जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय ईश्वराच्या अधीन आहे. म्हणजेच धर्म ईश्वराचे अस्तित्व मानतो. या धर्माचे सिद्धांत या लेखातून जाणून घेऊ.
‘धर्मात सिद्धान्त आहेत, नियम नाहीत. नियमाला अपवाद असू शकतो, सिद्धान्ताला नाही. सिद्धान्त हा पालटत नसतो, म्हणजे तो त्रिकालाबाधित असतो. तसेच ईश्वरात अनादी काळापासून पालट होत नसल्याने, ईश्वरप्राप्तीचे सिद्धान्त अनादी काळापासून तेच आहेत, म्हणजे त्यांच्यात पालट होत नसल्याने, धर्मात पालट होत नाही. ‘२ + २ = ४’ यात जसा काळानुसार कधीही पालट होत नाही, तसेच हे आहे. कालप्रवाहात ऐतिहासिक घडामोडींमुळे (अर्थात अंतर्बाह्य) धर्माचरणाचा तपशील पालटत असतो; पण ‘तो पालटलेला (पालटविलेला) तपशील आज ना उद्या सिद्धान्ताला गाठ घालणारा असावा’, याचे समाजाला विस्मरण होऊ नये, अशी समाजाची अंतःधारणा असावी.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे.
धर्माचे काही सिद्धान्त पुढीलप्रमाणे आहेत.
१. ईश्वराचे अस्तित्व
धर्म ईश्वराचे अस्तित्व मानतो. जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय ईश्वराच्या अधीन आहे.
२. अनेक देव आणि अनेक साधनामार्ग
हिंदु धर्मात ३३ कोटी देवांचा उल्लेख पुष्कळदा केला जातो. तसेच हिंदु धर्मात साधनामार्गही अनेक सांगितले आहेत. खरेतर ईश्वर एकच आहे, मग ईश्वराच्या उपासनेसाठी ३३ कोटी देवांची आवश्यकता काय किंवा त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी इतक्या साधनामार्गांची आवश्यकता काय, असा प्रश्न कोणालाही पडू शकतो.
ईश्वर विविध कार्यांच्या पूर्तीसाठी निरनिराळ्या रूपांमध्ये प्रगट होतो. ईश्वराची ही रूपे म्हणजेच देवता. तसेच ‘व्यक्ती तितक्या प्रकृती, तितके साधनामार्ग’, हे अध्यात्मातील एक वचन आहे. पृथ्वीवरची लोकसंख्या सातशे कोटींहून अधिक आहे. सातशेहून अधिक कोटींतील कोणतीही दोन माणसे एकसारखी नसतात. प्रत्येकाचे शरीर, मन, आवडी-निवडी, गुण-दोष, आशा-आकांक्षा, वासना इत्यादी सगळे निराळे आहे; प्रत्येकाची बुद्धी निराळी आहे; संचित आणि प्रारब्ध निराळे आहे; सत्त्व, रज अन् तम हे त्रिगुण निरनिराळे आहेत. त्यामुळे प्रत्येकाने कोणत्या देवतेची (देव किंवा देवी) उपासना केली की, तो परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो, हे निरनिराळे आहे. प्राणीमात्रांतच काय, तर निर्जीव गोष्टींतही परमेश्वराचे अस्तित्व असल्यामुळे धर्मात देवांची संख्या पुष्कळ आहे.
यो यो यां यां तनुं भक्तः श्रद्धयार्चितुमिच्छति ।
तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम् ।।
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ७, श्लोक २१
अर्थ : जो जो भक्त ज्या ज्या देवतेची श्रद्धेने भक्ती करण्याची इच्छा करतो, त्या त्या भक्ताची श्रद्धा त्या त्या देवतेच्या ठिकाणी मी स्थिर करतो.
त्याचप्रमाणे पृथ्वीवरील प्रत्येक जणच निरनिराळ्या प्रकृतीचा आणि पात्रतेचा असल्याने ईश्वरापर्यंत जाण्याचे साधनामार्गही अनेक आहेत.
इतर पंथांप्रमाणे हिंदु धर्माने कोणताही एकच एक साधनामार्ग आणि कोणत्याही एकाच देवाची उपासना सांगितली नाही, हे हिंदु धर्माचे वैशिष्ट्यच आहे. हिंदु धर्माची व्यापकता ही अखंड विश्वाला सामावून घेणारी आहे.
३. मूर्तीपूजा
‘इंद्र, वरुण, सोम इत्यादी देवता या सृष्टीतील प्रत्यक्ष दिसणार्या भौतिक घटनांच्या अधिष्ठात्री देवता होत्या. वेदात त्यांचे स्तवन केलेले आहे, तसेच त्यांचे मानवरूपात वर्णनही केले आहे. उपनिषदांत परब्रह्माची कल्पना दृढ होऊन त्याचे निदिध्यासन (अविरत चिंतन) हेच पूजेचे स्वरूप ठरले. कालांतराने भिन्न भिन्न रूपांत देवपूजा चालू झाली. सामान्य मनुष्याला अमूर्त, निर्गुण परमेश्वराची उपासना करणे कठीण वाटते; म्हणून सगुणोपासकांना मूर्तीची आवश्यकता भासली आणि त्यांनी मूर्तीपूजेचा मार्ग अनुसरला.’
४. ऋणकल्पना
४ अ. चार ऋणे
१. देवताऋण
‘ईश्वराने निर्माण केलेल्या पदार्थांचा उपयोग माणसाला सहजासहजी मिळतो, याविषयी तो देवतांचा ऋणी ठरतो.
२. ऋषीऋण
प्राचीन महर्षींनी निर्माण केलेले ज्ञान-विज्ञान मनुष्य मिळवत असतो; म्हणून तो ऋषींचा ऋणी ठरतो.
३. पितृऋण
आपल्याला जन्म देऊन पितरांनी कुलपरंपरा अखंड राखली, हे पितरांचे ऋण असते.
४. समाजऋण
त्याखेरीज ज्या ज्या मानवांशी आपला संबंध आला असेल, त्या प्रत्येकाने प्रच्छन्न (अप्रकट) किंवा उघड स्वरूपात आपल्याला काहीतरी दिलेलेच असते. हे समाजाचे ऋण होय.
प्रत्येक मनुष्याला ही चार ऋणे फेडावीच लागतात.’
४ आ. ऋणे फेडणे (पंचमहायज्ञ)
१. तैत्तिरीय संहितेत (६.३.१०.५) असे सांगितले आहे की, जन्माला येणारा ब्राह्मण तीन ऋणांसह जन्मतो. (ही तीन ऋणे त्याने आयुष्यात फेडली पाहिजेत.) ऋषींचे ऋण (स्वाध्यायऋण) विद्याध्ययनाने (आणि शक्य झाल्यास ज्ञानात नवीन भर घालून), देवांचे ऋण (देवताऋण) यजन-पूजनाने आणि पितरांचे ऋण (पितृऋण) (धर्मयुक्त) प्रजोत्पादनाने फेडता येते.
२. शतपथब्राह्मणाने (१.७.२.१-६) या कल्पनेत सुधारणा केली आणि मनुष्यऋण हे चौथे ऋण अगोदरच्या तीन ऋणांत समाविष्ट केले असून समस्त मानवजातीला हा सिद्धान्त लागू केला आहे. परस्पर सहकार्य आणि परोपकाराने मनुष्यऋण फेडता येते.
३. पंचऋणकल्पनेत मनुष्यऋणाच्या ठिकाणी अतिथीऋण हे चौथे ऋण मानले असून, पाचवे ऋण हे भूतऋण समजले आहे. भूतऋण म्हणजे गाय, बैल इत्यादी प्राणी, विविध वनस्पती आणि पंचमहाभूते यांचे ऋण. प्राणी आणि वनस्पती यांचे जीवन सुखावह होईल आणि पर्यावरणाचे संतुलन राखणे, हे यात अंतर्भूत आहे.
ही ऋणे फेडण्यासाठी ‘गृहस्थाश्रमा’मध्ये दिलेले पंचमहायज्ञ करतात. ‘ही ऋणे फेडल्याविना स्वर्ग मिळत नाही’, असेही सांगितले आहे.
५. वर्णाश्रमकल्पना
ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हे चार आश्रम होत. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे चार वर्ण होत. आश्रमव्यवस्थेद्वारे व्यक्तीगत जीवन उन्नत करणे आणि वर्णव्यवस्थेद्वारे सामाजिक जीवनाचा विकास साधणे, या ध्येयकल्पनेला वर्णाश्रमकल्पना असे म्हणतात.
५ अ. परार्थ कर्म
‘कर्मे मनुष्याने स्वतःच करावी किंवा त्यात एकमेकांचे साहाय्य घ्यावे किंवा एकमेकांना साहाय्य करावे, असा प्रश्न उत्पन्न होतो. ‘स्वतःकरता सर्व कर्मे स्वतःच करावी’, असे म्हटले असता माणसाला शेती करणे, शेतीची अवजारे बनवणे, घर बांधणे, कापड विणणे इत्यादी अनेक कृत्ये स्वतःच करावी लागतील आणि त्यांपैकी एकही काम त्याला चांगल्या प्रकारे करता येणार नाही; परंतु दुसर्या, म्हणजे परस्पर साहाय्याच्या मार्गाचे अवलंबन केल्यास प्रत्येकाने एकेकच कर्म करायचे आणि त्या कर्मांची फळे परस्पर विनिमयाने सर्वांनी वाटून घ्यायची, अशी सोय होऊ शकेल. यात प्रत्येकाकडे एकेकच कर्म असल्यामुळे तो ते कर्म करण्यात कुशल होईल आणि त्याच्या कर्माचे फलही उत्तम प्रकारचे येईल.
यावरून ‘परस्परांनी परस्परांना साहाय्य करून सर्वांचे निःश्रेयस (उच्च सुख) साधावे’, हा सिद्धान्त उत्पन्न होतो. धर्माचा बहुतेक भाग याच सिद्धान्ताने व्यापलेला आहे. ‘पती-पत्नींनी एकमेकांच्या साहाय्याने अन् सहकार्याने एकमेकांचे हित साधावे’, हाच विवाहपद्धतीचा उद्देश आहे. ‘पिता-पुत्रांनी किंवा भावाभावांनी परस्परांच्या स्नेह आणि सहकार्य यांनी अभ्युदय साधावा’, हाच कुटुंबपद्धतीचा उद्देश आहे.
वर्णव्यवस्थेचा उद्देशही ‘प्रत्येक वर्णाने आपापल्या कर्मात नैपुण्य मिळवून परस्परांचे हित साधावे’, हाच होता. ‘दानपुष्ट ब्राह्मणांनी आपला सर्व वेळ ज्ञानवृद्धीकडे द्यावा आणि आपल्या ज्ञानाचा इतर वर्णांना लाभ करून द्यावा’, हाच दानाचा उद्देश होता. ‘प्रजेने कर देऊन राजाचे पोषण करावे आणि राजाने अधार्मिक अन् उपद्रवी लोकांचा निग्रह करून प्रजेचे पोषण करावे’, हा राजा आणि प्रजा यांचा परस्पर हितसंबंध होता. गुरु-शिष्य, स्वामी-सेवक इत्यादींचे परस्परसंबंधही अशाच प्रकारचे निःश्रेयसाला उद्देशून ठरविण्यात आले होते. श्रीकृष्णाने हा सिद्धान्त पुढील श्लोकात स्पष्टपणे प्रतिपादिला आहे –
देवान्भावयतानेन ते देवा भावयन्तु वः ।
परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ ।।
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ३, श्लोक ११
अर्थ : यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवता (देव-देवी) तुम्हालाही संतुष्ट करतील आणि मनुष्य अन् देवता यांच्यामधील परस्पर सहयोगाने सर्वत्र समृद्धीचेच साम्राज्य पसरेल.
हा परस्पर भावनेचा धर्मसिद्धान्त फारच मोलाचा आहे. हा माणसामाणसांतच लागू पडतो असे नाही, तर तो पशू आणि मनुष्य; तसेच कुटुंबे, जाती आणि राष्ट्रे यांमध्येही लागू पडणारा आहे. सिद्धान्ताला अनुरूप असा आचार जसजसा वाढत जाईल, तसतशी या जगात सुखसमृद्धी अवतीर्ण होईल.
५ आ. परोपकार
इतरांचे हित केल्याविना स्वतःचे हित करता येत नाही. इतरांची प्रीती संपादन केल्याविना ते साधत नाही. यालाच परोपकार असे म्हणता येईल. परस्पर भावना आणि परोपकार यांत भेद असा की, परस्पर भावनेत फलाचा (मोबदल्याचा) स्पष्ट किंवा अस्पष्ट करार असतो. परोपकारात तो नसतो. अर्थात परोपकारानेही कोणतेतरी फळ मिळाल्याविना रहात नाही.’