केल्याच्या चुकीची जाणीव करून दिली. त्यानंतर पितृपंधरवड्यातील तिथीला (१०.९.२०१७ या दिवशी) देवद आश्रमात यजमानांसाठी श्राद्धविधी करण्यात आला. मला त्याआधी कोणतीही व्यक्ती दिसली, तरी तिच्याविषयी माझ्या मनात प्रतिक्रिया येण्याचे प्रमाण पुष्कळ अधिक होतेे. त्याविषयी स्वयंसूचनासत्र केल्यावर माझ्यामध्ये तात्पुरता पालट होत असे; पण पितृपंधरवड्यात श्राद्धविधी केल्यानंतर आपोआप माझ्या मनातील प्रतिक्रियांचे प्रमाण ९० टक्के न्यून झाले आहे.’
– श्रीमती जयश्री भालेराव, रायगड (२२.१२.२०१७)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक