‘सनातन धर्म’ आणि ‘आर्यधर्म’

‘धर्म’ म्हटले की कोणी ‘सनातन धर्म’ म्हणतो तर कोणी ‘वैदिक धर्म’ म्हणून धर्माला संबोधतो. प्रस्तूत लेखात आपण धर्माचे विविध समानार्थी शब्द त्यांचे अर्थ आणि वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

 

१. सनातन धर्म

१ अ. व्युत्पत्ती

‘सना आतनोति इति सनातनः ।’ सना म्हणजे शाश्वत अन् आतनोति म्हणजे प्राप्ती करून देते; म्हणून ‘सनातन’ म्हणजे शाश्वताची प्राप्ती करून देते ते.

१ आ. अर्थ

१ आ १. ‘सनातनो नित्यनूतनः ।’ म्हणजे जो शाश्वत, अनादी असूनही नित्यनूतन, म्हणजेच कधी जुनापुराणा होत नाही, त्याला ‘सनातन’ म्हणतात. जे नेहमी नवीन स्वरूप प्रकट करील, तेच टिकेल, उदा. झाडाला नवीन पालवी फुटेनाशी झाली की, ते झाड मरणार असे समजावे. भावार्थदीपिकेत (ज्ञानेश्वरी १.७१) संत ज्ञानेश्वर म्हणतात –

हें नित्य नूतन देखिजे । गीतातत्त्व ।।

अर्थ : या गीतातत्त्वाचा (गीतेचा) विचार करावयास जावे, तर (ते) प्रतिदिन नवीनच आहे, असे दिसते. (त्याचा नवनवीन अर्थ कळू लागतो.)

सनातन मधील ‘स’ हे सूर्याचे बीज आहे. सूर्य म्हणजे तेजतत्त्व.

१ आ २. सनातन यामधील ‘सन्’ म्हणजे चालू वर्तमानकाळ आणि ‘अतन’ म्हणजे शरीर नाही असा, म्हणजेच कालातीत. यालाच ब्रह्म असे म्हणतात.

 

२. वेदधर्म किंवा वैदिक धर्म

विद् म्हणजे जाणणे. ‘वेद’ हा शब्द ‘विद्’ या धातूपासून बनला आहे. वेद शब्दाचा अर्थ ज्ञान, ज्ञानाचा विषय किंवा ज्ञानाचे साधन असा होतो. ज्ञान म्हणजे आत्म्याचे किंवा ईश्वराचे ज्ञान, अनुभूती.

 

३. आर्यधर्म

आर्य लोकांचा हा धर्म; म्हणून याला `आर्यधर्म’ असेही संबोधितात.

३ अ. ‘आर्य’ कोणाला म्हणावे ?

मनुष्याच्या सर्वंकष उत्कर्षाच्या विरोधात येणार्‍या सर्व प्रकारच्या आंतरिक आणि बाह्य प्रवृत्तींचा विरोध मोडून काढून त्यांच्यावर जय संपादन करतो, तो ‘आर्य’ होय.

३ आ. आर्यांची वैशिष्ट्ये

१. प्राचीन काळापासून ‘आर्य’ हा शब्द वंशवाचक किंवा वर्णवाचक म्हणून नव्हे, तर संस्कृतीवाचक आणि गुणवाचक म्हणून वापरला गेला आहे.

२. ‘आर्य’ या शब्दाचा उल्लेख ‘एक धार्मिक प्रवृत्ती आणि आदर्श विचारप्रणाली’ असाही करण्यात येतो.

३. आर्य या शब्दाद्वारे मानवजातीचा सर्वांगीण विकास साधणारे तत्त्व, धर्मशीलता, चारित्र्यता, निःश्रेयस, सत्य, नीतीमत्ता, समाजजीवनासाठी आदर्श, तेजस्वीपणा, ज्ञानप्राप्तीची तीव्र तळमळ, दुबळ्या आणि पीडित जनांचे रक्षण करण्याची क्षमता इत्यादी कित्येक गुणांचा बोध होतो.

४. आर्य रज-तमप्रधान प्रवृत्ती आणि वासना यांपासून स्वतःला दूर ठेवतात; म्हणून ते मनोविजयी, आत्मविजयी आहेत.

५. आर्यांची वृत्ती ही नेहमी सत्यशोधक, विजिगीषू आणि दृढनिश्चयी राहिली आहे.

३ इ. आर्यांचे जीवितकर्तव्य

जीवनात ईश्वरप्राप्तीसाठी अहर्निष साधना करून त्या योगे मनुष्यजन्माचे सार्थक करणे, हे आर्यांचे जीवितकर्तव्य असते. आर्य स्वतःच्या उद्धारासह संपूर्ण मानवजातीला सत्य, ज्ञान आणि आनंद ही शाश्वत जीवनमूल्ये मिळवून देण्याच्या कामी साहाय्यभूत ठरतात. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी ‘कृण्वन्तो विश्वमार्यम्’, म्हणजे ‘सार्‍या जगाला आर्य (सुसंस्कृत) करू’, असे सांगितले होते.

३ उ. आर्यांच्या ध्वजाच्या रंगाची वैशिष्ट्ये

आर्यांच्या ध्वजाचा रंग केशरी आहे. सकल विश्वाचे कल्याण हेच ब्रीद असलेल्या ऋषीमुनींच्या वस्त्रांचा रंगही भगवाच आहे. केशरी रंगाचे वैशिष्ट्य म्हणजे हा अग्नीज्वालेचा रंग आहे. ज्याप्रमाणे अग्नीज्वाला शुद्ध आणि पवित्र असते अन् तिच्या सान्निध्यात येणार्‍या प्रत्येकाला ती शुद्ध आणि पवित्र करीत असते, त्याचप्रमाणे आर्यही अखिल विश्वाला शुचित्व अन् पावित्र्य प्रदान करतात. अग्नी हा निर्मिती आणि नाश यांच्या संघर्षाच्या वेळी प्रज्वलित होत असतो. भगवा रंगही शाश्वताच्या निर्मितीच्या आणि अशाश्वताच्या लयाच्या संदर्भात अग्नीचे प्रतीक म्हणून वापरला आहे.

 

४. चैतन्यधर्म

हिंदुत्व म्हणजे चैतन्यवाद. चैतन्यामुळे धारणा होते; म्हणून हिंदु धर्माला ‘चैतन्यधर्म’ असेही म्हणतात.

 

५. ईश्वरी-धर्म

धर्म ईश्वरनिर्मित असल्याने याला `ईश्वरी-धर्म’ असेही म्हणतात.

 

६. मानवधर्म

मानव सनातन आहे; म्हणून धर्माला `मानवधर्म’ असेही म्हटले जाते. असे असले, तरी त्यात केवळ मानवाचा विचार न करता सर्व विश्वाचा विचार केलेला आहे.

 

७. विश्वधर्म

‘ज्ञानेश्वरमाउलीने धर्माला ‘विश्वधर्म’ असे संबोधिले आहे; कारण मानवाचा जन्म विश्वव्यापी ईश्वराच्या प्राप्तीसाठी आहे.’ – प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘धर्म’

Leave a Comment