‘देवकार्यापेक्षा पितृकार्य श्रेष्ठ कसे’, श्राद्ध हे धर्म, अर्थ आणि काम यांची प्राप्ती कशी करून देते ?, श्राद्धामुळे पूर्वजांच्या त्रासांपासून आपले रक्षण कसे होते इत्यादी सूत्रांमागील अध्यात्मशास्त्रीय विवेचन या लेखातपाहू. या सर्व सूत्रांतून आपल्याला हिंदु धर्माचे महत्त्वही लक्षात येईल.
१. श्राद्धामुळे पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण कसे होते ?
‘श्राद्धातून उत्पन्न झालेली ऊर्जा ही मृताच्या लिंगदेहामध्ये सामावलेल्या त्रिगुणांच्या ऊर्जेशी साम्य दाखवते; म्हणून अल्प कालावधीत श्राद्धातून उत्पन्न झालेल्या ऊर्जेवर लिंगदेह मत्र्यलोक पार करतो. (मर्त्यलोक हा भूलोक आणि भुवलोक यांच्या मध्ये आहे.) मर्त्यलोक पार केलेला लिंगदेह परत पृथ्वीवरील सर्वसामान्य व्यक्तीला त्रास देण्यासाठी पृथ्वीच्या वातावरणकक्षेत येऊ शकत नाही; म्हणून श्राद्धाला अत्यंत महत्त्व आहे; नाहीतर वासनांच्या फेर्यात अडकलेले अनेक लिंगदेह व्यक्तीच्या साधनेमध्ये व्यत्यय आणून तिला साधनेपासून परावृत्त करू शकतात.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १.३.२००५, सायं. ६.४३)
२. पद्मपुराणात ‘देवकार्यापेक्षा पितृकार्य श्रेष्ठ आहे’, असे का सांगितले आहे ?
२ अ. ‘साधना न करणार्या एखाद्या व्यक्तीने पितरांच्या संबंधित कार्य केले असता तिच्यावर पितरांची कृपा होऊन तिचे जीवन सुखी होते. त्यानंतर ती व्यक्ती साधनेकडे वळू शकते आणि चांगल्या प्रकारे देवकार्य करू शकते. त्यामुळे देवकार्यापेक्षा पितरांशी संबंधित कार्याला अधिक महत्त्व आहे.’ – ईश्वर (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून, २३.७.२००५, सायं. ७.४५)
२ आ. ‘पितृकार्याला कर्मकांडामध्ये प्रत्यक्ष कर्तव्याचे स्थान दिले आहे. कर्तव्य करणे, ही कर्माची पहिली पायरी आहे; कारण कर्तव्य करणे, म्हणजेच मायेला प्रत्यक्ष आणि जवळून अनुभवणे अन् कर्म करणे, म्हणजे कर्तव्यातून जन्मलेला ईश्वराचा माया-स्वरूपी नियोजनाचा परिणाम पहाणे. कर्तव्याप्रती भाव निर्माण झाला की, जीव प्रत्यक्ष कर्माचा आनंद लुटू शकतो. यातूनच ईश्वराप्रती असलेल्या व्यक्त भावाची निर्मिती होते. भाव हे प्रत्यक्ष कर्तव्यस्वरूप सगुण स्तराचे, तर भावाच्या पुढचा टप्पा म्हणजे सर्व कर्ममय म्हणजेच ईश्वरमय होणे, हे निर्गुण स्तराचे आहे. प्रथम कर्तव्य आणि कर्म योग्य रीतीने करून त्यातून उत्पन्न होणार्या जाणिवेनेच जिवाला देवकार्यापर्यंत जाता येते. यासाठी पद्मपुराणात पितृकर्म आणि देवकर्म यांच्या माध्यमातून ‘कर्तव्य-कर्म सिद्धांत’ स्पष्ट केला आहे. पितृकर्मामागील ईश्वराच्या कार्यकारणभावाचे महत्त्व जो समजू शकतो, तोच देवकार्य तेवढ्याच श्रद्धेने आणि भावाने करू शकतो; म्हणून ईश्वराकडे जाण्याच्या प्रवासातील पितृकर्म ही प्रथम कर्तव्यस्वरूप पायरी, देवकर्म ही दि्वतीय पायरी, तर प्रत्यक्ष ईश्वरी कार्य म्हणजेच समष्टी कार्य ही तिसरी पायरी आहे. अशा प्रकारे जीव हळूहळू मोक्षाला प्राप्त होतो.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २७.७.२००५, दुपारी १२.२७)
३. पितृऋण फेडणार्या श्राद्धामुळे देवऋण आणि ऋषीऋण फेडणे सुलभ होणे
‘ऋषी हे देवांपेक्षा कोपिष्ट असल्याने ते शाप देऊन जिवाला बंधनात अडकवू शकतात; परंतु पितृऋण हे कर्मवाचक असल्याने ते फेडायला अत्यंत सोपे आणि सहज आहे. श्राद्धविधीकर्मातून हे आपल्याला शक्य होते; म्हणून प्रत्येकाने इतर ऋणे चांगल्या तर्हेने फेडता येण्यासाठी देव आणि ऋषी यांना जोडणार्या पितृऋणरूपी दुव्याचा आश्रय घेऊन त्यांना विधीतून संतुष्ट करून त्या योगे मोक्षाची गती धारण करण्याचा प्रयत्न करावा. श्राद्धविधीकर्म केल्याने पितरांच्या साहाय्याने आपल्याला हळूहळू देव आणि ऋषी यांच्यापर्यंत पोहोचता येऊन वसु, रुद्र अन् आदित्य (‘वसु’ म्हणजेच इच्छा, ‘रुद्र’ म्हणजेच लय आणि ‘आदित्य’ म्हणजेच तेज, म्हणजेच ‘क्रिया’), या तिन्हींच्या संयोगाने अनुक्रमे पिता, पितामह आणि प्रपितामह यांचा उद्धार करता येणे शक्य होऊन देवतांचा आशीर्वाद मिळवणे शक्य होते.
४. आपापसातील बंध तोडून जीवन्मुक्त होणे
‘श्राद्ध’ ही संज्ञा पूर्णतः माया आणि ब्रह्म यांना ऋणबंधनाने जोडलेली आहे. ज्या वेळी हे ऋणबंधनरूपी देवाणघेवाणयुक्त धागे संपुष्टात येऊन जीव मुक्त होतो, त्या वेळीच तो गती धारण करून मोक्षाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. पितरऋणरूपी मायेचे ध्येयही मोक्षाकडे जायचे असल्याने श्राद्धविधीकर्मातून विष्णुगणांच्या साक्षीने आपापसातील बंध तोडून जीवन्मुक्त होता येते.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २३.८.२००६, दुपारी १२.३५)
५. श्राद्ध हे धर्म, अर्थ आणि काम यांची प्राप्ती कशी करून देते ?
‘अध्यात्मात ‘धर्म’ हे प्रत्यक्ष कर्तव्यपालनाचे, ‘अर्थ’ हे कर्तव्यातून प्राप्त झालेल्या समाधानपूर्तीचे, तर ‘काम’ हे कर्तव्यभावनेतून निर्माण झालेल्या आसक्तीच्या निर्दालनाचे प्रतीक आहे. श्राद्ध करतांना जो पितरांचे उत्तरदायित्व घेऊन पितृऋण फेडतो, तो एक प्रकारे पितरांच्या लिंगदेहांना गती देण्यासाठी प्रत्यक्ष कर्तव्यस्वरूप धर्मपालनच करत असतो. हे सर्व करत असतांना तो त्या कर्मात एकाग्र होऊन ते पूर्ण करण्यासाठी झटत असतो. यातूनच त्याचा सेवाभाव निर्माण होऊन त्याला अध्यात्मातील एकेका अर्थाची, म्हणजेच समाधानाची प्राप्ती होत असते. ते कर्तव्यकर्म आटोपल्यानंतर परत तो त्याच्या मायेतील व्यावहारिक विश्वात रममाण होतो, म्हणजेच श्राद्ध केल्याचा विधी त्याच्या भूतकाळामध्ये जमा होतो किंवा आपोआप त्यागला जातो. या सर्वांतून एक प्रकारे धर्म, अर्थ आणि काम हे साधत जाते; म्हणून श्राद्ध हा अशुद्ध विधीसुद्धा शुद्ध भावातून केला असता, त्यातूनही धर्म, अर्थ आणि काम यांची प्राप्ती करून घेण्याची सोय हिंदु धर्माने केली असल्याचे लक्षात येते.’
– एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, ३.८.२००५, दुपारी ३.५४)
६. ‘श्राद्ध केल्याने एकशे एक कुळांना गती मिळते’, याचा अर्थ काय ?
(‘श्राद्ध केल्याने एकशे एक कुळांना गती मिळणे’, म्हणजेच मृत पावलेल्या
जिवाशी संबंधित देवाणघेवाणयुक्त क्रियेने बांधलेल्या इतर सजिवांनाही गती मिळणे)
‘कुळ’ हा शब्द ‘जीवनात त्या त्या जिवाच्या प्रत्यक्ष, तसेच अप्रत्यक्षपणे देवाणघेवाणयुक्त रूपात संपर्कात आलेले इतर जीव’ या अर्थी वापरला आहे, ‘पिढी’ या अर्थी नव्हे. श्राद्धादी कर्म केल्याने त्या त्या लिंगदेहावर परिणाम होऊन त्याच्या कोषातील आसक्तीयुक्त रज-तमात्मक धाग्यांचे विघटन झाल्याने त्या जिवासहच त्याच्याशी अनेक कारणांनी संपर्कात आलेल्या जवळजवळ शंभरेक जिवांचाही तो तो देवाणघेवाणयुक्त संपर्क फिटण्यास साहाय्य झाल्याने ते जीवही या देवाणघेवाण कर्मातून मुक्त होऊन थोड्याफार प्रमाणात का होईना त्याच्यामुळे गती धारण करतात. या अर्थी ‘श्राद्ध केल्याने एकशे एक कुळांना गती मिळते’, म्हणजेच मृत पावलेल्या जिवाशी संबंधित देवाणघेवाणयुक्त क्रियेने बांधलेल्या इतर सजिवांनाही गती मिळते, असे म्हटले आहे.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १३.८.२००६, दुपारी २.१३)
७. इतर पंथांमध्ये खर्या अर्थाने श्राद्ध (टीप १) करत नसल्यामुळे त्या
पंथियांच्या लिंगदेहांचे पुढे काय होते ? (इतर पंथांत खर्या अर्थाने श्राद्ध करत नसल्याने त्या
पंथियांच्या लिंगदेहांना गुलाम बनवून त्यांच्याकडून कार्य करवून घेणे मांत्रिकांना (टीप २) सोपे जाणे
‘इतर पंथांत खर्या अर्थाने श्राद्ध न केले गेल्याने त्या पंथियांचे लिंगदेह कित्येक जन्म भटकत राहिल्याने, त्यांना मोठ्या प्रमाणात भुव, तसेच मत्र्य या लोकांतून भूलोकाला त्रास देणे सोपे जाते. म्हणूनच मनुष्याला त्रास देणार्या वाईट शक्तींमध्ये जवळजवळ ७० टक्के वाईट शक्ती इतर पंथीय आणि ३० टक्के वाईट शक्ती हिंदू असतात. या लिंगदेहांना पद्धतशीरपणे मर्त्यलोकात अडकवून ठेवून त्यांना दास बनवून त्यांच्याकडून कार्य करवून घेतल्यामुळे, भूलोकाशी संपर्क ठेवणे आणि पृथ्वीवर अधिराज्य गाजवणे मांत्रिकांना सोपे जाते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, २२.११.२००५, दुपारी १.४७)
टीप १ – जैन पंथात पितरांच्या तिथीच्या दिवशी देवळात जाऊन तीर्थंकरांना नैवेद्य दाखवतात आणि पितरांचे स्मरण करून पूजन करतात. खिस्ती पंथातील प्रोटेस्टंट पंथात श्राद्धासारखा काहीएक विधी नाही; मात्र रोमन कॅथॉलिक पंथात वडिलांच्या मृतदिनी मुलगा चर्चमध्ये जाऊन त्यांच्यासाठी प्रार्थना, म्हणजे ‘मासेस’ करतो.
मुसलमान पंथात मृत व्यक्तीच्या स्मृतीदिनी तिच्या नावे फकिराला अन्न आणि द्रव्य यांचे दान करतात आणि कुराणातील काही वचने वाचतात. पारशी पंथात त्यांच्या वर्षाच्या शेवटच्या दिवसांत ते पितरांसाठी घरातील स्वच्छ जागी फळे आणि फुले ठेवतात. ज्या दिवशी मृत माणसाची तिथी असेल, त्या दिवशी त्यांचे अध्यारू (पुजारी) मंत्र म्हणतात.
हिंदु धर्मात चैतन्यमय संस्कृत मंत्रोच्चारांसह केल्या जाणार्या विविध स्तरांवरील नियमित शास्त्रोक्त श्राद्धविधींमुळे पूर्वजांच्या लिंगदेहांचे वाईट शक्तींपासून रक्षण होऊन त्यांना मर्त्यलोक भेदून पुढे जाण्यास बळ प्राप्त होते. वर दिल्याप्रमाणे विविध पंथांत केवळ पितरांचे पूजन, त्यांच्यासाठी प्रार्थना, दानकर्म यांसारखे मंत्रोच्चाररहित श्राद्धसदृश विधी केले जात असल्याने, ते पितरांना गती देण्याच्या दृष्टीने अपुरे ठरतात. म्हणूनच इतर पंथांत ‘खर्या अर्थाने श्राद्ध करत नाहीत’, असे म्हटले आहे. – संकलक
टीप २ – मनुष्याला त्रास देणारे भुवलोक आणि पाताळ येथील अदृश्य जीव (लिंगदेह) म्हणजे अनिष्ट शक्ती. अनिष्ट शक्तीचे भूत, पिशाच, हडळ यांसारखे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यांपैकी मांत्रिक म्हणजे सर्वांत बलाढ्य अनिष्ट शक्ती होय.
८. श्राद्धकर्म हा विधी पितरांसाठी असूनही तो एखाद्या विशिष्ट तिथीस केल्यास कर्त्यास विशिष्ट फलप्राप्ती होते
‘प्रत्येक गोष्ट ही त्याच्या कार्यकारण-भावासहित जन्माला येते. प्रत्येक गोष्टीची परिणामकारकता ही त्याचा कार्यमान कर्ता, कार्यातील योग्य घटिका आणि कार्यस्थळ यांवर अवलंबून असते. या सर्वांच्या पूरकतेवर कार्याची फलनिष्पत्ती, म्हणजेच परिपूर्णता ठरून कर्त्याला विशिष्ट फलप्राप्ती होते. ही गोष्ट ज्या वेळी ईश्वरी नियोजनाच्या म्हणजेच प्रवृत्ती आणि प्रकृती यांच्या संगमाने घडते, त्या वेळी ती प्रत्यक्ष इच्छा, क्रिया आणि ज्ञान या तीन स्तरांवरील शक्तीच्या साहाय्याने सगुण रूप धारण करून साकार होते. तिथी ही प्रकृतीला आवश्यक, म्हणजेच बळ देणारी म्हणजेच मूळ ऊर्जास्वरूप आहे, तर त्या तिथीला त्या त्या जिवाच्या नावाने घडणारे कर्म हे त्यातून उत्पन्न होणार्या प्रवृत्तीला, म्हणजेच फलनिष्पत्तीस पोषक आहे. प्रत्येक गोष्ट त्या त्या तिथीला आणि त्या त्या मुहूर्ताला करणे महत्त्वाचे आहे; कारण या दिवशी त्या त्या घटनात्मक कर्मांचे कालचक्र आणि त्यांचा प्रत्यक्ष घटनाक्रम, त्यातून उत्पन्न होणारा परिणाम या सर्वांची स्पंदने एकसारखी म्हणजेच एकमेकांना पूरक असतात. ‘तिथी’ ही तो तो घटनाक्रम पूर्णत्वास नेण्यास आवश्यक असणार्या लहरी कार्यरत करणारी असते.’ – एक विद्वान (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून, १२.८.२००५, सायं. ६.०२)