आदर्श राज्याचा विचार मनात आला की, प्रत्येकाला रामराज्यच आठवते. ‘असे रामराज्य आपल्या वाट्याला का येऊ नये’, असेही अनेकांना वाटते. आपण प्रयत्न केल्यास पूर्वीसारखेच रामराज्य आताही अवतरू शकेल. त्यासाठी नेमके काय प्रयत्न करायला हवेत, ते या लेखात पाहू.
१. धर्माचरणाचा अभाव, हेच राष्ट्राच्या सध्याच्या दुःस्थितीचे मूळ
‘अधर्म एव मूलं सर्व रोगाणाम् ।’ म्हणजे अधर्म (व्यक्ती आणि समाज धर्माचरणापासून विन्मुख होणे), हाच सर्व रोगांचे मूळ आहे. समाज आणि राष्ट्र यांवरील धर्माचा अंकुश नाहीसा झाल्याने व्यक्तीगत जीवनात स्वार्थ, अधिकार, हव्यास, भोगलालसा आदी दोष आणि राष्ट्रीय जीवनात गुन्हेगारी, भ्रष्टाचार, सत्तापिपासूपणा, चारित्र्यहीनता, नीतीहीनता आदी समस्या निर्माण झाल्या आहेत.
२. समाजाला धर्माचरणापासून दूर लोटून राष्ट्राला अधोगत बनवणारी सध्याची निधर्मी राज्यव्यवस्था
राष्ट्राने ईश्वरप्राप्तीच्या दिशेने टाकलेल्या पावलांवरून राष्ट्राची प्रगती कळते. ही राष्ट्राची खरी प्रगती असते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात रुजलेल्या निधर्मी राज्यव्यवस्थेत तर ईश्वरप्राप्तीचे माध्यम असलेला ‘धर्म’च राज्यकर्त्यांनी नाकारला. म्हणजे राष्ट्राची पावले उलटी पडत गेली आणि स्वातंत्र्यानंतर (२०१४ या वर्षी) ६६ वर्षांत झालेली राष्ट्राची अधोगती आपण पहातच आहोत.
धर्म नाकारून राष्ट्राची ध्येयधोरणे निश्चित केल्याने शालेय शिक्षण, शासकीय धोरणे, सामाजिक जीवन अशा सर्वच ठिकाणी स्वार्थ, अधिकाराची (हक्काची) जाणीव, नैतिकतेची पायमल्ली आदींचा अतिरेक झाला. राज्यव्यवस्थेत धर्माचे अधिष्ठान न राहिल्यामुळे लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींमध्येही धर्माने शिकवलेला त्याग, संयम, कर्तव्यनिष्ठा, सदाचार, चारित्र्यशीलता यांसारख्या गुणांचा विकास झाला नाही. ‘यथा राजा तथा प्रजा’, यानुसार प्रजेचीही स्थिती तशीच झाली.
३. आदर्श धर्मराज्यांची उदाहरणे
राजा कैकय, प्रभु श्रीराम ते अलीकडील काळातील छत्रपती शिवाजी महाराज यांनी धर्मराज्याचा आदर्श घालून दिला; म्हणून हिंदु समाजासाठी ते आजही संस्मरणीय आणि वंदनीय ठरतात.
४. धर्माचरण हाच धर्मराज्याचा (हिंदुराष्ट्राचा) पाया
धर्मनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा, कर्तव्यभावना, नीतीमत्ता, चारित्र्यशीलता इत्यादी गुण सर्व समाजानेच अंगिकारलेले असणे, हे आदर्श समाजव्यवस्थेचे साध्य आहे. त्यासाठी धर्म हा महत्त्वाचा घटक आहे; कारण धर्माच्या आधारेच मनुष्याचा अभ्युदय साधतो, म्हणजे लौकिक आणि पारमार्थिक जीवन उन्नत होते, तसेच मोक्षप्राप्ती होते.
५. धर्मराज्याची निर्मिती म्हणजे क्रांती नव्हे, तर विश्वबंधुत्वाच्या निर्मितीची प्रक्रिया
धर्मराज्याच्या निर्मितीत क्रांती होत नाही, तर उत्क्रांती होते. क्रांतीत विध्वंस असतो. उत्क्रांतीत विध्वंस नसतो, तर उद्धार असतो. जनतेला धर्मशिक्षण देऊन, तिच्यातील दोषांचे निर्मूलन करून आणि सद्गुण वाढवून तिला सात्त्विक बनवले जाते आणि तिच्यात विश्वबंधुत्व निर्माण केले जाते. प्रभुकृपा झालेले राष्ट्रसंत आणि साधक आपले आदर्श, सद्गुण, संस्कृती अन् अनुभव यांद्वारे धर्मराज्याची निर्मिती करतात. त्यामुळे रक्तहीन क्रांतीच्या, म्हणजे वैचारिक क्रांतीच्या माध्यमातून साकार होणारे आगामी धर्मराज्य, हे जगासमोर एक आदर्श निर्माण करील.
६. सर्वगुणसंपन्न धर्माधिष्ठित भावी हिंदुराष्ट्र असे असेल !
६ अ. राजकीयदृष्ट्या हिंदुराष्ट्र
६ अ १. राज्यकर्ते
राज्यकर्ते हे धर्मपालक, सात्त्विक, नीतीमान, जनकल्याणकारी, निःस्वार्थी अन् जनतेवर पितृवत प्रेम करणारे असतील. ते जनतेकडून धर्माचरण करवून घेणारे, संतांचे मार्गदर्शन घेणारे, पारदर्शक कारभार करणारे, तसेच न्यायप्रियता, योजनाबद्धता, शिस्तप्रियता, निर्णयक्षमता, सतर्कता आदी प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाच्या गुणांनी संपन्न असतील.
६ अ २. राज्यघटना
‘लोकशाहीत राज्यघटनेची आवश्यकता असते, तर धर्माधिष्ठित हिंदुराष्ट्रात धर्म हेच नीतीनियमांचे सार असल्याने राज्यघटनेची आवश्यकताच नसेल.’ – अधिवक्ता (अॅड्.) रामदास केसरकर, सनातन संस्थेचे मानद कायदाविषयक सल्लागार
६ अ ३. निवडणुका
एकगठ्ठा मतपेढ्या, राखीव जागा, हिंसाचार, ५० टक्क्यांहून अधिक लोकांनी नाकारूनही सर्वाधिक मते मिळाली म्हणून उमेदवार जिंकणे आदी त्रुटी असलेल्या निवडणुका हिंदुराष्ट्रात नसतील.
६ आ. न्यायिकदृष्ट्या हिंदुराष्ट्र
६ आ १. न्यायदान
न्यायाधीश सूक्ष्मातील जाणणारे असल्याने अन्यायग्रस्तांना योग्य अन् त्वरित न्याय मिळेल. त्यामुळे अधिवक्त्यांची (वकिलांची) निकड नसेल.
६ आ २. कायदे
सर्व कायदे हिंदुहिताचे असतील. धर्मांतराला कायद्याने बंदी असेल. सर्व नागरिकांसाठी ‘समान नागरी कायदा’ असेल.
६ इ. प्रशासकीयदृष्ट्या हिंदुराष्ट्र
६ इ १. आरक्षक (पोलीस) : हिंदुराष्ट्रात पोलीस दलासाठी राष्ट्रभक्ती आणि धर्मप्रेम या दोन घटकांना सर्वाधिक प्राधान्य असेल.
६ इ २. प्रशासन : हिंदुराष्ट्रात शासन, प्रशासन, संरक्षण दले आणि न्यायालये यांत केवळ राष्ट्र अन् धर्म प्रेमी असतील.
६ इ ३. आरक्षणहीन पदोन्नती : हिंदुराष्ट्रात लायकीप्रमाणे, म्हणजे तळमळ, भाव, प्रीती (निरपेक्ष प्रेम), नेतृत्व, अल्प अहं इत्यादी गुण असणार्यांनाच बढत्या मिळतील.
६ ई. संरक्षणदृष्ट्या हिंदुराष्ट्र
६ ई १. सीमा : हिंदुराष्ट्रात देशाच्या सर्व सीमा सर्वप्रथम सुरक्षित केल्या जातील. घुसखोरीला लगाम घालणारे कठोर कायदे केले जातील.
६ ई २. संरक्षण : देशाच्या अंतर्बाह्य सुरक्षेला प्रथम प्राधान्य असेल. आतंकवादी (बाह्य) अन् नक्षलवादी (अंतर्गत) शत्रूंचा पूर्ण बीमोड केला जाईल.
६ उ. आर्थिकदृष्ट्या हिंदुराष्ट्र
६ उ १. अर्थशास्त्र : अर्थशास्त्रानुसार हिंदुराष्ट्रातील सर्वांना आवश्यक ते सर्व मिळेल, म्हणजे सर्व जण सुखी होतील.
६ उ २. अर्थव्यवस्था : काळे धन आणि भ्रष्टाचार नसल्याने आणि जनतेची उद्योगीवृत्ती वाढल्याने देशाची अर्थव्यवस्था कणखर होईल.
६ उ ३. कृषी : शेतकरी सात्त्विक, राष्ट्रीय गरजा पूर्ण करणारी आणि राष्ट्रीय प्रगतीला पोषक असलेली पिके घेतील.
६ ऊ. शैक्षणिकदृष्ट्या हिंदुराष्ट्र
६ ऊ १. शिक्षण : मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धती रहित करून आदर्श ‘गुरुकुल’ पद्धत अस्तित्वात येईल. या शिक्षणपद्धतीमुळे विद्यार्थी स्वयंपूर्ण, ज्ञानपूर्ण, स्वाभिमानी, राष्ट्रप्रेमी, तसेच आत्मबल अन् क्षात्रतेज संपन्न होतील.
६ ऊ २. धर्मशिक्षण : शाळेत असल्यापासूनच धर्मशिक्षण दिले गेल्याने भावी पिढी सुसंस्कारित अन् नीतीमान होईल. ‘गुरु-शिष्य परंपरा’ पुनरुज्जीवित करण्यात येईल.
६ ऊ ३. कला : ‘कलेसाठी कला’, असे कलेचे स्वरूप न रहाता ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’, अशा भावाने कलेचा विकास होईल.
६ ए. सामाजिकदृष्ट्या हिंदुराष्ट्र
६ ए १. दंडनीती : चोर, भ्रष्टाचारी, गुन्हेगार आदींना कठोर शिक्षा दिली जाईल. समाजव्यवस्थेत ‘कायदा’ नव्हे, तर ‘धर्म’ हा केंद्रबिंदू असल्याने समाज नीतीमान अन् सदाचारी बनेल.
६ ए २. नागरिक : धर्माचरणी, सुसंस्कृत, एकमेकांना साहाय्य आणि एकमेकांवर प्रेम करणारे, कार्यक्षम अन् सर्व नियम पाळणारे असे नागरिक असतील.
६ ए ३. आरोग्य : धर्माचरणामुळे मानवी आरोग्य आणि आयुष्य वर्धिष्णू होईल. आयुर्वेदाला राजमान्यता दिली जाईल आणि त्याचे संवर्धन केले जाईल.
६ ऐ. धार्मिकदृष्ट्या हिंदुराष्ट्र
६ ऐ १. देवळे : देवळांचे विश्वस्त आणि सेवेकरी भक्त असतील, तसेच देवनिधीचा वापर धर्मकार्यासाठीच होईल.
६ ऐ २. देवतांच्या मूर्ती : देवतांच्या मूर्ती त्या त्या देवतेचे अधिकाधिक तत्त्व आणि सात्त्विकता प्रक्षेपित करणार्या असतील.
(संदर्भ : कौटिल्याचे अर्थशास्त्र, सनातन-निर्मित ‘ईश्वरी राज्याची स्थापना’ ग्रंथ आणि ‘दैनिक सनातन प्रभात’मधील प्रकाशित चौकटी )
!! जयतु जयतु हिंदुराष्ट्रम !!