प्रस्तूूत लेखात आपण धर्माचे विविध प्रकार पहाणार आहोत. अन्य कोणत्याच पंथाने केला नसेल, असा प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार हिंदु धर्माने कसा केला आहे, हे यांतून लक्षात येईल.
मर्यादित अर्थाने धर्माचे पुढील विविध प्रकार आहेत.
१. सामान्यधर्म (नीतीधर्म, आत्मगुण)
क्षमा सत्यं दमः शौचं दानमिन्द्रियसंयमः ।
अहिंसा गुरुशुश्रूषा तीर्थानुसरणं दया ।।
आर्जवं लोभशून्यत्वं देवब्राह्मणपूजनम् ।
अनभ्यसूया च तथा धर्मः सामान्य उच्यते ।। – विष्णुधर्मसूत्र, अध्याय २, सूत्र १६, १७
अर्थ : क्षमा, सत्य, मनाचे दमन करणे, शौच, दान, इंद्रियांचा निग्रह करणे, अहिंसा, गुरूंची सेवा करणे, तीर्थयात्रा, दया, ऋजुत्व (प्रामाणिकपणा), निर्लोभ वृत्ती असणे, देव आणि ब्राह्मण यांचा सत्कार करणे अन् कोणाचीही निंदा न करणे, हा सामान्यधर्म म्हटला जातो.
गौतम धर्मसूत्रात या वरील नीतीधर्माच्या गुणांना ‘आत्मगुण’ म्हटले आहे. तो सर्वांना सारखाच लागू असतो. या सामान्यधर्मात चोदनालक्षण आणि अभ्युदय-निःश्रेयसलक्षण अशा उभयविध धर्मांचा अंतर्भाव होतो.
२. वर्णधर्म
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण होत. त्या त्या वर्णाला लागू असलेल्या धर्माला वर्णधर्म म्हणतात.
३. जातीधर्म
गौतम (धर्मसूत्र ११.२०) म्हणतो की, जातीधर्म वेदाशी अविरुद्ध असेल, तर तो प्रमाण समजावा.
४. आश्रमधर्म
ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे चार आश्रम होत. आश्रमधर्म हा विशिष्ट आश्रमापुरताच असतो.
५. वर्णाश्रमधर्म
हा विशिष्ट वर्णातील माणसाला विशिष्ट आश्रमातच लागू असतो, उदा. ब्राह्मण ब्रह्मचार्याने पळसाचा दंड आणि मृगाचे चर्म घ्यावे.
६. गुणधर्म
ज्या भूमिकेवर किंवा अधिकारपदावर मनुष्य असेल, त्याला अनुसरून करायचे कर्तव्य, उदा. राजा, मग तो कोणत्याही वर्णाचा असो, त्याने प्रजेचे पालन करावे इत्यादी. पंचमहाभूतांच्या गुणांनाही गुणधर्म म्हणतात, उदा. पाण्याचे गुणधर्म आहेत थंडपणा, द्रवत्व, उंच भागाकडून सखल भागाकडे वहात जाणे इत्यादी. या गोष्टींना आपण आधुनिक भाषेत विज्ञान समजतो; परंतु भारतीय संस्कृतीत त्याला ‘स्वभाव’ असे म्हणतात. येथे ‘स्व’ याचा अर्थ ईश्वर असा घ्यावयाचा. ईश्वर ज्या पद्धतीने एखाद्या वस्तूतून प्रकट होतो, तो त्याचा स्वभाव झाला.
७. निमित्तधर्म
प्रसंगानुरूप घडलेल्या गोष्टींमुळे जे वेगळे आचरण करावे लागते, त्याला ‘निमित्तधर्म’ म्हणतात, उदा. नवरात्रात ‘अखंड दीपप्रज्वलन’ करतात. तेव्हा काही कारणामुळे दीप विझला, तर तो पुन्हा प्रज्वलित करून प्रायश्चित्त म्हणून अधिष्ठात्री देवतेचा १०८ वेळा जप करतात.
८. आपद्धर्म
आपद्धर्म म्हणजे ‘आपदि कर्तव्यो धर्मः ।’ म्हणजे आपदेत (आपत्तीत) आचरण्याचा धर्म. चातुर्वर्ण्य पद्धतीत प्रत्येक वर्णाची धार्मिक कर्तव्ये नेमून दिलेली असतात. ‘कित्येकदा दिव्य-भौम (आधिदैविक, आधिभौतिक) उत्पात, राज्यक्रांती, दुष्काळ, निर्वासन (स्थलांतर) इत्यादी आकस्मिक कारणांनी वर्णव्यवस्था बिघडते आणि लोकांना वर्णोचित कर्मे करणे अशक्य होऊन बसते. वर्णोचित कर्मे करता न आल्याने उपजीविकेला बाधा येते. अशा स्थितीत एका वर्णाने अन्य वर्णाचा धर्म अपवाद म्हणून स्वीकारायला हरकत नाही, अशी शास्त्राने सोय केली आहे. या सोयीलाच आपद्धर्म म्हणतात. आलेली आपत्ती टळून गेल्यावर किंवा समाजाची घडी नीट बसल्यावर ज्या त्या मनुष्याने प्रायशि्चत्त घेऊन ज्याचा त्याचा धर्म पुनःश्च अंगीकारावा, असा नियमही धर्मशास्त्रात घालून दिलेला आहे.’
८ अ. आपत्कालाचे प्रकार आणि त्यांवरील उपाय
‘सर्वकाही अनुकूल असून धर्माप्रमाणे वागता येईल, हा संपत्काल होय. तो एकप्रकारचा आहे. याच्या उलट आपत्काल आहे. तो पुढील तीन प्रकारचा आहे.
१. दैविक आपत्काल : दुष्काळादीकाने प्राप्त झालेला तो दैविक आपत्काल होय.
२. भौतिक आपत्काल : शत्रूकडून प्राप्त झालेला तो भौतिक आपत्काल होय.
३. आपराधिक आपत्काल : आपल्या चुकीमुळे गुरुजनांकडून प्राप्त झालेला दंड म्हणजे आपराधिक आपत्काल होय.
समयनिरीक्षण किंवा पूजाहोमादिकांनी पहिला आपत्काल नष्ट होतो. नीती आणि पराक्रम यांच्या योगाने दुसर्या आपत्कालातून पार पडता येते. तिसरा आपत्काल मात्र भयंकर आणि सर्वनाशक आहे. तथापी फलोन्मुख झाला नसेल, तर सद्धर्माने आणि भक्तीने त्यातून पार पडता येते.’ – श्री गुलाबराव महाराज
८ आ. आपद्धर्माचे स्वरूप समजून घेणे महत्त्वाचे !
‘प्रश्न : आपत्काली अधर्माचा धर्म आणि धर्माचा अधर्म का होतो ?
श्री गुलाबराव महाराज : आगम सांगतो म्हणून ! कारण धर्मामध्ये शास्त्रच प्रमाण आहे. राज्यव्यवस्थेत जसे प्रासंगिक दंडक (कायदे) असतात, तशीच ही आगमाची व्यवस्था आहे.’
‘आपद्धर्म हे नीतीच्या आणि धर्माच्या मिश्रणाने झाले आहेत; तथापी त्यांत वैदिक धर्माचे शुद्ध स्वरूप दृष्टीस पडते, म्हणूनच त्यास आपद्धर्म म्हणावयाचे.’ – श्री गुलाबराव महाराज
‘धर्म हा पदार्थनित्य आहे. नित्य पदार्थ नेहमी अपरिवर्तनशील असतो, म्हणून आपद्धर्म हा शाश्वत धर्म नव्हे. आपत्कालात मिळालेली सूट आपत्काल जाऊन संपत्काल येईपर्यंतच आहे. असे असले, तरी आज आपद्धर्मच शाश्वत धर्म होऊन बसला आहे. त्यामुळे मनुष्य आत्मोन्नती करू शकत नाही. म्हणून आपद्धर्म संपत्कालात तसाच चालू ठेवणे, हा अधर्म आहे; पण आपत्कालात मात्र याला शास्त्रकारांनी धर्ममान्यता दिली आहे. आपत्कालात ती परिस्थिती दूर करून संपत्काल निर्माण करण्याचा प्रयत्न करणे, हासुद्धा आपत्कालीन धर्मच आहे.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.
धर्माचे अन्य प्रकार जाणून घेण्यासाठी या लेखाचा दुसरा भाग ‘धर्माचे प्रकार (भाग २)’ वाचा! त्यासाठी येथे ‘क्लिक’ करा !
संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘धर्म’