धर्म आणि नीती

भारतीय धर्मशास्त्रात धर्म आणि नीती या दोन गोष्टी भिन्न मानलेल्या आहेत. या लेखातून आपण ‘नीती’ शब्दाचा अर्थ काय, नीतीच्या अस्तित्वासाठी काय आवश्यक आहे; याबरोबरच धर्मशास्त्र आणि नीतीशास्त्र यांतील भेद इत्यादी जाणून घेऊ.

 

१. ‘नीती’ या शब्दाचे निरनिराळे अर्थ आणि महत्त्व

१ अ. ‘नी (नय्) नेणे, पुढे चालवणे, या धातूवरून ‘नीती’ हा शब्द बनला आहे. सत्यप्रवृत्ती, सदाचरण, सारासार विवेक, सत्य, अस्तेय इत्यादी गुण आणि अंतिम श्रेयाकडे नेणारा मार्ग इत्यादी गोष्टी नीती या शब्दाने दर्शित होतात. अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, जीवनशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र या शास्त्रांशी नीतीचा घनिष्ट संबंध येतो. त्यामुळे नीतीचा विचारही तितकाच व्यापक होतो. अशा या व्यापक नीतीविचारालाच नीतीशास्त्र असे म्हणतात.’

१ आ. ‘नीतीचे अंतिम तत्त्व म्हणजे ऐक्य, मोक्ष किंवा सामरस्याचा अनुभव घेणे. देवाचे यथार्थ ज्ञान वाढण्यास आणि त्यायोगे त्याचा साक्षात्कार करून घेण्यास ज्यामुळे काही साहाय्य होईल, ती सर्व नीती असे समजावे. इतर सर्व अनीती होय.’

१ इ. धर्माकरिता काळानुसार सांगितल्या जाणार्‍या व्यावहारिक नियमांना नीती म्हणतात.

१ ई. ‘नीती हा अध्यात्माचा पाया असून साक्षात्कार हा नीतीचा कळस आहे. असा साक्षात्कार आणि नीती यांचा परस्परसंबंध असल्याविषयी गुरुदेवांनी आपल्या ग्रंथात विवरण केले आहे.’

१ उ. ‘भारतीय धर्मशास्त्राचे एक विशेष असे की, त्यात धर्म आणि नीती या दोन गोष्टी भिन्न मानलेल्या आहेत. सामान्य आणि विशेष असा त्यांचा संबंध आहे, उदा. ‘सत्यं वद’ म्हणजे ‘खरे बोल’, ही सामान्य नीती झाली; पण तेवढ्यानेच भागत नाही म्हणून त्यापुढे ‘धर्मं चर’ म्हणजे ‘धर्माचे आचरण कर’, असे सांगितले. सत्य तर बोललेच पाहिजे; पण त्यासह धर्माचेही आचरण केले पाहिजे, असा त्याचा आशय आहे. नीतीमत्ता हे खर्‍या धर्माचे एक महत्त्वाचे अंग असून, अर्थ-कामप्रवृत्तीचे नियमन करणे, हे तिचे स्वरूप आहे.’

 

२. नीतीच्या अस्तित्वासाठी तपश्चर्येचे फळ आवश्यक !

‘जगामध्ये कोणतीही नैतिक मूल्ये केवळ चांगली आहेत म्हणून टिकत नाहीत; तर त्यांचे अस्तित्व टिकवून धरण्यासाठी त्यांच्या पाठीमागे समर्थ लोकांच्या तपश्चर्येचे पाठबळ असणे आवश्यक असते. तपश्चर्येच्या बळाने जगात पुष्कळ वेळा असत् मूल्येही विजयी झाली आहेत.’

 

३. सरळ आणि कुटील नीती

‘प्रश्न : नीतीचा सरळपणा आणि कुटीलपणा हा भेद सर्वकाळ असतो काय ?

श्री गुलाबराव महाराज : नाही. आपत्काली कुटील नीतीही सरळ होते.’

 

४. धर्मशास्त्र आणि नीतीशास्त्र

४ अ. धर्म आणि लौकिक अर्थाने नीती यांतील भेद

धर्म नीती
१. निर्माता ईश्वर मानव
२. उद्देश पारलौकिक सुखप्रधान ऐहिक सुखप्रधान
३. महत्त्वाचा पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम नि मोक्ष अर्थ आणि काम
४. स्थल, काल आणि व्यक्ती
यांनुसार सापेक्षता
निरपेक्ष सापेक्ष
५. पातळी आध्यात्मिक मानसिक
६. पालनाचा आग्रह आहे नाही (दुराग्रह आहे)
७. विचार कशाचा ? कर्त्याचा (करणार्‍याचा) कृत्याचा
८. जास्त संबंध कशाशी ? व्यक्ती समाज

४ आ. धर्मशास्त्र अन् नीतीशास्त्र कसे शिकावे ?

‘धर्मशास्त्र अंतःस्फूर्तीचे असल्यामुळे गुरुशास्त्रापासून शिकावे आणि नीतीशास्त्र अनेक लहानसहानसुद्धा अनुभव गोळा करून शिकावे. भीष्मांनी महाभारतात धर्माला म्हटले आहे की, हे मी सर्वच काही वेदांच्या आधाराने सांगत आहे, असे तू समजू नकोस. शहाण्याच्या अनुभवातून गोळा केलेले हे मधु आहे, असे समज.’

– श्री गुलाबराव महाराज

५. पंथ, धर्म आणि नीती

उपनिषदांत बायबलमधील ‘दहा आज्ञा (Ten commandments)’ सारख्या आज्ञा नाहीत. यहुदी (ज्यू) आणि खिस्ती हे पंथ आदेशांवर उभारलेले आहेत. उपनिषदांच्या मताप्रमाणे कृतींची आज्ञा करणे, हे नीतीशास्त्राचे काम आहे. इस्लाम, ज्यू आणि खिस्ती हे पंथ नीतीशास्त्रावर आधारित आहेत. सनातन धर्म, तसेच जैन आणि बुद्ध धर्म हे चेतनेवर, म्हणजे मन आणि बुद्धी शुद्ध करण्यावर आधारित आहेत.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘धर्म’

Leave a Comment