प.पू. दादाजी वैशंंपायन यांच्या चरणी अनंत कोटी शिरसाष्टांग नमस्कार !

ॐ आनंदम् हिमालयवासी सदगुरु प.पू. कल्याणकारी कर्मयोगी
लक्ष्मी पुरुषोत्तम विष्णुरूपी दादाजी वैशंंपायन यांच्या चरणी त्यांच्या
जन्मदिनानिमीत्त सनातनच्या साधकांचा अनंत कोटी शिरसाष्टांग नमस्कार !

प.पू. दादाजी वैशंंपायन
प.पू. दादाजी वैशंपायन

ॐ आनंदम् हिमालयवासी सदगुरु प.पू. कल्याणकारी कर्मयोगी लक्ष्मी पुरुषोत्तम विष्णुरूपी दादाजी वैशंंपायन यांच्या जन्मदिनानिमीत्त त्यांचा परिचय तसेच त्यांच्याविषयीची काही वैशिष्ट्यपूर्ण माहिती पुढे देत आहोत.

 

प.पू. कर्मयोगी दादाजी वैशंपायन यांचा परिचय

‘प्रथम परिचयाने आपल्याला हवेसे वाटणारे, ‘‘निश्चिंत व्हा’’ असे सांगणारे परंतु परिश्रमाशिवाय पर्याय नाही याची जाणीव करून देणारे प.पू. कर्मयोगी दादाजी वैशंपायन म्हणजे मला भेटलेला एक द्रष्टा, तत्त्वज्ञानी, महान कर्मयोगी, ऋषि नव्हेच तर ईश्वरी प्रेरणेचा मानवी अवतार आहे. अत्यंत मृदु, लाघवी, विश्वासु, समर्पक शब्दाची पखरण करणारे तुमच्या जीवनाला वळण देणारे एक महान व्यक्तिमत्त्व होय.’ – श्री. अ. द. गाडगीळ (मासिक भाग्यनिर्णय, पृ. १९)

 

प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या सांप्रदायिक मंत्राचा अर्थ

‘ॐ आनंदं हिमालयं विष्णुं गरुडध्वजं ॐ ।।
ॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ।।’
– प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या संप्रदायाचा मंत्र
भावार्थ : भगवान विष्णूचे स्मरण मद म्हणजे गर्व कमी करते. शिवशंकराच्या उपासनेने कामवासना नियंत्रित होते. श्री दत्तगुरूंच्या नामस्मरणाने त्रिदोषांचे संतुलन होऊन क्रोध संयमित होतो. गायत्री (सूर्य) उपासनेच्या प्रखर तेजामुळे मनातील मत्सररूपी जळमटे नाहीशी होतात. सरस्वतीच्या उपासनेमुळे बुद्धीचा विकास होतो, उत्तम विचारांना चालना मिळते व मोहावर विजय मिळविणे शक्य होते. श्री महालक्ष्मी प्रसन्न झाल्यावर कसला लोभच उरत नाही. (संदर्भ : मासिक भाग्यनिर्णय, ऑगस्ट २००२.)

 

अचूक निदान व अचूक भाकिते करणारे
योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांच्या कल्याणकारी उपचार पद्धती

प.पू. दादाजी वैशंपायन यांचे पूर्ण नाव श्री. श्रीपाद गणेश वैशंपायन असे आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील नेरे हे त्यांचे जन्मगाव. त्यांचा जन्म ७ मे १९२० रोजी, म्हणजेच मराठी कालगणेनुसार वैशाख पौर्णिमा (बुद्धपौर्णिमा) या दिवशी झाला.
हिमाचल प्रदेशात कुलू खोर्‍यातील गुहेत वास्तव्य असणारे हिमालयवासी महामुनी विष्णुरूपी भगवान आनंदस्वामी यांनी त्यांना शिष्य म्हणून स्वीकारले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली प.पू. दादाजींनी तुंगभद्रा व कन्याकुमारी येथे ४० दिवसांची खडतर अशी अनेक जल-अनुष्ठाने केली. दररोज २२ तास खडतर साधना करून त्यांनी अनेक सिद्धी प्राप्त करून घेतल्या आहेत. प.पू. दादाजी स्वतः योग-साधनेत तज्ञ आहेत. प.पू. दादाजींच्या शक्तीदेवता कधीकधी नागदेवतेच्या स्वरूपात प्रकट होतात. अचूक निदान व अचूक भाकिते, हे प.पू. दादाजींच्या साधनेचे वैशिष्ट्य आहे.
संपूर्ण जगभरात प.पू. दादाजींचा भक्तपरिवार खूप मोठा आहे. दादाजींच्या योगसामर्थ्याचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. अनेकांनी याची प्रचीती घेतली आहे. प.पू. दादाजी करत असलेले आध्यात्मिक उपचार हे व्यक्तीनुसार व समस्येनुसार वेगवेगळे असतात. त्यांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊ.

 

प.पू. दादाजी वैशंपायन वापरत असलेल्या उपचार-पद्धती

१. कल्याणकारी कार्यपद्धती

१ अ. प्रत्यक्ष भेटीत प्रश्न समजून घेऊन त्यांचा अभ्यास करणे

सर्वसाधारणपणे प्रत्यक्ष भेटीत साधकाचे प्रश्न समजूून घेतले जातात. त्यावर अभ्यास केला जातो. कार्य किंवा समस्या यांचे स्वरूप ज्या प्रकारचे आहे, त्या प्रकारची उपाय-योजना केली जाते. याची त्या व्यक्तीला कल्पना देण्यात येते. कोणत्या कार्यासाठी काय करायचे, हे ते कार्य किंवा ती समस्या व त्या व्यक्तीचा पुण्यांश यांवर अवलंबून असते.

१ आ. प्रत्यक्ष उपाययोजना करण्यापूर्वी व्यक्तीच्या योग्यायोग्यतेची घेतली जाणारी चाचणी

उपाययोजना करण्यापूर्वी अशी व्यक्ती योग्य आहे, याचे सर्व प्रकारे निरीक्षण केले जाते. तसेच काही साधे मूलमंत्र त्याला पाठासाठी देऊन त्याची सातत्यता व वेध घेतला जातो. याशिवाय कोणती उपाययोजना, किती प्रमाणात, कशाप्रकारे, केव्हा व कुठे करायची याची योजनाबद्ध संपूर्ण तयारी करून मगच कार्यवाही केली जाते. योग्य स्थळ, काळ व वेळ निवडतांना त्याचे प्रमाण लगेच सांगता येत नाही; तसेच कोणत्या कामासाठी कोणते विधी होतात, हेही साचेबद्ध स्वरूपात सांगता येत नाही.

२. सामूहिक अभ्युदयार्थ करावयाचा ‘जलतर्पण विधी’

मोठ्या प्रमाणावर सांघिक शक्तीसाठी दैवी शक्तींचा पाठिंबा मिळविण्याकरता उपाययोजना करायची असल्यास व विशेष कालमर्यादा असल्यास, ठराविक मुदतीत करण्यासाठी ‘जलतर्पण विधी’ उचित असतो. त्यात गायत्रीमंत्र, नवग्रहमंत्र, त्या विशेष कार्यासाठी तयार केलेला विशिष्ट मंत्र यांचे पाठ करतात. संरक्षण मिळण्यासाठी व संकटनिवारणासाठी याचा उपयोग होतो. बाह्यपीडा-निरसनार्थ व अनिष्ट शक्तींना दूर करून संरक्षण मिळण्यासाठीही याच पद्धतीचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो, असे दिसते.
अशी सामूहिक अभ्युदयार्थ उपासना संकटाच्या स्वरूपाप्रमाणे ३ दिवस, ५ दिवस व कधी ८ दिवसही असते. ही उपासना सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत निरंतर कमरेएवढ्या पाण्यात उभे राहून करायची असते. या उपासनेने निश्चित फायदा होतो.

 ३. मनोकामना पूर्ण होण्यासाठी व देवतेचा
पाठिंबा मिळण्यासाठी करावयाची ‘श्री बालाजी हुंडी’ उपासना

मनोकामना पूर्ण होण्यासाठी व देवतेचा पाठिंबा मिळण्याकरिता अखंड उपासनेत सातत्य ठेवल्यावर हा विधी करायचा असतो. यात देवतांना प्रत्यक्ष आवाहन केले जाते. साधकाने स्वतः एका विशिष्ट पद्धतीने पूजा व पाठ करून उच्चसंस्कारीत मूर्तींना यथाशक्ती धन अर्पण करायचे असते. यात अतिमौलिक कार्यवाही श्री व्यंकटेश (श्री बालाजी) या महादेवतेला हुंडीत सोडून अर्पित केली जाते. यामुळे कामे सुरळीत होण्याच्या मार्गात रहातात.
या उपासनेने अडलेली कामे सुरू होणे, ऐहिक सुखप्राप्ती, सांसारिक अडचणींचे निवारण, विवाह होणे, संततीप्राप्ती, लक्ष्मीप्राप्ती, लक्ष्मी अखंड टिकणे, निरोगी/दीर्घ आयुष्य असे अनेक फायदे अनेकांना अनुभवात व प्रत्यक्ष पहाण्यात आले आहेत.

४. संकट निवारणार्थ व श्रीकृपेच्या मार्गाने शुद्धीसाठी
जमिनीत सिद्ध प्रासादिक वस्तू व उच्च मौलिक वस्तू यांचा ‘निक्षेप’ करणे

जमिनीमध्ये सिद्ध शक्तींच्या मंत्रपठणाने सिद्ध प्रासादिक वस्तू व उच्च मौलिक वस्तू यांची पूजा करून निक्षेप करण्यात येतो. यामुळे अनिष्टशक्तीनिवारण, बाह्यपीडानिरसन, वास्तूदोष दूर होणे, बाह्य शक्तींचा वास्तूवरील परिणाम कमी होणे, अनुवंशिक दोष दूर होणे, कृपेचा मार्ग शुद्ध करणे व संकटनिवारण असे अनेक परिणाम प्राप्त होतात.

५. इतर कार्यक्रम

या शिवाय संकटनिवारणार्थ करण्यात येणारे अनेक विशेष कार्यक्रम उल्लेख करता येत नाहीत, असे आहे. ते प्रत्येक साधक चक्षुर्वैसत्यम् अनुभवतो.

 

प.पू. दादाजी वैशंपायन यांचे स्वभाववैशिष्ट्य – मिस्किलपणा !

वैशाख पौर्णिमेच्या दिवशी, म्हणजे २.५.२००७ रोजी योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन यांचा जन्मदिन होता. त्या वेळी मी त्यांना भ्रमणध्वनी करून जन्मदिनानिमित्त शि.सा. नमस्कार केला व ‘‘जीवेत् शरद: शतम् ।’’ या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर माझे व प.पू. दादाजी वैशंपायन यांच्यात झालेले संभाषण येथे देत आहे.
प.पू. दादाजी : तुम्ही किती दिवस आश्रमात आहात ?
प.पू. पांडे महाराज : आता मी प.पू. डॉक्टरांच्या स्वाधीन आहे. ते जसे म्हणतील त्याप्रमाणे करणार.
प.पू. दादाजी : तुमच्यासारखा प.पू. डॉक्टर आम्हाला दृष्टान्त देत नाहीत !
नंतर त्यांनी ‘‘मी आपले पुस्तक वाचून त्यावर अभिप्राय कळवतो’’, असे सांगितले. – प.पू. पांडे महाराज.

 

प.पू. दादाजी वैशंपायन यांचा जीवन संदेश

ज्ञानाचे बळ जवळ असतांना
निराश कधी व्हायचे नसते ।
गत दुःखांची उजळणी करत
हताश कधी व्हायचे नसते ।। १ ।।

यश पदरात पडत नाही
म्हणून कधी रडायचे नसते ।
नव्या जोमाने सुरुवात करून
जीवनाची दिशा बदलायची असते ।। २ ।।

हाताचा पसा दुसर्‍यासमोर धरून
लाचारी कधी स्वीकारायची नसते ।
संकटाची तमा न बाळगता
कष्टाने त्यावर मात करायची असते ।। ३ ।।

दिवसभर नुसते बसून
आपली व्यथा कधी गायची नसते ।
आत्मविश्वासाने काम करून
दिवसाची वाटचाल करायची असते ।। ४ ।।

उद्याचे जीवन आनंदात जाण्यासाठी
आजच आघात सोसायचे असतात ।
आपल्या अनुभवाअंती आलेल्या शहाणपणातूनच
जीवनाचे रंग फुलवायचे असतात ।। ५ ।।

– प.पू. दादाजी वैशंपायन, कल्याण

 

Leave a Comment