धर्माची चार प्रमाणे कोणती ?

प्रस्तूत लेखात आपण धर्माची चार लक्षणे आणि ४ प्रमाणे कोणती, हे पहाणार आहोत.

 

१. धर्मलक्षण

१ अ. मनूनुसार धर्मलक्षण

`धृतिः क्षमा दमोऽस्तेयं शौचमिन्द्रिरयनिग्रहः ।
धीर्विद्या सत्यमक्रोधो दशकं धर्मलक्षणम् ।। – मनुस्मृति, अध्याय ६, श्लोक ९२

अर्थ : धृति (धैर्य), क्षमाशीलता, मनाचे दमन, दुसर्‍याच्या द्रव्याची अभिलाषा नसणे, शुद्धता (पावित्र्य), इंद्रियनिग्रह, विवेकबुद्धी, विद्या, सत्य आणि न संतापणे, ही धर्माची दहा लक्षणे आहेत.

१ आ. याज्ञवल्क्यानुसार धर्मलक्षण

याज्ञवल्क्याने दशलक्षण धर्मापेक्षा नवलक्षण धर्म सांगितला आहे, तो असा –

अहिंसा सत्यमस्तेयं शौचमिन्द्रिरयनिग्रहः ।
दानं दमो दया क्षान्ति: सर्वेषां धर्मसाधनम् ।। – याज्ञवल्क्यस्मृति, अध्याय १, श्लोक १२२

अर्थ : अहिंसा, सत्य, चोरी न करणे, अंतर्बाह्य शुचिता, इंद्रिरयनिग्रह, अन्नजलादी वस्तूंचे दान, मनाला निषिद्ध विषयांचे चिंतन करू न देणे, दीनदुबळ्यांवर दया करणे आणि एखाद्याने अपकार केला असताही चित्ताचा क्षोभ होऊ न देणे, ही धर्माची साधने आहेत.’

 

२. धर्मप्रमाण (शास्त्रप्रमाण)

२ अ. प्रमाण म्हणजे काय ?

‘एक दार्शनिक तत्त्व. याची व्याख्या अशी – ‘प्रमीयते अनेन इति ।’ म्हणजे ज्याच्यामुळे यथार्थ अनुभवाची उत्पत्ती होते, त्याला ‘प्रमाण’ असे म्हणावे. प्रमाणाची दुसरी व्याख्या अशी – ‘प्रमाकरणं प्रमाणम् ।’ म्हणजे यथार्थ ज्ञान करून घेण्याचे सर्वांत उपयुक्त साधन म्हणजे ‘प्रमाण’ होय. सर्व भारतीय दार्शनिकांनी ‘मानाधीना मेयव्यवस्था ।’ म्हणजे प्रमेयाची व्यवस्था ही प्रमाणाच्या अधीन असते किंवा ‘प्रमेयसिदि्धः प्रमाणादि्ध ।’ म्हणजे प्रमेयाची सिद्धी ही प्रमाणांच्या आधारे होते (साङ्ख्यकारिका, कारिका ४), हा सिद्धान्त मानलेला आहे.’

२ आ. शास्त्रप्रमाण आणि बुद्धीप्रमाण

‘एखादी वस्तू जशी आहे तसे तिचे सम्यक् (यथार्थ) ज्ञान होणे, याला ‘यथाभूत ज्ञान’ म्हणतात आणि त्या ज्ञानाला ‘प्रमा’ असे म्हणतात. बुद्धीने ते (ज्ञान) होत नाही. तसेच एकाच्या बुद्धीला योग्य वाटते, ते दुसर्‍याच्या बुद्धीला अयोग्य वाटते. तिसर्‍याला काही योग्य आणि काही अयोग्य वाटते अन् चौथा त्यातून असा अर्थ काढतो की, तो या सर्वांहून वेगळा असेल; म्हणून बुद्धीप्रमाण, बुद्धीप्रामाण्यवाद योग्य नाही.’

तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ । – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १६, श्लोक २४

अर्थ : (भगवान श्रीकृष्ण म्हणतात,) अर्जुना, ‘कार्य कोणते आणि अकार्य कोणते’, याचा निर्णय करण्याच्या कामी तुला शास्त्रच प्रमाण मानले पाहिजे.

प्रामाण्याचे महत्त्व पुढील उदाहरणावरून स्पष्ट होते. एकदा भीष्माचार्य वडिलांचे श्राद्ध करत होते. त्या वेळी त्यांच्या वडिलांचा दिव्यहस्त समोर प्रकट झाला. भीष्माचार्यांनी श्राद्धकार्याला बोलावलेल्या ब्राह्मणांना विचारले, ‘‘हात प्रकट झाल्यामुळे हातावर पिंडदान करू काय ?’’ त्यावर ब्राह्मण म्हणाले, ‘‘तसा विधी नाही. वेदी आणि कुश यांवर पिंडदान करावे, असा विधी आहे.’’ तेव्हा भीष्माचार्यांनी पिंडदान हातावर न करता ब्राह्मणांच्या सांगण्यानुसार केले. त्यावर भीष्माचार्यांचे वडील प्रसन्न झाले आणि म्हणाले, ‘‘मी तुझी शास्त्रश्रद्धा पहाण्यासाठी आलो होतो.’’

२ इ. धर्मप्रमाणाचे प्रकार

‘मनूने धर्माची जी चार प्रमाणे सांगितली आहेत, ती अशी –
१. वेदः स्मृतिः सदाचारः स्वस्य च प्रियमात्मनः ।
एतच्चतुर्विधं प्राहुः साक्षाद्धर्मस्य लक्षणम् ।। – मनुस्मृति, अध्याय २, श्लोक १२

अर्थ : वेद, स्मृती, सदाचार आणि स्वतःच्या अंतःकरणास जे योग्य वाटेल ते, अशी धर्माची चार प्रकारची लक्षणे (प्रमाणे) आहेत.

२. वेदोऽखिलो धर्ममूलं स्मृतिशीले च तद्विदाम् ।
आचारश्चैव साधूनाम् आत्मनस्तुषि्टरेव च ।। – मनुस्मृति, अध्याय २, श्लोक ६

अर्थ : सर्व वेद हे धर्माचे मूळ आहेत. वेदांचे यथार्थ ज्ञान असणार्‍या ऋषींनी वेदाधारे स्मृतींची रचना केली. श्रेष्ठ चारित्र्य कशाला म्हणावे, तेही सांगितले.

‘सज्जनाचे आहार-विहारादी वर्तन कसे असावे’, याचेही सविस्तर वर्णन केले. ही सर्व धर्माचीच अधिष्ठाने आहेत. (या वर्णनात कोठे विविधता वा विसंगती आढळली तर) स्वत:ला त्यांतीलच जे कोणते वचन योग्य वाटेल, त्याप्रमाणे स्वत:चे वर्तन ठेवावे.

मनूने धर्माची सांगितलेली चार प्रमाणे :
१. वेद
२. वेदाच्या विरोधी नसलेल्या स्मृती
३. वेद अर्थात श्रुती आणि स्मृती यांच्या आधारावर योग्य आचार करणारा विद्वान
४. श्रुती-स्मृतींच्या आधाराने वागणारा सच्छील (शीलवान) आणि सदाचारी असा जो विद्वान (पुढील क्रमांक २ इ ३, २ इ ४, २ इ ५), त्याच्या अंतर्यामी स्फुरणारा विचार (पुढील क्रमांक २ इ ६)

२ इ १. वेद (श्रुति)

वेद हे अलौकिक आणि अपौरुषेय असल्यामुळे ते सर्वांत पहिले धर्मप्रमाण होय.

२ इ २. स्मृति

स्मृति वेदाचा अनुवाद करणार्‍या असल्यामुळे त्याही धर्मनिर्णयाचे साधन ठरतात.

‘रामायण अन् महाभारत या दोन महाकाव्यांत आणि त्यातल्यात्यात महाभारतात अनेक ठिकाणी धर्मशास्त्रासंबंधी विवेचन केले आहे. त्या ग्रंथांतील अशी अवतरणे महाभारतानंतर झालेल्या ग्रंथकारांनी स्मृतींच्या योग्यतेची प्रमाणभूत मानली आहेत.’

२ इ ३. श्रोत्रिय ब्राह्मण (अलोभी तर्कशास्त्रज्ञ)

अनाज्ञाते दशावरैः शिष्टैरूहवद्भिरलुब्धैः प्रशस्तं कार्यम् ।। ४६।।
चत्वारश्चतुर्णां पारगा वेदानां प्रागुत्तमात्त्रय आश्रमिणः
पृथग्धर्मविदस्त्रय एतान्दशावरान्परिषदित्याचक्षते ।। ४७ ।।
असम्भवे त्वेतेषां श्रोत्रियो वेदविचि्छष्टो विप्रतिपत्तौ यदाह ।। ४८ ।।
यतोऽयमप्रभवो भूतानां हिंसानुग्रहयोगेषु ।। ४९ ।। – गौतमधर्मसूत्र, प्रश्न ३, अध्याय १०

अर्थ : श्रुती-स्मृतींमध्ये ज्याचे धर्माधर्मत्व समजत नाही, त्याविषयी शिष्ट, तर्कशास्त्रज्ञ आणि अलोभी अशा पुढील दहा (किंवा दहापेक्षा जास्त) जणांना जे मान्य असेल, ते करावे. ।। ४६ ।।

ते १० जण म्हणजे – एकेका वेदाचे वेदांगांसहित अध्ययन करून त्यांचा अर्थ जाणणारे असे ४ वेदवेत्ते; तसेच ब्रह्मचारी, गृहस्थ आणि संन्यासी असे ३ आश्रमवासी आणि न्याय, मीमांसा, निरुक्त अन् स्मृती यांचे अध्ययन केलेले ३ धर्मशास्त्रज्ञ. या १० जणांच्या समूहाला ‘परिषद’ असे म्हणतात. ।। ४७ ।।

हे १० जण न मिळाल्यास संशयाच्या वेळी वेदांचे अध्ययन करणारा (श्रोत्रिय), त्यांचा अर्थ जाणणारा आणि धर्माचरणी असा एक ब्राह्मण, जे सांगेल ते करावे. ।। ४८ ।।

कारण असा श्रोत्रिय ब्राह्मण हिंसा किंवा अनुग्रह यांविषयी कधीही धर्मबाह्य निर्णय देणार नाही. ।। ४९ ।।

२ इ ४. शिष्ट

ज्यांना शास्त्र, व्यवहार इत्यादी गोष्टींचे ज्ञान असते, त्यांना शिष्ट म्हणतात. ज्या वेळी शास्त्रानुसार निर्णय करता येणे कठीण जाते, त्या वेळी शिष्टांनी सांगितलेला समादेश (सल्ला) मानण्यात येतो. शिष्टांनी घालून दिलेल्या नीतीनियमांस शिष्टस्मृती म्हणतात.

अ. यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनः ।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते ।। – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ३, श्लोक २१

अर्थ : श्रेष्ठ पुरुष जे जे कर्म करतो, ते ते कर्म इतर लोकही करतात आणि तो श्रेष्ठ पुरुष जे शास्त्र प्रमाण मानतो, त्या शास्त्रालाच प्रमाण मानून इतर लोकही वागत असतात.

आ. तर्कोऽप्रतिष्ठः श्रुतयो विभिन्ना नैको ऋषिर्यस्य मतं प्रमाणम् ।
धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां महाजनो येन गतः स पन्थाः ।। – महाभारत, वनपर्व, अध्याय ३१३, श्लोक ११७

अर्थ : (धर्मतत्त्वाचा विचार करू लागले असता) युक्तीवाद लंगडा पडतो, श्रुतिवाक्ये पहावी, तर ती निरनिराळ्या प्रकारची आहेत. ज्याचे मत सर्वांना प्रमाण आहे, असा एकही ऋषी आढळून येत नाही. तात्पर्य, धर्माचे तत्त्व गुहेत दडलेले आहे (म्हणजे अत्यंत गूढ आहे). अशा स्थितीत थोर लोक ज्या मार्गाने गेले, तोच मार्ग उत्तम !

२ इ ५. श्रेष्ठ आत्मज्ञानी (संत)

तो सांगेल तो धर्म, असे म्हणून धर्मशास्त्रकारांनी अध्यात्म (आत्म)ज्ञानाला प्रामाण्य अर्पण केलेले आहे.

`धर्मतत्त्व हे अत्यंत सूक्ष्म आहे. सर्वसंगपरित्यागी, कंदमूळफलाशनी, वल्कलपरिधानी, तसेच समुद्रवलयांकित असे पृथ्वीचे राजे, ज्यांच्या बाहुबलांत स्वर्गातल्या देवांवरसुद्धा (परचक्राची) संकटे आल्यावर त्यांनाही त्यातून सोडवण्याची शक्ती होती, ते ज्यांच्या पादपद्मी बसून आत्मप्राप्तीचे धडे घेत असत, अशा द्रष्ट्या आणि ऋृतंभराप्रज्ञायुक्त ऋषीमुनी यांसारख्या महाजनांकडून धर्मतत्त्व समजून घ्यावे. अशा महाजनांनी दाखवून दिलेल्या मार्गाने जनसामान्यांनी जाणे, हाच एकमेव कल्याणाचा मार्ग आहे.’

– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

२ इ ६. अंतःप्रेरणा (बुद्धी)

‘सत्यासत्याचा विचार चालू असता भीष्माने युधिषि्ठराला सांगितले, ‘‘श्रुतीत जे जे सांगितले आहे, तो तो धर्म होय’, असे कित्येक म्हणतात, तर कित्येकांच्या मते ‘तो सर्वच धर्म होय, असे नाही.’ या दुसर्‍या मताचा आम्ही तिरस्कार करत नाही; कारण श्रुतीत प्रत्येक गोष्ट सांगितलेली असणे शक्य नाही.’’ (महाभारत, अध्याय १२, श्लोक १०९) यास्तव धर्मनिर्णयाच्या कामी
स्वतःची तारतम्य बुद्धी वापरली पाहिजे. पुढे एका प्रसंगी तर भीष्माने धर्मराजाला स्पष्टच सांगितले आहे,

तस्मात् कौन्तेय विदुषा धर्माधर्मविनिश्चये ।
बुदि्धमास्थाय लोकेऽसि्मन् वर्तितव्यं यतात्मना ।। – महाभारत, शानि्तपर्व, अध्याय १३९, श्लोक ९४

अर्थ : म्हणून हे कुंतीपुत्रा, विद्वान पुरुषाने धर्म आणि अधर्म यांचा निर्णय करण्याच्या कामी बुद्धीचा अवलंब करून या लोकात वागले पाहिजे.’

असंशयं क्षत्रपरिग्रहक्षमा यदार्यमस्यामभिलाषि मे मनः ।
सतां हि सन्देहपदेषु वस्तुषु प्रमाणमन्तःकरणप्रवृत्तयः ।। – अभिज्ञानशाकुन्तल, अङ्क १, श्लोक २०

अर्थ : दुष्यंत राजा म्हणतो, `ज्या अर्थी मी सतत धर्माचे अनुसरण करत आलो असतांनाही (तसेच माझी प्रजाही धर्माचरण करत असतांना) माझे मन या कन्येकडेच खेचले जात आहे, त्या अर्थी ही (शकुंतला) क्षत्रियकन्याच असली पाहिजे; कारण संतांना (उन्नतांना) जेथे शंका येते, तेथे त्यांची अंतःकरणप्रवृत्तीच प्रमाण ठरते.

‘जशी आसक्ती असेल, तसे मनोवृत्ती सांगत असते. सर्वांचीच मनोवृत्ती सर्वकाल सत्याकडे धावते, हे म्हणणे बहुधा धाडसाचे आहे.’ – श्री गुलाबराव महाराज

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘धर्म’

Leave a Comment